मित्रांनो, शौर्य, निर्भयता आणि साहस या गुणांनी देश अन् संस्कृती यांचे रक्षण होते, तसेच त्यांचे वैभव वाढत रहाते. हे गुण आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरतात. आज आपण शूर बालक पृथ्वीसिंग याच्या शौर्याची कथा पाहू.
एकदा सम्राट औरंगजेब रानात शिकारीला गेला होता. त्याने आपल्या सेवकांच्या साहाय्याने एक भला मोठा वाघ पकडला आणि वाड्यावर आणून बागेतील एका मोठ्या पिंजऱ्यात अडकवून ठेवला. दुसऱ्या दिवशी आपल्या राजसभेतील मंडळींसमोर त्याने आपण मोठ्या धाडसाने वाघाला पकडल्याची प्रौढी मारली आणि म्हणाला, ``असा वाघ तुमच्यापैकी कुणी कधी पाहिला आहे काय ?''
`स्वामींनी पकडलेल्या वाघाच्या तोडीचा दुसरा वाघ कुठे असणंच शक्य नाही', असे राजसभेतील मंडळींतील प्रत्येक लाचार इसम बोलू लागला. मोगलांचे मांडलिकत्व नाईलाजाने पत्करलेला जोधपूरचा राणा यशवंतसिंह म्हणाला, ``स्वामी, आपण पकडून आणलेला वाघ ज्याच्यापुढे फिक्का पडेल, असा एक छावा माझ्याकडे आहे.''
अहंभावाने ओथंबून गेलेला औरंगजेब त्याला म्हणाला, ``मग राणाजी, घेऊनच या उद्या तुमच्या छाव्याला. तुमच्या त्या छोट्या वाघाला आपण माझ्या वाघाच्या पिंजऱ्यात घालू. बघूया, त्यांच्यापैकी कोण कुणाला पुरून उरतो ते !''
दुसऱ्या दिवशी राणा यशवंतसिंह आपला चौदा वर्षांचा धाडसी आणि बलदंड पुत्र पृथ्वीसिंग याला समवेत घेऊन राजसभेत आला. औरंगजेब आणि सर्व राजसभेतील मंडळी वाघाच्या पिंजऱ्याकडे गेली. त्यानंतर यशवंतसिंहाने आपल्या मुलाकडे बोट दाखवून `हाच माझा छावा आहे', असे सम्राटाला म्हटले. औरंगजेबने पृथ्वीसिंगला वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश करायला सांगितले.
पृथ्वीसिंग वाघाच्या पिंजऱ्यात शिरताच वाघाकडे एकटक नजरेने पाहू लागला. त्याच्या दृष्टीला दृष्ट भिडताच तो वाघ जागच्या जागी थबकून उभा राहिला; पण औरंगजेबाच्या सांगण्यावरून त्याचे सेवक त्या वाघाला भाल्यांनी टोचू लागले. त्यामुळे तो डरकाळी फोडून पृथ्वीसिंगच्या अंगावर गेला. पृथ्वीसिंग पटकन बाजूला झाला आणि त्याने आपल्या कमरेची तलवार हाती घेतली. आता तो तिचा वार वाघावर करणार, इतक्यात राणा यशवंतसिंह त्याला म्हणाला, ``बेटा! प्रतिस्पर्ध्या वाघापाशी तलवार नसतांना तू त्याच्यावर तलवारीचा वार करणे धर्मयुद्धाला धरून होणार नाही.''
पित्याचे हे शब्द ऐकताच पृथ्वीसिंगने हातातली तलवार टाकून दिली आणि त्या क्रुद्ध वाघावर झेप घेतली. आपल्या दोन हातांनी त्याचा जबडा फाडून बघता बघता त्याची प्राणज्योत विझवून टाकली. एवढ्या लहान पृथ्वीसिंगच्या त्या अपूर्व पराक्रमाने सम्राटासकट इतर सर्व मंडळी थक्क झाली.
मित्रांनो, अहिंसेचे पालन करणे चांगले असले, तरी आंधळी अहिंसावृत्ती ही स्वत:चा, समाजाचा आणि देशाचा घात करणारी असते; म्हणून सामर्थ्याला अन् शौर्याला मानवी जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. शौर्य, निर्भयता आणि साहस या गुणांनी देश अन् संस्कृती यांचे रक्षण होते, तसेच त्यांचे वैभव वाढते.
No comments:
Post a Comment