Tuesday, March 19, 2013

सतार आणि तंबो-यांच्या जन्माची चित्तरकथा



ही गोष्ट आहे स्वरांना जन्म देणा-या तारांच्या जन्माची. अर्थात भारतीय शास्त्रीय संगीतात मानाचे स्थान पटकावलेल्या तंतूवाद्यांच्या जन्माची. तुमच्या-आमच्या शेतात पिकणा-या भोपळ्यापासून बनविण्यात येणा-या सतार आणि तंबो-याची. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी असलेले ठाण्यातील फोटोग्राफर शेखर सिधये यांनी अत्यंत कुशलतेने कॅमे-यात बंदिस्त केलेली ही चित्तरकथा ' मटा ऑनलाइन ' च्या वाचकांसाठी त्यांच्याच शब्दांत....

माझे पणजोबा नटश्रेष्ठ गणपतराव बोडस हे मिरजमध्ये वास्तव्याला होते , त्या घराबद्दल माझ्या आजीच्या बोलण्यात सतत उल्लेख येत असे. खरं तर आजीला त्या घराची खूप आठवण येत होती. ते घर कॅमे-यात बंदिस्त करून तिला दाखवावे असे नेहमी वाटायचे. असाच एकदा मिरजेला जाण्याचा योग आला तेव्हा मनात विचार आला , घराला एक धावती भेट द्यायला काय हरकत आहे , म्हणून मग अब्दुल करीमखान चौकातल्या त्या घराकडे मी माझा मोर्चा वळविला. याच रस्त्याने पुढे जाऊन लक्ष्मी मार्केटच्या थोडे पुढे गेल्यानंतर ' सतार मेकर्स लेन ' लागते. तेथे गेल्यावर एका दुकानामध्ये छताला पिवळे धम्मक भोपळे टांगलेले दिसले. त्याच भोपळ्याखाली काही कारागीर तंतुवाद्य बनविताना मी पाहिले. भोपळ्यापासून सतार किंवा तंबोरा तयार करतात हे मला जरी माहित असले तरीही मी हे प्रथमच पहात होतो.

हे दृश्य पाहून मला एकच वाटले की , यावर एक छायाचित्र रूपात गोष्ट तयार करावी. माझी कल्पना मी या कामात पिढीजात व्यवसाय करणा-या आणि जी. एस. सतार मेकर्स या दुकानाचे मालक असलेल्या युसुफभाईंना सांगितली. त्यांनी माझे सर्व बोलणे ऐकून मला परत यायला सांगितले. बहुधा मी खरंच मनापासून हे करेन का ? हे तपासण्याकरताच ते मला असे म्हणाले असावेत कारण ' कल्पकतेचा कस लावून वाद्य तयार करणे एक मोठी वेळखाऊ प्रक्रिया आहे ' असे ते म्हणाले. काही दिवसांनंतर मी पुन्हा मिरजेला गेलो आणि त्यांच्या दुकानात जाऊन बसू लागलो. यावेळी छायाचित्रे न काढता एकंदरीत काम कसे चालू आहे त्याचे निरीक्षण करू लागलो. मुंबईला परत आल्यावर मी ही वाद्ये तयार करण्याच्या पद्धतीविषयी वेबसाईट्सवर माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला खरा पण हाती फारसं काही लागलं नाही जे काही उपलब्ध होतं ते विखुरलेल्या स्वरूपात आणि अतिशय तोकडं होतं ; आणि हो महत्तवाचं म्हणजे जे साहित्य उपलब्ध होतं ते शब्दबध्द स्वरूपात होतं.

वेबसाईट्सवर भरपूर शोधाशोधकेल्यावर असं लक्षात आलं की यासंबंधी फार चांगली छायाचित्रे उपलब्ध नसून एकाही छायाचित्रकाराने या विषयावर काम केलेलं नाही. मी ठरवलं आपण याच विषयावर काम करायचं ही एक लांबलचक आणि वेळखाऊ पद्धत आहे. त्यासाठी मला मिरजेला भेट द्यावी लागणार होती. याकरिता मी मिरजेला वरचेवर वारंवार भेटी द्यायला सुरूवात केली आणि त्या प्रत्येक भेटीत हे वाद्य कशापद्धतीने तयार केलं जातं याचा बारकाईने अभ्यास करायला सुरूवात केली.

महाराष्ट्राच्या दक्षिणेला पंढरपूरजवळ बेगमपूर नावाचे एक छोटे खेडे आहे. शेतकरी दसरा झाल्यानंतर आपल्या शेतात भोपळ्याच्या बियांची लागवड करतात. हे भोपळे खासकरून वाद्य तयार करण्यासाठीच पिकविले जातात. याची पूर्ण वाढ होण्यासाठी सहा-सात महिन्यांचा काळ जातो. शेतकरी याची विशेष काळजी घेतात जेणेकरून यांचा आकार बिघडता कामा नये. मार्च महिन्यात वाढ पूर्ण होताच हे भोपळे देठापासून कापून शेतातच वाळविण्यासाठी ठेवले जातात. पंढरपूरच्या उष्णतेत होरपळून निघालेले अद्वितीय असे हे भोपळे न आक्रसता आपला आकार तसूभरही बदलत नाहीत. ही पंढरपूर भागातल्या भोपळ्यांची खासियतच म्हणावी लागेल. हे भोपळे पूर्णपणे सुकल्यानंतर ते विक्रीसाठी ठेवले जातात आणि त्यांना चांगला भावही मिळतो.

मिरजेतले सतार मेकर्स खास पंढरपूर भागात येऊन भोपळे खरेदी करतात. विकत घेतलेले हे भोपळे लॉरीने मिरजेत आणले जातात. त्यानंतर त्यांना पोटमाळ्यावर ठेवण्यापूर्वी खोलीच्या छताखाली ते कोणती जागा पटकावणार हे त्या भोपळ्याचा घेरच ठरवितो. त्यावर त्याची शाईने तशी नोंद केली जाते. जेव्हा सतार किंवा तंबोरा तयार करण्याची ऑर्डर मिळते त्यावेळी प्रत्येकाच्या सोयीनुसारच तो तयार केला जातो , मग तो वापरणारा पुरूष किंवा स्त्री कोणीही असो , त्याला जो योग्य , सोयीचा वाटेल तोच भोपळा त्याच्यासाठी निवडला जातो. पुरुषांसाठी असणा-या भोपळ्याचा आकार तुलनेने मोठा असतो.

अशी बनते सतार आणि तंबोरा

भोपळा देठाच्या बाजूने गोलाकार कापून आतल्या सर्व बाजूंनी साफ केला जातो. त्यानंतर भोपळ्याच्या आतली त्वचा मऊ व्हावी म्हणून त्यात पाणी भरले जाते आणि तो पाण्याने भरलेला भोपळा दोन दिवस त्याच स्थितीत ठेवला जातो. दोन दिवसांनी त्यातील पाणी आणि गर काढून टाकाला जातो. त्यानंतर , त्यात उभ्या आडव्या दिशेने लाकडी काठ्या घट्ट बसविण्यात येतात जेणेकरून त्याला दिलेला आकार हा ' समाकार ' रहावा हा त्यामागील उद्देश असतो. त्याचवेळी त्याच्या गोलाकार भागाभोवती ' तून ' किंवा ' टून ' चे लाकूड वापरून त्यापासून त्याचा गळा तयार केला जातो.

शेवटी लाखेचा वापर करून त्या गळ्यावर दांडी बसविली जाते. त्यानंतर भोपळ्यावर लाकडाची एक तबकडी बसविली जाते जेणेकरून भोपळा बंद होतो. यापुढे त्यावर कलाकुसर केली जाते. त्यानंतर चार पाच वेळा पॉलिशचे हात दिले जातात. हे करत असतानाच या वाद्याचा रंग ठरविला जातो. शेवटी त्यावर खुंट्या , तारा आणि वाद्या बसवून हे वाद्य सूर जुळवून वाजविण्यासाठी सज्ज होते. अशा त-हेने सतार किंवा तंबो-याचा जन्म होतो.

सिधये यांची छायाचित्रे कॉफी टेबल बुकमध्ये

> ' सतारमेकर्स ऑफ मिरज ' या मिरजमधील सतार आणि तंबोरा तयार करण्याच्या पद्धतीवर छायाचित्रण करणा-या सिधये यांच्या छायाचित्रांचा समावेश महाराष्ट्र कॉफी टेबलबुकमध्ये करण्यात आला आहे.

> सतार आणि तंबोरा तयार करणे याला एक कला किंवा एक खुप जुनी परंपरा म्हणून अशा प्रकारे छायाचित्र स्वरूपात कधीच गणले गेले नव्हते.

> राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मल्टिमीडिया या प्रकाशन संस्थेला सरकारतर्फे महाराष्ट्र कॉफी टेबलबुक तयार करण्याच्या सूचना मिळाल्या.

> ऐतिहासिक घडामोडींपासून ते अगदी अलीकडेच नव्याने बांधण्यात आलेल्या वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत कला , संस्कृती , प्रशासन , विज्ञान , उद्योगधंदे आदींचा समावेश या बुकात करण्यात आला आहे. त्यात सिधये यांच्या छायाचित्रांनी स्थान पटकावले आहे.

> मी छायाचित्रण केलेले मिरजचे सतार मेकर्स हे कॉफी टेबलबुकचा एक भाग आहेत. त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विनंतीला मान ओबामांनी हे टेबलबुक व्हाईट हाऊसच्या वस्तुसंग्रहालयात ठेवले आहे. ही केवळ मराठी माणसासाठी अभिमानाचीच गोष्ट नसून हा सतार आणि तंबोरा तयार करणा-या मिरजच्या दर्दी कलाकारांच्या मेहनतीला केलेला सलाम असल्याच्या भावना सिधये यांनी व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive