Sunday, April 25, 2010

अन्नयोग : मीठ

अन्नयोग : मीठ


मीठ हा आहारातील महत्त्वाचा घटक. मिठाशिवाय अन्नाला रुची येणे शक् नसते. मीठ अनेक प्रकारचे असते. आयुर्वेदात सौवर्चल, सैंधव, सामुद्र, औद्भिद, बीड, रोमक, पांसुज वगैरे नावाची मिठे वापरली जातात. रोजच्या स्वयंपाकात वापरले जाते ते सामुद्र मीठ असते, पण सैंधव, सौवर्चल (पादेलोण) वगैरे मीठ प्रत्येक घरात असणे चांगले.
समुद्राच्या पाण्यापासून बनविलेले मीठ म्हणजे "सामुद्र'.

सामुद्रं रुचिदं हृद्यमग्निदीप्तिकरं मतम्
कैशशौक्ल्यकरं भेदि ह्यविदाहि बलासकृत्।।
पाके तु मधुरं प्रोक्तं कटु तिक्तं गुरु स्मृतम्
किंचित्उष्णं पित्तलं क्षारं स्निग्धं शूलनुत्।।...निघण्टु रत्नाकर

रस - खारट
गुण - गुरू म्हणजे पचण्यास जड
वीर्य - किंचित उष्ण, स्निग्ध, अविदाही म्हणजे जळजळ करणारे
विपाक - मधुर
दोष - पित्तकर, कफवर्धक

समुद्राच्या पाण्याचे मीठ रुचकर असते, मनाला प्रिय वाटते, अग्नी प्रदीप्त करते, वेदना कमी करते. मिठामुळे मळाचे भेदन होते. मात्र मीठ अतिप्रमाणात घेतल्यास त्यामुळे केस पांढरे होतात. मिठामुळे शरीरातील क्लेद (अतिरिक् ओलावा) वाढत असल्याने रक्तदाबही वाढू शकतो.

स्वयंपाक करताना आपण हेच मीठ वापरतो, त्यामुळे मिठाचा अतिरेक करणे चांगले नाही. अन्नाला रुची येईल, अग्नीचे दीपन होईल एवढ्या प्रमाणात मीठ वापरता येते. तसेच सामुद्र मिठावर अग्निसंस्कार झाला, की त्याचे दुष्परिणाम कमी होतात. म्हणून अन्न शिजवताना त्यात चवीनुरूप मीठ टाकणे योग्य. जेवायला बसल्यावर वरून मीठ घेणे चांगले नाही, तसेच चिवडा, भेळ वगैरे ज्या पदार्थांत कच्चे मीठ टाकावे लागते त्याचा अतिरेक करणे योग्य नाही.

मिठामधला अजून एक दोष म्हणजे मीठ अभिष्यंदी असते म्हणजे मिठामुळे शरीरातील स्रावांचे प्रमाण वाढते. काकडीला मीठ लावले, की काकडीला पाणी सुटते, हे आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो. तसेच मिठामुळे शरीरातील ओलावा (क्लेद) आवश्यकतेपेक्षा जास्त वाढू शकतो. म्हणूनच सूज येण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी, वजन अधिक असणाऱ्यांनी मीठ प्रमाणात शिजवूनच खाणे श्रेयस्कर असते.
सैंधव - सैंधव मिठाचे खडे मिळतात. औषधात हे मीठ मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

सैन्धवं रुचिदं वृष्यं चक्षुष्यं चाग्निदीपनम्
शुद्धं स्वादु लघु स्निग्धं पाचनं शीतलं मतम्।।
अविदाहि तु सूक्ष्मं हृद्यं चैव त्रिदोषजम्
व्रणदोषं मलस्तंभं हृद्रोगं चैव नाशयेत्।।...निघण्टु रत्नाकर

रस - खारट, रुचकर
गुण - लघू म्हणजे पचायला हलके, स्निग्ध, सूक्ष्म, अविदाही म्हणजे जळजळ करणारे
वीर्य - शीतल
विपाक - मधुर
दोष - त्रिदोषांना संतुलित करणारे

सैंधव मीठ शुक्रधातूसाठी हितकर असते, डोळ्यांसाठी हितकर असते. जाठराग्नीला प्रदीप्त करते, पचनास मदत करते. हृदयासाठी हितकर असते. व्रण, मलावष्टंभ, हृद्रोगामध्ये हितकर असते.
बहुतेक सर्व लवणे (मीठ) डोळ्यांसाठी अहितकारक असतात, पण नियमाला अपवाद म्हणजे सैंधव. सैंधवामुळे डोळे खराब, तर होत नाहीतच, पण उलट डोळ्यांसाठी सैंधव चांगले असते. साधे मीठ सैंधव मिठात बराच फरक आहे.

म्हणूनच औषधात सैंधव अधिक प्रमाणात वापरले जाते. आजारपणातही साध्या मिठाऐवजी सैंधव वापरता येते. सौवर्चल (पादेलोण) - पादेलोणाचेही खडे असतात. याचा रंग फिकट गुलाबीसर असतो.

सौवर्चलं रेचकरं क्षारं कटु लघु स्मृतम्
अपित्तलं भेदकं रुचिकृत्चाग्निदीपनम्।।
पाचकं विशदं चोष्णं सूक्ष्मं स्निग्धं सुगन्धिकम्
उद्गारशुद्धिदं तीक्ष्णं मलावष्टंभशूलनुत्।।
जन्तूर्ध्ववातगुल्मानाम्आमशूलस्य नाशकम्
आनाहरेचकं चैव नाशयेद्इति कीर्तितम्।।...निघण्टु रत्नाकर

रस - खारट, तिखटसर
गुण - लघू म्हणजे पचण्यास सोपे, सूक्ष्म, स्निग्ध, सुगंधी, तीक्ष्ण
वीर्य - उष्ण

पादेलोणामुळे शौचाला साफ व्हायला मदत होते, पचनास मदत मिळते, अग्नी प्रदीप्त होतो. मलावष्टंभ, शूळ, कृमी, ढेकर, वायुगोळा, आमशूळ, गॅसेस, तोंडाला चव नसणे वगैरे त्रासांमध्ये पादेलोण उपयुक् असते.
दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताकात चिमूटभर पादेलोण थोडी जिरेपूड टाकून घेण्याने पचन व्यवस्थित होते. अपचन, गॅसेस, पोट दुखणे वगैरे त्रास होत असल्यास आल्या-लिंबाच्या रसात चवीपुरते पादेलोण टाकून घेण्याने लगेच बरे वाटते.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive