Sunday, May 29, 2011

गुंतवणुकीला द्या 'लिक्विड फंडा'ची जोड

बचतीवर ७ टक्के उत्पन्न अर्थात 'रिटर्न' मिळते. होय, बचतीच्या पैशांवर ७ टक्के उत्पन्न मिळू शकते. बँकेतील 'सेव्हिंग्ज अकाउंट'वर चार टक्के दराने व्याज मिळते, ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच मग प्रश्न पडतो, की प्राथमिक बचतीवरील 'रिटर्न' दुप्पट कसे काय केला जाऊ शकते?

आपल्याला पैशांचा उपयोग महागाईवर मात करण्यासाठी झाला पाहिजे. जेव्हा आपल्या आसपासच्या सर्वच गोष्टी महाग होतात आणि आपल्या पैशांच्या वृद्धीचा दर हा या वाढणाऱ्या महागाईएवढा नसतो. अशा वेळी आपल्या भविष्यावर आपणच अन्याय करतोच, पण त्याचबरोबर आपल्या मेहनतीच्या कमाईलाही योग्य न्याय देत नाही. या महागाईवर मात करण्याच्या बाबतीत आपण जेवढे म्हणून यशस्वी ठरू, तेवढे तुमचे पैसे तुमच्यासाठी अधिक मेहनत करतील.

पगारातील काही रक्कम ही काही महिन्यांसाठी, तरी बचत खात्यात (सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये') ठेवण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे संकट कधीही येऊ शकते आणि त्यासाठी हे करणे गरजेचे असते. पण, जर तुम्हाला अशा प्रकारच्या गरजेसाठी तुमचे पैसे 'सेव्हिंग्ज अकाउंट'ऐवजी अगदी तेवढ्याच सुविधेसह ठेवण्याची सोय उपलब्ध असेल तर काय? हा पर्याय अगदी व्यवस्थित नियमन असलेला, पारदर्शक, समजण्यास अगदी सोपा, कमी जोखीम उत्पादनाचा आहे. होय! हा पर्याय आहे म्युच्युअल फंडाचा!

आपली जोखीम तपासा

' लिक्विड फंड' तुम्हाला माहीत असतीलच. या 'फंडा'ला आणखीही नावे आहेत. 'मिस्टर कॅश फंड', 'लिक्विड' किंवा 'कॅश फंड'. हे तीन महत्त्वाच्या गोष्टींवर आधारित असतात. उच्च रोखता अर्थात 'लिक्विडिटी', कमी जोखीम आणि स्थिर उत्पन्न ('रिटर्न'). या पर्यायाबाबत विचार करायला हवा. सेव्हिंग्ज अकाउंटमधून जे मिळते तेच तुम्हाला या पर्यायामधून मिळत नाही का? 'सेव्हिंग्ज बँक अकाउंट'वर आता चार टक्के 'रिटर्न' म्हणजेच व्याज मिळतेे, पण आपल्या देशातील कोणताही म्युच्युअल फंड हा आपल्या फंडाच्या परताव्याची हमी देऊ शकत नाही. स्वत:ला एक प्रश्न विचारा, आपण घेत असलेली जोखीम अगदी नगण्य आहे हे माहीत असते, तेव्हा तुम्ही हमखास मिळणाऱ्या उत्पन्नाला कितीसे महत्त्व देता?

मूलभूत आधार

पैशांच्या गुंतवणुकीतील आणखी एक मूलभूत नियम मी तुमच्यासमोर आणतो. एखादी व्यक्ती घेत असलेली वाढती जोखीम ही आज त्याला जो उत्पन्न मिळत आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक उत्पन्न मिळवून देणारी असेल, तर मग गुंतवणूकदाराने त्यात उडी मारण्यास हरकत नसावी. ज्या गुंतवणुकीत जोखीम सामावलेली असते, त्या गुंतवणुकीच्या बाबतीत एक प्रश्न तुम्ही विचारणे अत्यंत आवश्यक आहे आणि तो म्हणजे 'किती प्रमाणात जोखीम?' 'सेबी'ने 'लिक्विड फंडां'वर बंधने आणली आहेत. 'लिक्विड फंड' हे 91 दिवसांपेक्षा अधिक कालावधी असलेल्या 'अंडरलाइंग' योजनांमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. यातून किमान व्याजदर जोखमीपासून तुम्हाला एक भक्कम मूलभूत आधार मिळतो.

पुढील तीन ते सहा महिन्यांसाठी, आपल्या अर्थव्यवस्थेेमध्ये झटपट आणि अल्पकालीन पैशांसाठीची भूक (गुंतवणूक जगतात या पैशाला 'टाइट लिक्विडिटी' म्हणतात) वाढत जाणारी आहे. 'टाइट लिक्विडिटी'च्या या स्थितीमध्ये पैशांना खूप मागणी असेल, पण त्याचा तेवढा पुरवठा होणार नाही. म्हणूनच मग बँकांच्या पुढे सर्वसाधारणपणे या तुटीवरील उतारा असतो, तो म्हणजे रिर्झव्ह बँकेकडून कर्ज घेणे. जेव्हा बँका अशाप्रकारे झटपट पैसे उभे करतात, तेव्हा गुंतवणूक जगत त्याला 'रेपो', असे म्हणते. 'रेपो'चे प्रमाण खूप जास्त असल्याचे जेव्हा तुमच्या वाचनात येते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो, की आर्थिक जगतामध्ये झटपट पैशांची अर्थात रोखतेची ('लिक्विडिटी') कमतरता आहे. अशावेळी आपल्या बचतीतील पैशांकडून आपल्याला अधिक उत्पन्न मिळण्याची संधी इथे प्राप्त होते. ही संधी 'लिक्विड फंडां'मध्ये गुंतवणूक करून साध्य करता येते.

अनेक पर्याय उपलब्ध

म्युच्युअल फंड उद्योगाने तुम्हाला निवडीसाठी ५० विविध लिक्विड फंड उपलब्ध करून दिले आहेत. आज कित्येक 'ऑनलाइन' व्यासपीठे उपलब्ध असताना त्यांची खरेदी करणे ही बाब अगदी सोपी आहे. या 'फंडां'वर कोणतेही प्रवेश किंवा निर्गमन शुल्क नसते आणि तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुमचे पैसे कोणत्याही दिवशी परत घेऊ शकता. ज्यांना यात खूपच रस आहे, अशांसाठी 'अल्ट्रा शॉर्ट टर्म 'डेट् फंड' हे आदर्शवत ठरतात. त्यामुळे 'सेव्हिंग्ज अकाउंट'मध्ये पैसे पडून राहण्यापेक्षा 'लिक्विड फंडा'त गुंतवणूक करण्याच्या पर्यायाचा विचार करण्यास हरकत नाही.

1 comment:


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive