हिंदी चित्रपटसृष्टीसाठी "बॉलिवूड' हा शब्दप्रयोग वापरला जातो. या 'बॉलिवूड'ची राजधानी म्हणजे मुंबई. हिंदी चित्रपटसृष्टीच्या जन्मापासून "बॉलिवूड'चा कारभार मुंबईतूनच चालतो. त्यामुळे इथल्या "स्टार' कलावंतांना मराठी यायला हवं, अशी अपेक्षा केली जाणं साहजिकच आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी स्थिती काही वर्षांपूर्वी तरी निश्चितच नव्हती; परंतु अलीकडच्या काळात परिस्थिती खूपच बदलली आहे. प्रत्यक्ष लिहिता-बोलता येत नसलं, तरी अनेक "ग्लॅमरस' चेहरे सध्या वेगवेगळ्या माध्यमांतून मराठीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोण कोण कसकशी साधत आहे ही जवळीक...?
श्वास चित्रपटाचं आपण खूप काही देणं लागतो. या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीला संजीवनी दिली, हे तर आता सर्वश्रुतच आहे; परंतु या चित्रपटाचं आणखी एक मोठं योगदान म्हणजे त्यानं बॉलीवूडला मराठी चित्रपटसृष्टीची दखल घ्यायला लावली. मराठी चित्रपटही "ऑस्कर'पर्यंत जाऊ शकतो, ही त्यांच्यासाठी एक "ब्रेकिंग न्यूज'च होती. "श्वास' पाहिल्यानंतर या प्रकारचे चित्रपट मराठीत याआधी तयार झाले आहेत का, असेही प्रश्न विचारण्याची काही कलाकारांची मजल गेली होती. "श्वास' प्रदर्शित होईपर्यंत बॉलिवूडमधील बहुसंख्य कलाकारांना मराठी चित्रपटांबाबत काहीच देणं-घेणं नव्हतं. काही मोजकेच अपवाद वगळले तर बहुतेक कलाकार इंग्लिश "मीडिया'लाच उपलब्ध व्हायचे. मराठी; तसेच इतर भाषिक माध्यमांसाठी काम करणाऱ्या पत्रकारांना एकगठ्ठा मुलाखती देण्याची प्रथा होती. ही प्रथा आता हळूहळू बदलतेय. विशेष म्हणजे आता चित्रपटांची प्रसिद्धी करणाऱ्या संस्थांमध्ये मराठी; तसेच इतर भाषांसाठी वेगळ्या "पीआर'ची नेमणूक होऊ लागलीय. गेल्या एक-दोन वर्षांत झालेला हा सर्वात मोठा बदल मानायला हवा.
आघाडीवर आमिरच!
आपण मराठी शिकतोय, अशी जाहीर घोषणा अभिनेता आमिर खान यानं जेव्हा केली, तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत त्याची मोठी चर्चा झाली. कारण, आमिरनं गेल्या काही वर्षांत आपल्या प्रत्येक कृतीला एका विशिष्ट "स्टॅंडर्ड'ला नेऊन ठेवलंय. त्यामुळे आमिरच्या या मराठी शिकण्याच्या गोष्टीकडंही बहुतेकांनी गांभीर्यानं पाहिलं. आमिरचं हे मराठीप्रेम एका रात्रीत आलेलं नाही. गेल्या काही वर्षांपासून त्याचा तसा प्रयत्नही सुरू होता. "वळू' चित्रपट त्यानं "मल्टिप्लेक्स'मध्ये जाऊन पाहिला होता. आमिरशी मला अनेकदा संवाद साधता आलाय. एका मुलाखतीत माझे प्रश्न हिंदीत असूनही त्याची उत्तरं आमिरकडून इंग्रजीमधून येत होती. याबद्दल आमिरला विचारलं असताना त्यानं त्याबद्दल खंत व्यक्त केली होती. आपलं शिक्षण इंग्रजी भाषेतून झालं असल्यामुळं हिंदी भाषेचा पटकन उपयोग करताना अडचणी येतात, असंही तो म्हणाला होता. परंतु, ही समस्या तो आता प्रयत्नपूर्वक दूर करीत आहे. तो मराठीच नव्हे; तर इतर भाषांमधील "मीडिया'बद्दल विशेष आस्था दाखवतो. आपल्या नवीन चित्रपटांची प्रसिद्धी इंग्लिश वर्तमानपत्रांपेक्षा स्थानिक भाषांमधील वर्तमानपत्रांमध्ये व्हायला हवी, असा तो आग्रह धरतो. अशा प्रकारचा आग्रह इतर कलाकारांकडून क्वचितच धरला जातो. हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुतेक सर्व अमराठी कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना मराठी बोलताना अडचणी येतात आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांचं इंग्लिश भाषेतून झालेलं शिक्षण. मात्र, आमिरचा अपवाद वगळता आजपर्यंत कुणीही मराठीची शिकवणी लावलेली नव्हती.
अभिनेता अक्षयकुमार हाही मराठी चांगले बोलतो. मात्र, त्याविषयी कुणाला फारसे माहीत नाही. त्यामुळे त्याच्याशी कोणी मराठीतून बोलायला जात नाही. अक्षयकडे एकदा असाच मराठीचा विषय काढला असताना तो म्हणाला ः "हल्लीचे चांगले मराठी चित्रपट मला सांग. मला ते पाहायचे आहेत.' "जमलं तर डीव्हीडीही दे...' असंही तो हसत हसत म्हणाला.
* * *
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला मराठी बोलता येतं. मात्र, चारचौघांसमोर बोलण्यास ती कचरते.
* * *
आमिरचा स्पर्धक मानला जाणाऱ्या शाहरुख खान याचीही मराठीबद्दलची मूठ सध्या झाकलीच आहे.
* * *
सलमान खानची आई मराठी असल्यामुळे त्याला मराठी समजतं आणि थोडंफार बोलताही येतं. मात्र, जाहीर मराठी बोलण्याचं तो टाळतो.
* * *
बच्चन कुटुंबीयांच्या मराठीप्रेमाबद्दलही बरीच चर्चा आतापर्यंत झाली आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यापैकी फक्त जया बच्चन या थोडंफार मराठी बोलू शकतात. मात्र, या कुटुंबानं अलीकडच्या काळात मराठीशी आपलं नातं अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केलाय. "विहीर' चित्रपटाची निर्मिती अमिताभ बच्चन यांनी आपल्या संस्थेतर्फे केलीय आणि ते आणि त्यांचं कुटुंब सध्या चांगल्या मराठी पटकथांच्या शोधात आहे.
'टीव्ही क्वीन' एकता कपूरबद्दलही असंच काहीसं म्हणावं लागेल. मराठीशी तिनं आपलं नातं आता आपल्या कामातून जोडलं आहे. मराठी मालिकांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन ती आता मराठी मालिकांच्या निर्मितीकडे वळलीय.
* * *
अभिनेत्री रेखा हिनेही मराठीवरील प्रेम वेळप्रसंगी व्यक्त केलेले आहे. आपल्याला दोन आई आहेत, असे ती नेहमी सांगते. एक म्हणजे जन्मभूमी ः दक्षिण भारत आणि दुसरी म्हणजे कर्मभूमी ः महाराष्ट्र. महाराष्ट्रातच आपल्याला नाव, प्रसिद्धी, पैसा सर्व काही मिळाले, याचा उल्लेख ती आवर्जून करते. गेल्याच वर्षी एका जाहीर कार्यक्रमातही तिने महाराष्ट्राविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती आणि तीही मराठी भाषेतून. ती म्हणाली होती ः "महाराष्ट्र माझा; मी महाराष्ट्राची!'
* * *
अभिनेता जॅकी श्रॉफ मुंबईतील तीन बत्ती परिसरात वाढला. त्याला चांगलं मराठी बोलता येतं आणि त्यानं ही गोष्ट कधी लपवूनही ठेवलेली नाही. जॅकीबरोबरच आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या अनिल कपूरकडून मात्र कधी मराठी बोलण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालेलं नाही.
* * *
व्यवसायाचा विचार करूनही अनेक जण मराठीकडे वळलेत. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांनी "सनई-चौघडे' चित्रपटाची निर्मिती केली होती. घईंची पत्नी पुण्यातील आहे. त्यामुळे त्यांचा पुण्याशी आणि पर्यायानं मराठीशी अनेकदा संपर्क येतो. त्यामुळे मराठी बोलता येत नसलं तरी त्यांना ते चांगलं समजतं.
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही मराठीबद्दल प्रचंड आस्था आणि प्रेम आहे. मराठी नाट्यसंगीताचे ते विशेष चाहते आहेत.
* * *
कलावंतांच्या तुलनेत गायक-संगीतकार मंडळी ही मराठीच्या अधिक जवळ आल्याचं लक्षात येतं. प्रसिद्ध पार्श्वगायक शंकर महादेवन हे चांगलं मराठी बोलू शकतात.
* * *
प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मांना मराठी समजत नाही; परंतु व्यवसायाच्या गरजेपोटी ते महाराष्ट्रातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून असतात. राज्यातील राजकारणावर त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. त्यामुळेच मराठी वृत्तवाहिन्या ते आवर्जून पाहतात. आपल्याकडच्या राजकीय मंडळींची भाषणं ते आवर्जून ऐकतात. मग त्याचा उपयोग ते "सत्या', "सरकार'सारख्या चित्रपटांमध्ये करतात.
* * *
गुलजार, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, जावेद अख्तर... यांसारख्या विख्यात लेखक-दिग्दर्शकांचं मराठी साहित्यावर, मराठी चित्रपटसृष्टीवर बारकाईनं लक्ष असतं.
* * *
बोमन इराणी, मनोज जोशी, सतीश शहा, जॉनी लिव्हर, ज्युनिअर मेहमूद हे कलावंतही मराठीशी चांगलेच रुळले आहेत.
* * *
गेल्या जमान्यात जरासे डोकावल्यास बऱ्याच कलावंतांची नाळ मराठीशी जुळल्याचं लक्षात येतं. जितेंद्र, राजेश खन्ना या कलावंतांचं गिरगावाशी नातं असल्यामुळे त्यांचा संबंध मराठी चित्रपट, मराठी नाटक आणि मराठी संस्कृतीशी यायचा.
मराठी चित्रपट आता व्यावसायिकदृष्ट्याही चांगली प्रगती करतोय. "नटरंग', "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटांनी मिळवलेल्या यशानं बॉलिवूडमधील वितरकांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. गेल्या वर्षीच्या पूर्वार्धात बहुतेक हिंदी चित्रपटांनी "बॉक्स ऑफिस'वर माना टाकायला सुरवात केल्यानंतर चित्रपटगृहे तसेच "मल्टिप्लेक्स'चे चालक मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनालाच प्राधान्य देत होते. ज्येष्ठ वितरक श्याम श्रॉफ, "गेईटी-गॅलेक्सी' या प्रसिद्ध चित्रपटगृहाचे व्यवस्थापक मनोज देसाई यांच्याशी बोलताना मराठीबद्दल त्यांना असलेली आस्था कायमच जाणवते.
भविष्यकाळात मराठी चित्रपटांनी वेगळ्या वाटेवरचे यशस्वी चित्रपट दिले तर मराठीचा "बॉलिवूड'मधील टक्का निश्चितच वाढणार आहे. आपल्याकडचे कलाकार आता राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही बाजी मारत आहे. त्याचाही परिणाम हळूहळू होत आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये बॉलिवूडमधील बहुतेक सर्व स्टार मंडळी मराठीकडे झुकल्यास आश्चर्य वाटू नये!
No comments:
Post a Comment