Thursday, May 27, 2010

माझं पहिलं प्रेम

माझं पहिलं प्रेम

माझं पहिलं प्रेम कुणावर, कशावर हे जर कुणी विचारलं तर त्याचं उत्तर मी नि:शंकपणे देईन- लेखन आणि वाचनावर. हे प्रेम, हे झपाटलेपण किमान तीन तपं तरी माझ्या संदर्भात टिकून आहे. प्रेमासाठी प्रेमीजन आपल्या आयुष्याची बाजी लावतात, हवी ती किंमत देतात, हे जसं दैहिक, तारुण्यातल्या किंवा दोन जिवांच्या प्रेमाच्या संदर्भात खरं असतं; तेवढंच ते या नैष्ठिक छंदाच्या संदर्भातही खरं असतं, असं मला वाटतं.
आयुष्याच्या पुढच्या प्रवासाकडे, भविष्याकडे एक कटाक्ष टाकताना, पुढील-उर्वरित कालखंडाचा विचार करताना माझं हे प्रेम कमी होईल, ते डागाळेल असं चुकूनही वाटत नाही. उलट त्या प्रेमातली नैष्ठिकता, तीव्रता, सत्त्व दिवसेंदिवस पणाला लागून हे प्रेम आणि त्या प्रेमाची प्रभा अधिकाधिक झळाळून निघू शकेल, हाच एक विचार मनीमानसी घट्टपणे रुजलेला आहे, असे वाटते.
साहित्यावर माझं हे प्रेम कधी बसलं? हे प्रेम अजाणतेपणी बसलं. नकळत्या वयात बसलं; पण ते बसलं तो क्षण, ती सुरुवात विसरता येत नाही. वयाच्या तेराव्या, चौदाव्या वर्षी, सातव्या वर्गात शिकत असताना आम्ही मुलांनी एक नाटक बसवायचं ठरवलं. आपल्याला हवं तसं नाटक कुठं मिळणं अशक्य आहे, हे कळलं तेव्हा तशा प्रकारचं नाटक लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि हे साहित्यप्रेमाचं नख लागून ती धुंदी अवघ्या रक्तात भिनली. ती खोल खोल अशी भिनत गेली.
तीन-चारशे घरांचं एक छोटं खेडं हे माझं जन्मगाव. वयाची वीस वर्षे त्याच गावात गेलेली. सातवीपर्यंत कंदिलाच्या, चिमणीच्या मिणमिणत्या प्रकाशात अभ्यास करायची सवय. तीन भावंडं याच प्रकाशात अभ्यास करायचो. पण या वयात असा अभ्यास तरी कितीसा? मग अभ्यास झाला की इतर वाचनासाठी मोकळा वेळ मिळायचा.
खरसोली या माझ्या गावापासून नरखेड हे तीन-चार किलोमीटरवरचं गाव. तिथं बऱ्यापैकी बाजार भरायचा. या ना त्या निमित्तानं मी त्या बाजारात जायचो. घरच्या किराणा दुकानात माल आणाया म्हणून कधी वडिलांसोबत, शेताततली वांगी विकायला न्यायची म्हणून कधी आजी आजोबांसोबत. नरखेडच्या या रविवारच्या आठवडीबाजाराची अशी सवय लागलेली. कधी कुणासोबत जाणं झालं नाही, तर चुकल्याचुकल्यासारखं वाटायचं. रुखरुख लागायची. मग दुपारनंतर बाजारात एकटाच पायी जायचो. मनसोक्त भटकायचो. फोटोफ्रेमिंगच्या दुकानाजवळ उभा राहून देवादिकांचे फोटो तास न् तास उभा राहून न्याहाळायचो. त्यांचे चेहरे पाहायचो. राम-रावण युद्ध, सीताहरण, द्रौपदी वस्त्रहरण, श्रावणबाळाचं मातृ-पितृ प्रेम अशा तसबिरी पाहता पाहताच कुणीतरी सांगितलेल्या या कथा आठवत राहायच्या. या फोटोफ्रेमिंगवाल्याच्या बाजूलाच एक टोपीवाला पुस्तकं घेऊन विकायला बसायचा. त्याच्याजवळही अशाच पौराणिक कथांची पुस्तकं असायची. रामायण, महाभारताचे कथासार त्यात प्रामुख्याने असायचे. तिथंच बसल्याबसल्या ती पुस्तकं चाळायचो. वाचायचो. दर रविवारी अशी ही पुस्तकं वाचता वाचता वाचनाची भूक वाढू लागली. आणि मग त्यातूनच सुरू झाला हा पुढचा प्रवास.
दहावीनंतर कॉलेजात आलो आणि वाचनाचं भांडार जणू उघडं झालं. त्यातच गंगाधर गाडगीळांची `साहित्याचे मानदंड', आणि `खडक पाणी' ही दोन पुस्तकं हातात पडलीत. ती मनापासून वाचून काढली आणि साहित्यातलं चांगलं काय, वाईट काय हे कहायला लागलं. त्यातलं सांगितलेलं जे चांगलं, कसदार साहित्य होतं, ते वाचनाचा झपाटा लावला. विश्राम बेडेकर, राम गणेश गउकरी, आचार्य अत्रे, चि.विं.जोशी, . वा. दिघे, आण्णासाहेब किर्लोस्कर, मर्ढेकर, इंदिरा संत, नवकथाकार, श्री. वा. पेेंडसे, विजय तेंडुलकर, खांडेकर, फडके, माडखोलकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत या लेखकांचं हाताला येईल ते वाचू लागलो. एकीकडे हे असं या लेखकांचं वाचन सुरू असतानाच नाटकाच्या लेखन वेडानं झपाटलं होतं. एखादा विषय सुचला की त्यावर विचार करून, `प्रतिभासाधन'मधील लेखनतंत्राला समोर ठेवून नाटक लिहून काढायचो लिहिलेलं नाटक मग आम्हाला शिकवणाऱ्या प्राध्यापकांना वाचायला द्यायचो. त्यावरच्या त्यांच्या बऱ्यावाईट प्रतिक्रिया ऐकून घ्यायचो. हे नाटक कुठंतरी सादर व्हावं म्हणून धडपडायचो. पण नाटक लिहिण्याच्या पुढे फारसं काही सरकत नव्हतं. लिहिलेल्या नाटकांचे बाड बांधून ठेवू लागलो.
वाचनानं जसं झपाटून टाकलं होतं तसंच लेखनोर्मीनंही पुरता वेडावलो होतो. लेखनासाठी वाचन आणि वाचन-मननाच्या चिंतनातून लेखन ही प्रक्रिया जरी या अवस्थेसाठी आवश्यक पूरक ठरत होती, तरी हे सगळं घडत होतं ते अजणतेपणानंच. एखादा विषय लेखनाच्या दृष्टीने मनात सुचला आणि त्या विषयानं झपाटून जाऊन त्यासंबंधीच्या सर्व साधनसामग्रीची जुळवाजुळव करून, बैठक मांडून लेखन करण्याचं सलग भान त्यावेळी यायचं होतं; पण लेखनाच्या या उर्मीला मात्र वाट मिळावी आणि आपण `मोठा लेखक' व्हायचं हे स्वप्न मात्र उराशी होतं. कानेटकर, कालेलकर, शं. ना. नवरे, बाळ कोल्हटकर, सुरेश खरे, विजय तेंडुलकर, वि. वा. शिरवाडकर, रांगणेकर, वरेरकर, तोरडमल हे मागचे पुढचे नाटककार आपल्याला नाटककार व्हायचं म्हणून जवळपास दहावी-बारावीच्या दरम्यानंच मुळातून वाचून काढले होते; पण नाट्यलेखनाचा प्रयत्न लेखनापलीकडे फारसा सफल होत नाही, आपलं नाटक रंगमंचावर येत नाही, हे असं नाटक रंगमंचावर येणं दिसतं तेवढं सोपं नाही हे जाणवलं तेव्हा कथा-कादंबरीकडे मोर्चा वळवला. एक असफल प्रयत्न म्हणून अकरावीत शिकत असताना एका प्रेमकथेवर कादंबरी लिहिण्यचा प्रयत्न केला होता; पण तो प्रयत्न किती कच्चा आहे याचीही जाणीव होती. मग जाणीवपूर्वक मराठीतील महत्त्वाचे कथाकार-कादंबरीकार वाचू लागलो. मराठीतली महत्त्वाची समीक्षा वाचू लागलो. हरिभाऊ आपटेंपासून नेमाडे, यादव, अरुण साधू आणि दिवाकर कृष्ण, . गो. जोशींपासून तर `सत्यकथे'तील नवकथोत्तर कथेपर्यंतची कथा वाचत होतो. याच काळात सोबतीला कधी राजेंद्रसिंह बेदी, कधी शरच्चंद्र, कधी रवींद्रनाथ, कधी प्रेमचंद हेही लेखक असायचे. पुढं पुढं तर या वाटेवर .एम.फॉस्टर, जॉन स्टाईनबेक, चेकॉव्ह, मोपाँसा, टेनिसी विल्यम, इत्यादी पाश्चात्य तर गिरीश कर्नाड, अनंत मूर्ती, डॉ. एस. एल. भैरप्पा, शिवरामपंत कारंथ, श्रीलाल शुक्ल, निर्मल वर्मा, धर्मवीर भारती, कुर्रतलऐन हैदर, तकर्षा शिवशंकर पिल्ले, एम. टी. वासुदेवन नायर हे भारतीय लेखन मधूनच भेटायचे. त्यांच्या साहित्यानं कळत नकळत आतून समृद्ध होत होतो.
या प्रवासात जाणीवपूर्वक लेखनाची वाट सापडली ती १९८५,८६ नंतर. तोपर्यंत महाविद्यालयीन जीवनात `प्रवाह'ही कादंबरी आणि चार-पाच कथा लिहून लेखनाची प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. आपले शब्द छापखान्यातून छापून आल्यावर जो आनंद होतो, त्याचा अनुभवही या निमित्तानं आला होता. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, आपल्या जगण्याची वाट सर्वसामान्यांपेक्षा विशेष अशी आहे, ही भावना, जाणीव सातत्यानं मनाला उन्नत करू लागली होती. यातूनच पुढं समीक्षा आणि ललितलेखनाचा राजमार्ग सापडला. या राजमार्गानं आगेकूच सुरू झाली आणि मराठी साहित्याच्या भल्यामोठ्या नभांगणात मला माझी छोटीशी का होईना, पण जागा निर्माण करता आली.
रक्तामांसाच्या व्यक्तीवरचं प्रेम हे उन्नत असेल; प्रमाथीही असेल; पण त्या प्रेमाच्या मर्यादांची जाणीवही ताबडतोब होऊ लागते. असे अमर्याद आणि आमूलाग्र प्रेम वाट्याला येणं हे संचित मला खूप मोलाचं वाटतं. म्हणूनच माझं पहिलं प्रेम हे माझ्या आत्म्याशी, जगण्याशी एकरूप झालेल्या या माझ्या लेखन-वाचनाच्या छंदावर, नव्हे मूलप्रकृतीवर आहे, हे सदैव मी मान्यच करेन.

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive