Tuesday, March 19, 2013

मराठी मोहोर!


भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवी वर्षात मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली लखलखीत मोहोर उमटवली असून सोमवारी जाहीर झालेल्या ६० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी कलाकारांनी वर्चस्व गाजवले.
usha.jpg
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना ' अनुमती ' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला असून त्यांना हा पुरस्कार इरफान खान (पानसिंग तोमर) यांच्यासोबत विभागून देण्यात आला. ' धग ' या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी उषा जाधव या अभिनेत्रीने पदार्पणातच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला , तर याच चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. आरती अंकलीकर-टिकेकर यांना ' पलके ना मुंदो ' या ' संहिता ' चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचे पारितोषिक मिळाले. ' संहिता ' साठीच सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार शैलेंद्र बर्वे यांना संयुक्तपणे (कलियाचन - मल्याळी चित्रपट) मिळाला. विशेष उल्लेखनीय पुरस्कारांत ' धग ' मधील बालकलाकार हंसराज जगताप याचा समावेश आहे. रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केलेला ' इन्व्हेस्टमेंट ' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला असून ' मोदीखान्याच्या दोन गोष्टी ' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट कलासंस्कृती हा पुरस्कार जाहीर झाला. ' देख इंडियन सर्कस ' हा मंगेश हाडवळे दिग्दर्शित चित्रपट सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट ; तर , ' कातळ ' हा सर्वोत्कृष्ट कथाबाह्य लघुपट ठरला.

' पानसिंग तोमर ' सर्वोत्कृष्ट चित्रपट

ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर दरोडेखोर बनलेल्या पानसिंग तोमर यांच्या जीवनावर आधारित ' पानसिंग तोमर ' या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. तिग्मांशू धुलिया यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

' मटा ' कडून ' सन्मान '

महाराष्ट्र टाइम्सच्या शनिवारी झालेल्या ' मटा सन्मान ' सोहळ्यात चित्रपट विभागात ' धग ' नेच बाजी मारली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक( शिवाजी लोटन पाटील) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (उषा जाधव) , सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता ( उपेंद्र लिमये) , सर्वोत्कृष्ट बालकलाकार (हंसराज जगताप) आणि सर्वोत्कृष्ट पटकथा (नितीन दीक्षित) असे सहा पुरस्कार या चित्रपटाने पटकावले होते!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive