होमिओपॅथी - उन्हाळ्यातील मुलांचे आजार
( डॉ. मीनल सोहनी )
**********************************************
उन्हाळ्यातील उच्च तापमानामुळे होणाऱ्या उष्माघात व डोकेदुखी या त्रासांबद्दल आपण मागील भागात माहिती घेतली. याशिवायही उन्हाळ्यात इतर अनेक समस्या आपल्याला सतावतात. त्या समस्या व त्यावरील होमिओपॅथिक औषधांची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊ-
जेव्हा थंडी संपून उन्हाळा चालू होतो तेव्हा हवाबदलाच्या या काळात विविध विषाणूंचा प्रादुर्भाव होऊन वेगवेगळ्या आजारांच्या साथी येतात. मुलांमध्ये गोवर, कांजिण्या, डोळे येणे, तळावणे, सर्दी, खोकला असे विविध आजार या काळात दिसून येतात. गोवर व कांजिण्यांच्या लक्षणांवरून अँटिमनी क्रूडम, कार्बो व्हेज, पल्सेटिला, सल्फर, ब्रायोनीया अशी अनेक औषधे मुलांसाठी खूप गुणकारी ठरतात. डोळ्यांच्या विविध तक्रारीवर युफ्रेसिया, आर्जेंटम नायट्रीकम, नॅट्रम आर्सेनिकम, स्टॅफिसॅग्रिया अशी विविध औषधे वापरता येतात.
या काळात आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, शीतपेये यामुळे तसंच रस्त्यावरची सरबतं, कुल्फी, उघड्यावरचे खाद्यपदार्थ यांच्या सेवनाने जंतूंचा प्रादुर्भाव होऊन पोटाच्या विकारांनाही आमंत्रण दिलं जातं. उन्हात खेळल्यावर लगेच गार पाणी पिणं, घाम येत असतानाच थंड पाण्याने अंघोळ करणं वा खूप शारीरिक श्रम करून लगेच पोहायला जाणं यामुळेही विविध प्रकारचे त्रास होतात. त्यावर काही औषधे अशी-
१) ऍकोनाइट - लहान मुलाना उन्हाल्यात होणारे विकार विशेषतः उलट्या, जुलाब वगैरे. घाम येत असताना त्यावर वारा लागणे किंवा अंघोळ करणे यामुळे झालेली सर्दी खोकला इ. वर गुणकारी.
२) ब्रायोनिया - खूप उकाड्यात अतिथंड पाणी पिणं किंवा शारीरिक श्रम यामुळे होणारी सर्दी, खोकला, डोकेदुखी, चक्कर; तसेच मळमळ, उलट्या, अपचन, जुलाब इ. वर गुणकारी. गोवर, कांजिण्यावरही प्रभावी औषध.
३) एश्युजा- लहान मुलांना उन्हाळ्यात होणाऱ्या पोटाच्या विकारांवर उदा. उलट्या, जुलाब, अपचन, दूध न पचणे, बाळाला दात येताना उष्णतेने होणारे त्रास यावर अतिशय गुणकारी. उन्हाळ्यात काकड्या, कलिंगड खाण्याची मौजच काही खास असते; पण काही वेळा खराब वा नासक्या फळांमुळेही उलट्या, जुलाबाचा त्रास होतो. अशा खराब वा नासक्या अन्नाने वा फळांनी होणाऱ्या विकारांवर आर्सेनिक आल्ब, कार्बो व्हेज, झिंजीबर इ. औषधे उपयुक्त ठरतात.
उन्हामुळे विशेषतः कोरड्या हवामानात मुलांना आणि मोठ्यांनाही कधी कधी नाकातून रक्तस्राव होतो किंवा घोळणा फुटतो. अशा वेळी चेहरा थंड पाण्याने धुणे, नाकावर बर्फ चोळणे, बोटाच्या चिमटीत नाक घट्ट पकडणे यामुळे रक्तस्राव आटोक्यात यायला मदत होते. तसेच बेलाडोना, मिलिलोटस, मिलिफोलियम, फॉस्फोरस, क्रोकस अशी औषधेही तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने देता येतात.
उन्हाळ्यात येणाऱ्या घामाने व हवेतील आर्द्रतेने बऱ्याचदा त्वचेचे विकारही प्रामुख्याने आढळतात. घामोळे येणे, त्वचेवर चट्टे उठणे, बुरशीचा प्रादुर्भाव किंवा जंतुसंसर्ग, घाम येण्याच्या जागांवर खाज सुटणे असे विविध त्वचेचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची स्वच्छता फार महत्त्वाची ठरते.
त्वचेवरील घाम साठून राहणाऱ्या जागा स्वच्छ व कोरड्या ठेवणे, कपडे स्वच्छ धुवून वापरणे, एकमेकांचे कपडे, टॉवेल इ. न वापरणे ही काळजी घेणे उत्तम असते. त्वचेसाठी गुणकारी अशी शेकडो औषधे होमिओपॅथिक आहेत. त्वचेला खाज सुटून चट्टे वा पित्तासारख्या गांधी येणे, त्वचेचा दाह यावर एपिस, आर्टिका युरेन्स, नॅट्रम म्यूर इत्यादी. त्वचेला खाज येणं, पुरळ उठून आग होणं यावर युस्टीलगो सल्फर इत्यादी. खूप दुर्गंधीयुक्त घाम व त्यामुळे बुरशी वा पांढरे चट्टे येणं यावर थुजा कल्केरिया कार्ब इत्यादी. अशी विविध औषधे डॉक्टर लक्षण-साधर्म्यावरून देऊ शकतात.
- डॉ. मीनल सोहनी
No comments:
Post a Comment