Friday, March 11, 2011

हळदी कुंकू - पण राजकीय


 



आपल्या नवऱ्यांची भांडणं असोत किंवा मतभेद असोत, बायकांनी मात्र त्या भांडणांची सावली आपल्यावर पडू देऊ नये असं ठरविले. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील रथी-महारथी, आघाडी-युती, लातूर-बारामती या सगळ्यांच्या बायका एकत्र आल्या आणि त्यांनी हळदी-कुंकवाचा जंगी कार्यक्रम केला. हसणं, खिदळणं, खाणं, गप्पा असा कार्यक्रम धमाल रंगला. आणि मग कोणीतरी टूम काढली नाव घेण्याची. अर्थातच नाव घेण्याचा पहिला मान मुख्यमंत्र्यांच्या बायकोचा. त्यामुळं सगळ्यांनी आग्रह करून सौ.सत्वशीला चव्हाणांना खुर्चीवर बसवलं आणि उखाण्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. दिल्लीत राहून असल्या कार्यक्रमांचा खरं तर त्यांना विसर पडला होता; परंतु नवऱ्याचा आदर्श बाळगून त्यांनी लगेचच इथल्या वातावरणाचा सराव करून घेतला. घसा साफ केला आणि नाव घेतलं-
इथली थंडी अशी तशीच, दिल्लीत थंडी जोरात
बिल्डर आला दारात, की पृथ्वीराज घुसतात घरात
अर्थात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मुख्यमंत्र्यांच्या बायकोच्या पाठोपाठ उखाणा घेण्याचा आपला हक्क मिसेस भुजबळ किंवा मिसेस आबा यांनी हिरावून घेऊ नये म्हणून अजितदादांच्या बायकोनं चपळाई केली आणि खुर्ची गाठली. सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. आणि शांतता होताच सुनेत्रा पवार यांनी उखाणा सुरू केला-
वाट पाहायची हद्द झाली, कित्ती कित्ती वाट पाहिली
अजितरावांची आता फक्त एकच पायरी राहिली
काँग्रेस आणि राष्ट्रवादी झाल्यावर आता भाजपाला संधी मिळाली पाहिजे, असा विचार करीत प्रज्ञा मुंडे यांनी खुर्चीकडे धाव घेतली; परंतु त्याआधीच नीलम राणेंनी खुर्चीचा ताबा घेतला होता. त्यामुळं त्यांना बाजूला उभे राहावे लागले. नीलमताईंनी चारी बाजूला नजर वळवून एखाद्या फलंदाजानं फिल्डिंगचा अंदाज घ्यावा तसा अंदाज घेतला आणि मग खणखणीत आवाज लावला-
समुद्रावर वारा सुटला की नारळ-सुपारी आनंदानं झुलते
'
अहो मुख्यमंत्री' म्हटलं की नारायणरावांची कळी खुलते
नीलमताई डौलात उठल्या आणि प्रज्ञा मुंडे खुर्चीवर बसल्या. मिसेस गडकरींनी कान टवकारले आणि त्या खुर्चीच्या जवळ सरकल्या. प्रज्ञा मुंडेंनी उखाणा घेतला-
अंगात जाकिट, खिशात पाकिट, अंगठीत  चार  खडे
गोपीनाथराव, तुम्ही धीर नका सोडू गडे
चारही बाजूंनी या उखाण्याला मोठा प्रतिसाद मिळाला आणि कांचन गडकरींनी खुर्चीत पटकन् स्वत:ला झोकून दिलं. वैदर्भी अघळपघळ स्वभावानुसार त्यांनी थेट उखाणा सुरूही केला-
नाश्त्याला वडे, जेवणात खीर, दुपारी भेळ, रात्री हॉटेलात जाऊ
तरी नितीनराव म्हणतात, सांग- मधल्या वेळेत काय खाऊ
पुढे जाऊ की नको अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या आर. आर. आबांच्या बायकोला मीनाताई भुजबळांनी हातानं धरून आणलं आणि खुर्चीवर बसवलं. मग सुमन आबा पाटील यांनी जरा संकोचत संकोचत उखाणा म्हटला-
कुणी म्हणतं हाटेल, आन कुणी म्हणतं ढाबा
सासरी आल्यावरच कळलं, नवऱ्याला म्हणत्यात आबा
या उखाण्यानं सगळीकडेच एकच जल्लोश झाल्यावर चहासाठी कमर्शियल ब्रेक जाहीर करण्यात आला.
' '
ब्रेकनंतर सगळ्यांचं स्वागत वगैरे झालं आणि आबांच्या बायकोने भुजबळांच्या बायकोला खुर्चीवर बसवीत फिट्टंफाट करून टाकली. मीनाताई भुजबळांनी मनातल्या मनात भुजबळांचा धावा केला आणि नाव घेतलं-
नव्या जमान्यात, नव्यानं लिहिली पाहिजे आता एबीसी
छगनरावांच्या बाराखडीत पहिली अक्षरं ओबीसी
मीनाताई उठून राष्ट्रवादींच्या बायकांत जाऊन बसल्या तोवर रश्मी ठाकरेंनी खुर्ची गाठली. त्याचवेळी शर्मिला ठाकरेही तिथं पोचल्या. दोघींमध्ये जणू संगीत खुर्चीची स्पर्धा लागली. परंतु वैशाली देशमुख पुढे सरसावल्या आणि शर्मिलाला म्हणाल्या, 'अगं, ती मोठी आहे तुझ्यापेक्षा.. तिचा मान पहिला.' शर्मिलाकडे विजयी मुद्रेने पाहत रश्मीताईंनी खुर्चीवर बसत उखाणा सुरू केला-
कधी कधी बघतात माझ्याकडे ते अशा काही चेहऱ्यानं
उद्धवरावांचा काढते फोटो, मी हृदयाच्या कॅमेऱ्यानं
रश्मीताईंच्या उखाण्याला मिळालेली दाद पाहून शर्मिला ठाकरेंवरची जबाबदारी वाढली. त्यांनी साडीचा पदर कमरेला खोचत पोज घेतली आणि उखाणा मारला-
 '
मराठीत म्हणतात पाच, त्याला इंग्रजीत म्हणतात फाइव्ह
 
सगळ्यांची भाषणं 'डेड' फक्त राजचंच भाषण 'लाइव्ह
वातावरणात राजकीय ताण संपला. खेळीमेळीनं सगळं सुरू होतं. ते पाहून वैशाली देशमुखही मोकळ्या झाल्या. त्यांनी आग्रहाची वाट न पाहता खुर्चीवर बसत नाव घेतलं-
सदा मेला टकामका बघतो, एक नंबरचा चोंबडा
कोण म्हणता? अहो, विलासरावांच्या केसांचा कोंबडा!
हास्याची लकेर सर्वत्र उमटली. अशोकराव चव्हाणांची बायको मराठीत उखाणा घ्यायला संकोचत होती. वैशालीताई म्हणाल्या, 'अगं, इंग्रजी चालेल!' मग त्या उठल्या-
आऊट ऑफ टेन, एकसारखे असतात नाइन
यू डोंट वरी, नाऊ अशोकराव इज फाइन
मिसेस चव्हाणांच्या या खुलाशानंतर सगळ्यांनी मिळून आग्रहानं प्रतिभा पवारांना खुर्चीत बसवलं. त्यांनीही सगळ्यांचा मान ठेवला-
बारा कोस बारामती, दहा कोस वाई
शरदरावांचं नाव घेते, सुप्रियाची आई
इथंसुद्धा त्यांनी मुलीला प्रमोट केलं.. अशी कुजबूज यावर अजितदादांच्या बायकोनं केली.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive