Monday, April 12, 2010

सिंहासन बत्‍तिशी - कथा पहिली

सिंहासन बत्‍तिशी - कथा पहिली


'राजा, मी तुझ्यावर खूष आहे. मी तुला सांगते ते ऐक' जया पुतळी बोलूं लागली ---

फार फार पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी उज्जयिनीला राजा भर्तृहरी राज्य करीत होता. त्याच्या राज्यांत एक ब्राह्मण फार तेजस्वी होता. तपस्वी होता. पार्वतीची आराधना करण्यांत त्याला देहाचीही शुद्ध रहात नसे. असे बरेच दिवस गेले. अखेल देवी पार्वती त्याला प्रसन्न झाली एक सुंदर फळ त्याच्याकडे फेकून म्हणाली, 'वत्सा, मी प्रसन्न आहे. तूं हे फळ खा, म्हणजे अमर होशील ! माझा श्रेष्ठ भक् ठरशील !'

फळ देऊन देवी गुप्त झाली. ब्राह्मण भानावर आला. तें फळ समोर पडलेले होते. ब्राम्हणानें स्वत:शीच विचार केला -- 'देवीनें मला हें फळ दिलें, हें फळ खाऊन मी अमर झालीं तर कुणाचे कल्याण होणार आहे ? त्यापेक्षां आपले महाराज तर भर्तृहरी यांना हें फळ नेऊन द्यावे ते जर अमर झाले तर माझ्यासारख्या अनेकांचें ते रक्षण करतील-पालन करतील.'

विचार मनांत येतांच त्या ब्राह्मणानें दरबारांत जाऊन तें फळ राजाला अर्पण केलें. राजाने त्याची हकीकत ऐकून घेतली. त्याचा नि:स्वार्थीपणा पाहून तो अतिशय खूष झाला त्यानें ब्राह्मणाला खून संपत्ति दिली. ब्राह्मण आनंदानें घरीं निघून गेला.

तें फळ घेऊन राजा अंत:पुरात गेला. नुकताच राजानें एका सौदर्यवती षोडशेबरोबर विवाह केला होता. सर्व राण्यांत ती सुंदर तरुण असल्यानें राजाची तिच्यावर जास्त प्रीति होती. आपल्या लावण्यसंपन्न राणीला राजानें तें फळ भेट म्हणून दिलें. ती राणी खूष झाली.

राजा निघून गेला. या राणीला एक पहिला प्रियकर होता. तो अधूनमधून गुप्त वेषानें राणीला भेटत असे. राणीने तें फळ आपल्या प्रियकराला देऊन टाकले. तो प्रियकरही रंगेल माणूस होता. त्याचे एका वेश्येवर प्रेम जडले होते; पण ती वेश्या राजा भर्तृहरीकडे जात येत असे. तिला राजा जास्त आवडत असे. या वेश्येने आपल्यावर प्रेम करावे म्हणून त्यांने ते फळ तिला दिले. पण वेश्या मोठी धुर्त होती. भर्तृहरीला एकांतात गांठून ती म्हणाली, 'महाराज, अमर होण्यासाठी हें औषध आहे. हे फळ मला मिळालें आहे, पण माझ्यासारखीनें अमर होऊन उपयोग काय ? आपण अमर झालात तर पृथ्वीचें कल्याण होईल. आपण हें फळ घ्यावें म्हणजे मी धन्य होईन. आपली कृपा मात्र अशीच असूं दे.'

राजानें टक लावून त्या फळाकडे पाहिलें. काल आपल्याला त्या ब्राह्मणानें जे फळ दिले होते 'ते हेंच' हे त्याच्या लक्षांत आले. त्याला फार संताप आला. त्यानें तेथेंच चौकशी सुरू केली. अखेर सर्वांचे बिंग उघडकीस आलें. भर्तृहरीनें सर्वांना कडक शिक्षा दिल्या. तरीही त्याच्या मनाला शांती मिळेना. तो विचार करूं लागला - अरेरे ! मी जिच्यावर फार प्रेम केलें, जिचें नित्य चिंतन केले ती दुसऱ्यावर प्रेम करते. तो तिचा यार तिच्यापेक्षा दुसऱ्याच कुणा स्त्रीवर आषक झालेला दिसतो. आणि ती स्त्री माझ्यावर प्रेम कते. अरेरे ! काय हें अध:पतन !! माझा, माझ्या राणीचा, वेश्येचा. राणीच्या प्रियकराचा धि:कार असो. आमच्या मनांत हें प्रेम उत्पन्न करणाऱ्या मदनाचाही धि:कार असो --

यांचिंतयमि सततं मयि सा विरत्का
सा चान्यमिच्छाति जनं जनोऽन्यसत्:
अस्मत्कृतें तु परितुष्यति काचिदन्या
धिक् तांच तं मदनं इमां मांच

पण् या गोष्टी ऐकल्यानंतर् राजाला स्ंसाराचा वीट् आला. एक् दिवस् हें सर्व् राज्य् सोडून् तो वनवासांत् निघून् गेला.

राजा निघून गेल्यावर नगरींत हाहाकार उडाला. प्रधानाला काय करावे हे कळेना. राजाचा धाकटा भाऊ विक्रम बेपत्ता होता. राजाला वारस नव्हता. प्रधानानें एका हुशार तरुणाला गादीवर बसवले. पण त्याच रात्रीं त्याचा खून झाला. त्यानंतर आणखी दोनचार तरुणांना राज्याभिषेक करून पाहिला. अगदी कडेकोट बंदोबस्त ठेवला. पण तरीही त्या सर्वांना कुणीतरी मारून टाकले. अखेर एका प्रख्यात ज्योतिषांने सांगितले. 'हे काम वेताळाचे आहे. तो गादीवर बसलेल्या माणसाला ठार मारतो.' हे कळतांच कुणीही राज्यपद स्वीकारायला तयार होईना. दैवयोगाने परदेशी गेलेला भर्तृहरीचा धाकटा बंधू विक्रम त्यच सुमारास उज्जयिनीला आला. गादीवर राजा नसल्याचें कारण त्याला राजधानीत शिरतांच समजलें. आपल्या वाडवडिलांची गादी अशी रिकामी राहूं द्यायची नाही, मग काय होईल ते होवो; असा विचार करून तो सामान्य वेषांतच दरबारांत गेला म्हणाला.

'
मी गादीवर बसायला तयार आहे.' त्याचें तारुण्य, राजबिंडे शरीर न्हाहळून पहात प्रधान म्हणाला, 'पण वेताळ राजाला बळी घेतो हे आपल्याला माहीत आहे ना ?'

'
हो आहे !'

'
तरीही आपण गादीवर बसणार ?'

'
होय !'

'
मग माझी हरकत नाही' प्रधान म्हणाला. लगेच विक्रमाचा राज्याभिषेक करण्यांत आला.

रात्र झाली. विक्रम राजाच्या हुकुमाप्रमाणे त्याच्या शयनगृहांत पहारा ठेवला नव्हता. मात्र उत्तमोत्त्म खाद्याचे पदार्थ तयार करून पलंगाजवळ ठेवले होते. विक्रम राजा सावधपणें चाहूल घेत बसला. डोळे मिटतात असे वाटल्याबरोबर त्यानें आपल्या करंगळीला लहानशी जखम करून घेतली जखमेवर मीठ दाबले.

मध्यरात्र झाली. वेताळ हलक्या पावलांनी पलंगाजवळ आला. विक्रम राजानें त्याला नमस्कार करून म्हटलें, 'वेताळ महाराज, आपल्यासाठीं हें अन्न शिजवून ठेवलें आहे तें खा मग मला खा ! मला खाऊन आपलें पोट भरणार नाहे.'

वेताळाच्या तोंडाला तें सुग्रास अन्न बघून पाणी सुटले होते. त्यानें ते सारे अन्न मग बकाबक खाल्ले. त्याचा आत्मा तृप्त झाला आणि त्यानें विक्रमाला जिवंत सोडून दिले. मात्र त्याने आज्ञा केली कीं, 'रोज असेच अन्न मला मिळाले पाहिजे तुझ्या शयनगृहांत दुसरे कुणीही येता कामा नये.'

कांहीं दिवस असेच गेले. विक्रमानें एक रात्रीं वेताळाला विचारले, 'वेताळ महाराज, आपले ज्ञान शक्ती किती आहे, याचा मला अजून अंदाज आला नाही ---'

'
हे बघ ! मला भूतकाळांतील सर्व दिसते. वर्तमानकाळाबद्दल जरी फारसे सांगता आले नाहीं तरी भविष्य मात्र उत्तम समजते.'

'
मग माझे आयुष्य वाढविण्याचे किंवा कमी करण्याचेहि सामर्थ्य तुझ्यात असेल.'

'
छे ! छे ! मला माझ्या स्वत:च्या इच्छेप्रमाणें त्यांत कांहींच बदल करतां येत नाहीं.'

'
अच्छा ! आतां जा-तुमची वेळ झाली.' विक्रम म्हणाला. वेताळ निघून गेला.

दुसऱ्या दिवशीं रात्रीं वेताळ तेथें आला तर खोलींत अन्न नव्हतें. तो संतापला विक्रमाचे अंगावर धांवला. विक्रमानें सरकन आपली तलवार म्यानाबाहेर काढली म्हटलें, 'आजपर्यंतच्या दुबळ्या पुरुषांचा तूं वध करीत आलास ! यापुढें तुला ते जमणार नाहीं. माझें आयुष्य जर शिल्लक असेल तर तूं ते कमीजास्ती करूं शकत नाहींस मग युद्धाला तयार हो --'

त्याचे शौर्य पाहून वेताळ खूष झाला. तो म्हणाला, 'विक्रमा, मी तुझ्या धैर्यावर, शौर्यवर एकदम खूष आहे. आतां काय वाटेल तो वर माग --'

'
आतां रोज येथें येऊं नये. मात्र मी ज्यावेळेस आपले स्मरण करीन त्यावेळेस हजर राहून माझें काम करावे.'

'
तथास्तु' असे म्हणून वेताळ निघुन गेला. आतां राज्याला कसलीच भीति राहिली नाही.

सर्वजण विक्रम राजावर खूष होते. त्याची कीर्ति, सामर्थ्य औदार्य दिवसेंदिवस वाढतच होते. राजा रसिक होता. विद्वान लोकांचा त्याच्या दरबारांत नेहमी सत्कार होते असे.

एक दिवस काय झालें ! सिद्धसेन नांवाचा एक श्रेष्ठ कवी उज्जयिनीला आला. राजाने त्याचा योग्य तो आदरसत्कार केला त्याला नम्रपणे म्हटले - 'आपण आपली काही काव्यरचना आम्हांला ऐकवावी.'

कवी हुशार होता. त्यानें एक श्लोक म्हटला -

अपूर्वेयं धनुविर्द्या भवता शिक्षिता कृता:
मार्गणौधस्तु त्वा भ्यैति गुणो याति दिगंतरम

राजा, अरे अशाप्रकरची अपूर्व, अमोल धनुर्विद्या तूं शिकलास कुंठे ? तुझ्या या धनुर्विद्येत बाणरुपी याचक तुझ्याकडे धांवत येतात आणि खूप द्रव्य घेऊन जणु कांही त्या धनुष्याच्या दोरीसह बाहेर जातात.

आपल्या औदार्याचा हा उल्लेख विक्रमराजाला एवढा आवडला कीं, त्यानें खूष होऊन कवीला एक गांव बक्षीस दिले.

राजाला नमस्कार करून कवीनें खालील अर्थांचा दुसरा श्लोक म्हटला --

'
हे राजा ! तूं सर्वाना सर्व देतोस अशी तुझी लोक स्तुति करतात, पण ती खोटी आहे -

'
काय ?' रजा एकदम ओरडला.

'राजा, तूं शत्रूस पाठ परस्त्रीस हदय कधी दिलें आहेस का ?'

सर्वदो सर्वदोऽसीति मिथ्या त्वं कथ्यसे बुधै:
नारयो लेभिरे पृष्ठं वक्ष: परयोषित:

श्लोकाचा दुसरा चरण ऐकतांच विक्रम राजा एवढा खूष झाला कीं, त्यानें आणखी एका गांवाचें दानपत्र कवीला करून दिले. राजाला वंदन करून कवीनें आणखी दोन श्लोक म्हटले,

अरयस्ते भयत्रस्त: स्फुटितां घटवत्हदि
गलित नेत्रपाताच्छ राजन चित्रमिदं महत
सरस्वती स्थिता कंठे लक्ष्मी: करसरोरुहे
राजेन्द्र कृपिता कीर्तिस्तेन दशांतर गता

श्लोकाचा अर्थ असा होता - हे विक्रम, तुझ्या भीतीनें शत्रूचे हदयघट फुटले आणि त्यांतील पाणी नेत्रांतून गळूं लागलें. हा खरोखरच चमत्कार आहे. विक्रम राजा तुझ्या कंठांत प्रत्यक्ष सरस्वती वास करते आहे. तुझ्या हातांत लक्ष्मी नांदते आहे आणि म्हणूनच कीर्तिला राग आला ती देशांतराला निघून गेली.

'वा ! वा ! कविराज कमाल केलीत ! आज मी इतका खूष आहे कीं सारे राज्य तुम्हांला देऊन टाकतो आहे.'

'महाराज ! मी राज्य घेऊन काय करूं ? माझ्यासारख्याला त्याचा उपयोग काय ? तुझें तुलाच ते लखलाभ असो. मात्र तुझ्या औदार्यावर, रसिकतेवर मी फार फार खूष झालो आहे.'

विक्रमराजाला आशीर्वाद देऊन, संतुष्ट होऊन तो कवि आपल्या घरीं निघून गेला.

अशा या उदार, पराक्रमी राजावर खुष होऊन प्रत्यक्ष इंद्राने हें सिंहासन स्वर्गातून पृथ्वीवर पाठवून दिले. यावर बसून त्यानें अनेक वर्षें उत्तम प्रकारें राज्य केलें शेवटीं तो स्वर्गात गेला.

विक्रम राजा स्वर्गात गेला त्यावेळी आकाशवाणी झाली, 'या सिंहासनावर बसायला सध्या कुणी लायक माणूस नाहीं तेव्हा ते भूमीत पुरून ठेवा.'

आकाशवाणीप्रमाणे प्रधानानें हें सिंहासन जमिनीत पुरून ठेवलें. दैवयोगानें आज हें तुला सांपडलें, पण विक्रम राजाची योग्यता तुझ्यात नाही. तेव्हां तूं यावर बसायचा प्रयत् करूं नकोस !'

एवढें बोलून ती पुतळी स्तब्ध झाली. भोजराजा खिन्न होऊन आपल्या महालांत गेला.

पण विक्रमराज्याच्या गोष्टी ऐकण्याची त्याची उत्सुकता वाढीसच लागली. त्याने ठरवलें-रोज एका पुतळीला हात लावायचा आणि गोष्ट ऐकायची --

त्यानें दुसऱ्या दिवशीचा समारंभ रद्द केला. 'मी एक महिनाभर उपासना करणार आहे.' असेहि जाहीर केले.

राज्यकारभाराचा आपल्याला त्रास होऊ नये विक्रमराजाच्या गोष्टी आपल्याला निवांतपणे ऐकता याव्यात हाच त्यांचा हेतू होता. राज्यकारभार प्रधानावर सोपवून राजा भोज दुसऱ्या दिवसाची वाट पाहूं लागला --

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive