रक्तदाबाचा त्रास आहे. त्यासाठी गोळ्याही चालू आहेत; मात्र चालताना माझे पाय लाकडासारखे कडक होतात व दुखतात, त्यामुळे चालता येत नाही. बसल्याशिवाय बरे वाटत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. - परशुराम गुरव, सिंधुदुर्ग उत्तर - चालताना याप्रमाणे त्रास होणे हे रक्ताभिसरण पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे लक्षण आहे, त्यामुळे गोळ्यांच्या मदतीने रक्तदाब नियंत्रणाखाली राहात असला तरी रक्ताभिसरण सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. यासाठी संपूर्ण शरीराला, विशेषतः पायांना खालून वर या दिशेने हलक्या हाताने अभ्यंग करणे उत्तम. वातदोषाचे संतुलन करणाऱ्या व रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करणाऱ्या द्रव्यांनी सिद्ध "संतुलन अभ्यंग तेल" यासाठी उत्तम होय. बरोबरीने "कार्डिसॅन"सारखे चूर्ण मधाबरोबर घेण्याचाही चांगला उपयोग होईल. सोबत "संतुलन वातबल", "संतुलन रुधरा" वगैरे योग घेण्याचाही फायदा होईल. योग्य रक्ताभिसरणावर सर्व शरीरव्यापार अवलंबून असल्याने वेळेवर योग्य उपचार अवश्य सुरू करावेत. शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म करणेही महत्त्वाचे होय. प्रश्न - माझ्या दोन्ही डोळ्यांवर टेरिजियम म्हणजे पांढरट पडद्यासारखे वाढते आहे. एकदा ऑपरेशन झाले आहे तरीही पुन्हा वाढते आहे. कृपया कमी होण्यासाठी व पुन्हा वाढू नये यासाठी मार्गदर्शन करावे. - श्री. मनोहर, पुणे उत्तर - ऑपरेशन करूनही या प्रकारचा त्रास वारंवार होतो हा अनेकांचा अनुभव असतो. असा त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी अवश्य प्रयत्न करता येतात तसेच पडदा वाढण्यास नुकतीच सुरुवात आली असली तरी शस्त्रकर्म टाळता येऊ शकते. डोळ्यात नियमित अंजन उदा. "सॅन अंजन (क्लिअर)"टाकणे, रात्री झोपताना डोळ्यात "संतुलन सुनयन तेला"सारखे डोळ्यांचे आरोग्य कायम राहण्यास मदत करणारे तेल टाकणे हे उपाय करता येतात. तसेच रोज सकाळी त्रिफळ्याच्या काढ्याने डोळे धुण्याचाही उपयोग होऊ शकतो.
डोळ्यांचे आरोग्य कायम राहावे व टेरिजियम सारखा त्रास वारंवार होऊ नये यासाठी हे सर्व उपाय उत्तम होत. बरोबरीने पोटात घेण्यासाठी औषधांची गरज दिसते, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रश्न - मी 37 वर्षांची आहे. माझी पाठ, कंबर, खांदे व सर्वच सांधे खूप दुखतात. लहानपणी मला संधिवाताचा त्रास झाला होता. त्या वेळी सात-आठ वर्षे मी महिन्याला एक याप्रमाणे खूप इंजेक्शने घेतली होती. सध्या कॅल्शियमच्या गोळ्या चालू आहेत पण खूप वय झाल्यासारखा थकवा येतो. हालचाल करू नये असे वाटते. जागरणे तर मुळीच सहन होत नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे. - सोनाली मोरे, चिंचवड उत्तर - लहानपणापासून असंतुलित झालेल्या वातदोषामुळे इतका त्रास होतो आहे. वातसंतुलनासाठी तसेच ताकद वाढविण्यासाठी संपूर्ण शरीराला "संतुलन अभ्यंग तेल" व सांध्यांना "संतुलन शांती तेल" लावण्याचा उपयोग होईल. नियमितपणे पादाभ्यंग करण्यानेही वात संतुलनास मदत मिळू शकते. बरोबरीने "संतुलन वातबल गोळ्या' "संतुलन प्रशांत चूर्ण", "कॅल्सिसॅन गोळ्या" घेण्याचा उपयोग होईल. चमचाभर एरंडेल तेलाचे मोहन टाकून तयार केलेली गरम गरम पोळी वा भाकरी दिवसातून एकदा खाण्याचा तसेच रोज सकाळी नाश्त्यापूर्वी सुंठ-गूळ-तुपाची सुपारीच्या आकाराची गोळी घेण्याचाही उपयोग होईल.
कॅल्शियम मिळण्याच्या दृष्टीने आहारात दूध व साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश असण्याकडे लक्ष ठेवावे. बऱ्याच वर्षांपासून व बराच तीव्र त्रास आहे त्यादृष्टीने तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने पंचकर्मातील विरेचन, बस्ती करून क्षीरबस्ती, पिंडतैलबस्ती वगैरे घेणेही श्रेयस्कर होय. प्रश्न - माझे वय 46 वर्षे असून, वर्ण सावळा आहे; पण चेहरा रापल्यासारखा काळा वाटतो. विशेषतः कपाळावर भुवयांवर काळसर तवंग असल्यासारखा दिसतो. उन्हात जावे लागले नाही, तरी चेहरा काळवंडलेला असतो. नेमके काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे. - शरद जोशी, पुणे उत्तर - शरीरात अशुद्धी साठायला लागली की काही विशिष्ट ठिकाणची त्वचा काळवंडू लागते, भुवयांच्या वरचा काळसरपणा हा यामुळेच आलेला आहे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन व बस्ती घेणे. एरवीसुद्धा पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवायला हवे.
दर 15 दिवसांनी एरंडेल तेल किंवा योगसारक चूर्ण घेऊन दोन-तीन जुलाब होऊ देण्याचाही उपयोग होईल. या उपायांनी आंतरशुद्धी होणे सर्वात आवश्यक असून बरोबरीने "संतुलन रोझ ब्युटी तेला"सारखे वर्ण्य तेल लावण्याचा, "सॅन मसाज पावडरने' चेहरा धुण्याचाही फायदा होईल. महामंजिष्ठादि काढा, मंजिष्ठासॅन गोळ्या घेणेही चांगले होय.
No comments:
Post a Comment