Thursday, May 13, 2010

Marathi Novel Ch-2:आभाळ कोसळलं (शून्य- कादंबरी)

Marathi Novel Ch-2:आभाळ कोसळलं (शून्य- कादंबरी)

अँजेनीने तिची कार अपार्टमेंटच्या पार्किंगच्या जागेकडे वळविली तेव्हा समोर तिला मगाशी दिसलेली पोलीस व्हॅन पार्क केलेली दिसली. तिला धडधडायला लागलं. काय झालं असावं? ती कारमधून उतरून आपल्या शॉपींग बॅग्ज सांभाळत घाईघाईने लिफ्टकडे गेली. लिफ्ट उघडून दोन पोलीस बाहेर येत होते. पोलीसांना पाहून ती अजूनच अस्वस्थ झाली. तिने लिफ्टमध्ये जाऊन बटन दाबले ज्यावर लिहिले होते 10. लिफ्टमधून बाहेर आल्या आल्या जेव्हा अँजेनीने आपल्या सताड उघड्या फ्लॅटसमोर गर्दी बघितली, तिला हातपाय गळाल्यासारखे झाले. तिच्या हातातल्या शॉपींग बॅग्ज गळून पडल्या. ती तशीच गर्दीकडे धावत निघाली. "काय झालं?" तिने कसबसं जमलेल्या लोकांना विचारलं. सगळे जण गंभीर होऊन फक्त तिच्याकडे बघायला लागले . कुणीही बोलायला तयार नव्हता. ती घरात गेली. बेडरूमकडे सगळ्या पोलिसांचा रोख पाहून ती बेडरूमकडे गेली. जाता जाता तिने पुन्हा एका पोलिसाला विचारले " काय झालं?". तो फक्त बेडरूमच्या दिशेने बघायला लागला. ती घाईघाईने बेडरूममध्ये गेली. समोरचे दृष्य पाहून तिचे राहिलेलेे अवसानसुध्दा गळून गेले. समोर तिच्या नवऱ्याचे रक्तबंबाळ मृत शरीर पाहून ती जागेवरच कोसळली. कसेबसे तिच्या तोंडून निघाले- " सानी...". तिची ती स्थिती पाहून तिला सावरण्यासाठी जॉन तिच्याजवळ गेला. त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण हे काय? जॉनच्या लक्षात आले की तिचा श्वासोश्वास बंद पडला होता. जॉनने पटकन आदेश दिला " अलेक्स कॉल डॉक्टर इमीडीएटली ... आय थींक शी हॅज गॉट ट्रिमेंडस शॉक". अलेक्स पटकन फोनकडे गेला. जॉनला काय करावे काही सुचत नव्हते. "सर शी नीड्स आर्टिफिशीअल ब्रीदिंग" कुणीतरी सुचविले. जॉनने आपल्या तोंडातून तिच्या तोंडात हवा भरली आणि तिचे हृदय सुरू होण्यासाठी तिच्या छातीवर जोर देऊन दाब द्यायला लागला 101 , 102, 103. मोजून त्याने पुन्हा एकदा तिच्या तोंडात हवा भरली आणि तिच्या छातीवर जोर देऊन दबाव द्यायला लागला 101 , 102, 103. असे अजून एकदोन वेळ करून जॉनने तिचा श्वास बघितला. एकदा गेलेला श्वास पुन्हा परत यायला तयार नव्हता. एव्हाना त्याचे साथीदार जवळ येऊन जमा झाले होते. शेवटचा एक प्रयत्न म्हणून तो तिच्या तोंडात हवा भरून मोजायला लागला 101 , 102, 103. हॉस्पिटलमध्ये अँजेनीला इंटेसीव्ह केअर युनिट मध्ये हलविण्यात आले होते. बाहेर दरवाजाजवळ जॉन आणि त्याचा एक साथीदार उभा होता. तेवढ्यात आय.सी.यू मधून डॉक्टर बाहेर आले. बाहेर येताच त्यांनी त्यांच्या तोंडावरचे हिरवे कापड बाजूला सारले. जॉन त्यांच्या जवळ येऊन ते काय म्हणतात याची आतुरतेने वाट पाहू लागला. " शी इज आऊट ऑफ डेंजर .... नथींग टू वरी" डॉक्टर म्हणाले. तेवढ्यात जॉनच्या मोबाईलची घंटी वाजली. जॉनने मोबाईलचे एक बटन दाबून कानाला लावला , " यस सॅम" तिकडून आवाज आला " सर , आम्ही त्याला सगळीकडे शोधलं पण तो आम्हाला सापडला नाही. " " नाही सापडला? ... आपण येण्यात आणि तो जाण्यात असे किती वेळाचे अंतर होते?... तो जवळपासच कुठेतरी असायला पाहिजे होता." जॉन म्हणाला. " नाही सर.... कदाचित त्याने नंतर त्याचा टी शर्ट बदलला असावा कारण आम्ही जवळपासच्या सर्व पोलीस चौकींवर माहिती देऊन सुध्दा तो सापडला नाही" तिकडून आवाज आला. " बर त्याचं स्केच तयार करायला लागा.... आपल्याला त्याला पकडलंच पाहिजे" जॉनने आदेश दिला. "यस सर" तिकडून आवाज आला. जॉनने मोबाईल बंद केला आणि तो डॉक्टरांना म्हणाला, " अच्छा, आम्ही आता निघतो... टेक केअर ऑफ हर ... आणि जर काही प्रॉब्लेम असला तर आम्हाला कळवा." " ओके" डॉक्टर म्हणाले. जाता जाता जॉन त्याच्या सहकाऱ्याला म्हणाला , " तिचे नातेवाईक असतील तर माहित करा आणि त्यांना इन्फॉर्म करा" " यस सर" जॉनचा सहकारी म्हणाला.
....(
क्रमशः)


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive