Tuesday, April 27, 2010

नेहरू सायन्स सेंटर - वैज्ञानिक चमत्कारांची खाण

नेहरू सायन्स सेंटर - वैज्ञानिक चमत्कारांची खाण

आठवीत की नववीत असताना कधीतरी पाहिलेलं सायन्स सेंटर, मनामधे एक वेगळीच जागा निर्माण करून गेलं होतं. निरनिराळ्या उपकरणांच्या माध्यमातून शिकवलेलं सामान्य विज्ञान, स्वर, स्पर्श यांच्या अनुभवाची प्रात्याक्षिकं करून पहाताना तीन तास कसे निघून गेले ते कळलंच नाही. बाहेर आल्यावर आपण इतका वेळ एक वेगळ्याच विश्वात वावरत होतो असं वाटायला लागलं. तिथे पुन्हा जाण्याची वारंवार इच्छा व्हायची पण कालपर्यंत ते कधी जमलं नाही. काल मात्र तडकाफडकी मी सायन्स सेंटरला जायचं ठरवलं आणि मला पुन्हा एकदा तोच वेगळ्या विश्वात गेल्याचा अनुभव आला.

खाली मी काही फोटो टाकले आहेत, त्यातील कुठल्याही फोटोवर क्लिक केलंत तर फोटो मोठया आकारात पहायला मिळेल.



केवळ शाळकरी मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनाही माहित नसलेल्या कितीतरी वैज्ञानिक गोष्टी या सायन्स सेंटरमधे पहायला मिळतात. म्हणूनच असेल कदाचित ही लहान मोठी वैज्ञानिक उपकरणं हाताळताना लहान मुलांइतकीच मोठ्या माणसांचीही उत्सुकता ओसंडून वहात होती. वरवर पहाता सामान्य वाटणा-या गोष्टींमधे दडलेलं वैज्ञानिक सत्य उलगडून पहाताना मोठेही लहान झाल्यासारखेच वाटत होते.



विविध वैज्ञानिक चमत्कारांचा खजिना आहे, हे सायन्स सेंटर म्हणजे. आता हेच पहा ना, या खालच्या चित्रात माझा फोटो दिसतोय तुम्हाला? माझ्यामागे काही विविध संगीत वाद्य ठेवलेली दिसतायंत? ती खरीखुरी नाहीतच मुळी! ती आहे आभासी वास्तविकता.




सायन्स सेंटरमधे या प्रयोगासाठी एक छोटीशी रूम बनवली आहे. ही रूम रिकामी आहे. तिथे आत गेलं की समोर एक दूरचित्रवाणी संच लावलेला असतो. त्यात तुम्हाला स्वत:चं आरशात जसं प्रतिबिंब पडतं, तसं प्रतिबिंब दिसतं आणि आजूबाजूला ही संगीत वाद्य. रूमच्या बाहेरून कुणी पाहिलं तर बघणा-याला वाटेल की आपण वेड्यासारखे हातवारे करतोय पण प्रत्यक्षात तुम्ही त्या संगीत वाद्यांपैकी कुठल्यातरी वाद्याला हात लावत असता. या प्रकाराबद्दल खूप रोचक माहिती तिथे लिहून ठेवली आहे. मी त्याचाच फोटो काढला. या खालच्या चित्रावर टिचकी दिलीत तर एक मोठा फोटो उघडेल. त्यात या आभासी वास्तविकतेचा उपयोग कशाकशासाठी होऊ शकतो, याची माहिती दिली आहे.



केवळ संगीत उपकरणंच नव्हेत, तर आपल्या रोज ज्या भाज्या, झाडं पहातो, ती कशी उगवतात, म्हणजे कंदभाज्या, फळभाज्या यातील फरक जाणून घेण्यासाठी तिथे असा देखावा करण्यात आला आहे. तुम्ही काचेसमोर उभे राहिलात की हाताजवळच बटणं सापडतील. बाजूला निरनिराळ्या भाज्यांची चित्रं आहेत. तुम्ही ज्या भाजीच्या चित्राचं बटण दाबल, ती भाजी कशी उगवते याचं तुम्हाला छोटंसं प्रात्याक्षिक पहायला मिळतं.उदा. कांदे, मुळा या भाज्या जमिनीखाली उगवतात. जर तुम्ही मुळ्याच्या बाजूचं बटण दाबलत तर जमिनितून मुळा वर येताना दिसतो.



अशा छोट्या छोट्या प्रात्याक्षिकांतून लहान मुलांना सामान्यज्ञान तर मिळतंच पण प्रात्याक्षिकामुळे ही माहिती कायमची स्मरणात रहाते. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान जगात जास्त उपयोगी पडतं, असं म्हणतात. आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीमधे बदल हवा अशी मागणी होत असताना, या सायन्स सेंटरमधील काही छोट्या छोट्या लो बजेट प्रात्याक्षिकांसाठी प्रत्येक शाळेने आपल्या प्रयोगशाळेतही खास जागा ठेवावी असं मला वाटतं. सायन्स सेंटरमधेसुद्धा काही दुरूस्तींची गरज आहे असं वाटतं. काही उपकरणांची बटणं चालत नाहीत. त्यामुळे तो नेमका काय प्रयोग आहे, हे कळलं नाही. शिवाय तिथल्या प्रसाधनगृहातील उग्र दर्प मंदपणे संपूर्ण सेंटरभर दरवळत होता, त्यामुळे बाजूच्या कॅफेटेरियामधे काही खावंसं वाटलं नाही.
सायन्स सेंटरला गेले पण ओडेसी शो काही पहाता आला नाही. पुढच्या वेळेस नक्की पहाण्याचा मानस आहे. सेंटरमधे बरीच लहान मुलं एका बसमधून आली होती. ती शाळेची सहल वाटत नव्हती. प्रायव्हेट सहल असावी कारण मुलांसोबत त्यांचे आईवडीलही होते. सर्व कानडी वाटत होते. मी सेंटरमधून बाहेर पडल्यावर त्यांच्यापैकी एक दोन पालकांना बाहेरच्या जिन्यावर बसलेलं पाहिलं. त्यांच्यापैकी एका महिलेने मला कानडीत काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या एकूण अवतार पाहून मी त्यांच्याकडे आधी दुर्लक्श केलं पण त्या महिलेचा चेहेरा पाहून लक्षात आलं की ही भाषेची अडचण आहे. मग मी पुन्हा तिला विचारलं की काय हवंय? तेव्हा तिने खुणा विचारलं की हे सेंटर किती वाजता बंद होईल? तिचा मुलगा की मुलगी केव्हापासून आत आहे, बाहेर यायचं नावच घेत नाही. मग मीसुद्धा तिला खुणा करून सांगितलं की सेंटर सहा वाजता बंद होईल, तेव्हा सर्व बाहेर येतीलच. तुम्ही दरवाजाजवळ उभ्या रहा म्हणजे तुमच्या मुलाला तुम्ही पटकन गाठू शकाल. तिला ते समजलं असावं कारण ती तोंडभरून हसली. मनात आलं की जेव्हा भाषा नव्हती, तेव्हा माणूस एकमेकांशी खुणेच्याच भाषेत बोलायचा. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मनुष्याने आधी खुणांची भाषा आणि मग निरनिराळ्या भाषा शोधून काढल्या हाही एक वैज्ञानिक चमत्कारच नाही का?

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive