Tuesday, April 27, 2010

नेहरू सायन्स सेंटर - वैज्ञानिक चमत्कारांची खाण

नेहरू सायन्स सेंटर - वैज्ञानिक चमत्कारांची खाण

आठवीत की नववीत असताना कधीतरी पाहिलेलं सायन्स सेंटर, मनामधे एक वेगळीच जागा निर्माण करून गेलं होतं. निरनिराळ्या उपकरणांच्या माध्यमातून शिकवलेलं सामान्य विज्ञान, स्वर, स्पर्श यांच्या अनुभवाची प्रात्याक्षिकं करून पहाताना तीन तास कसे निघून गेले ते कळलंच नाही. बाहेर आल्यावर आपण इतका वेळ एक वेगळ्याच विश्वात वावरत होतो असं वाटायला लागलं. तिथे पुन्हा जाण्याची वारंवार इच्छा व्हायची पण कालपर्यंत ते कधी जमलं नाही. काल मात्र तडकाफडकी मी सायन्स सेंटरला जायचं ठरवलं आणि मला पुन्हा एकदा तोच वेगळ्या विश्वात गेल्याचा अनुभव आला.

खाली मी काही फोटो टाकले आहेत, त्यातील कुठल्याही फोटोवर क्लिक केलंत तर फोटो मोठया आकारात पहायला मिळेल.



केवळ शाळकरी मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनाही माहित नसलेल्या कितीतरी वैज्ञानिक गोष्टी या सायन्स सेंटरमधे पहायला मिळतात. म्हणूनच असेल कदाचित ही लहान मोठी वैज्ञानिक उपकरणं हाताळताना लहान मुलांइतकीच मोठ्या माणसांचीही उत्सुकता ओसंडून वहात होती. वरवर पहाता सामान्य वाटणा-या गोष्टींमधे दडलेलं वैज्ञानिक सत्य उलगडून पहाताना मोठेही लहान झाल्यासारखेच वाटत होते.



विविध वैज्ञानिक चमत्कारांचा खजिना आहे, हे सायन्स सेंटर म्हणजे. आता हेच पहा ना, या खालच्या चित्रात माझा फोटो दिसतोय तुम्हाला? माझ्यामागे काही विविध संगीत वाद्य ठेवलेली दिसतायंत? ती खरीखुरी नाहीतच मुळी! ती आहे आभासी वास्तविकता.




सायन्स सेंटरमधे या प्रयोगासाठी एक छोटीशी रूम बनवली आहे. ही रूम रिकामी आहे. तिथे आत गेलं की समोर एक दूरचित्रवाणी संच लावलेला असतो. त्यात तुम्हाला स्वत:चं आरशात जसं प्रतिबिंब पडतं, तसं प्रतिबिंब दिसतं आणि आजूबाजूला ही संगीत वाद्य. रूमच्या बाहेरून कुणी पाहिलं तर बघणा-याला वाटेल की आपण वेड्यासारखे हातवारे करतोय पण प्रत्यक्षात तुम्ही त्या संगीत वाद्यांपैकी कुठल्यातरी वाद्याला हात लावत असता. या प्रकाराबद्दल खूप रोचक माहिती तिथे लिहून ठेवली आहे. मी त्याचाच फोटो काढला. या खालच्या चित्रावर टिचकी दिलीत तर एक मोठा फोटो उघडेल. त्यात या आभासी वास्तविकतेचा उपयोग कशाकशासाठी होऊ शकतो, याची माहिती दिली आहे.



केवळ संगीत उपकरणंच नव्हेत, तर आपल्या रोज ज्या भाज्या, झाडं पहातो, ती कशी उगवतात, म्हणजे कंदभाज्या, फळभाज्या यातील फरक जाणून घेण्यासाठी तिथे असा देखावा करण्यात आला आहे. तुम्ही काचेसमोर उभे राहिलात की हाताजवळच बटणं सापडतील. बाजूला निरनिराळ्या भाज्यांची चित्रं आहेत. तुम्ही ज्या भाजीच्या चित्राचं बटण दाबल, ती भाजी कशी उगवते याचं तुम्हाला छोटंसं प्रात्याक्षिक पहायला मिळतं.उदा. कांदे, मुळा या भाज्या जमिनीखाली उगवतात. जर तुम्ही मुळ्याच्या बाजूचं बटण दाबलत तर जमिनितून मुळा वर येताना दिसतो.



अशा छोट्या छोट्या प्रात्याक्षिकांतून लहान मुलांना सामान्यज्ञान तर मिळतंच पण प्रात्याक्षिकामुळे ही माहिती कायमची स्मरणात रहाते. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान जगात जास्त उपयोगी पडतं, असं म्हणतात. आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीमधे बदल हवा अशी मागणी होत असताना, या सायन्स सेंटरमधील काही छोट्या छोट्या लो बजेट प्रात्याक्षिकांसाठी प्रत्येक शाळेने आपल्या प्रयोगशाळेतही खास जागा ठेवावी असं मला वाटतं. सायन्स सेंटरमधेसुद्धा काही दुरूस्तींची गरज आहे असं वाटतं. काही उपकरणांची बटणं चालत नाहीत. त्यामुळे तो नेमका काय प्रयोग आहे, हे कळलं नाही. शिवाय तिथल्या प्रसाधनगृहातील उग्र दर्प मंदपणे संपूर्ण सेंटरभर दरवळत होता, त्यामुळे बाजूच्या कॅफेटेरियामधे काही खावंसं वाटलं नाही.
सायन्स सेंटरला गेले पण ओडेसी शो काही पहाता आला नाही. पुढच्या वेळेस नक्की पहाण्याचा मानस आहे. सेंटरमधे बरीच लहान मुलं एका बसमधून आली होती. ती शाळेची सहल वाटत नव्हती. प्रायव्हेट सहल असावी कारण मुलांसोबत त्यांचे आईवडीलही होते. सर्व कानडी वाटत होते. मी सेंटरमधून बाहेर पडल्यावर त्यांच्यापैकी एक दोन पालकांना बाहेरच्या जिन्यावर बसलेलं पाहिलं. त्यांच्यापैकी एका महिलेने मला कानडीत काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या एकूण अवतार पाहून मी त्यांच्याकडे आधी दुर्लक्श केलं पण त्या महिलेचा चेहेरा पाहून लक्षात आलं की ही भाषेची अडचण आहे. मग मी पुन्हा तिला विचारलं की काय हवंय? तेव्हा तिने खुणा विचारलं की हे सेंटर किती वाजता बंद होईल? तिचा मुलगा की मुलगी केव्हापासून आत आहे, बाहेर यायचं नावच घेत नाही. मग मीसुद्धा तिला खुणा करून सांगितलं की सेंटर सहा वाजता बंद होईल, तेव्हा सर्व बाहेर येतीलच. तुम्ही दरवाजाजवळ उभ्या रहा म्हणजे तुमच्या मुलाला तुम्ही पटकन गाठू शकाल. तिला ते समजलं असावं कारण ती तोंडभरून हसली. मनात आलं की जेव्हा भाषा नव्हती, तेव्हा माणूस एकमेकांशी खुणेच्याच भाषेत बोलायचा. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मनुष्याने आधी खुणांची भाषा आणि मग निरनिराळ्या भाषा शोधून काढल्या हाही एक वैज्ञानिक चमत्कारच नाही का?

जीवनदायी रक्‍त

जीवनदायी रक्‍त

जलांश म्हणजे जीवन हा जगातल्या प्रत्येक घटकाला लागू असणारा न्याय लक्षात घेतला तर, रक्त हे आपल्या जीवनाशी इतके निगडित का हे लक्षात येऊ शकते. रक्तात निर्माण झालेले दोष शरीरावर विविध प्रकारे व्यक्त होतात. म्हणून मुळात रक्तातच दोष निर्माण होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जायला हवी.

पुराणांतरी अशी गोष्ट सापडते की युद्धात एका राक्षसाचा वध करणे खूप अवघड होते कारण युद्ध करते वेळी जमिनीवर पडलेल्या त्याच्या रक्‍ताच्या प्रत्येक थेंबापासून पुन्हा राक्षस उत्पन्न होत असे. पुराणातील असा राक्षस दूषित रक्‍ताचा, कुठल्यातरी व्हायरसचा निदर्शक असतो. शुद्ध रक्‍त म्हणजेच जीवन व रक्‍तामुळेच जीवनातील आनंद असतो. माणसा-माणसातील स्नेह ह्या ओलाव्यामुळेच असतो. रक्‍त दूषित होणे म्हणजेच ओलावा कमी होणे.

"प्रयत्ने वाळूचे कणही रगडिता तेलही गळे" असे म्हणायची वेळ का येते तर वाळू एवढी कोरडी असते की त्यात जलांश वा तेलांश असूच शकत नाही. पण म्हणतात की खूप प्रयत्न केले तर कदाचित वाळूतूनही तेल निघणे शक्‍य आहे. वाळूतील तेल काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल हा संदेश या म्हणीतून आपल्याला मिळतो. तात्पर्य काय तर कणाकणात ओलावा असावाच लागतो. लाकडात ओलसरपणा असेपर्यंत ते जिवंत असते, त्यातला ओलसरपणा एका मर्यादेपेक्षा कमी झाला की ते निर्जीव होते, त्याचा भुगा होतो, त्याचे कण वाऱ्यावर उडून जातात व त्याचे आयुष्य संपते.

वस्तूचा जिवंतपणा त्यातील जलांशावर वा तेलांशावर अवलंबून असल्याने तोच अंश काढून घेतल्यास वस्तूचा आकार तसाच राहिला तरी त्या वस्तूत काही तथ्य राहिलेले नसते.

आयुर्वेदाने अन्नाच्या परिवर्तनानंतरच्या धातू - स्निग्धांशाला वीर्य असे संबोधले. म्हणून एखाद्या वस्तूत वीर्य किती आहे त्यानुसार त्या वस्तूची किंमत ठरते. सध्या लवंगा, वेलची अशा महागड्या वस्तू त्यातील तेल काढून घेऊन नंतर स्वस्तात विकल्या जातात. अशा वस्तू वापरून, "मी शिऱ्यात वेलची टाकली' अशा समाधानापेक्षा अन्य काही उपयोग होत नाही. अशा वेलचीला वास येत असला तर त्या वेलचीला रासायनिक द्रव्य लावले आहे, असे समजायला हरकत नाही.

प्रत्येक वस्तूतला जलांश हेच त्या वस्तूचे जीवन असते. तसेच, मनुष्याच्या शरीरातील रक्‍त हेच त्याचे जीवन असते. रक्‍त बाहेर बनविता येत नाही. ते वाळविताही येत नाही. वाळण्याची सुरुवातीची क्रिया म्हणजे ते थोडेसे घट्ट झाले तरी हृदयात वा मेंदूत अवरोध उत्पन्न होऊन हृदयाघात वा पक्षाघाताचा झटका आलेला दिसतो. रक्‍त शरीरात असताना त्याचा एक विशिष्ट पातळपणा असणे आवश्‍यक असते, त्यातील सर्व द्रव्ये विशिष्ट प्रमाणात असावी लागतात व प्रत्येक पेशीला रक्‍तातूनच जीवन मिळते. माया पातळ झाली तर व्यवहारात नातेसंबंध बिघडतात.

रक्‍त अति पातळ होऊ लागले तर जखम झाली असता रक्‍त वाहून जाईल व आंतरेंद्रियांना आवश्‍यक त्या प्रमाणात रक्‍तपुरवठा होणार नाही. म्हणूनच हिमोफिलिया या रोगाची मोठी भीती वाटते. पण या रोगाशी लढण्यासाठी जन्मपूर्व प्रयत्न, गर्भसंस्कार व नैतिक वागणूक यांची आवश्‍यकता असते आणि तरच औषधोपचार यशस्वी होतात.

शरीरात रक्‍त भरपूर आहे किंवा नाही याचा अंदाज बोटाचे नख दाबून घेतला जातो. समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत बोट दाबले की तेवढा भाग पांढरट दिसतो कारण त्यातला जलांश दूर सरकतो तसेच नख दाबल्यावर प्रथम तेथील रक्‍त बाजूला सरून तेथील नख पांढरट दिसते व नखावरचा दाब काढल्यावर तेथे रक्‍तप्रवाह जलद गतीने येऊन नख लाल दिसते.

केसांमध्ये जोपर्यंत जीवांश किंवा तेलांश आहे तोपर्यंत केसांना चकाकी असते. अशा वेळी वरून लावलेले तेल उपयोगी पडते व ते नीट बसतात. शरीराच्या मुख्य भागांनाच जेव्हा जीवनसत्त्वे मिळणे दुरापास्त होते तेव्हा केसांना बिचाऱ्यांना रक्‍त कोठून मिळणार? अशा वेळी केस पांढरेफटक पडून वाऱ्यावर भुरभुरू लागले वा गळू लागले तर नवल नाही. तेव्हा केस गळण्याची तक्रार असल्यास फक्‍त केसांना तेल लावून उपयोग नसतो. तर, शरीरातील रक्‍ताकडेही लक्ष द्यावे लागते. केस पांढरे होणे या तक्रारीवर उपाय करायचा असला तर रक्‍तावर उपचार करून नंतरच केसांवर उपचार करणे आवश्‍यक असते. शरीरात रक्‍त कमी असले की ताकद राहात नाही, धाप लागते, त्वचा काळपट, पांढरट वा राखाडी म्हणजे जीवन नसलेली दिसू लागते.

रक्‍त हेच जीवनाचे सर्वस्व असल्याने व्यक्‍ती कुठल्या रक्‍ताची आहे, व्यक्‍ती राजघराण्यातील रक्‍ताची आहे का? असे पाहिले जाते. यावरून लक्षात येते की रक्‍तसंबंध हाच शेवटी महत्त्वाचा असतो. युद्धात शत्रूचे रक्‍त सांडणे किंवा रक्‍तशुद्धी, रक्‍ताचे नाते या गोष्टी नेहमी बोलण्यात असतात व यावरूनही रक्‍ताचे महत्त्व लक्षात येते.

शरीरात रक्‍त भरपूर प्रमाणात असले तरी त्यात काही दोष असतात असेही बरेच वेळा असे दिसते. जसे पाणी उघडे ठेवले तर वरून कीडा-मुंगी पडून पाणी दूषित होईल हे तर वेगळेच पण त्यात वातावरणातील धुळीचे बारीक कण मिसळून जातात काही वेळाने त्यात दोष उत्पन्न होतो. त्याचप्रमाणे शरीरावर कुठेही बाह्यवातावरणाशी संबंध येईल अशी उघडी जखम असल्यास खूप काळजी घ्यावी लागते. कारण, अशा उघड्या जखमेद्वारे बाह्यवातावरणातील जंतुसंसर्ग वा व्हायरससंसर्ग होऊ शकतो. या गोष्टीवर आधारित स्त्रियांच्या मासिक धर्माच्या वेळचे काही नियम केलेले दिसतात.

रक्‍ताची शुद्धता सांभाळणे खूप महत्त्वाचे असते. सेवन केलेल्या अन्नापासूनच रक्‍त तयार होत असल्याने अन्न-पाण्याची शुद्धी पाळणे हे रक्‍त शुद्ध ठेवण्याचा एक सोपा व प्रभावी मार्ग असतो. मसालेदार, अति तिखट पदार्थ, तेलकट पदार्थ सेवन केल्यास रक्‍तात पित्तदोष उत्पन्न होऊन त्वचा लाल होणे, त्वचेवर गांधी वा पुटकुळ्या उठणे असे त्रास सुरू होतात. फुप्फुसात वा रक्‍तात मोठा दोष उत्पन्न झाला तर एक्‍झिमा, त्वचारोग, सोरायसिस असे रोगही झालेले दिसतात. डोक्‍यात कोंडा होणे, अंगावर कंड सुटणे, अंगावर सुई टोचण्यासारखे वाटणे असे सर्व त्रास झालेले दिसतात. रक्‍तातील बरेचसे दोष काही प्रमाणात तरी बरे करता येतात. तसेच ऍनिमिया म्हणजे रक्‍त कमी प्रमाणात असणे या रोगाचाही इलाज करणे सोपे असते,

सध्या खाण्यापिण्यावर काही निर्बंध राहिलेले नसल्यामुळे व आहारशास्त्राबाबतीत चुकीचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे बहुतेक ठिकाणी रक्‍तदोष घेऊनच मुले जन्माला आलेली दिसतात. त्वचेवर फोड, लालसरपणा याद्वारे रक्‍तदोष साधारणपणे प्रकट होतो पण रक्‍तदोष अधिक प्रमाणात असल्यास श्‍वसनाचे विकारही झालेले दिसतात. रक्‍तातील दोषामुळेच त्वचा काळवंडते हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून सौंदर्य वाढविण्याची वा रंग उजळ व्हावा व चेहरा तेजःपुंज दिसावा अशी इच्छा असल्यास औषधयोजना करण्याचे काम रक्‍ताच्या माध्यमातून अत्यंत सोपेपणाने होऊ शकते.

 


उत्तरे तुमच्या प्रश्नांची…

उत्तरे तुमच्या प्रश्नांची…

रक्‍तदाबाचा त्रास आहे. त्यासाठी गोळ्याही चालू आहेत; मात्र चालताना माझे पाय लाकडासारखे कडक होतात व दुखतात, त्यामुळे चालता येत नाही. बसल्याशिवाय बरे वाटत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
-
परशुराम गुरव, सिंधुदुर्ग
उत्तर - चालताना याप्रमाणे त्रास होणे हे रक्‍ताभिसरण पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे लक्षण आहे, त्यामुळे गोळ्यांच्या मदतीने रक्‍तदाब नियंत्रणाखाली राहात असला तरी रक्‍ताभिसरण सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. यासाठी संपूर्ण शरीराला, विशेषतः पायांना खालून वर या दिशेने हलक्‍या हाताने अभ्यंग करणे उत्तम.
वातदोषाचे संतुलन करणाऱ्या व रक्‍ताभिसरण सुधारण्यास मदत करणाऱ्या द्रव्यांनी सिद्ध "संतुलन अभ्यंग तेल" यासाठी उत्तम होय. बरोबरीने "कार्डिसॅन"सारखे चूर्ण मधाबरोबर घेण्याचाही चांगला उपयोग होईल. सोबत "संतुलन वातबल", "संतुलन रुधरा" वगैरे योग घेण्याचाही फायदा होईल. योग्य रक्‍ताभिसरणावर सर्व शरीरव्यापार अवलंबून असल्याने वेळेवर योग्य उपचार अवश्‍य सुरू करावेत. शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म करणेही महत्त्वाचे होय.
प्रश्‍न - माझ्या दोन्ही डोळ्यांवर टेरिजियम म्हणजे पांढरट पडद्यासारखे वाढते आहे. एकदा ऑपरेशन झाले आहे तरीही पुन्हा वाढते आहे. कृपया कमी होण्यासाठी व पुन्हा वाढू नये यासाठी मार्गदर्शन करावे.
-
श्री. मनोहर, पुणे
उत्तर - ऑपरेशन करूनही या प्रकारचा त्रास वारंवार होतो हा अनेकांचा अनुभव असतो. असा त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी अवश्‍य प्रयत्न करता येतात तसेच पडदा वाढण्यास नुकतीच सुरुवात आली असली तरी शस्त्रकर्म टाळता येऊ शकते. डोळ्यात नियमित अंजन उदा. "सॅन अंजन (क्‍लिअर)"टाकणे, रात्री झोपताना डोळ्यात "संतुलन सुनयन तेला"सारखे डोळ्यांचे आरोग्य कायम राहण्यास मदत करणारे तेल टाकणे हे उपाय करता येतात. तसेच रोज सकाळी त्रिफळ्याच्या काढ्याने डोळे धुण्याचाही उपयोग होऊ शकतो.

डोळ्यांचे आरोग्य कायम राहावे व टेरिजियम सारखा त्रास वारंवार होऊ नये यासाठी हे सर्व उपाय उत्तम होत. बरोबरीने पोटात घेण्यासाठी औषधांची गरज दिसते, त्यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.
प्रश्‍न - मी 37 वर्षांची आहे. माझी पाठ, कंबर, खांदे व सर्वच सांधे खूप दुखतात. लहानपणी मला संधिवाताचा त्रास झाला होता. त्या वेळी सात-आठ वर्षे मी महिन्याला एक याप्रमाणे खूप इंजेक्‍शने घेतली होती. सध्या कॅल्शियमच्या गोळ्या चालू आहेत पण खूप वय झाल्यासारखा थकवा येतो. हालचाल करू नये असे वाटते. जागरणे तर मुळीच सहन होत नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे.
-
सोनाली मोरे, चिंचवड
उत्तर - लहानपणापासून असंतुलित झालेल्या वातदोषामुळे इतका त्रास होतो आहे. वातसंतुलनासाठी तसेच ताकद वाढविण्यासाठी संपूर्ण शरीराला "संतुलन अभ्यंग तेल" व सांध्यांना "संतुलन शांती तेल" लावण्याचा उपयोग होईल. नियमितपणे पादाभ्यंग करण्यानेही वात संतुलनास मदत मिळू शकते. बरोबरीने "संतुलन वातबल गोळ्या' "संतुलन प्रशांत चूर्ण", "कॅल्सिसॅन गोळ्या" घेण्याचा उपयोग होईल. चमचाभर एरंडेल तेलाचे मोहन टाकून तयार केलेली गरम गरम पोळी वा भाकरी दिवसातून एकदा खाण्याचा तसेच रोज सकाळी नाश्‍त्यापूर्वी सुंठ-गूळ-तुपाची सुपारीच्या आकाराची गोळी घेण्याचाही उपयोग होईल.

कॅल्शियम मिळण्याच्या दृष्टीने आहारात दूध व साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश असण्याकडे लक्ष ठेवावे. बऱ्याच वर्षांपासून व बराच तीव्र त्रास आहे त्यादृष्टीने तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने पंचकर्मातील विरेचन, बस्ती करून क्षीरबस्ती, पिंडतैलबस्ती वगैरे घेणेही श्रेयस्कर होय.
प्रश्‍न - माझे वय 46 वर्षे असून, वर्ण सावळा आहे; पण चेहरा रापल्यासारखा काळा वाटतो. विशेषतः कपाळावर भुवयांवर काळसर तवंग असल्यासारखा दिसतो. उन्हात जावे लागले नाही, तरी चेहरा काळवंडलेला असतो. नेमके काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे.
-
शरद जोशी, पुणे
उत्तर - शरीरात अशुद्धी साठायला लागली की काही विशिष्ट ठिकाणची त्वचा काळवंडू लागते, भुवयांच्या वरचा काळसरपणा हा यामुळेच आलेला आहे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन व बस्ती घेणे. एरवीसुद्धा पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवायला हवे.

दर 15 दिवसांनी एरंडेल तेल किंवा योगसारक चूर्ण घेऊन दोन-तीन जुलाब होऊ देण्याचाही उपयोग होईल. या उपायांनी आंतरशुद्धी होणे सर्वात आवश्‍यक असून बरोबरीने "संतुलन रोझ ब्युटी तेला"सारखे वर्ण्य तेल लावण्याचा, "सॅन मसाज पावडरने' चेहरा धुण्याचाही फायदा होईल. महामंजिष्ठादि काढा, मंजिष्ठासॅन गोळ्या घेणेही चांगले होय.

 

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories