Sunday, April 4, 2010

विधी आणि संस्कार

विधी आणि संस्कार

भरतभूमीमधील इतर हिंदुधर्मीयांप्रमाणेच महाराष्ट्रातील हिंदूचे धार्मिक जीवन संस्कार नामक विविध धार्मिक विधी आणि परंपरांच्या भोवती गुंफलेले आहे. संस्कार म्हणजे यज्ञयागादी विधिद्वारे केलेली शुद्धिक्रिया. स्त्रिया आणि म्हणून संस्कार ह्यांच्यामधील सुप्त शक्तींना मूर्त स्वरूप देण्यास्तव त्याचप्रमाणे त्यांच्या आंतरिक परिवर्तनाचे बाह्य प्रतीक म्हणून संस्कार आवश्यक मानले जातात. उपनयनासारख्या काही संस्कारांनी आध्यामिक तद्वतच सामाजिक हेतू साध्य होतात. त्यामुळे वेदाभ्यासाचे द्वारे खुली होतात. आणि संस्कार करून घेणाऱ्या व्यक्तीस विशिष्ट सामाजिक अधिकार प्राप्त होऊन तीवर कर्तव्यपूर्तीचे बंधन घातले जाते. मनोवैज्ञानिकदृष्ट्या देखील संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनात आपणास नवीन भूमिका वठवावयाची आहे, तसेच धर्माचरण विषयक नियमांचे पालन आपणास करावयाचे आहे, असे त्या वक्तीच्या मनावर बिंबविले जाते. त्याद्वारे आत्मोन्नतीचा मार्ग खुला होतो. नामकरण, अन्नप्राशन आणि निष्क्रमण ह्यांसारखे विधी संस्कार प्रायः सामाजिक समारंभ स्वरूपाचे होत. त्यांमुळे प्रेम आणि वात्सल्याची अभिव्यक्ति तसेच आनंदोत्सव साजरे करण्याची संधी प्राप्त होते. गर्भाधान, पुंसवन आणि सीमातोन्नयन यांसारख्या संस्कारांना पौराणिक आणि प्रतीकात्मक महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार विवाह हा एक संस्कार असून त्याद्वारे दोन भिन्न व्यक्तिमत्वांचे मीलन होते. त्या मीलनातून वंशवृद्धी साध्य करून आत्मसंयम, आत्मत्याग आणि परस्पर साहचर्यामधून दोघांचा आत्मोद्धार करणे हा विवाह संस्काराचा मूळ हेतू असतो.

 

संस्कार ते साजरे करावयाचा क्रम ह्याबद्दल वेद आणि गृह्यसूत्रांमध्ये नियम घालून दिलेले आहेत. तथापि विविध स्मृतिकारांमध्ये संस्काराच्या संख्येबद्दल एकवाक्यता नाही. सोळा संस्कार मात्र अनिवार्य मानलेले आहेत. कालक्रमानुसार बरेच संस्कार अस्तंगत झाले असून स्मृतिग्रंथांनी विहित केलेल्या पद्धत्यानुसार संस्कार ब्राह्मणवर्गीय देखील करीत नाहीत. खाली नमूद केलेले विधी संस्कार साजरे करण्याची महाराष्ट्रात पूर्वीपासून परंपरा होती.

उपरोक्त संस्कारांपैकी गर्भाधान विधी मुलींच्या लग्नाचे वय वाढल्यामुळे कालांतराने निरर्थक झाल्यामुळे कालबाह्य झाला आहे. नामकरण आणि चौल मात्र वेदमंत्राविना स्नेहसंमेलनाच्या स्वरूपात साजरे केले जातात. बरेच वेळा दोन अथवा अधिक संस्कार एकत्रच साजरे करतात. उदाहरणार्थ, चौल उपनयनप्रसंगी करतात, तर सोडमुंज उपनयनानंतर त्याच दिवशी उरकून घेतात.

प्रत्येक शुभ संस्काराचा प्रारंभ गणपतिपूजन, पुण्याहवाचन मातृकापूजन आणि नांदिश्राद्ध ह्या विधींनी केला जातो. गणपतिपूजन म्हणजे मूठभर तांदळाच्या ढिगावर एक सुपारी गणपतीचे प्रतीक म्हणून ठेवून आपल्या आगमनाने संकल्पित संस्काराची सिद्धी शुभदायक निर्विघ्न करण्यास्तव केलेले आवाहन होय. संस्कार करणारी व्यक्ती हात जोडून गणपतीला नमस्कार करून `ओम महागणपतये नमो नमः निर्विघ्नम कुरू ' असा मंत्रोच्चार करते.

 

पुंसवन

हा विधी केल्याने पुत्रप्राप्ती होते अशी श्रद्धा असल्याकारणाने त्यास पुंसवन असे म्हणतात. हा विधी बाईच्या गरोदरपणात तिसऱ्या महिन्यात करतात; कारण त्यामुळे गर्भ-लिंग ठरविणाऱ्या देवता प्रसन्न होऊन पुत्रप्राप्तीचा योग संभवतो.

 

पाचवी आणि सटवाई

हा जरी वैदिक संस्कार नसला तरी सर्व हिंदू लोक शिशू जन्मल्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी पाचवी सटवाईची पूजा करतात. बालकच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो. जन्मानंतर पाचवी सहावी या रात्री अर्भकास धोकादायक असतात तेव्हाच त्याच्या ललाटीची रेखा आखली जाते असा सर्वसाधारण समज आहे. म्हणून इडापिडा आणि भूतबाधा टाळण्यास्तव देवतांना प्रसन्न करतात.

 

नामकरण

बारसे या नावाने महाराष्ट्रात प्रचलित असलेला हा संस्कार सामान्यत: जन्मानंतर बाराव्या दिवशी साजरा करतात. पण स्मृतिग्रंथांनी विहित केलेला वैदिक विधी मात्र केला जात नाही. जन्मसमयीची ग्रहदशा ज्योतिषशास्त्रीय परिस्थिती लक्षात घेऊन शुभ नाम शोधण्यासाठी ब्राह्मण पुरोहिताचा सल्ला घेतात. ह्या समारंभास प्रामुख्याने महिलांना आमंत्रण देतात. सर्व महिला बालकासाठी भेटवस्तू आणतात. ग्रॅनाईट दगडाच्या वरवंट्याला तेल लावून पाळण्यात ठेवतात. आपल्या अर्भाकास हातात घेऊन आई पाळण्याच्या एका बाजूला उभी राहाते आणि समोरच्या बाजूच्या महिलेस " कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या " असे म्हणते. समोरची महिला वरवंटा हातात घेते आणि मुलाला प्रथमच पाळण्यात घातले जाते. आई मुलाला द्यावयाचे शुभ नांव प्रथम त्याच्या कानात कुजबुजते आणी नंतर आमंत्रितांसमोर घोषित करते. सर्व महिला मग बालक झोपी जाण्यास्तव `पाळणा' गीत म्हणतात. अभ्यागतांना अल्पोहार घुगऱ्या दिल्यावर नामकरण विधी समाप्त होतो.

 

कर्णवेध

हिंदू रुढीनुसार प्रत्येक बालकाचे कान टोचणे अनिवार्य आहे. सामान्यपणे सोनाराकडून कानटोचून घेतात. सोनार एक टोकदार सोन्याची तार कानाच्या पाळ्यात खुपसून वलय तयार करतो. मुलीचे कान टोचताना प्रथम डावा कान टोचण्याची प्रथा आहे. `देव-देवतांनो, आमच्या कानातून आम्हास परमोच्च आनंददायक गोष्टी ऐकू येऊ देत' अशा मंत्राने कर्णवेधाचे वेदामध्ये समर्थन केलेले आहे. (ऋग्वेद .८९.)

 

चौल, जावळ

बालकाच्या डोक्यावरील केस जन्मानंतर प्रथमच कापण्याचा हा विधी असतो. हे केस अपवित्र मानल्यामुळे ते विधिवत कापून टाकतात. या विधीमध्ये यज्ञहोम करून कापलेले केस कुणाचाही त्यांवर पाय पडणार नाही अशा तऱ्हेने विसर्जित करतात.

 

उपनयन, मुंज

महाराष्ट्रात मुंज या नावाने लोकप्रिय असलेला उपनयन हा अत्यंत महत्त्वाचा शुद्धिसंस्कार आहे. तेणेकरून मुलास अध्ययन ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा दिली जाते. प्राचीन झोरोआस्ट्रियन धर्मग्रंथ आणि आधुनिक पारशी लोकांच्या चालीरीती ह्यांच्याशी तुलना केल्यास असे दिसून येते की उपनयन संस्काराचा उगम इंडो-इराणियन संस्कृतीमध्ये झाला असावा. ब्राह्मण आपल्या मुलांची मुंज जन्मानंतर आठव्या वर्षी साजरी करतात, तर क्षत्रिय अकराव्या वर्षी आणि वैश्य बाराव्या वर्षी करतात. तथापि कालावधीबाबत थोडेफार स्वातंत्र्य दिलेले आहे. उपनयनाच्या सुयोग्य मुहूर्ताबद्दल धर्मशास्त्राने गुंतागुंतीचे नियम विहित केलेले आहेत.

धार्मिक विधीच्या प्रारंभी घाणा, गणपतिपूजन, मातृकापूजन आणि पुण्याहवाचन हे उपचार यथास्थित केले जातात. जर चौल ह्यापूर्वीच केलेले नसेल तर उपनयन प्रसंगी उरकून घेतात. वडील आपल्या मुलाचे डोक्यावरील काही केस कापतात. तदनंतर शेंडी व्यतिरिक्त उर्वरित केस न्हाव्याकडून कापून घेतात. बटूस (मुलास) स्नान घातले जाते. मुंज झालेल्या अविवाहित मुलांसोबत आई बटूस आपल्या मांडीवर बसवून भरविते आणि त्याच थाळीमधून स्वतः अन्नग्रहण करते.

मुंजीची मुहूर्तवेला समीप येत असताना बटू आणि त्याचे वडील ह्यांच्या दरम्यान दोन पुरोहित कुंकवाने स्वस्तिकचिन्ह रेखाटलेला अंतरपाट धरतात. पुरोहित मंगलाष्टके म्हणतात आणि आमंत्रित पाहुणे बटू आणि त्याच्या वडिलांवर अक्षता टाकतात. मुहूर्तसमयी पुरोहित मंगलाष्टके समापत करून उत्तरेकडे अंतरपाटा ओढतात. बटू वडिलांना साष्टांग नमस्कार करतो. मंगल वाद्ये वाजू लागतात आणि पानसुपारी देऊन आमंत्रितांचा सत्कार केला जातो.

उपनयन संस्काराचा आता प्रारंभ होतो. होमाग्नी प्रज्वलित करून त्यात तूप, तीळ आणी सात प्रकारच्या समिधा अर्पन करतात. लंगोट आणि पंचा असा पोषाख करून बटू ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा देण्यास्तव पुरोहितास हात जोडून विनंती करतो. पुरोहित विनंती मान्य करून त्यास पवित्र यज्ञोपवीत आणि पलाश वृक्षाचा दंडा देऊन ज्ञानार्जनास्तव उपदेश करतो. सूर्याची प्रार्थना केल्यावर बटूदेखील अग्नी समिधा अर्पण करतो. पुरोहित यज्ञाची सांगता करतो, आणि बटूस कानमध्ये गायत्रीमंत्र सांगतो. बटू गायत्रीमंत्राचा पुनरुच्चार करतो.

तदनंतर महत्त्वाचा विधी म्हणजे भिक्षावळ. गणेशमंदिरात जाऊन गणेश स्तोत्रा म्हणतात. कार्यस्थळी परतल्यावार `ओम भवति, भिक्षाम देहि' अशा शब्दात बटू आईचे आर्जव करतो, आई वात्सल्याने ओतःपोत अंतःकरणाने बटूस आशीर्वाद देऊन मिठाई तसेच सोन्या चांदीचे नाणे भिक्षा म्हणून देते. इतर आंमत्रित महिलासुद्धा भिक्षा घालतात. ब्रह्मचाऱ्याने भिक्षा मागूनच उदरनिर्वाह करावा अशी या विधीमागची भावना आहे. उपनयनातील अंतिम विधी मेधाजनन हा होय. मेधा म्हणजे बुद्धी. मेधाजनन विधीमुळे बटूची बुद्धी अध्ययन वेदाभ्यास करण्यास समर्थ बनते अशी श्रद्धा आहे. म्हणून ज्ञान आणि वैभव यांच्या प्राप्तीस्तव बटू बुद्धिदेवतेची प्रार्थना करतो. पूर्वीच्या काळी हा विधी उपनयनाच्या चौथ्या दिवशी साजरा करीत असत. अलीकडे मात्र मेधाजनन त्याच दिवशी उरकून घेतात.

उपनयनाची सांगता करताना सुपारी आणि कलश या रुपातील अनुक्रमे गणपती आणि वरुण या देवतांना आवाहन करून नमस्कार करतात. आता बटू ब्रह्मचर्यातश्रमात पदार्पण केलेला असतो. त्याने बारा वर्षे अध्ययन करावयाचे असते. अध्ययनांनतर त्याचा समावर्तन म्हणजे सोडमुंज हा विधी करणे अगत्याचे असते. आधुनिक काळात मात्र सोडमुंज उपनयनानंतर लगेच उरकतात. त्यामध्ये बटू दर्भाची मुंज तसेच लंगोटी काढून टाकतो. जरीकाठी धोतर, कोट उपरणे, जरीची टोपी आणि पादत्राणे परिधान करून बनारसच्या यात्रेस जाण्याचे नाटक करतो. तथापि त्याचा मामा त्या मार्गापासून त्यास परावृत्त करतो आणि आपल्या मुलीचा त्याच्याशी विवाह करून देण्याचा संकल्प सोडतो, की जेणेकरून बटूने पुढे योग्य वेळी विवाहबद्ध होऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा.

 

विवाह

विवाह हा सर्वाधिक महत्त्वाचा संस्कार होय. एका विशिष्ट क्रमाने करावयाच्या अनेक समारंभाचा या संयुक्त विधीमध्ये समावेश होतो. वस्तुतः धर्मशास्त्रानुसार विवाह संस्काराच्या वेळी ४३ विधी साजरे करतात. तथापि सांप्रत काळात बहुतांश विवाह सनातन रुढीतील अनेक उपचार वगळून परिवर्तित पद्धतीनुसार साजरे केले जातात.

महाराष्ट्रातील उच्चवर्णीयांमध्ये सगोत्र, सप्रवर आणि सपिंड विवाह निषिद्ध मानले जातात. तथापि मामेबहिणीबरोबर लग्न करण्यास मुभा आहे. अलीकडे बहिर्विवाहांचे प्रमाण वाढले आहे.

सांप्रतकालीन हिंदू विवाह रूढीचे खालील तीन पद्धतीत वर्गीकरण करता येईल :

() वेदमंत्रोच्चाराचा समावेश असलेली आणि गृह्यसूत्रांनी निर्धारित केलेली वैदिक पद्धती

() वेदमंत्रविरहित पौराणिक पद्धती आणि

() लोणावळ्याच्या धर्मनिर्णय मंडळाने सुचविलेली पुनर्रचित वैदिक पद्धती.

उच्चवर्णीय लोक पहिल्या पद्धतीचा अंगिकार करतात, ब्राह्यणेतर दुसऱ्या पद्धातीचा तर कुठल्याही जातीचे लोक तिसऱ्या पद्धतीनुसार विवाह साजरे करतात.

 

विवाह रुढी

पारंपारिक विवाह रूढी खूपच विस्तीर्ण होती. अलीकडे मात्र त्यातील बरेच उपचार संक्षिप्त केलेले आहेत, तर काहींची विस्मृती झालेली आहे.

विवाह संस्काराच्या प्रारंभी गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, इत्यादि आराधनात्मक विधी साजरे करतात. महाराष्ट्रातील प्रमुख विवाह विधी क्रमानुसार खाली दिले आहेत.

 

हळद

विवाह संस्काराचा प्रारंभ मुलास हळद लावण्याने होतो. त्याची आई, बहिण नात्यातील बायका त्याला सुगंधी तेलात भिजविलेली हळद लावतात. ह्या रंगतदार समारंभात हळदीची गाणी आणि वाजंत्री यांसह मुलास समारंभपूर्वक आंघोळ घालतात. उर्वरित म्हणजे उष्टी हळद, साडी आणि पूजा साहित्यासह, वधूगृही नेतात. वरपक्षाकडे ज्याप्रमाणे हळदीचा कार्यक्रम झालेला असतो त्याचीच वधूकडे पुनरावृत्ती करतात. वधूला हळद लावताना नारळ पाच मूठभर तांदळांनी तिची समारंभपूर्वक ओटी भरतात. हळद लावल्यावर मुला-मुलीस नवरदेव-नवरी असे संबोधिले जाते.

 

सीमांतपूजन

वधूगृही जातांना वराने वधूच्या गावाची सीमा ओलांडल्यानंतर सीमांतपूजन करण्याची पूर्वीच्या काळी प्रथा होती. आजकाल विवाहदिनी देवळातच सीमांपूजन करण्याची प्रथा आहे. वधूचे आई-बाप नातलग वरपक्षांचे स्वागत करण्यास्तव देवळात असलेल्या वराकडे जातात. गणपति आणि वरुण देवतांचे प्रतीक असलेली सुपारी कलश यांची पूजा करतात. विष्णूस्वरुप नवरदेवास आपली लक्ष्मीसारखी कन्या द्यावयची असल्यामुळे आई-बाप वराची पूजा करतात. आणि त्यास नवीन पोषाख अर्पण करतात. वधूची आई वरमातेचे पाय धुते, आणि वरमाता तसेच वराकडील इतर आप्तेष्ट महिलांचा यथास्थित ओटीभरण विधी करते.

 

वरप्रस्थान

वरपक्ष वाजतगाजत वधूगृही जातो. मंडपप्रवेशद्वारावर वरास पंचारती ओवाळून सुवासिनी त्याचे स्वागत करतात. नवरदेवास मंडपात समारंभपूर्वक नेऊन चौरंगावर बसतात. शुभ मुहूर्ताची योग्य वेळ कळण्यास्तव पुरोहित घटिकापात्राची योजना करतो.

 

मंगलाष्टके

लग्न लागण्याचा प्रारंभी नवरदेव पूर्वाभिमुख उभा राहतो. त्याचे समोर स्वस्तिक चिन्ह रेखांकित केलेला अंतरपाट धरतात. वराच्या पुढ्यात अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला नवऱ्या मुलीस उभी करतात. पुरोहित मंगलाष्टके पठन करीत असताना वधू-वरांच्या हातात पुष्पहार असतात. शुभ मुहूर्ताचा क्षण येताच मंगलाष्टक पठन बंद होते. पुरोहित अंतरपाटा उत्तरेकडे ओढून घेतात. वादक वाजंत्री वाजवतात आणि आमंत्रित पाहुणे वधू-वरांवर अक्षता टाकतात. प्रथम वधू वरास वरमाला घालते. नंतर वर वधूस पुष्पहार घालतो; तसेच तिच्या गळ्यात मंगलसूत्र बांधतो. मंगलसूत्रबंधानाने वधू विवाहबंधनात अडकते.

 

कन्यादान

कन्यादान विधिद्वारे वधूपिता आपल्या कन्येचे पवित्र दान करतो. आपल्या कन्येची धर्म, अर्थ आणि कर्माचे बाबतीत कुठल्याही प्रतारणा करू नये असे वधूपिता वरास आवर्जून सांगतो. `नातिचरामि' या शब्दांनी नवरदेव प्रतिसाद देतो.

 

लाजाहोम

होमाग्नी प्रज्वलित केल्यावर लाजाहोम विधी होतो. वर मंत्रोच्चार करीत असताना वधू होमाग्नीला भाताच्या लाह्या त्रिवार अर्पण करते. लाह्यांचे चौथे आणि अंतिम अर्ध्यदान वधू नवरदेवाच्या मंत्रोच्चार थांबल्यावर स्तब्धपणे करते. तदनंतर ते जोडपे पवित्र होमाग्नी, भूमाता आणि देवाब्राह्मणांना साक्षी ठेवून अशी शपथ घेते की, आयुष्याच्या अंतापर्यंत सर्व सुखदुःखांमध्ये ते एकमेकाचे साथीदार राहातील. त्यानंतर अग्निपरिणयन आणि अश्मारोहण विधी पार पडतात.

 

सप्तपदी

सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अप्रत्यावर्ती होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या सभोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान सात राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्ध्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताच्या सतत मंत्रोच्चार चालू असताना वधूःवर यज्ञवेदीभोवती प्रदक्षणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात.

सप्तदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवताऱ्याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहसंबधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.

वरात, गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, देवकोत्थापन आणि मंडापोद्वासन ह्या विधींनंतर विवाह संस्काराची सांगता होते.

 

अंत्यंविधी

अंत्येष्टी

देहावसानसुद्धा एक शुद्धिसंस्कार आहे. एकादी व्यक्ती मरणोन्मुख असल्यास तिच्या मुखात लहानसा सोन्याचा तुकडा, तुळशीपत्र आणि गंगोदकाचे काही थेंब टाकतात. उत्तरेकडे डोके ठेवून मृतदेह जमिनीवर ठेवतात. पुरोहिताकडून मंत्रोच्चार चालू असताना मयताचा मुलगा अथवा मुख्य सुतकी व्यक्तीस शुद्धिक्रिया म्हणून आंघोळ करावी लागते. मृतदेहास आंघोळ घालून सुगंधी तेल लावतात आणि नवीन कपड्यात गुंडाळून फुलांनी सजवितात. सुवासिनी मरण पावल्यास तिला हळद कुंकू लावण्याचा सन्मान प्राप्त होतो. वैदिक पौराणिक विधी करणारे हिंदू बहुधा मृतदेहाचे दहन करतात, तर इतर लोक देह स्मशानात पुरतात.

 

उत्तरक्रिया

मरणानंतर सुतक पाळतात आणि बाराव्या अथवा तेराव्या दिवशी उत्तरक्रिया केली जाते. त्याप्रसंगी भोजन आयोजित करतात. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात गांभीर्यपूर्वक भरणीश्राद्ध करण्याची प्रथा आहे. सवाष्ण मेलेल्या सुवासिनीच्या नावे तिचा पती हयात असेप्रर्यंत भाद्रपदातील अविधवा नवमीला विशेष अर्ध्यदान करतो. आपल्या मृत पूर्वाजांच्या नावे अक्षय्य तृतीयेला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दान आणि अर्ध्यदान करण्याची प्रथा रूढ आहे.

अशा प्रकारे आत्मशुद्धी आणि मनाचे उदात्तीकरन करण्यास्तव माणसाचे संपूर्ण आयुष्य विविध शुद्धिसंस्कारांनी संपन्न केले जाते.

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive