Monday, May 23, 2011

डोंबिवलीकरांना सुयोगचा तीन कोटींचा गंडा!

सहाशे कोटींचा गंडा घालणाऱ्या कल्पवृक्षने सहकार क्षेत्राची विश्वासहर्ता धुळीस मिळवली. त्या पाठोपाठ सुयोगने डोंबिवलीकरांना सुमारे तीन कोटींचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे.

1992 साली डोंबिवली सुयोग डिपार्टमेंट स्टोअर्सची ठेव योजना डोंबिवली नागरी सहकारी बँकेचं एक संचालक किरण पिंगळे यांनी सुरू केली होती. सुयोग डिपार्टमेण्टची डोंबिवलीत राजाजी पथ , टिळक रोड , मानपाडा रोड या तीन ठिकाणी शॉप अपार्टमेण्टमध्येही कार्यरत आहेत. या योजनेचे संचालक अरुण पिंगळे , विजय पिंगळे , मिनल पिंगळे आणि किरण पिंगळे या सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण व विजय पिंगळे यांना ठाणे आथिर्क गुन्हा शाखेचे पोलिस इन्स्पेक्टर अजित देशमुख यांनी अटक केली आहे. पिंगळे बंधूंनी डोंबिवलीतील त्यांच्या शॉपसमोर आपल्या गुंतवणूक योजना अल्पावधीत कशा लाभदायक व भरपूर व्याज देणारे असल्याचे मोठमोठे बोर्ड लावलेले होते. या आकर्षक जाहिरातबाजीला फसून पिंगळे बंधूंच्या ठेव योजनांमध्ये ओढले गेले. त्यातच डोंबिवलीतील एक नामवंत बँक म्हणून ख्याती असणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेवर किरण पिंगळे हे संचालक आहेत. त्यांनी स्वत:च सुरू केलेल्या स्वतंत्र ठेव योजनांवर डोंबिवलीकरांचा चटकन विश्वास बसला. सरकारी बँका सहा ते सात टक्के व्याज मोठ्या मुष्किलीने देत असताना पिंगळे बंधूंनी मात्र वाषिर्क 24 टक्के व्याज अशी भुलभुलय्या देणारी जाहिरातबाजी केली. सुमारे अडीचशे डोंबिवलीकर लोकांनी या भुलभुलय्याला फसून पाच हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत गुंतवणूक या ठेव योजनांमध्ये केली. प्रारंभी दीड कोटींच्या घरात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं बोललं गेलं. परंतु प्रत्यक्षात ही रक्कम तीन कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. पिंगळे बंधूंनी ठेवीदारांकडून एक लाख व त्याहूनही अधिक रक्कम स्वीकारताना कोणत्याही प्रकारचा सरकारी मुदाकांचा वापर केला नाही. तसंच त्यांच्याकडील छापील अर्जावरच ही रक्कम लिहून घेतल्यानं गुंतवणूकदारांच्या अज्ञानावरही झगझगीत प्रकाश पडला आहे.

कल्पवृक्ष , संचयनी , संजीवनी , मुंबईतील शेरेगर घोटाळा , भिशी , चिटफंड आणि आता सुयोग या एकामागोमाग एक घडलेल्या आथिर्क गैरव्यवहारातून गुंतवणुकीबाबतचे कमालीचे अज्ञान ठाणे आथिर्क गुन्हे शाखेसमोरील सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. गुंतवणूक करताना ठेवीदार संबंधित आथिर्क कंपनीची कोणतीही खातरजमा करत नाहीत. त्यामुळे मनस्तापाखेरीज गुंतवणूकदारांच्या हाती काहीही पडत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive