उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, नौदलप्रमुख निर्मल वर्मा आणि निवृत्त व्हाईस अॅडमिरल मनोहर आवटी यांनी त्यांचे स्वागत केले. याआधी परिक्रमेच्या अंतिम टप्प्यात मुंबई बंदरात येत असताना नौदलाच्या स्पीड बोट आणि हेलिकॉप्टरनी दोंदे यांच्या बोटीची सोबत केली. बंदरात दाखल होत असताना कमांडर दोंदे यांना आयएनएस दिल्लीसह, आयएनएस म्हैसूर, आयएनएस प्रबल आणि नौदलाच्या अन्य जहाजांनी सलामी दिली.
आपल्या ताकदीची आणि क्षमतेची जाणीव जगाला करुन देण्यासाठी मराठी दर्यावर्दी कमांडर दिलीप दोंदे यांनी एकट्यानेच सुमारे ४० हजार किमी (२१ हजार ६०० सागरी मैल) अंतर पार करत सागर परिक्रमा केली. सागर परिक्रमा केलेले ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय समुद्रात आपले महत्त्व टिकवण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची होती, असे नौदल अधिका-यांनी सांगितले.
स्वदेशी बनावटीच्या ' म्हादेई ' या तब्बल २४ टन वजनाच्या अत्याधुनिक शिडाच्या बोटीतून (यॉटमधून) कमांडर दोंदे एकटेच पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी मुंबई बंदरातून १९ ऑगस्ट २००९ रोजी निघाले होते. नौदलप्रमुख अॅडमिरल सुरेश मेहता यांनी झेंडा दाखवल्यावर या साहसी मोहिमेची सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल २७६ दिवसांनी परिक्रमा पूर्ण करुन दोंदे पुन्हा एकदा मुंबई बंदरात दाखल झाले आहेत. या प्रवासादरम्यान त्यांनी दोनदा विषुववृत्त पार केले तसेच पृथ्वीवरील सर्व वृत्तांना स्पर्श केला. फ्रॅमॅन्टल (ऑस्ट्रेलिया), क्रिस्टचर्च (न्यूझीलंड), पोर्ट स्टॅनले (फॉकलंड द्विपसमुह) आणि केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) या चार बंदरांना भेटी दिल्या.
आतापर्यंत सुमारे ५७० दर्यावर्दींनी समुद्रातून पृथ्वीप्रदक्षिणा केली आहे. मात्र यात एकाही भारतीय वीराचा समावेश नव्हता. त्यामुळेच भारतीय नौदलाने धाडस करण्याचा निर्णय घेतला होता.
एकट्याने समुद्रातून पृथ्वी प्रदक्षिणा करण्याची संकल्पना निवृत्त व्हाईस अॅडमिरल आवटी यांनी सर्वप्रथम मांडली. नौदलाकडून परवानगी मिळाल्यानंतर मोहिमेसाठी यॉट तयार करण्याचे काम सुरू झाले. नौदलात १९८६ पासून कार्यरत असलेले दिलीप दोंदे साहस करण्यासाठी पुढे आले आणि त्यांची सागरी परिक्रमा मोहिमेसाठी निवड करण्यात आली.
दोंदे यांच्यापुढे असलेल्या विविध आव्हानांचा विचार करुन गोव्याच्या अॅक्वारियस फायबरग्लासच्या रत्नाकर दांडेकर यांच्या टीमने यॉट तयार केले. तब्बल सहा कोटी रुपये खर्च करुन गोव्यामध्ये तयार करण्यात आलेल्या या यॉटमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची आधुनिक संपर्क यंत्रणा बसवण्यात आली. गोव्यात मांडवी नदीच्या किना-यावर यॉटची निर्मिती करण्यात आली. त्यामुळेच नदीच्या ' म्हादेई ' या पुरातन नावावरुनच यॉटचे नामकरण ' म्हादेई ' असे करण्यात आले आहे.
ही मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारतीय नौदलाची आधुनिक जहाज निर्मितीची क्षमता पुन्हा एकदा जगापुढे आली आहे. तसेच आपले नौदल कितीही अवघड आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचे प्रतिकात्मक स्वरुपात दिसले आहे.
No comments:
Post a Comment