Sunday, May 29, 2011

बॅंकेच्या सेवेतील त्रुटींबद्दल दाद मागता येते

प्रश्‍न - मी एका नामांकित मल्टिनॅशनल बॅंकेकडून कारसाठी कर्ज घेतले होते. त्या वेळेस बॅंकेने गाडीच्या कागदपत्रांवर तशी नोंद केली होती व सर्व मूळ कागदपत्रे जमा करून घेतली होती. आता मी सर्व कर्जाची परतफेड करून चार महिने पूर्ण होऊनही बॅंकेने मला मूळ कागदपत्रे परत केलेली नाहीत अथवा कर्ज खाते बंद झाल्याबद्दल कोणतेही प्रमाणपत्र दिलेले नाही, याबद्दल मी अनेक वेळा बॅंकेशी ई-मेलद्वारे संपर्क साधला. परंतु, आश्‍वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. याबाबत ग्राहक मंचामध्ये जाता येईल का?
- एक वाचक

उत्तर - ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार सेवेतील त्रुटी अथवा कमतरता, याकरिता ग्राहक मंचामध्ये तक्रार करता येते. आपण बॅंकेकडून कारसाठी कर्ज घेतले होते. त्यामुळे आपण बॅंकेचे ग्राहक आहात. आपण कर्जाची सर्व रक्कम ही सव्याज परतफेड करूनही संबंधित बॅंकेने आपली सर्व मूळ कागदपत्रे परत केलेली नाहीत. तसेच ना-हरकत प्रमाणपत्र अथवा कर्ज खाते बंद झाल्याचे प्रमाणपत्र दिलेले नाही, ही निश्‍चितपणे सेवेतील कमतरता आहे. कर्ज खाते पूर्णत- बंद झाल्यावर कारची मूळ कागदपत्रे न देणे हे संबंधित बॅंकेचे कृत्य निश्‍चितपणे बेकायदा व सेवेत कमतरता करणारे आहे. याबाबत आपण बॅंकेशी ई-मेलद्वारे अनेकदा संपर्क साधला, असे नमूद केले आहे. आता, आपण बॅंकेला एक सविस्तर पत्र, रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून, सर्व मूळ कागदपत्रे व कर्ज खाते बंद झाले आहे असे प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी करावी. हे पत्र मिळूनही बॅंकेने कागदपत्रे व प्रमाणपत्र न दिल्यास, ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल करावी आणि बॅंकेकडून मूळ कागदपत्रे मिळावीत, कर्ज खाते बंद झाल्याचे प्रमाणपत्र मिळावे, बॅंकेने अनाधिकाराने मूळ कागदपत्रे, चार महिन्यांपासून बॅंकेजवळ ठेवल्याने, नुकसानभरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा, या मागण्या कराव्यात.

सकाळ वृत्तसेवा

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive