Tuesday, April 27, 2010

प्रज्ञापराध टाळा

प्रज्ञापराध टाळा

आयुर्वेद हे फक् रोग बरा करणारे वैद्यकशास्त्र नाही तर ते एक जीवनाभिमुख शास्त्र आहे, याचा ग्रंथ वाचताना पदोपदी प्रत्यय येतो. कसे वागावे, काय करू नये यासंबंधी सद्वृत्त विभागात अतिशय मौलिक मार्गदर्शन केलेले आढळते.

सद्वृत्तामध्ये काय काय करू नये हे जे सांगितले त्यात पहिली गोष्ट सांगितली, "नानृतं ब्रूयात्‌"' म्हणजे असत्य बोलू नये.

मनुष्याला तीन स्वाभाविक इच्छा असतात. प्राणैषणा, धनैषणा आणि परलोकैषणा.

प्राणैषणा म्हणजे प्राणांचे रक्षण करण्याची इच्छा

धनैषणा म्हणजे उपजीविका चालण्यासाठी आवश्यक असणारे धन मिळविण्याची इच्छा

परलोकैषणा म्हणजे मृत्यूनंतर परलोकात चांगले स्थान मिळविण्याची इच्छा

आयुर्वेदात या तीन एषणा नुसत्याच समजावल्या असे नाही तर त्या पूर्ण होण्यासाठीही मार्गदर्शन केलेले आहे. चरकसंहितेतल्या या सूत्रावरून हे स्पष्ट होते.

इमांस्तु धारयेद्वेगान्हितार्थी प्रेत्य चेह

साहसानाम्अशस्तानां मनोवाक्काय कर्मणाम्।।

चरक सूत्रस्थान

जिवंत असताना तसेच मृत्यूनंतर परलोकातही स्वतःचे हित हवे असणाऱ्या व्यक्तीने अयोग्य, अत्यंत साहसयुक् तसेच मन, वाणी शरीरासाठी निंदित असणाऱ्या वेगांचे धारण करावे. यात वाणीसाठी निंदित असणाऱ्या वेगांमध्ये "खोटे बोलण्या"चा समावेश केलेला आहे. बरोबरीने अत्यंत कठोर वचन बोलणे, चहाड्या करणे वेळेचे तारतम्य ठेवता बोलणे याही गोष्टी निंद्य सांगितल्या आहेत.

आयुर्वेदाने काया, वाचा, मन या तिन्ही स्तरांवर याप्रकारे काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन करण्याने मनुष्याचे मन, वचन कर्म यांची शुद्धी झाली की सुखपूर्वक धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ साध्य करून तो फळांचा उपभोग घेऊ शकतो आरोग्याचा आनंद घेऊ शकतो. खरे बोलणे हे केवळ सज्जनतेचे नव्हे तर आरोग्याचेही कारण असते हे यावरून लक्षात येते.

असत्य बोलणे हा एक प्रकारचा प्रज्ञापराधच असतो. बुद्धी, संयमन शक्ती आणि स्मरणशक्ती या तिघांचा परस्परात समन्वय असला आणि त्या आपापले काम व्यवस्थित करत असल्या की मनुष्य योग्य निर्णय घेतो आणि त्यामुळे आरोग्याचे रक्षण होते. मनुष्य असत्य बोलतो म्हणजेच वास्तविकतेपेक्षा काहीतरी वेगळे बोलत असतो.

अर्थातच सत्य काय हे बुद्धीला माहीत असले तरी ती भ्रष्ट झाल्याने काहीतरी वेगळे बोलायला, करायला भाग पाडते. यात संयमन होऊ शकलेले नसते आणि यातूनच वास्तविकतेपेक्षा निराळा निर्णय बुद्धीने घेतला की प्रज्ञापराध घडतो आणि प्रज्ञापराध हे अनेक रोगांचे कारण असल्याने त्यातून अनेक रोग निर्माण होतात.

अशा प्रकारे "सत्य' सद्वृताच्या दृष्टिकोनातून जितके महत्त्वाचे असते तितकेच आरोग्यरक्षणासाठीही आवश्यक असते.

खराब पाणी प्यायल्याने जसा लगेच त्रास होतो तसा असत्य बोलण्याचा दुष्परिणाम लगेचच दिसेल असे नाही. मात्र, प्रज्ञा भ्रष्ट होणे हे खराब पाणी पिण्याने होणाऱ्या त्रासापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरू शकते.

योग, ज्योतिष, संगीत, अध्यात्म अशी अनेक भारतीय शास्त्रे आहेत. या प्रत्येक शास्त्राचा मुख्य विषय निरनिराळा असला तरी "मोक्षप्राप्ती' हेच त्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे. आयुर्वेदही याला अपवाद नाही. आयुर्वेदात मोक्षप्रकरण नावाचे वेगळे प्रकरण दिलेले आहे. यात सांगितले आहे,

शुद्धसत्त्वस्य या शुद्धा सत्या बुद्धिः प्रवर्तते

चरक शारीरस्थान

शुद्ध मन असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी जी शुद्ध बुद्धी प्रकट होते तिला "सत्याबुद्धी' म्हणतात. ज्या सत्याबुद्धीच्या बलावर अतिबलवान अंधकाररूपी तमाचे, मायेचे भेदन करणे शक् होते; ज्या सत्याबुद्धीमुळे मनुष्य निःस्पृह बनतो अहंकारापासून मोकळा होऊ शकतो; ज्या सत्याबुद्धीमुळे योगाची सिद्धी होते तत्त्वज्ञान संपन्न होते; ज्या सत्याबुद्धीमुळे जन्म-मरणाच्या चक्राला कारण ठरणाऱ्या गोष्टींपासून मनुष्य दूर राहू शकतो; ज्या सत्याबुद्धीमुळे मनुष्य सर्व इच्छांचा, वासनांचा त्याग करू शकतो "अक्षरब्रह्म" प्राप्त करू शकतो या सत्याबुद्धीलाच सिद्धी, प्रज्ञा, ज्ञान असे म्हणतात.

अर्थात मनाची शुद्धी सहजासहजी होत नसते.

कर्मयोग, भक्तियोग, सद्गुरुंचे आशीर्वाद वगैरे अनेक गोष्टींमुळे मन शुद्ध होत असते. सत्यवचन आणि असत्याचा त्याग ही त्याची पूर्वतयारी होय.

थोडक्यात सर्वांगीण आरोग्यासाठी, सामाजिक स्वस्थतेसाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी सत्याचा अवलंब करणे श्रेयस्कर होय.

 



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive