मातीचा धुंद करणारा सुगंध ... हिरवीगार झालेली वृक्षवल्ली ... वातावरणात आलेला उत्साह ... पाऊस हळूहळू मनाचा ताबा घेऊ लागतो आणि मग जिभेवर ताबा ठेवणं कठीण जातं . गरमागरम , रुचकर पदार्थांची साथसंगत अनिवार्य होऊन बसते . भजी , वडे खुणावू लागतात आणि पक्क्या मुंबईकरांच्या नाकाला या स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असणारे नाके आकर्षित करू लागतात . त्यातही पाऊस आणि भजी यांचं नातं खासच . पाऊस आणि कविता किंवा पाऊस आणि प्रेम यांच्यासारखंच . पहिल्या पावसाचा आनंद घेता घेता गरमागरम भज्यांची चव चाखण्याची संधी मग कुणीही सोडू शकत नाही .
मुंबईत असे भजीचे स्पॉट असंख्य आहेत . कांदा भजी , बटाटा भजी , मेथी भजी , मूग भजी , पालक भजी , मिरचीची भजी अशा प्रकारांबरोबर आता चायनिज भजीसारखे वेगळ्या चवीची ओळख करून देणारे प्रकारही लोकप्रिय होताना दिसतात . त्यासोबत येणाऱ्या चटण्याही जिभेचे चोचले पुरवतात . नाक्यानाक्यावर मिळणाऱ्या या भज्यांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बनवली जात नसली तरी नॉनव्हेज भजीही पावसाळ्यात लज्जत आणतात . त्यात खिमा भजी व जवळा भजी यांना विशेष मागणी असते .
कांदा भजी हा पावसाळ्यातला सर्वात लोकप्रिय प्रकार . बाहेर या भजीचा आस्वाद घेतानाच घरीही कुटुंबासोबत या भजीची चव चाखण्याची मजाही वेगळीच . खोबरे - लसणाच्या चटणीबरोबरच कोथिंबिरीच्या आंबटगोड चटणीसोबतही या भजीची मजा घेता येते . बारिक उभा चिरलेला कांदा घेऊन त्यात मीठ आणि ओवा टाकून थोडा वेळ ठेवा . या कांद्याला पाणी सुटेल आणि मग त्यात बेसन पीठ , लाल तिखट , हळद , चवीप्रमाणे मीठ , कुरकुरीतपणासाठी तांदळाचं पीठ असं मिश्रण करून त्यात कांदा मिसळा व घट्ट मिश्रणाचे गोळे गरम तेलात तळा . चला , पाऊस वाढू लागला आहे .
आता भजीचा आनंद घ्यायलाच हवा .
पार्ल्यातील वसंत नामे यांच्या पार्लेश्वर वडापाव सम्राट या प्रसिद्ध दुकानातील चायनिज भजी म्हणजे तरुणांचा वीक आणि विक पॉइंटही आहे . कोबी , गाजर , फरसबी , भोपळी मिरची अशा भाज्यांपासून बनविण्यात आलेली व्हेज चायनिज भजी म्हणजे सगळ्यांचाच आवडीचा विषय . गेली २७ वर्षे या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नामे यांच्या पार्लेश्वर मंदिराजवळ असलेल्या दुकानात या भजीचा आस्वाद घेण्यासाठी लोकांची झुंबड उडते . वडापाव हे त्यांचे अस्सल उत्पादन . पण आज तरुणाईच्या जिभेवर चायनिजची चव रुळत असताना नामे यांनी त्याच चवीची भजी तयार केली आणि शेजवान चटणीसह या भज्यांचा आस्वाद घेणारी पिढी तयार झाली . आज कॉलेज तरुण तरुणींच्या या भजीवर उड्या पडतात ते उगीच नव्हे . चायनीज भजी नेमकी कशी बनवतात , याचे वर्णन नामे करतात तेव्हाच तोंडाला पाणी सुटू लागते . कोबी , फरसबी , गाजर , भोपळी मिरची किसून त्यात आले , मिरची , लसूण यांची पेस्ट टाका . लाल भोपळी मिरची मिक्सरला लावून तीही या मिश्रणात टाकली की , भजीला लाल रंगही येईल . सोबत टॉमेटो सॉस , चिली सॉस आणि चवीनुसार मीठ टाकले की , झाले भजीचे मिश्रण तयार . घट्ट मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून मग तेलात तळा . नंतर शेजवान चटणीसोबत भजीचा आस्वाद घ्या . नामे भजीची कृती सांगतात . आज तर पार्ल्यातीलच नव्हे तर अख्ख्या मुंबईतून नामे यांच्या दुकानांतील या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होते . त्यात सेलिब्रिटीही असतात . परदेशातही त्यांचे हे पदार्थ पाठविले जातात . सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांना सुखावणारे हे खरे नामेवंत म्हणायला हवेत .
दादर , शिवाजी पार्क येथील रवी आणि बाबू वसईकरांची बटाटाभजीही अशीच लोकप्रिय . बटाट्याचे पातळ काप घ्यावेत . त्यानंतर बेसन पीठ , चवीपुरते मीठ , हळद , कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं थोडं पीठ आणि बारीक केलेला थोडा ओवा असं मिश्रण घ्यावं आणि त्यांच्या मिश्रणात हे काप टाकून ते नंतर तळावेत , बाबू वसईकर आपली खासियत असलेल्या बटाटा भजीच्या रेसिपीविषयी सांगतात . १९६८पासून सुरू असलेला त्यांचा हा व्यवसाय आता व्यवसाय न राहता सवयच बनली आहे . अगदी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनीही त्यांच्या या भज्यांची आणि वड्यांची चव एकेकाळी आजमावली होती . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही येथे भेट दिलेली आहे . कांदाभजी मात्र ते बनवत नाहीत . खरे तर धंदा करायचा म्हणून कांदाभजी बनवून लोकांना उगीचच बनविणे त्यांना पसंत नसावे . पार्ल्यातील नामे , बाबू वसईकर यांच्याप्रमाणेच वांद्रे गव्हर्नमेंट कॉलनीतील पाटील , प्रभादेवीचे सारंग हेदेखील अशा चवदार भजी व वड्यांसाठी नावाजलेले आहेत . मग आता या पावसात या स्पॉटना भेट द्या आणि पावसाचा आनंद लुटा !
No comments:
Post a Comment