Monday, October 18, 2010

डोकं गरम ठेवा... थंड डोक्याचे राहाल तर चिरडले जाल! शिवसेनाप्रमुखांची चौफेर फटकेबाजी

डोकं गरम ठेवा...
थंड डोक्याचे राहाल तर चिरडले जाल!
शिवसेनाप्रमुखांची चौफेर फटकेबाजी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरील अफाट दसरा मेळाव्यात 'माझा शिवसैनिक हा गरम डोक्याचा, गरम रक्ताचाच असला पाहिजे. थंड डोक्याचे राहाल तर चिरडले जाल' असे बजावत स्फुल्लिंग चेतवले. शिवसेनाप्रमुखांनी पाऊणतासाच्या आपल्या खणखणीत भाषणात देशाची पुरती वाट लावणार्‍या राज्यकर्त्यांची नामर्दांमध्ये गणना करतानाच घरफोड्यांवरही जबरदस्त आसूड ओढले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींपासून मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् आणि महसूलमंत्री नारायण राणेपर्यंत कोणीही शिवसेनाप्रमुखांच्या जबरदस्त तडाख्यातून वाचू शकले नाहीत. या दणदणीत भाषणामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
* शिवसेना ही दम देणारी आहे, दम खाणारी नव्हे.
शिवसेनेची डरकाळी 50 डेसिबलमध्ये बसणार नाही. शिवतीर्थावरील हा जल्लोष 50 डेसिबलपर्यंत मर्यादित ठेवता येणार नाही. यंत्र फाटेल, पण आमचा आवाज थांबणार नाही. ब्रह्मदेवाचा बाप आला तरी त्याला शिवसेनेचा आवाज दाबता येणार नाही!
* स्टाईल चोराल, विचारांचं काय?
माझी स्टाईल कुणीतरी उचलली असं म्हणतात, मला माहीत नाही, असे उद्गार शिवसेनाप्रमुखांनी काढताच शिवतीर्थावर एकच हशा पिकला. शिवसेनाप्रमुख पुढे म्हणाले, आता तुम्ही मराठी मराठी करताय, पण तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मराठीचा हा लढा मी उभारलाय (टाळ्या). शिवतीर्थावर ही जी गर्दी दिसतेय ती गर्दीच त्याची साक्ष आहे. माझी स्टाईल चोरता येईल, पण विचारांचे काय? तुमचे काही वाचनबिचन आहे का? नुसत्या स्टाईल मारून काय होणार.
* वृत्तवाहिन्यांचे आभार
शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करणार्‍या वृत्तवाहिन्यांचे खास आभार मानले. ते म्हणाले, हा संपूर्ण सोहळा लोकांसमोर आणण्याचं मोठं काम वृत्तवाहिन्यांनी केलं आहे. हे प्रेम असंच कायम ठेवा. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी...
* एकीची वज्रमूठ कायम ठेवा
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून दसरा मेळाव्याकरिता शिवतीर्थावर जमलेल्या लाखों कडवट, निष्ठावान शिवसैनिकांचे आभार मानताना शिवसेनाप्रमुख म्हणाले, 'एकीची ही वज्रमूठ अशीच कायम ठेवा. तुम्हा सर्वांना निरोगी, दीर्घआयुरारोग्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
* अफझल गुरूला फासावर लटकवा?
कश्मीर पेटलंय असे सांगून शिवसेनाप्रमुख म्हणाले, ''ही सगळी घाण नेहरूंनी केलीय. देशाची वाट लावलीय. यांचं प्रेम लांड्यांवरच (टाळ्या...) त्या अफझल गुरूला फाशीची शिक्षा ठोठावून चार वर्षे झाली. पण त्याला फासावर लटकवत नाहीत. दोर मिळत नाही की काय (हशा). कसले हे हिजड्यांचे राज्य. हे बिलकूल खपवू नका. अफझलगुरूला फासावर लटकवायलाच हवे.
* रंग भगवाच
शिवसेनाप्रमुखांनी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर हल्ला चढवला, 'नक्षलवादी आणि अतिरेकी हल्ले करतात. मात्र यांची लुंगी का सुटत नाही. यांना हिरवा दहशतवाद दिसत नाही. भगवा दिसतो. पण भगव्याचे तेज तुम्हाला परवडणार नाही. तुम्ही गृहमंत्री असा आणखी कुणी... आमच्या हिंदुस्थानचा रंग भगवा आहे. धर्माचा रंग भगवा आहे. तो भगवाच राहणार. (टाळ्या). हा रंग बदलण्याची कुणा लांड्याची हिंमत होणार नाही. (प्रचंड टाळ्या).
या राज्याचा मुख्यमंत्री आम्हीच ठरवणार असे म्हणणारे आता कुठे आहेत? त्याचे मुख्यमंत्री कुठे आहेत? कल्याण-डोंबिवलीचा महापौर आमचाच होणार अशा वल्गनाही हीच मंडळी आता करू लागली आहेत. पण सगळं तुमचंच होणार असेल तर आमचं काय? आम्हालाही काहीतरी ठेवा. आम्ही इतकी वर्षे कशाला घासली? असे सवाल शिवसेनाप्रमुखांनी केले तेव्हा हा चिमटा कोणाला काढला आहे ते लक्षात येऊन शिवतीर्थावर हास्यस्फोट झाला.
* घरफोड्यांना पाठीशी घालू नका
घरफोड्यांना पाठीशी घालू नका, असा आदेशच शिवसेनाप्रमुखांनी यावेळी दिला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा उल्लेख करीत ते म्हणाले, कल्याण-डोंबिवलीत कटकारस्थाने सुरू आहेत. पण हरामखोरी करणार्‍यांना थारा देऊ नका. निवडणुका येतात जातात. तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज काय होता. काहीजण आम्ही खूप घाम गाळला असं म्हणतात आणि नाराजी व्यक्त करतात. पक्षाने कदर केली नाही म्हणतात. घाम गाळला कुणासाठी? पक्षासाठीच ना? निष्ठा आहे म्हणता, मग ती पक्षावर आहे की तिकिटावर? यापुढे हे चालणार नाही. धमक्या देऊ नका. हवे तर आम्ही सगळे बाजूला होतो. मग नाराजांनी शिवसेना चालवावी. महाराष्ट्रात सत्ता आणून दाखवावी.
* घराणेशाही आणि गोळ्या
शिवसेनेत घराणेशाही नाही, असे ठामपणे सांगताना शिवसेनाप्रमुख उपरोधाने म्हणाले, ''कुणा मंत्र्याचा पोरगा आमदार होतो, तर कुणाचा खासदार होतो... तर कुणी गोळ्या घालतो (हशा). पण या गोळ्या घालणार्‍यांना क्लीन चिट दिली जाते. तुमच्याकडे क्लीन चिट आहेत तरी किती? प्रत्येकाला हे क्लीन चिट देत सुटले आहात.
कॉंग्रेसने देशाची पुरती वाट लावली आहे असा आसूड ओढत शिवसेनाप्रमुख म्हणाले, या देशाला काय भवितव्य आहे. पोलिसांकडे शस्त्र नाहीत. त्यांच्याकडे ऍटमबॉम्ब आहेत, पण ते दिवाळीतील (हशा). साळसकर, करकरे, कामटे असे बहाद्दर अधिकारी अतिरेक्यांशी झुंजताना शहीद झाले. त्यांना कारस्थान करून मरणाच्या दारात लोटलं असा आरोपही झाला. खरं खोटं कुणी सांगावं. त्यांना जॅकेट दिलं होतं तेही भोक पडणारं. अशोक चव्हाण मंत्रालयाच्या भिंती मजबूत करतायत, पण आधी देशाच्या भिंती मजबूत करा. तिकडे चीन घुसतोय. अतिरेकी घुसतात. याचं कुणाला भान आहे की नाही?
याच मुद्यावर शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवला. जुना संदर्भ देत ते म्हणाले, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी संजय गांधींच्या चपला हातात घेतल्या होत्या. या कॉंग्रेसवाल्यांना कशाची लाज वाटत नाही. आता त्यांचा पोरगा तोही मुख्यमंत्री आहे. तोही राहुल गांधींच्या .... राहुलच्या काय घालतो (हशा). विसरलो, शब्द पुढे मागे होतात. त्यातून हा घोळ होतो (पुन्हा हशा). घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात या मुख्यमंत्र्यांनीही राहुलच्या चपलांची काळजी वाहिली.
शिवसेनाप्रमुखांनी सत्ताधारी कॉंग्रेसवाल्यांची गणना हिजड्यांमध्ये केली. ते म्हणाले, कॉंग्रेस पक्षात हिजडे भरलेत. सोनियांपुढे ते झुकतात. शिवसेनाप्रमुखांनी यावेळी एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले, सुधीरभाऊ जोशींच्या गाडीतून आम्ही कोकणच्या प्रवासाला निघालो होतो. या प्रवासात डास खूप चावत होते. कोकणातसुद्धा डास आहेत. प्रत्येक जण डास मारण्यासाठी टाळ्या वाजवत होता. भालचंद्र ठाकूर यांना म्हणालो, पुढच्या वेळी हिजडे आणा, ते स्टाईलने टाळ्या वाजवतील, त्यांची हौस भागेल आणि डासही मरतील.
माझ्या सैनिकांनो एक व्हा, सत्ता येणारच. शिवसेना सत्ता घेणारच! असा जबरदस्त आत्मविश्‍वास व्यक्त करीत शिवसेनाप्रमुख म्हणाले, मजबूत विचार करून उठा. दसर्‍याचं सोनं लुटत असताना शिवसेनेची सत्ता आली पाहिजे, असा निर्धार करा. मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे. कोल्हापूर महापालिकेतही आमचीच सत्ता येणार. मराठ्यांनो एक व्हा!
शिवसेनाप्रमुख पुढे म्हणाले 'माणिकराव. काय माणिक शोधलंय. आम्ही काही बोललो तर पंचायत व्हायची. आपापसात डावपेच चाललेत. तुमच्या डोक्यावर केस नाहीत. (बाजूला बघत) आणि त्यांच्या डोक्यावरही... सरकार यावरून घसरून पडणार.'
'माय नेम इज खान... जा ना पाकिस्तानात. 'बिग बॉस'मध्ये दोन लवंडे आणलेत पाकिस्तानातून. का इथे आपल्याकडे कोणी कलाकार नाहीत? मीसुद्धा गायला लागेन. 'वंदे मातरम, जनगणमन...' जो पाकिस्तान आपल्या मुळावर आलाय त्यांना जवळ करताय? पाकिस्तानबरोबर चीनचेही आक्रमण... हे काय चाललंय? काय आहे, कोणती बाई? इटलीवाली. अरे! मुर्दाडांनो आधी 2000 वर्षे मुगलांनी राज्य केले. नंतर ब्रिटिशांनी दीडशे वर्षे आणि आता पुन्हा तुम्हाला इटलीवाली बाई हवी... परदेशी... अशा शब्दांत शिवसेनाप्रमुखांनी सालटी काढली.
काय भयंकर चाललंय. कुपोषण सुरू आहे. बालके मरताहेत. पोटे फुगलेली दिसताहेत. कल्पना अफाट आहेत. मी वाईनवर बोलणार नाही. हे कोण बोलतात... शरद पवार. माझे जुने मित्र. काय पितात मला माहीत नाही. शिवांबी सोडून... धान्यापासून आता दारू बनवायचे चाललंय. लोकांना खायला अन्न मिळत नाही, लोक उपाशी मरताहेत आणि तुम्ही धान्याची दारू काढताय, अशी देशाची वाट लावणार्‍यांना तुम्ही निवडून देता... त्यांना मतदान करता? असा सवाल शिवसेनाप्रमुखांनी केला. तेव्हा (शेम... शेम) असा आवाज घुमला.
* मला शिवसेनेत घराणेशाही नको
पत्रकारांविषयी काय बोलावं. दुखावले तरी आणि नाही दुखावले तरी नवीन जन्मलेल्यांनी नोकरीवर ठेवल्यासारखे ते बातम्या छापतात. मी तुमच्याच क्षेत्रातला. व्यंगचित्रकार. मी तुमचे काय घोडे मारलेय. मी उद्धवला शिवसेनेत आणलेले नाही, मला शिवसेनेत घराणेशाही नको. ज्यांनी उद्धवला आणले तो बाजूला राहतोय. मी महाबळेश्‍वरला होतो... हारतुरे आले. मी विचारले हे काय? तर म्हणाले उद्धव कार्याध्यक्ष झाले. अरे केलं कुणी उत्तर आले कृष्णकुंजवाल्यांनी (हशा...) पुढच्याच क्षणी कठोर होत शिवसेनाप्रमुख म्हणाले, ही भिक्कार लोकशाही नाही. शिवशाही आहे. मला विचारल्याशिवाय शिवसेनेचे धोरण कोणालाही ठरवता येणार नाही. मी हुकूमशहा आहे. हिटलर आहे. मी कधीच घराणेशाही केलेली नाही, असे सांगत शिवसेनाप्रमुखांनी आदित्यकडे कटाक्ष टाकला आणि विचारले, का रे, मी तुला सांगितलं का शिवसेनेत ये म्हणून.
'सच ए लॉंग जर्नी' या पुस्तकाच्या वादावर बोलताना शिवसेनाप्रमुख म्हणाले, मिस्त्रिच्या पुस्तकात किती घाणेरडे शब्द आहेत. हे पुस्तक कोणता संस्कार करणार? काय शिकवताय. कोणता संस्कार करताय. इतका घाणेरडा सिलॅबस. हे पुस्तक सिलबॅसला जाऊ तरी कसं शकलं.
* मी नतमस्तक आहे
शिवतीर्थावरील अति विराट जनसमुदायाला उद्देशून शिवसेनाप्रमुख म्हणाले, 'माझी शक्ती शरीरात नाही, तर माझ्यासमोर बसलेल्या माझ्या सैनिकांमध्ये आहे. शिवसैनिक हेच माझे टॉनिक आहे, शक्तिवर्धक आहे. हा पुरवठा असाच होत राहो... मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे. ज्या एका निष्ठेने तुम्ही शिवसेनेचे काम करीत आहात त्याच निष्ठेने यापुढेही करीत राहा.
* तेजस माझ्यासारखाच आहे
शिवसेनाप्रमुख म्हणाले, शिवसेनेवर ठाकरे घराणे लादले जाणार नाही. उद्धवचा मुलगा तेजस तो माझ्यासारखाच आहे. मला आवडतं तेच त्याला आवडतं. तो म्हणतो, आपली तोडफोड सेना आहे. तरुण मुले एकत्र येतायत. चांगली गोष्ट. उद्या टीका होईल. शिवसेनेच्या सभेत जल्लोष नव्हता, जिवंतपणा नव्हता, या पेड न्यूजवाल्यांनी सर्व राजकारणच बिघडवले. आतमध्ये घाला ती एकेक वाक्यं... (एकच हशा)
* साहेब, मला आशीर्वाद द्या हो!
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा नुकताच वाढदिवस झाला, हा संदर्भ देत शिवसेनाप्रमुख म्हणाले, ''छगनरावांचा फोन आला होता. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि अटक करण्यासाठी आटापिटा केला ते छगनराव म्हणाले, साहेब, मला आशीर्वाद द्या, माझा वाढदिवस आहे. मी म्हटलं, महाराष्ट्रासाठी झटा आणि लढा! हाच आशीर्वाद.''
शिवसेना नेते, खासदार डॉ. मनोहर जोशी, संजय राऊत, शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते सुभाष देसाई, महापौर श्रद्धा जाधव, शिवसेना नेते सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, लीलाधर डाके, विधान परिषदेतील शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते, शिवसेना नेते आमदार रामदास कदम, गजानन कीर्तिकर, शिवसेना सचिव अनिल देसाई, विनायक राऊत, दिवाकर बोरकर, विभागप्रमुख मिलिंद वैद्य, भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अभिजीत पानसे, प्रवक्त्या श्‍वेता परुळकर आदी मान्यवर व्यासपीठावर होते. तर सौ. रश्मी ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व उपनेते, विभागप्रमुख, आमदार, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी हे यावेळी उपस्थित होते.
* 'शमी'वरची शस्त्रे बाहेर काढून कॉंग्रेसला धडा शिकवावा लागेल - मनोहर जोशी
'कॉमनवेल्थ'ने भ्रष्टाचाराची कीड लावली तर 'लवासा' हा भ्रष्टाचाराचा डोंगर आहे. कॉंग्रेसने ही कीड आणि डोंगर निर्माण केल्यामुळे आता शमीच्या झाडावरची शस्त्रे बाहेर काढून कॉंग्रेसला धडा शिकवावा लागेल, असा इशारा शिवसेना नेते खासदार डॉ. मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना दिला.
* 2012 च्या निवडणुकीत मुंबईवरही भगवाच फडकेल
मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करायला अजून कुणी जन्माला आलेला नाही, असे सांगून न्यायदेवतेचे व महापालिकेचे आभार मानले. कल्याण-डोंबिवली महापालिकेवर तसेच 2012 साली मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल, असा निर्धार महापौरांनी व्यक्त केला.
* ही वसुली रॅली नाही
शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिवतीर्थावर येणारा शिवसैनिक हा उत्स्फूर्तपणे मैदानाकडे धाव घेतो, हा विचारांचा मेळावा आहे, कॉंग्रेसची वसुली रॅली नाही. मुंबईत उंच उंच इमारती उभ्या राहात असून आता 'लोढा हवा की लढा हवा' अशी परिस्थिती आहे. शिवसेना कोणताही अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा देऊन देसाई म्हणाले की, एका बाजूस 'लवासा'सारख्या प्रकल्पांना मान्यता मिळते, तर गिरणी कामगार बेघर होतोय.
* मतदान यंत्रे बाजूला ठेवा; कॉंग्रेसचे डिपॉझिट जप्त होईल
शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांनी आपल्या घणाघाती भाषणात सांगितले की, मतदान यंत्रांचा काळाबाजार झाला म्हणून शिवसेना-भाजप युतीची सत्ता येऊ शकली नाही. ही यंत्रे बाजूस ठेवा. लोकांना मतदान करूद्या, कॉंग्रेसचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहाणार नाही.
* क्षणचित्रे
- शिवसेना नेते, खासदार डॉ. मनोहर जोशी आणि विभागप्रमुख मिलिंद वैद्य यांनी भला मोठा गुलाब पुष्पहार घालून शिवसेनाप्रमुखांचे स्वागत केले.
- डोंबिवली शहरप्रमुख सदानंद थरवळ यांनीही शिवसेनाप्रमुखांना पुष्पहार देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
- शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेशी संबंधित पुस्तके, विशेषांक, स्टिकर्स, बिल्ले यांच्या विक्रीचे स्टॉल्सही परिसरात होते.
- राष्ट्रगीताने दसरा मेळाव्याची सांगता झाली. मेळाव्यातून परतणारा प्रत्येक शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुखांच्या ज्वालाग्राही व जाज्ज्वल्य विचारांनी भारावला होता.
* आदेश बांदेकर शिवसेना सचिव
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आदेश बांदेकर यांची शिवसेना सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज दसरा मेळाव्यात केली.
* विरोधकांचे धाबे दणाणले
शिवतीर्थावरील आजच्या ऐतिहासिक आणि अतिविराट दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी विरोधकांवर कडक शब्दांत आसुड ओढले. शिवसेनाप्रमुखांची तब्येत ठणठणीत आहे. तब्बल पाऊण तास शिवसेनाप्रमुखांच्या तेजस्वी विचारांची तोफ धडाडत होती. इटलीवाल्या सोनिया गांधी, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना सणसणीत हाणतानाच शिवसेनाप्रमुखांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराचा समाचार घेतला. शिवसेनाप्रमुखांचे घणाघाती भाषण विरोधकांसाठी जणू ही धोक्याचीच घंटा होती. त्यातच शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केले. 'मी पूर्वीसारखा दौरे करणार... महाराष्ट्रात फिरणार.' त्यामुळे येत्या काळात विरोधकांची खैर नाही, असेच दिसत आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive