Saturday, May 29, 2010

समरसता हाच मूल स्वर

समरसता हाच मूल स्वर

मुंबईतील शिवाजी पार्क येथे दि. ११ डिसेंबर २००५ रोजी झालेल्या बौध्दिक वर्गातील मा. सुदर्शनजींचे भाषण

''डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली संघ सुरू केला आणि व्यक्तिगत संपर्काच्या कार्यपध्दतीचा अवलंब केला. या कार्यपध्दतीवर बाह्य प्रचारतंत्राचा काहीही परिणाम होत नाही. आज काही विदेशी शक्ती आणि विदेशप्रेरित शक्ती संघाबद्दल अपप्रचार करीत असतात, परंतु या अपप्रचाराचा आजही फारसा विपरीत परिणाम होत नाही. हिंदू समाज संघटित होऊ शकतो यावर डॉक्टरांच्या काळी कुणाचा विश्वास नव्हता. जाती, पाती, पंथ, भाषा यांत विखुरला गेलेला समाज संघटित होईल असे कुणाला वाटत नव्हते, परंतु ध्येयवेडया माणसांनीच जगात मोठमोठी कार्ये करून दाखविली आहेत.
आज संघकार्याला ऐंशी वर्षे झालेली आहेत. आज संघकामात पाचवी पिढी आहे. आज येथे १९३४ साली स्वयंसेवक झालेले विनायकराव वालावलकर आहेत आणि नुकतेच संघात आलेले १३-१४ वर्षांचे किशोरवयीन स्वयंसेवकसुध्दा आहेत. त्यामुळे संघात तरुण पिढी येत नाही हा समज चुकीचा आहे हे सिध्द होते. डॉक्टरांनी जेव्हा संघ सुरू केला तेव्हा संघात फक्त तरुणच होते, परंतु संघाचे वय जसजसे वाढत चालले तसतसे तरुण पिढी आणि जुणी पिढी यांचे प्रमाणही वाढत चालले आहे आणि ते स्वाभाविकसुध्दा आहे.

संघाच्या ऐंशी वर्षांच्या काळात प्रत्येक पिढीचे योगदान आहे. १९२५ ते १९४५ या कालावधीत संघाच्या पहिल्या पिढीने रक्ताचे पाणी करून हे सिध्द केले की जाती, पाती, पंथ, भाषा या भेदांचा पलीकडे जाऊन हिंदू समाज संघटित होऊ शकतो. १९४० साली डॉक्टर खूप आजारी होते. हे आपले जिवावरचे दुखणे आहे हे ओळखून ते श्रीगुरुजींना म्हणाले, ''हे कार्य येथून पुढे आपल्याला चालवायचे आहे.'' २१ जून १९४० ला सकाळी .२५ ला डॉक्टरांनी शेवटचा श्वास घेतला. डॉक्टरांच्या अंतिम इच्छेप्रमाणे श्रीगुरुजी सरसंघचालक झाले.

आपल्या पहिल्या भाषणात श्रीगुरुजी म्हणाले, ''मतभेदांच्या कोलाहलात बुडणारी लेचीपेची संघटना डॉक्टरजींनी आपल्या स्वाधीन केलेली नाही. आपली संघटना म्हणजे अभेद्य किल्ला आहे. या किल्ल्यांच्या भिंतीवर चंचुप्रहार करणार्यांच्या चोची तुटून पडतील अशी कडेकोट बांधणी डॉक्टरांनी केली आहे.'' २१ जुलैला मासिक श्राध्दाच्या वेळी बोलताना गुरुजींनी सांगितले की, डॉक्टरजींच्या नंतरसुध्दा सर्व स्वयंसेवक पूर्वीप्रमाणेच कार्य करीत आहेत. यावरून हीच गोष्ट सिध्द होते की, डॉक्टरांनी आम्हाला रूढीवादी बनविलेले नाही. आम्हाला तत्त्वनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा याचीच शिकवण दिलेली आहे.

पहिल्या पिढीची शेवटची पाच वर्षे राष्ट्रजीवनात उलथापालथ करणारी होती. १९४० साली महंमदअली जीना यांनी पाकिस्तानची घोषणा केली. १९४२ साली महात्मा गांधींनी 'छोडो भारत' आंदोलन सरू केले. या आंदोलनात आपण भाग घेतला पाहिजे अशी अनेक प्रचारकांच्या मनात इच्छा झाली. अनेक प्रचारकांच्या मनातही हा विचार होता. सर्व प्रचारकांच्या वतीने दत्तोपंत ठेंगडींनी श्रीगुरुजींशी चर्चा केली. श्रीगुरुजी म्हणाले, ''आमचा पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती यांची रक्षा हिंदू समाज संघटन करून हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी राष्ट्रीय संघाचा घटक बनलेलो आहे असे आपण आपल्या प्रतिज्ञेत म्हणत असतो. त्यामुळे देशाला स्वतंत्र करण्यासाठी चालविल्या जाणार्या चळवळीत भाग घेण्याची इच्छा स्वयंसेवकांना होणे स्वाभाविक आहे, परंतु या चळवळीत काही दोष निर्माण झालेले आहेत. ही चळवळ सुरू करणार्यांनी ती सुरू करताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार्या अन्य सर्व संघटनांशी कोणताच संपर्क केलेला नाही. असं संपर्क करून या प्रकारचे देशव्यापी आंदोलन चालविण्यासाठी प्रत्येकाला त्याच्या रुचीनुसार आणि क्षमतेनुसार काम वाटून देण्याचा प्रयत्नही झालेला नाही. त्यांनी केवळ ठराव संमत केला इंग्रजांनी सर्व नेत्यांना तुरुंगात डांबले. त्यामुळे हे आंदोलन नेतृत्वहीन झाले. आम्हाला विचारले नाही यामुळे हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनविण्याची काही गरज नाही, परंतु आजमितीस आमचे काम केवळ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशापुरतेच मर्यादित आहे. अन्य प्रांतात फक्त दोन-चार ठिकाणीच शाखा आहेत. येथील कार्य पाहून लोकांना वाटते की, संघकार्य खूप मोठे आहे. आपण आंदोलनात भाग घेतला पाहिजे, परंतु मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र देशाच्या मध्यभागी आहोत. त्यामुळे दोन्हीकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. ब्रिटिश सरकारने असे काही केले आंदोलन असफल झाले तर लोकांमध्ये नैराश्याची भावना बळावेल. म्हणून संघ यात भाग घेणार नाही, परंतु वैयक्तिक रूपाने संघस्वयंसेवक यांत भाग घेऊ शकतात, असे गुरुजी म्हणाले.

इंग्रजांनी काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात टाकल्यामुळे आंदोलन नेतृत्वहीन झाले होते. अशा वेळी अनेक भूमिगत नेत्यांना स्वयंसेवकांनी आश्रय दिला. अरुणा असफअली या दिल्लीचे संघचालक लाला हंसराज यांच्या घरी १५ दिवस होत्या. साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन आदींनासुध्दा स्वयंसेवकांनी आपल्या घरात आश्रय दिला.

१९४५ नंतर संघाच्या दुसर्या पिढीचे कार्य सुरू झाले. १९४६ साली मुस्लिम लीगने 'डायरेक्ट ऍक्शन'ची घोषणा करून ठिकठिकाणी दंगे पेटविले. या दंग्यात अनेक ठिकाणी हिंदू कापले गेले. ज्या ज्या ठिकाणी शाखा सुदृढ होत्या त्या त्या ठिकाणी हिंदूंचे रक्षण करण्याचे कर्तव्य स्वयंसेवकांनी पार पाडले, तर ज्या प्रांतात लीगचे शासन होते तेथे पोलीस आणि सैन्य दंगेखोरांचे रक्षण करीत. हिंदू आयाबहिणींनी त्या काळी अतुलनीय बलिदान केले.

मुस्लिम दंग्यांचा परिणाम होऊन १९४७ साली देशाची फाळणी झाली. महात्मा गांधी म्हणायचे - माझ्या देहाचे तुकडे होतील, पण देशाची फाळणी होणार नाही. पंडित नेहरू म्हणायचे - पाकिस्तानची मागणी फँटॅस्टिक नॉन्सेन्स आहे. परंतु मुस्लिम दंग्यांपुढे शरणागती स्वीकारून देशाच फाळणी ही स्वीकारली गेली. या काळात स्वयंसेवकांनी आणखी एक मोठे कार्य केले. संसदेला उडवून देण्याची योजना मुस्लिम लीगने आखली होती. स्वयंसेवकांनी मुसलमानांसारखे वेषांतर करून लीगच्या कार्यालयातून ही कागदपत्रे मिळवली आणि ती सरदार पटेल यांना नेऊन दिली. सरदार पटेल यांनी या माहितीच्या आधारे ठिकठिकाणी छापे मारून दिल्ली वाचवली.

श्रीगुरुजींनी फाळणीच्या विरोधात प्रचार सुरू ठेवला होता. तेव्हा संघ आणि काँग्रेस एकत्र आले असते तर कदाचित फाळणी टाळता आली असती, परंतु लॉर्ड माऊंटबॅटन यांनी धूर्तपणे फाळणीची योजना पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या गळी उतरवली. गांधीजींच्या लक्षात आले की जनमत आपल्या विरोधात आहे.
त्यावेळी संघाने फाळणीला विरोध केला असत तर लोक म्हणाले असते, ''खंडित का होईना परंतु स्वातंत्र्य मिळाले आहे आणि संघ मात्र याचा विरोध करीत आहे. ही फाळणी थोडीच टिकणार आहे. काही दिवसांनी सर्व एक होईलच. संघवाल्यांनी उगीच विरोध कशाला करावा?'' तयावेळचय प्रचारतंत्रामुळे 'संघ फाळणीच्या विरोधात आहे, संघ स्वातंत्र्याच्या विरोधात नाही.' ही गोष्ट लोकांपर्यंत मुळीच पोहोचली नसती, म्हणून फाळणी चुकीची आहे हे जाणूनसुध्दा संघाने सार्वजनिक रूपाने व्यापक पातळीवर तिला विरोध केला नाही. इंग्रजांना माहित होते की संघ आणि काँग्रेस या दोन्ही हिंदुत्वशक्ती आहेत. यांची आपापसांत साठमारी होऊन हिंदुत्व नष्ट झाले की आपोआप भारतावर आपला कब्जा ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. यामुळे गुरुजींनी अंतर्गत कलह टाळला.

श्रीगुरुजींनी फाळणीची मीमांसा करताना म्हटले की, हिंदूंचे विघटन आणि दुर्बलता यामुळे फाळणी झाली आहे. ही कारणे दूर केली तर देश पुन्हा अखंड होईल. फाळणीने विस्थापित झालेल्या आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी पंजाब सहायता समिती आणि वास्तुहारा सहायता समिती गठित करण्यात आली. यावेळी १९ जानेवारी १९४८ ला श्रीगुरुजींनी मुंबईतील एका सभेत 'वयं पंचाधिकं शतम्' हे अजरामर भाषण केले. श्रीगुरुजी म्हणाले, ''आपण आपापसात लढू नये, पण पाकस्तानच्या विरोधात लढताना आपण एकशेपाच आहोत याचे भान ठेवावे.''

या कालखंडात श्रीगुरुजींच्या विराट सभा होत होत्या. त्यामुळे नेहरूंच्या मनात श्रीगुरुजींविषयी ईर्ष्या निर्माण झाली. ते संघावर बंदी घालण्याची भाषा करू लागले. २९ जानेवारी १९४८ रोजी अमृतसरला ते म्हणाले, ''जातीयवादी शक्तींचा (संघाचा) आम्ही नायनाट करू.'' ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा गुरुजी चेन्नईत होते. आपला प्रवास रद्द करून ते नागपूरला परतले. तेथे त्यांना ३०२, ३०५, ३०७ कलमे लावून अटक करण्यात आली. पुढे ही कलमे काढण्यात आली. फेब्रुवारी १९४८ रोजी संघावर बंदी घालून हजारो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. गांधीजींच्या हत्येत संघाचा हात नसल्यामुळे अन्याय निवारणार्थ सत्याग्रह करण्यात आला. शेवटी सरकार नमले संघबंदी उठविण्यात आली.

वर्षातून दोनदा श्रीगुरुजींनी संपूर्ण देशभर प्रवास केला. जून १९७३ ला त्यांचे निधन झाले. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत. या जन्मशताब्दी वर्षाच्या सर्व कार्यक्रमाचा मूळ स्वर आहे 'सामाजिक समरसता.' संघाच्या प्रारंभापासूनच हिंदू-हिंदूंत आपण कोणताही भेदभाव केलेला नाही. १९३४ साली वर्धा येथील संघ शिबिराला महात्मा गांधी यांनी भेट दिली. शिबिरात स्पृश्य-अस्पृश्य असे सर्व हिंदू जातिभेद विसरून एकत्र भोजनादी कार्यक्रम करताना पाहून ते म्हणाले, ''जे काम इतक्या वर्षांपासून आम्ही करीत आहोत ते संघाने अतिशय साध्या सोप्या पध्दतीने केलेले आहे.''
अशाच प्रकारे पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाच्या शिबिरात भोजनाच्या वेळी आले असताना डॉक्टरांनी त्यांना सर्वांसोबत भोजन करण्याचा आग्रह केला. त्यामुळे संघात अस्पृश्यतेला मुळीच स्थान नाही अशी त्यांची खात्री पटली. एकदा संघ शिक्षा वर्गात एक सफाई कर्मचारी असलेला स्वयंसेवक भोजनाच्या वेळी कोपर्यात संकोचून उभा होता. त्यावेळी गुरुजींनी त्याच्या मनातील भाव ओळखून त्याला सांगितले की, ''आपण सर्व सारखे आहोत. तेव्हा आधी तू मला वाढ सर्वांनाही वाढप कर.''

संघात जरी भेदभाव पाळला जात नाही तरी समाजात मात्र तो पाळला जातो. अस्पृश्यतेची भावना लोकांच्या मनातून काढून टाकण्यासाठी आपण हिंदू धर्माचार्यांची मदत घेतली पाहिजे असे श्रीगुरुजींना वाटले.

भारतातून वेस्ट इंडिजला गेलेल्या मजुरांनी रामायणाच्या आधारावर आपले हिंदुत्व टिकवून ठेवले होते. त्यांना धार्मिक विधीसाठी इंग्रजी जाणणार्या पुरोहिताची गरज होती, परंतु सेक्युलरवादाचे कारण सांगून भारत सरकारने त्यासाठी नकार दिला. तेव्हा तेथील पंडित शंभूनाथजींनी श्रीगुरुजींची भेट घेतली होती. गुरुजींनी विचार केला की विदेशात राहणार्या हिंदूंच्या गरजांची पूर्तता करायला हवी. तसेच आपल्या देशात झोपडपट्टयांतून राहणार्या अनुसूचित जाती-जमातींच्या बांधवांना संस्कार प्रदान करण्याची गरज आहे. वनांचलात राहणार्या अनुसूचित जनजातीच्या बांधवांनाही समाजाबरोबर समरस करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. १९६४ साली स्वामी चिन्मयानंदांच्या सांदिपनी आश्रमात श्रीगुरुजींनी शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य आदी सर्व धर्माचार्य जैन, बौध्द, शीख संप्रदायाच्या प्रमुखांना एकत्र बोलविले. संपूर्ण हिंदू समाजाचा विचार करून या सर्वांना एकत्र आणण्यासाठी एका समान व्यासपीठाची निर्मिती करण्याचे ठरले विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली.

१९६६ साली प्रयागला कुंभमेळयाच्या वेळी विश्व हिंदू परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनात सर्व धर्माचार्यांनी एकमुखाने घोषणा केली - 'हिन्दवा सोदरा सर्वे:' म्हणजे सर्व हिंदू बंधू आहेत. पुढे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी श्रीगुरुजी सर्व धर्माचार्यांसोबत संपर्क साधून विचारविनिमय करत राहिले. त्यानंतर उड्डुपीत झालेल्या संमेलनास १३५ धर्माचार्य व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी घोषणा केली की, 'अस्पृश्यता मानणे हे धर्मविरोधी कृत्य आहे. आमच्या मूळ धर्मग्रंथात - वेदात कोठेही अस्पृश्यतेचे समर्थन केलेले नाही.' या संमेलनात ' हिंदू पतितो भवेत्' (कुणीही हिंदू पतित होऊ शकत नाही.) हा ठराव संमत झाल्यावर श्रीगुरुजी अतिशय हर्षभरित झाले. ते जेव्हा व्यासपीठावरून खाली उतरले तेव्हा सभेचे अध्यक्ष असलेल्या भरनैयांनी त्यांना आनंदाने मिठी मारली. भरनैया हे अनुसूचित जातीचे होते, परंतु संमेलनात त्यांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव दृष्टीस पडला नाही अनुभवाला आला नाही. म्हणून ते गुरुजींना म्हणाले, ''तुम्ही आम्हाला वाचविलेत.'' तेव्हा गुरुजी म्हणाले की, ''संपूर्ण हिंदू समाज आपल्या पाठीशी उभा आहे!''

मध्व संप्रदायाचे स्वामी विश्वेशतीर्थ यांनी सफाई कर्मचार्यांच्या वस्तीत जाण्याचे ठरविल्यानंतर संप्रदायाच्या प्रतिनिधी मंडळाने या गोष्टीस हरकत घेतली. ''एखाद्या अस्पृश्याचा स्पर्श झाला असता सचैल स्नान करावे असे शास्त्रात लिहिले असतानाही तुम्ही त्यांच्या वस्तीत का जाता?'' त्यावेळी स्वामीजींनी असे सडेतोड उत्तर दिले की, ''यवनाचा स्पर्श आपल्या शरीरास झाल्यास तो भाग कापून टाकावा असेही शास्त्रात लिहिले आहे. त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही ख्रिश्चन मुसलमानांशी बरोबरीचा व्यवहार करता आणि आपल्याच बांधवांना अस्पृश्य मानून दूर कसे लोटता?'' स्वामीजी त्या वस्तीत गेल्यावर बांधवांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले.

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य अनुसूचित जातीच्या बांधवांच्या गावाजवळून जात असताना त्या लोकांनी त्यांना आपल्या वस्तीत येण्याची विनंती केली. शंकराचार्य गावात आल्यावर त्यांचे प्रेमाने स्वागत करून आम्हाला एखादी कथा सांगा, असा गावकर्यांनी आग्रह केला. तेथील लोकांची अत्यंत हलाखीची स्थिती असून त्यांनी धनदौलत वा कपडालत्ता देण्याचा नव्हे तर कथा सांगण्याचा आग्रह धरावा हे विशेष. शंकराचार्यांनी रामायणातील कथा सांगून त्यांचे मनोरथ पूर्ण केले. गुजरातमध्ये सौराष्ट्र प्रांतात दुष्काळ पडला असताना तेथील संघकार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्तांना पाठविण्यासाठी सुखडीचे संकलन सुरू केले. तेथील संकलन केंद्रावर एक वृध्द भिकारीण आली. कार्यकर्त्यांना वाटले की ती सुखडी मागण्यासाठी आली आहे. मात्र मिळालेल्या भिक्षेतून तयार केलेले सुखडीचे दोन तुकडे दुष्काळग्रस्तांना पाठविण्याकरिता देण्यासाठी ती आलेली होती. गावोगावी चालणार्या कथा कीर्तनातून आणि प्रवचनातून असे जनमानस या देशात घडलेले आहे. तेथे सांस्कृतिक विकास साधलेला आहे. तेथील सामन्य व्यक्तीही असामान्य अंत:करणाची धनी आहे. असे पाश्चिमात्य देशात आढळत नाही. अमेरिकेवर कॅटरिनाचे संकट आले तेव्हा न्यू ऑर्लियन्सला पंचवीस हजार निग्रो अन्नपाण्यावाचून तडफडत असताना राष्ट्राध्यक्ष बुश सुट्टीचा आनंद लुटत होते. पाश्चिमात्यांनी केवळ शरीर, मन आणि बुध्दी या तीनच गोष्टी स्वीकारल्या आहेत. त्यांनी आत्मतत्त्व जाणून घेतलेले नाही. प्रत्येकाचे शरीर, मन बुध्दी वेगवेगळी असल्यामुळे या तीन गोष्टी समाजाला जोडू शकत नाहीत. वर्चस्व हाच पाश्चिमात्य सभ्यतेचा मूळ स्वर आहे. संपूर्ण जगावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सामाजिक, आर्थिक राजकीय क्षेत्रांत आपलेच वर्चस्व असावे असे त्यांना वाटते. तेथील धर्मपंथांचीही हीच गत आहे. ख्रिश्चनांना वाटते की संपूर्ण जगाचे ख्रिस्तीकरण झाले पाहिजे. टेक्सासमधील डल्लास येथील संमेलनात ७१ देशांतून ७२ चर्चचे प्रतिनिधी आले होते. त्यांना आपापसातील वितुष्ट संपवून संपूर्ण जगाच्या ख्रिस्तीकरणासाठी प्रयत्नरत होण्याचे आवाहन उद्घाटकाने केले. दुसरीकडे कट्टरपंथीय इस्लामी लोकसुध्दा संपूर्ण जगाला मुस्लिम बनविण्यासाठी जिहादच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत.

या सर्व आसुरी शक्तींना पराजित करण्यासाठी दैवी शक्तीची आवश्यकता आहे. इंद्रियांच्या पलीकडे मन असते, मनाच्या पलीकडे बुध्दी आणि बुध्दीच्या पलीकडे आत्मतत्त्व असते. या आत्मतत्त्वाचा साक्षात्कार भारतीयांना झालेला आहे. या तत्त्वज्ञानाच्या आधारावर संपूर्ण जगाला एकतेचा आणि 'वसुधैव कुटुंबकम्' हा संदेश देण्याचे कार्य भगवंतानेच आपल्यावर सोपविलेले आहे. हेच आपले जीवनकार्य आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' हे आपल्या राष्ट्राचे जीवनध्येय आहे, परंतु ध्येय कितीही श्रेष्ठ जरी असले त्याच्या पाठीमागे सामर्थ्याचे पाठबळ नसले तर तुमचे कुणीच ऐकणार नाही. जोपर्यंत अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन घडवले नव्हते तोपर्यंत अर्जुन त्याचे ऐकायला तयार नव्हता शंकाकुशंका काढत होता. विश्वरूप दर्शन झाल्यावर मात्र त्याला गीतोपदेश पटला तो लढण्यास तयार झाला. आत्मतत्त्वाचा साक्षात्कार घडवून आपल्याला सर्व प्रकारचे भेदभाव संपवायचे आहेत. आपल्या घरात काम करणारी मोलकरीण अथवा सफाई कर्मचारी यांना आपण सण-उत्सवात सहभागी करून घेतले पाहिजे. त्यांना आपल्याबरोबर पंगतीला भोजनासाठी बोलावले पाहिजे. काही ठिकाणी स्वयंसेवक या गोष्टी करीत आहेत. त्या आपण सर्वजणांनी केल्या पाहिजेत. दलित, गोंड, संथाल इत्यादी हिंदू समाजापासून वेगळे आहेत असा अपप्रचार करून या बांधवांना फुटीरतावादी शक्ती त्यांचे भक्ष्य बनवत आहेत. त्यांचे प्रयत्न आपण हाणून पाडले पाहिजेत.

सामाजिक समरसतेला केंद्रस्थानी मानून येत्या वर्षभरात भारतातील सर्व स्वयंसेवकांनी सामाजिक समरसता प्रस्थापित करण्यसाठी आचरणातून एक आदर्श प्रस्तुत केला पाहिजे. १९९० साली नागपुरात धर्मसंसद झाली होती तेव्हा शंकराचार्य, मध्वाचार्य सर्व धर्माचार्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता. काशीत धर्मसभा झाली तेव्हा ज्या डोमराजाच्या हाताखाली सत्यवादी राजा हरिशचंद्राने काम केले होते. त्याच्या वंशजाच्या घरी जाऊन सर्व धर्माचार्यांनी भोजन केले होते. अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी कामेश्वर चौपाल या अनुसूचित जातीच्या बांधवांच्या हातून शिलान्यास करण्यात आला होता. अशा रीतीने सर्व धर्माचार्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्या आदर्शाला अनुसरून सर्व समाजाला जागविण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट जेव्हा आपण करू तेव्हा संपूर्ण विश्वाला आपण नवीन संदेश देऊ, अशीच भविष्यवाणी आहे.

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गुरुबंधूंना १८९३-९४-९५ साली पत्रे लिहिली होती. त्या पत्रांत ते म्हणतात, '१८३६ साली जेव्हा रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला तेव्हाच युगपरिवर्तनाचा सूत्रपात झाला होता. एका नव्या सुवर्णयुगाच्या प्रारंभाची घोषणा झाली होती.' योगी अरविंद यांनी असे म्हटले आहे की, 'युगसंधीचा काळ १७५ वर्षांचा आहे. एक युग संपून दुसर्या युगाचा प्रारंभ जेव्हा होतो त्या दरम्यानच्या काळास युगसंधीचा काळ म्हणतात.' १८३६ मध्ये आपण १७५ वर्षे मिळवली तर २०११ हे वर्ष आपल्याला दिसते. म्हणून २०११ पासून भारताचा वैभवसूर्य अधिक तेजाने चमकू लागणार. येणार्या काळात संपूर्म जगाला एकता आणि बंधुभावाच्या सूत्रात गुंफण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आम्हाला नष्ट करण्यासाटी आसुरी शक्ती प्रयत्नशील आहेत. परंतु त्यांना घाबरात आपण यशस्वी होणारच!''

--------------------------------------------
साभार: सा. विवेक श्रीगुरुजी आणि सामाजिक समरसता विशेषांक

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive