Saturday, January 15, 2011

पानिपतातले आजचे मराठे!


 

पानिपतच्या लढाईत १७६१ मध्ये सदाशिवराव भाऊंबरोबर लढलेली २९८ कुटुंबे त्यापराभवानंतरही तेथेच राहिली. आज २४९ वर्षांनी त्यांची संख्या लाखावर गेली आहे. 

 इथे अडीचशे वर्षांपूर्वी मराठे आणि रोहिले अफगाण यांच्यात घनघोर युद्ध झाले या संग्रामाला २५० वर्षे पुरी होताहेत. महाराष्ट्र आणि हरयाणात या निमित्ताने परस्पर स्नेहबंधांचा नवा सेतू बांधला जावा अशी धडपड काही उत्साही मराठी जणांनी चालवली आहे. 

 सदाशिवराव भाऊंबरोबर युद्धात सहभागी असलेली २९८ मराठी कुटुंबे पराभवानंतर हरयाणातच राहिली. गेल्या २४९ वर्षांत त्यांच्या वारसांची संख्या दहा लाखांवर पोहोचली आहे. 'जैसा देश वैसा भेस या तत्त्वानुसार कालौघात या सर्वांनी हरयानवी संस्कृती अंगिकारली. पवारांचे पनवार महालेचे महल्ले महालान जोगदंडांचे जागलान अशी आडनावेही बदलली. बहुतेकजण आज जाटांसारखेच दिसतात. तरी ही मूळ मराठी संस्कृतीचा आजही सर्वांना जाज्वल्य अभिमान आहे. यापैकी अनेकजण स्वत:च उल्लेख आवर्जून मराठा चौधरी करतात. हरयाणात या समाजाला रोड मराठा 'म्हणतात. संस्कृती जपण्यासाठी हा समाज आपसात रोटी-बेटी व्यवहार करतो. 

पानिपत सोनपत कर्नाल कुरूक्षेत्र भागात जवळपास दोनशे गावांमध्ये हे मूळचे मराठी उत्तम शेती करतात. कुरूक्षेत्राच्या पुंडरी मतदारसंघात , ' रोड मराठां ची संख्या लक्षणीय आहे. समाजाचे नेतृत्व करणारे चौधरी ईश्वरसिंग पुंडरीतून चारदा विधानसभेवर निवडून आले. १९९१ ते ९६ या कालखंडात विधानसभेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले. २००० साली त्यांचे सुपुत्र तेजवीरसिंग अपक्ष उमेदवार असूनही जिंकले. 

पानिपतच्या युद्धाबाबत हे मराठीजन कमालीचे संवेदनशील आहेत. त्यांंच्यापैकी अनेकजण युद्धात सदाशिवराव भाऊंनी कसा पराक्रम गाजवला अखेरपर्यंत ते किती त्वेषाने लढले रणांगणावर विश्वासरावांना गोळी कशी लागली याचा सारा इतिहास कालपरवा घडलेल्या घटनेसारख्या सांगतात. या मराठी भाईबंदांना भेटण्यासाठी महामार्गाला लागूनच असलेल्या रोड मराठा समाजाच्या धर्मशाळेत शिरलो. तिथे मराठा नरेश ऊर्फ प्रताप चौधरी (जागलान)ची भेट झाली. या उत्साही तरुणानेछत्रपती शिवाजी सेवा संस्था स्थापन केली असून तिचे ऑफिस धर्मशाळेतच आहे. नरेश म्हणतो कुरूक्षेत्राच्या ज्या भूमीवर महाभारताचे युद्ध घडले त्या जागेला राज्यसरकारने वॉर मेमोरिअलचा दर्जा दिला. स्मारक सुंदर बनवून पर्यटनस्थळात त्याचेरूपांतर केले. असेच स्मारक पानिपत युद्धाचेही का नसावे उत्तरेत मराठ्यांनी अहमदशाह अब्दाली व रोहिल्यांशी झुंज देताना कडवी झुंज देताना मराठी फौजांना आलेले वीरमरण व त्यांच्या शौयाची गाथा त्यामुळे देशाला कळेल. 

जाट आणि मराठी जनतेचे ऋणानुबंध जुने आहेत. तीस-चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या विटा खटाव सांगली ,खानापूर आटपाडी भागातले मराठा बांधव याच संबंधांच्या आधारे पानिपतला आले आणि सोने-चांदी गाळण्याचा व्यवसाय करत इथे स्थिरावले. आता त्यांची महाराष्ट्रज्वेलर्स खटाव ज्वेलरी ज्योतिर्लिंग रिफायनरी जय शिवाजी ज्वेलर्स अशी दुकानेपानिपतच्या रस्त्यांवर दिसतात. 

 यश अपयश कोणाच्या हाती नसते. पराभव झाला म्हणजे सारे संपले असा निष्कर्ष काढणेही चुकीचेच. दुदेर्वाने पानिपत म्हणजे लाजिरवाणा पराभव असा पर्यायी शब्द अथवा वाक्प्रचार महाराष्ट्रात रूढ झाला आहे. मराठा दौलतीसाठी युद्धभूमीवर पराक्रम गाजवून स्वत:च्या प्राणांची आहुती देणाऱ्यांच्या हौतात्म्याचे ऐतिहासिक महत्त्व नाकारणे हा शुद्ध करंटेपणा नव्हे तर काय 

इतिहासाच्या तपशीलांविषयी आस्था नसलेल्यांची ही विकृत मानसिकता म्हणावी लागेल. महाराष्ट्राबाहेरच्या उर्वरित भारताला तुच्छ लेखणाऱ्याच्या संकुचित मनोवृत्तीचेही ते बोलके प्रतीक आहे. दिल्ली महाराष्ट्राला अपमानास्पद वागणूक देते ,मराठी जनांविषयी हिंदी भाषिक राज्यांना आस्था नाही अशी कोल्हेकुई महाराष्ट्रात सतत ऐकू येते. राज्याच्या विद्यमान राजकारणात भाऊंसारख्या पराक्रमी योद्ध्याचे वंशज किती असा प्रश्ान् हरयाणातल्या रोड मराठ्यांनी विचारला की मनोमन हसू येते. परप्रांतियांच्या द्वेषाने पछाडलेल्यांनी सव्वा दोनशे वर्षांपूवीर्च वेडा अन् अहंकारी ठरवून भाऊंच्या स्मृतीला महाराष्ट्रात मूठमाती दिली हे त्यांना कसे समजावून सांगणार
 पानिपतात मराठी फौजांचे नेतृत्व करणाऱ्या सदाशिवराव भाऊंचे चिरंतन स्मारक व्हावे यासाठी अनेक स्तरांवर सध्या प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने उभय राज्यात सांस्कृतिकदेवाणघेवाण वाढेल हरयाणा आणि महाराष्ट्र परस्परांच्या अधिक जवळ येतील. 

--


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive