"जगात अलीकडे मनुष्य जीवनाचा जो विध्वंस चालला आहे ते पाहून मनात येतं की हा जीवनाचा रथ कुठच्या दिशेला चालला आहे.? शे-पाचशे लोकांचा मृत्यु ही रोजचीच बाब झाली आहे. जग अगदी लहान होत चालल्याने जगातल्या कुठल्याही कोपर्यातली बातमी जणू आपल्या गावातल्या बातमी सारखी वाटू लागली आहे. ही मनुष्य जीवनाची हानी मग ती कुठच्याही धर्माची असो,किंवा कुठच्याही लष्कराची असो, माणसाला निसर्गाने दिलेल्या बुद्धिमत्तेचा दुरूपयोग म्हणून तर ही मनुष्य हानी होत नसेल ना?"
तळ्यावर आज प्रो.देसाई आणि प्रि.वैद्याना एकत्र आलेले पाहून त्यांच्याही बुद्धिला थोडीशी चालना मिळावी म्हणून आणि माझ्या प्रमाणे त्यांनाही ह्या विषयावर काय वाटतं हे समजण्यासाठी म्हणून बोलायला सुरवात केली.
प्रो.देसाई म्हणाले, "मला नेहमीच वाटतं की माणसाचं मन सर्वसाधारणपणे चांगलंच असतं.माणसाचं मन जन्मतःच संवेदनशील असतं.स्वतःला कुणी स्वीकृत करावं व स्वतः दुसर्यांना स्वीकृत करावं ह्या साठी त्याचं मन उतावीळ असतं.अगदी साध्यासुध्या आनंदाला आणि जीवन जगण्याला मोका मिळावा म्हणून त्याचं मन भुकेलेलं असतं. कुणाची हत्या करायला वा स्वतःची हत्या व्हावी म्हणून ते मन कधीही इच्छा करीत नाही. काही प्राप्त परिस्थितीत जरी दुष्टवृत्तीने त्याच्यावर काबू आणला तरी ते मन परीपूर्ण दुष्टवृत्तीचं होत नाही. थोडा फार चांगुलपणाचा अंश त्याच्यात असतोच. आणि तो चागुलपणाचा अंश कितीही अप्रभावी झाला तरी तो त्या चांगुलपणाची पुनःस्थापना करण्याच्या प्रयत्नात असतो."
प्रो.देसायांचं हे म्हणणं ऐकून प्रि.वैद्य थोडेसे विचारात पडलेले दिसले. "तुम्हाला काय वाटतं वैद्यसाहेब ?" असा मी त्यांना सरळ प्रश्न केला. ते म्हणाले, "मला माझ्या जीवनात आनंद वाटतो कारण मी आजुबाजूच्या लोकांत आणि त्यांच्या विकासात निरंतर स्वारस्य घेऊ इच्छितो.असं स्वारस्य घेण्याने त्यांच्या बद्दलच्या ज्ञानाची माझ्या ज्ञानात भर पडते आणि त्यामुळे मनुष्याच्या अंगात असलेल्या चांगुलपणावर विश्वास वाढतो. माणुसकीत माझा भरवसा आहे.पण मी भावूक होऊन भरवसा ठेवीत नाही.मला माहित आहे की अनिश्चीतता, भयभीती, आणि भुकेच्या वातावरणात माणूस अगदी ठेंगणा झालेला दिसतो आणि नकळत तो असा बनला गेला असण्याचा संभव आहे."
माझंही मत द्यावं म्हणून मी त्यांचं ऐकून म्हणालो, "एखाद्या दगडाखाली उगवण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोपट्याची धडपड कशी असते अगदी तसंच माणसाचं झालं आहे.ती शीळा बाजूला केल्यावरच ते रोपटं सहजपणे प्रकाशात फोफावून येतं.आणि फोफावून वर येणं ही त्या रोपट्याची स्वाभाविक क्षमता असते.फक्त मृत्युच त्याला अंत आणू शकतो. माझीपण आपल्यासारखी ह्या बाबतीत माणूसकीवर श्रद्धा आहे. त्याशिवाय आणखी कुठच्याही श्रद्धेची मला जरूरी भासत नाही."
प्रो.देसाई काही बोलत नाहीत असं पाहून प्रि.वैद्य आपला मुद्दा पुढे सरकवीत म्हणाले, "ह्या धरतीवरच्या एकूण आश्चर्यात,आणि जीवजंतूच्या आयुष्यात मी ध्यान-मग्न झालो आहे.त्यामुळे स्वर्ग आणि देवदूताबद्दल मी विचारच करीत नाही. माझ्या स्वतःच्या जीवनाच्या अंतापर्यंत विचार करायला ही वेळ मला भरपूर आहे.दुसर्या कसल्याही जीवनापेक्षा माणूस म्हणून मला जन्माला आल्याने सार्थक झाल्यासारखं वाटतं."
प्रो.देसायाना बोलकं करावं ह्या उद्देशाने मी त्यांना म्हणालो, "भाऊसाहेब,मनुष्याच्या जीवनातला आशय तरी काय असावा"? "माणसाच्या हृदयात असलेली एव्हडी अगाध श्रद्धा आणि प्रकाशाकडे झेप घेण्याची त्याची क्षमता पाहून मानवाच्या भविष्यात आशा आणि विश्वास ठेवण्यासाठी ह्या धरतीवरचा माझ्या जीवनातला आशय आणि कारण मला कळलं आहे. माणसाची व्यावहारिक बुद्धि कधी ना कधी हे नक्कीच सिद्ध करू शकेल की परस्परातली सहायता आणि सहयोग ह्या दोन गोष्टी सर्वांच्या सुरक्षतेसाठी आणि सुखासाठी विवेकपूर्ण बनल्या गेल्या आहेत." प्रो.देसाई असं म्हणून माझ्याकडे हंसत हंसत मलाच म्हणाले, "सांगा अशावेळी तुम्ही काय कराल? मला बोलू देण्यापुर्वी प्रि.वैद्य, "मी सांगतो" असं सांगून मला हाताने खुणावीत म्हणाले, "अशा तर्हेच्या श्रद्धेचा विनीयोग जर का मनुष्य स्वतंत्र राहून आपली उन्नती करून घेण्यात करील तर अशा परिस्थितिला चांगलं रूप आणण्यात माझ्या सारख्या एकट्यालाही सदैव सतर्कता ठेवून आणि उद्देश्यपूर्ण क्षमता आणून ते करता आले तर तेव्हडाच हातभार लागेल.अशी परिस्थिति मला वाटतं,सुरक्षितता आणि मित्रत्वाच्या आवश्यकतेवर पायाभूत असते.काही गोष्टी माझ्या मनापासून मला आशाजनक वाटतात जशा सगळ्या जगातल्या अन्न उत्पादनाचा नीट विनीयोग केला तर ह्या धरतीवरच्या सर्व माणसाना पुरण्याइतकं अन्न आपल्या जवळ शिल्लक राहिल.आपलं औषधीय शास्त्रासंबंधाचं ज्ञान एव्हडं परीपूर्ण आहे की सगळ्या मानवजातीचं आरोग्य सुधारता येईल. आपल्याकडे असलेलं संसाधन आणि शिक्षणातलं ज्ञान ह्यांचा नीट प्रबंध केला तर जागतीक तुलनेत मनुष्यजातीच्या बुद्धिमत्तेची पातळी उंचावता येईल.ह्या जगातल्या काही देशाजवळ अगोदरच असलेल्या अशा तर्हेच्या फायद्याचा संपूर्ण जगाच्या तुलनेत कसा प्रबंध करायचा एव्हडंच शोधून काढावं लागेल."
"आता तुम्ही बोला" असं मला म्हणून प्रि.वैद्य मिष्कील हंसले.प्रो.देसाई पण मला म्हणाले, "तुमचं सांगून झाल्यावर हा विषय समाप्त करू या.कारण आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत मला गेलं पाहिजे." मी माझं मत दिलं. माझी रोपट्यापासून दगड दूर करून ठेवण्याची उपमा आचरणात आणली पाहिजे.एकमेकात असलेल्या आणि एकमेकावर असलेल्या माणसाच्या विश्वासाच्या आधारे हे करणं शक्य आहे.अर्थात सर्वांजवळ एकाच वेळी ही श्रद्धा असेल असं नाही.पण जास्तीत जास्त लोकांत अशी श्रद्धा बळावयाला हवी. पाच पन्नास वर्षापूर्वी कुणीही जागतीक अन्नाचा साठा,जागतीक आरोग्याची जरूरी,जागतीक शिक्षण असल्या गोष्टींचा विचारही केला नसता. आजबरेच लोक ह्याचा विचार करायला लागले आहेत. आजच्या ह्या अन्धाधुंध विध्वंसाच्या काळात माझ्या मनात येणारा प्रश्न असा की, बुद्धिमंताजवळ ह्यावर कृती करायला वेळ राहिला आहे काय? कारण मला वाटतं हा, मृत्यु आणि अज्ञान किंवा जीवन आणि बुद्धिमत्ता ह्यातला संघर्ष आहे. माझी मात्र मानवतेवरची श्रद्धा अटळ आहे."
No comments:
Post a Comment