Monday, April 12, 2010

पासष्टावी कला फसवण्याची!

पासष्टावी कला फसवण्याची!

एखादे पेय पिऊन मुलगी दुप्पट उंच कशी होईल? किंवा एखादा साबण लावून आपण रोगजंतूंपासून कसे वाचू?

 

हे प्रश्न आपणच स्वत:ला विचारायला हवेत. वैज्ञानिक भाषा दाव्यांबद्दल आपल्याला आदर असेल तर जाहिरातींमध्ये विज्ञानाचा बुरखा पांघरून केलेले दावे खरे की खोटे, हे तपासायला हवे.

 ...............

 

'भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी?' काही वर्षांपूवीर् धुण्याचा साबण बनवणाऱ्या एका कंपनीच्या जाहिरातीतलं हे घोषवाक्य होतं. ते लोकप्रियही झालं आणि त्याचा वापर अन्य क्षेत्रांमध्ये, स्पर्धांमध्येही रूपकाने केला जात होता. आजकाल ही स्पर्धाच इतकी जीवघेणी झाली आहे की, कोणताही आडपडदा ठेवता सरळसरळ स्पर्धकाचं नाव घेत आपलाच माल कसा वरचढ आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न जाहिरातींमधून होतो. त्याचंच प्रत्यंतर अलीकडं धुण्याचाच साबण बनवणाऱ्या दोन कंपन्यांमधील युद्धामधून मिळालं होतं. प्रकरण चिघळून कोर्टात गेल्यानं त्यावर तात्पुरता पडदा पडला असला, तरी ती ऊमीर् नष्ट झाली आहे, असं नाही.

 

पण आपण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत, असा दावा कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादकाला करता येईल का, हा खरा सवाल आहे. ग्राहकाच्या मनात वैज्ञानिक पुराव्यांविषयी भीतिमिश्ाति आदर किंवा आदरमिश्ाति दहशत असते. त्याचा फायदा घेऊन मालासंबंधी मिथ्या वैज्ञानिक दावे खूप कंपन्या करतात. तेव्हा कृष्णाने कर्णाला विचारलेला तो सवाल या कंपन्यांना करावासा वाटतो, 'तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?'

 

आपलं पौष्टिक पेय पिणाऱ्या मुलांची उंची लक्षणीय वाढत असल्याचा दावा एक कंपनी करते. त्यासाठी काही वैज्ञानिक चाचण्या केल्याची ग्वाही देते. त्या चाचण्या करताना त्यासंबंधीचे सगळे वैज्ञानिक निकष आणि नियम पाळले गेले होते का, हे मात्र गुलदस्त्यातच राहतं. पोषणाच्या कमरतेमुळं शारीरिक वाढीवर अनिष्ट परिणाम होतात, हे खरंच आहे. परंतु एखाद्या मुलाची शारीरिक वाढ किती आणि कशी व्हावी, हे त्याच्या अंगची जनुकंच निश्चित करतात. हा वारसा मातापित्याकडून मिळतो. थोडक्यात, जन्मत: मुलाची उंची किती वाढेल, हे निश्चित असतं. योग्य पोषण मिळाल्यास उंचीची पूर्ण क्षमता विकसित होऊन कमाल मर्यादा गाठली जाते. पण मुळातच जनुकांनी निश्चित केलेली उंची कमी असेल, तर कितीही लटकलं किंवा कितीही पोषक पेयांचं सेवन केलं तरी त्या उंचीत लक्षणीय तर सोडाच, पण मामुली वाढही होऊ शकत नाही.

 

ही उपजत क्षमता किती असते आणि आनुवंशिक वारशाने ती कशी ठरते, याचं गणित आता वैज्ञानिकांनी केलं आहे. सर्व वंशांच्या व्यक्तींची सरासरी उंची वेगळी असते. उदाहरणार्थ, युरोपातल्या कॉकेशियन वंशाच्या व्यक्ती जास्त उंच असतात. तुलनेनं आशियाई कमी उंच असतात. शिवाय प्रत्येक वंशातील व्यक्तींच्या उंचीचा आलेखही विस्तारित असतो. सरासरीच्या दोन्ही अंगांनी तो पसरतो. हा फरक जसा जनुकांच्या प्रतिकृतींमधली फरकामुळं प्रतीत होतो, तसाच तो ज्या पर्यावरणात त्या व्यक्तीची वाढ होते त्यावरही अवलंबून असतो. पोषणाचाही यातच अंतर्भाव होतो.

 

या व्यतिरिक्त आनुवंशिकतेचा वारसा आईवडिलांकडून मिळण्याची शक्यताही वेगवेगळी असते. यालाच वैज्ञानिक भाषेत हेरिटॅबिलिटी म्हणतात. त्याचं मोजमाप नातलगांच्या पाहणीवरून होतं. जुळ्या किंवा सख्ख्या भावंडांच्या उंचीतील फरकांवरून हेरिटॅबिलिटीचं मोजमाप करण्यात येतं. या भावंडांमध्ये जनुकीय साम्यावरून आनुवंशिक घटक आणि पर्यावरणीय घटक यांच्या हेरिटॅबिलिटीमधील योगदानाचा अंदाज बांधता येतो. जवळच्या दोन नातलगांमध्ये किती जनुकीय निदेर्शांक सारखे आहेत, यावरून त्यांच्या जनुकीय साम्याचं मोजमाप करता येतं आणि त्यानुसार इतर घटकांच्या योगदानाचं अनुमान काढता येतं.

 

क्वीन्सलँडमधील पीटर व्हिश्शर यांनी ऑस्ट्रेलियातील तीन हजार ३७५ जुळ्या भावंडांच्या जोड्यांच्या केलेल्या सवेर्क्षणावरून हेरिटॅबिलिटीचं प्रमाण ८० टक्के असल्याचा निष्कर्ष काढला. अमेरिकेतल्या अशा सवेर्क्षणानंही या अनुमानाची पुष्टीच केली. फिनलंडमध्ये तर तब्बल हजार ९७५ जुळ्यांचं सवेर्क्षण झालं. त्यातून पुरुषांच्या बाबतीत हेरिटॅबिलिटी ७८ तर स्त्रियांच्या बाबतीत ती ७५ टक्के असल्याचं दिसलं. युरोपातल्या इतर काही ठिकाणी तर ८० टक्क्यांहूनही अधिक हेरिटॅबिलिटी दिसून आली.

 

निरनिराळ्या वंशांमध्ये जनुकीय उंचीच्या मर्यादेप्रमाणे हेरिटॅबिलिटीचं प्रमाणही वेगवेगळं असतं. २००४ साली मियो क्यून ली यांनी चीनमध्ये केलेल्या ३८५ कुटुंबांच्या सवेर्क्षणातून हे प्रमाण ६५ टक्केच दिसलं. याला जसे जनुकीय फरक कारणीभूत होते, तसेच आहार, हवामान आणि जीवनशैली यासारखे पर्यावरणीय घटकही कारणीभूत आहेत.

 

या हेरिटॅबिलिटीचा उपयोग करून उंचीवर होणाऱ्या जनुकीय आणि पर्यावरणीय घटकांच्या प्रभावाचं प्रमाण ठरवणं शक्य होतं. म्हणजे समजा एखाद्या वंशातलं हेरिटॅबिलिटीचं प्रमाण ८० टक्के आहे. त्यात वंशाची सरासरी उंची पाच फूट दहा इंच म्हणजेच १७८ सेंटिमीटर आहे. आता त्याच वंशातल्या एखाद्या व्यक्तीची उंची चक्क सहा फूट म्हणजेच १८३ सेंटिमीटर असेल तर त्या वाढीव पाच सेंटिमीटरमध्ये आनुवंशिक वारशाचा सहभाग किती आणि पोषणाचा सहभाग किती याचं गणित करता येतं. तसं केल्यास त्यापैकी ८० टक्के म्हणजे सेंटिमीटरची वाढ जनुकीय घटकांपोटी झालेली असेल आणि केवळ सेंटिमीटरचं श्रेय पोषणाला देता येईल. हेरिटॅबिलिटीचं किमान प्रमाण ६५ टक्के असल्याचं दिसल्यानं वाढीव उंचीपैकी एक तृतियांश हिस्साच पोषणापोटी झाला असेल. तेव्हा त्या पेयाच्या सेवनामुळं 'उंचीत दुप्पट वाढ' झाल्याचा दावा कसा मान्य करता येईल?

 

अशीच दुसरी एक जाहिरात. एका साबणाची. लपंडावाच्या खेळात वडील लपलेले असताना त्यांना खोकल्याची उबळ येते आणि त्यामुळं मुलगा त्यांना सहज शोधतो. यावर पांढरा कोट घातलेली स्त्री येऊन सांगते की बदलत्या हवामानांमुळं रोगप्रतिकारशक्तीत बदल होतात आणि त्यामुळं रोगजंतूंचं फावतं. तेव्हा सतत आमचा साबू वापरून त्या जंतूंना पळवून लावा.

 

रोगप्रतिकारशक्ती देखील प्रत्येक व्यक्तीला जनुकीय वारशाने मिळते. तिच्यावर बदलत्या ऋतूंचा काहीही परिणाम होत नाही. मग थंडीत सदीर् जास्त का होते? किंवा उन्हाळ्यात डोळे का येतात? असा प्रश्न साहजिकच पडेल. याचं कारण म्हणजे विविध रोगांचे कारक असलेले संधिशोधू रोगजंतू वातावरणात नेहेमीच दबा धरून बसलेले असतात. बदलत्या हवामानामुळे त्यांना बळ मिळतं. त्यांची वाढ जोमानं होते आणि त्यांचा हमलाही जोरकस होतो. ज्याच्यावर तो होतो त्याच्या रोगप्रतिकारशक्तीत काही बदल होत नाही पण मुळातच एखाद्याची ती दुबळी असेल तर त्याला लागण होते. या प्रतिकारयंत्रणेत ऋतुमानाने बदल होणार असतील, तर सर्वांना जंतूंची लागण व्हायला हवी. तशी ती होत नाही. हे जंतू हवेतून श्वसनातून शरीरात शिरतात. आपलं बाह्यांग साबणानं धुतल्यानं जंतू पळून कसे जातील?

 

जाहिरातदार सर्वसामान्य जनतेच्या वैज्ञानिक अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना भिववतात. त्या जाहिरातींमधील वैज्ञानिक दाव्यांची वस्तुनिष्ठ छाननी केल्यास त्यांचं पितळ नेहमीच उघडं पडतं. त्यामुळे अशा जाहिरातींना कितपत थारा द्यायचा, हे अखेर ग्राहकांनीच ठरवायला हवं.

 

डॉ. बाळ फोंडके

 

ज्येष्ठ वैज्ञानिक


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive