Saturday, October 30, 2010

बंड्याची शाळा (धडा पहिला - प्रगती पुस्तक)


बंड्याची शाळा (धडा पहिला - प्रगती पुस्तक)


खरं सांगायचं तर शाळेविषयी आत्ता जेव्हढं ममत्व वाटतं तितकं प्रत्यक्षात शाळेत असताना कधिही वाटलं नाही. त्यावेळी शाळा, अभ्यास, परीक्षा, रिझल्ट्स ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक कधिही न संपणारी शिक्षा वाटायची. वर्षानूवर्ष त्याच त्याच टॉर्चर मधून जाताना कधी एकदा शाळा संपून कॉलेजमधे जातोय असं वाटायचं. पण कॉलेजात पाऊल ठेवल्या ठेवल्या शाळेला मिस करायला सुरुवात झाली. नंतर कॉलेजच्या जीवनात रुळल्यावर शाळेचा कधी कधी विसरही पडला. सुदैवाने माझी शाळा घरा पासून जवळच असल्याने येता जाता शाळेचे दर्शन घडायचे. शिक्षक दिसले की आपसूकच पाया पडायचो, शाळेसमोरून जात असताना प्रार्थना सुरु असली की 'दक्ष' मधे उभा रहायचो, कॉलेजमधे असताना जेंव्हा सिग्रेट ओढायला सुरुवात केली तेव्हा एकवेळ बाबांनी बघितलं तरी चालेल पण बाईंनी बघू नये अशी देवाकडे प्रार्थना करायचो.

आज कळतंय शाळेचं महत्व. आमच्या शिक्षकांनी आम्हाला वळण लावण्याचे आणि सुजाण नागरीक बनवण्याचे बरेच प्रयत्न केले जे आम्ही पार वाया घालवले. आत्ता जाणवतंय की आपण आता जे काही २-५% माणसा सारखे वागतोय त्यात आई-बाबांइतकाच शाळेचाही हात आहे. आयुष्याला सुरुवात ह्या शाळेपासूनच झाली.

ह्या लेखमालेतून ते गेलेले दिवस पुन्हा एकदा जगण्याचा विचार आहे. पण पुन्हा एकदा त्या न केलेल्या अभ्यासाच्या, शिक्षेच्या, परिक्षेच्या, सिझल्ट्सच्या आठवणी नकोयत. त्यामुळे शाळेच्या दिवसात केलेल्या उनाडक्या, दंगा-मस्ती, आचरटपणा, वाह्यातपण ह्याच गोष्टी शब्दबद्ध करणार आहे.

ह्यातल्या काही घटना खर्‍या आहेत, काही पाहिलेल्या आहेत, काही ऐकलेल्या आहेत आणि काही पूर्णपणे माझ्या मनाचे श्लोक आहेत. बंड्या हे केवळ एक पात्र नसून ती एक (माझ्याशी ९९.९९९% साधर्म्य असणारी) प्रवॄत्ती आहे. 'बंड्याची शाळा' ह्या लेखमालेतून शालेय जीवनातील बर्‍याच गोष्टींचा विचार करणार आहे. तेव्हढीच जरा पुन्हा धमाल.




बंड्याची शाळा
(धडा पहिला - प्रगती पुस्तक)





माझ्या शाळेच्या १० वर्षात बाकिच्या कुठल्याही पुस्तकाने छळलं नसेल तेव्हढं ह्या एका पुस्तकाने छळलंय. हजारो वेळा ऐकलेला विनोद पुन्हा सांगायचा तर ते प्रगती पुस्तक नसून अधोगती पुस्तक होतं. ह्या वाक्यात नुसतंच प्रगती पुस्तक असं लिहून मधे (?) टाकून अजून एक 'वाचीक' विनोद करता येतो. असो. हा विनोद मला पहिल्यांदा आमच्या पिताश्रींनी ऐकवला. इयत्ता सातवी. त्यावेळीही आजच्या सारखंच काही कळत नव्हतं. पण तेव्हा वय सोबत होतं. चाचणी परीक्षेत सहा पैकी सहा विषयात मार्कांखाली लाल रेषा लेऊन आमचं प्रगती पुस्तक अवतरलं होतं. प्रगती पुस्तकांचं वाटप आमचे पी.टी. चे सर करायचे. रांगेत माझ्यापुढे अजय जाधव घोड्यासारखा दिड पायावर उभा होता. त्याची सुटका ३ लाल रेषांवर झाली. त्यामुळे मलाही हुरूप आल. पेपर दोघांनी मिळून सोडवला असल्याने जरा हायसं वाटलं.

पण माझ्या नशीबात सुखाने सुट्टी उपभोगणं तेव्हाही नव्हतं आत्ताही नाही. प्रगती पुस्तक देताना मास्तरांनी 'ऍहॅ रे जोशा, अभ्यास कर सांगत व्हतो तेंवा तुला खेळण्या पासून वेळ मिळंना, झालास ना फ्येल' असं ऐकवलं. आदल्याच वर्षी टिळकांचा शेंगांचा धडा पुस्तकात असल्याने बाणेदारपणाचं भूत डोक्यावर स्वार होतं. 'सर पण तुम्हीच सांगितलं होतं रोज किमान ३ तास मैदानी खेळ खेळा' असं मी मास्तरांना सांगितल्यावर मला काही कळायच्या आत त्यांनी माझ्या पायाचा अंगठा त्यांच्या अंगठ्याने जोरात दाबला. कळ आली म्हणून खाली वाकलो तर कपाळ बाकावर आपटलं. त्यावर आमचे पी.टी मास्तर मोठ्ठ्याने हसले.

थर्ड डिग्री लावण्याचा अनुभव असलेल्या लोकांनाच पी.टी चे मास्तर नेमत असावेत असा माझा कयास आहे. स्वत:ला कमीत कमी त्रास होऊन मुलांना जास्तीत जास्त शिक्षा द्यायचे विविध उपाय आमचे मास्तर शोधत असत. मुलांना थोबडवण्याची आणि अंगठ्याने खांदे दाबायची जबाबदारी आमच्या वर्गातल्या शित्या कडे त्यांनी दिली होती. शित्या २-३ वर्ष नापास झाल्याने आमच्याहून बराच थोराड होता. ह्यामुळे त्याला कुणी आपल्यात घेत नसे. गम्मत अशी की मास्तरांचं काम करतो म्हणून त्याची सुटका नव्हती. मास्तर त्याला दर आठवड्याला घाऊक मार देत असत.


असो. सुरुवातीला बरेच दिवस जिवाच्या आकांताने ते प्रगती पुस्तक घरच्यांच्या नजरे पासून लपवत होतो. घरी प्रगती पुस्तक मिळालं का अशी रोज चौकशी होई आणि शाळेतही मास्तर न विसरता सही करून आणलं का म्हणून रोज विचारीत. बाबा बाहेर गावी गेलेत ह्या सबबीवर त्यांना ४-५ दिवस थोपवलं. त्या नंतर बाबांची तब्ब्येत बरी नाहिये, ऑफीस मधून यायला उशीर झाला अशी वेग वेगळी कारणं देत होतो. ती सगळी संपल्याने मी एके दिवशी 'बाबांचा हात फ्रॅक्चर झालाय, महिनाभर प्लॅस्टर मधे असणार आहे' असं सांगितल्यावर मास्तरांचा संयम सुटला आणि उद्याच्या उद्या सही आणली नाहीस तर वर्गात घेणार नाही असं अल्टीमेटम मिळालं.


कसा बसा धीर गोळा केला. जेऊन घेतलं (कदाचीत नंतर मिळालं नसतं) आणि प्रगती पुस्तक बाबांच्या हातात देऊन मान खाली घालून त्यांच्या समोर उभा राहिलो.
मी - ...........
बाबा - ...........
मी - .................................
बाबा - अरे थोबाड उघडून बोलशील का काही?
मी - पण बाबा....
बाबा - थोबाड बंद ठेव..... सहा विषयात चक्क नापास??????
मी - सहाच विषय होते...........
बाबा - माहिती आहे मला. हे प्रगती पुस्तक आहे की अधोगती पुस्तक? उद्या पासून तुझं टी.व्ही. बघणं बंद.....
मी - अहो पण परीक्षा आहे म्हणून आपण २ महिने आधीच केबल बंद केली आहे...........
बाबा - ह्या प्रगती पुस्तकावर मी सही करणार नाही......
मी - मला उद्या वर्गात बसू देणार नाहीत.......
बाबा - जा की मग उंडारायला.....
इतक्यात आमचे सुखकर्ता, दुखहर्ता, संकट-मोचन आजोबा हॉल मधे अवतरले. मी उगाच मुसमुसायला लागलो. ते बघून हुकुमीपणे आजोबा विरघळले.
आजोबा - अरे नको चिडूस इतका त्याच्यावर, पुढल्यावेळी करेल अभ्यास, करशील ना रे.....
मी - ह्यावेळी पण केला होता........
बाबा - बघा बघा काही लाज आहे का बघा त्याला, अभ्यास केला होता मग मास्तरांना काय हौस आहे लाल रेषा काढायची???
आजोबा - असू दे रे, लहान आहे अजून. आण मी सही करतो....
मी - पण बाबांचीच सही आणायला सांगितली आहे....
आजोबा - मी तुझ्या बाबांचा बाबा आहे....
बाबा - द्या इथे, करतो सही. दुसरं काय करणार आम्ही....
आजोबा - त्याचा अभ्यास घेत जा....
बाबा - बाबा आता तुमी माझ्यावर घसरू नका....
आजोबा - का नको घसरू....


त्यांची जुंपलेली पाहून मी तिथून हळूच बेडरूम मधे सटकलो. आता पुढचे ४ महिने वर्गात बसायला मिळणार होतं. पण त्या नंतर पुन्हा एकदा हे प्रगती पुस्तक अवतरणार होतं. त्याचा काय बंदोबस्त करावा ह्या विचारात शांत पणे झोपी गेलो.


बाबा - काही लाज आहे का बघा त्याला. नापास होऊन आलाय आणि शांत पणे झोपलाय बघा कसा........

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive