Thursday, May 27, 2010

एक अमेरिकन प्रेमकथा

एक अमेरिकन प्रेमकथा


ऒर्कुटवर काही असे काही लोक असतात की जे स्वत:चे पूर्ण नाव, सविस्तर खरा पत्ता, तसेच खरा दूरध्वनी क्रमांक देखील प्रोफ़ाईलवर लिहून ठेवतात. इतकेच काय जोडीला त्यांची खरे छायाचित्रे देखील हजर असतात. तर इतर काही प्रकारचे लोक खरा दूरध्वनी क्रमांक पत्ता तर सोडाच आपले खरे नाव ही लिहीत नाहीत. तर स्वत:ची छायाचित्रे म्हणून विदेशी बालकांची छायाचित्रे लावून ठेवतात. (कृपया इथे कुणालातरी व्यक्तिश: दुखविण्याचा उद्देश असल्याचा गैरसमज करुन घेऊ नये.) पुन्हा त्यात आश्चर्य म्हणजे अशा भिन्न प्रकारच्या लोकांमध्ये मैत्री देखील होते. हे पाहून मला पूर्वी वाचलेली एक अमेरिकन प्रेमकथा आठवली. ती इथे मांडत आहे.

 

स्त्री आणि पुरूष यांच्या मूळातच भिन्न असलेल्या स्वभाव वैशिष्ट्यांचे सारे पैलू उलगडून दाखविणारी ही कथा आहे.

 

जागेअभावी कथा अगदीच थोडक्यात मांडत आहे. कथेचा संपूर्ण आनंद घेण्याकरीता मूळ कथाच वाचावी लागेल. असो नमनालाच घडाभर तेल गेले, तर विल्सन नावाचा एक तरूण एक सुंदर शृंगारिक कादंबरी वाचतो. त्यातील आवडलेल्या वाक्यांवर खुणा करून ठेवतो रिकाम्या जागेवर स्वत:चा अभिप्राय स्वत:ला सूचलेल्या काही काव्यपंक्ती तसेच स्वत:चे पूर्ण नाव पत्ताही लिहून ठेवतो. पुढे ती कादंबरी वाचून झाल्यावर तो ती एका वाचनालयास भेट देतो.

पुढे ती कादंबरी रोझी नावाची एक महिला वाचावयास घेते. त्यावर विल्सनने केलेल्या खुणा त्याने केलेल्या काव्यपंक्ती वाचून ती त्याला दाद देणारे एक पत्र लिहून ते त्याने पुस्तकावरच लिहून ठेवलेल्या त्याच्या पत्त्यावर पाठविते. त्या पत्रात ती स्वत:ला सूचलेल्या काही काव्यपंक्तीही सोबत लिहून पाठविते. तिचे पत्र पाहून विल्सन काहीसा चकित बराचसा आनंदी होतो. तिच्या पत्राला उत्तर म्हणून तो तिला स्वत:च्या अजूनही काही रचना तसेच स्वत:ला आवडलेल्या इतरही काही पुस्तकांची नावे लिहून तिने तिच्या पत्रावर लिहीलेल्या पोस्ट बॊक्स क्रमांकावर पाठवितो.

यानंतर हा पत्रांचा सिलसिला असाच चालू राहतो त्या दोघांची घनिष्ट पत्रमैत्री होते. विल्सन आपला भोळा-भाबडा, गरीब बिच्चारा पुरूष असल्यामूळे (खरे तर पुरूषांच्या मूळ स्वभावाप्रमाणे उतावळा असल्यामूळेच) एका पत्रात तिला तिच्यावरील आपल्या प्रेमाची कबूली देतो. तसेच सोबत तिला स्वत:चे नुकतेच काढलेले छायाचित्र पाठवून तिच्याही छायाचित्राची मागणी करतो. . रोझी ही (आपली नव्हे) एक चाणाक्ष, धूर्त पक्की व्यवहारी स्त्री असल्यामूळे (खरे तर स्त्रियांच्या मूळ स्वभावाप्रमाणे सावध असल्यामूळेच) विल्सनला प्रेमाची कबूली देण्याच्या फ़ंदात अजिबात पडत नाही. तसेच ती स्वत:चे छायाचित्र देखील त्याला पाठवित नाही. वर ते पाठविण्याचे छानसे स्पष्टीकरणही लिहून पाठविते ते असे

प्रिय विल्सन, मी माझे छायाचित्र मुद्दामच पाठवत नाही. कारण समजा मी जर सुंदर, तरूण असेल तर मला यापुढे असे वाटत राहील की तू माझ्या व्यक्तिमत्त्वावर प्रेम करीत नसून माझ्या सौंदर्यावर प्रेम करीत आहे. याउलट, जर का मी वयस्कर, कुरूप असेन तर मला असे वाटत राहील की, तूला मी अजिबात आवडलेली नसून तू आता केवळ नाईलाजास्तव पत्रव्यवहार चालू ठेवत आहेस (म्हणजे पाहा स्वत: नेमकी कशी दिसते ते लिहीलेच नाही. किती बनेल बाई!) तेव्हा धीर धर आणि वाट पाहा. आपण आपला पत्रव्यवहार असाच चालू ठेऊ आणि आपल्या प्रेमाची परीक्षा पाहू. (खरे तर विल्सनचा अंत पाहू असेच तिला म्हणायचे असेल)

तिच्या या उत्तराने विल्सन हिरमूसला होतो. परंतू तरीही जिद्दीने चिकाटीने तो पत्रव्यवहार चालू ठेवतो. रोझीही त्याच्या पत्रांना उत्तरे पाठवित राहते. विल्सन तिच्यात आधिकाधिक गुंतत जातो. आता तो अस्वस्थ होतो, कधी एकदा रोझीला पाहू असे त्याला होते. परंतू रोझीचा पत्तादेखील त्याला माहीत नसतो. ती नेहमीच स्वत:चा फ़क्त पोस्ट बॊक्स क्रमांकच त्याला कळवित असते. शेवटी तो तिला भेटण्याची विनंती करतो. सुरुवातीला ती टाळाटाळ करते. परंतू विल्सन प्रत्येक पत्रात तीच मागणी करतो तेव्हा ती शेवटी (एकदाची) तयार होते. तो तिला रेल्वे स्थानका जवळील प्रिन्स हॊटेल मध्ये बोलवितो. . परंतू रोझी त्याला आपण रेल्वेने अगोदर स्थानकावर येऊ विल्सनने तिला तेथून प्रिन्स हॊटेल मध्ये घेऊन जावे असे सूचविते. पण विल्सन रेल्वे स्थानकावर रोझीला कसा काय ओळखणार? त्याने तिला पुर्वी कधीच पाहिलेले नसते. तेव्हा आपल्या हातात आपण लालभडक गुलाबाचे फ़ुल धरू असे रोझी त्याला कळवते. त्याप्रमाणे ठरल्या दिवशी ठरल्या वेळेला विल्सन रेल्वे स्थानका पाशी पोहोचतो. रेल्वे स्थानकावर असलेल्या मोजक्या उतारूंपैकी फ़क्त दोनच स्त्रिया असतात. त्यापैकी एक अप्रतिम लावण्यवती, लाल गुलाबाप्रमाणे सुंदर लाल पोशाखात उभी असलेली नव यौवना असते. तिला पाहताच 'पाहताच ती बाला कलिजा खलास झाला' अशी विल्सनची अवस्था होते.

ही तरूणीच रोझी असावी असे त्याला मनोमन वाटते. तो पुढे जाऊन तिच्या जवळ उभा राहतो. परंतू तिच्या नजरेत त्याला कसलीच ओळख दिसत नाही. इतक्यात त्याचे तिच्या हातांकडे लक्ष जाते. आणि हाय रे दैवा! तिच्या सुंदर लाल हातमोजे घातलेल्या हातांध्ये त्याला लाल गुलाबाचे फ़ुल कूठेच दिसत नाही. म्हणजे अखेर ही रोझी नाही तर. त्याला धक्काच बसतो. ती पुढे रेल्वे स्थानका बाहेर निघून जाते. तो विचार करीत असतानाच त्याच्या समोर एक मध्यमवयीन सामान्य रूपाची महिला येऊन उभी राहते. ती जुनी ओळख असल्याप्रमाणे आपल्याकडे बघून का हसते आहे असे तो तिला विचारणार इतक्यात त्याचे तिच्या हातांकडे लक्ष जाते. तिच्या हातात सुंदर लाल गुलाबाचे फ़ुल असते.

हा दुसरा धक्का पचविणे विल्सनला खरोखरच अवघड वाटते. पण क्षणभरच! मग तो विचार करतो. ही रूपाने सुंदर नसेना का, पण ही मनाने ही नक्कीच सुंदर आहे. हिने मला किती सुंदर पत्रे लिहीली. आमची दोघांची मने एकमेकांशी किती जुळली आहेत. असे असूनही अल्पकाळाकरीता का होईना पण आपण एका परक्या स्त्रिचा मोह धरला या आपल्या अक्षम्य अपराधाबद्दल तो स्वत:ला मनातल्या मनात अनंत दूषणे देतो. नंतर तो तिच्याकडे वळून म्हणतो, " चल रोझी, आपण बाजूच्या प्रिन्स हॊटेलात जाऊन बोलूयात" तीही त्याच्यासोबत लगेच प्रिन्स हॊटेलात जाते. तिथे गेल्यावर ती स्वागतकक्षात खोली क्रमांक १०२ कोठे आहे असे विचारते. विल्सन चकित होऊन तिला त्याबद्दल काही विचारणार इतक्यात ती त्याला गप्प राहण्यास सांगते. . त्यानंतर ते दोघेही खोली क्रमांक १०२ पाशी जातात. ती महिला दरवाजा ठोठावते आणि म्हणते,"मादाम तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी माझ्या व्यवस्थित लक्षात होत्या. तुम्ही सांगितलंत त्याप्रमाणे मी ह्या साहेबांसमोर लाल गुलाबाचे फ़ुल घेऊन उभी राहिले. त्यानंतर तुम्ही सांगितलंत की हे साहेब मला टाळून निघून गेले तर त्यांना काही सांगता मी तुमच्या परतीच्या प्रवासाचे तिकीट काढून आणावे. पण तसं घडलं नाही. उलट ह्या साहेबांनी मला 'रोझी' म्हणून हाक मारली मला ते ह्या हॊटेलात घेऊन आलेत. आता काय करायचे ते तुम्ही मला सांगितलेच नाहीत म्हणून मी तुमच्या आरक्षित खोली पाशी आले आहे. तेव्हा कृपया दार उघडा रोझी मादाम." तिचे हे बोलणे ऎकून विल्सन चकीत झाला असतानाच खोलीचे दार उघडून थोड्या वेळापुर्वी रेल्वे स्थानकावर दिसलेली ती लाल पोशाखातली स्वरूपसुंदरी विल्सनच्या समोर आली.

 

पुढे काय घडले ते तुम्ही जाणले असेलच.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive