Thursday, September 23, 2010

सुरेखाचं दुसरं लग्न.

सुरेखाचं दुसरं लग्न.

" प्रेमासारख्या गोष्टीवर मी जर भरवंसा ठेवला आणि भीतीविरहीत निर्णय मी घेत गेले तरच नव्या परिस्थितिचा मला स्वीकार करता येईल असं त्यावेळी वाटत होतं."

"एखाद्या झाडाला निरोगी फळं लागतात पण एखाद दुसरं फळ किडकं पण असूं शकतं.माझं अगदी तसंच झालंय.माझा मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ सशक्त आणि निरोगी आहेत.माझ्या बाबतीत जन्मतःच माझ्या शरिराला आवश्यक होतं त्याच्या पेक्षा माझं हृदय लहान होतं.असं डॉक्टरानी माझ्या आईबाबाना सांगीतलं होतं.त्यामुळे मी जितकी वर्षं जगेन तेच माझं आयुष्य ठरेल असं भाकित केलं होतं."
असं अरविंद चिटणीस मला त्यावेळी म्हणाल्याचं आठवतं.

आम्ही एकाच वर्गात होतो.अरविंद माटूंग्याहून आमच्या शाळेत यायचा.पहिल्यापासून त्याचं बोलणं अगदी क्षीण आवाजात असायचं.प्रकृतीने अगदी "पाप्याचं पित्तर" होता.पण स्वभावाने खूपच प्रेमळ होता.चेहरापण खूप मोहक होता. अभ्यासात अवि हुशार होता.त्याचं अक्षर अतीशय सूंदर असायचं.
पुढे खूप शिकायचं असं त्याला नेहमी वाटायचं.त्याच्या वडलांचं दादरला फर्निचरचं दुकान होतं.अरविंदच्या घरी मी कधी गेलो की त्याची आई अरविंदबद्दल काळजीत असायची हे माझ्या लक्षात नेहमीच यायचं.तीच्या तीन मुलात हा एक असा प्रकृतीने अधू असल्याने ती त्याच्यावर जास्त प्रेम करायची.ते मला दिसून यायचं. आणि कुणाच्याही आईला असं वाटणं स्वाभावीक आहे.ती मला म्हणायची,
"
शिकतोय तेव्हडा शिकू देत.त्याच्यासाठी त्याच्या वडलानी भरपूर तजवीज करून ठेवली आहे.आमच्या पश्चात त्याचं कसं होणार देव जाणे?."
"
आई माझी उगाचंच काळजी करीत असते.जे विधीलिखीत आहे ते होणारच."
असं अवि मला म्हणायचा.

करता करता अरविंद बी. पास झाला.आणि वडलांच्या फर्निचरच्या दुकानात त्यांना मदत करायला जायाला लागला. काही दिवसानंतर त्याची आई त्याच्या मागे लागायला लागली की त्यांने लग्न करावं.मला एकदा म्हणाला,
"
आईला समजत कसं नाही.माझ्याशी लग्न करून त्या मुलीचं भविष्यात नुकसान नाही का होणार?आणि माझ्या अश्या ह्या प्रकृतीला मला कुठची मुलगी पसंत करणार?"
मला आठवतं मी त्याला म्हणायचो,
"
असं बघ,ती आई असल्याने तुला तसं सांगते.तीला वाटत असेल की तीच्या पश्चात तुला पहायला कुणीतरी असावं.आणि तुच म्हणतोस ना विधीलिखीत आहे ते होणार.असेल एखादी मुलगी माळ घेऊन."

आणि खरंच सुरेखा सुळे माळ घेऊन उभी होती.दोघांचा सुखाचा संसार चालला होता.अरविंदला एक मुलगा पण झाला. अविच्या आईला खूप आनंद व्ह्यायचा.ती सुरेखावर पण खूप प्रेम करायची.तीला  तीन मुलगे होते.मुलगी नव्हती.त्यामुळे ती सुरेखाला आपल्या मुली सारखीच पहायची.आपल्या पश्चात अविला पाहायला आपल्या सारखीच कुणी तरी आहे हे पाहून तीला समाधान होत असावं.
लग्न होऊन दोन वर्षानंतर अरविंदची प्रकृती ढासळायला लागली. थोडसं काम केल्यावर त्याला थकवा येऊ लागला. आवाज खूपच क्षीण होत गेला. नंतर नंतर तो फर्निचरच्या दुकानात जायचा बंद झाला.पूर्वी बरेच वेळा मी त्याला त्या दुकानात भेटत असायचो.

एकदा मी अरविंदला पाहायला त्याच्या घरी गेलो होतो.त्याची प्रकृती पाहून त्याचं काही खरं नाही असं मला वाटायला लागलं होतं. बिचार्या सुरेखाकडे बघून मला दाटून आलं होतं.अविची आई एकाएकी खूप वयस्कर झालेली मला दिसली.
आणि शेवटी,
"
जे घडू नये तेच घडलं"
अरविंद सर्वाना सोडून गेला.अगदी लहान वयात सुरेखावर मोठी जबाबदारी आली.पदरात लहान मुलगा.त्याचं पूरं संगोपन व्हायचं होतं.काही दिवस निघून गेल्यावर सुरेखाची सासू तीच्या मागे लागली,
"
तू दुसरं लग्न कर.तुला पूरं आयुष्य काढायचं आहे."

अरविंद गेल्यानंतर मी चिटणीसांच्या घरी वरचेवर जायचो.एकदा सुरेखाबद्दलचा विचार अविच्या आईने माझ्या जवळही काढला होता. सुरेखाला दिलेला अविच्या आईचा सल्ला मलाही बरोबर वाटत होता.
मी जरी सुरेखाला सरळ सरळ काही सांगू शकलो नाही तरी मी माझ्या मनात प्रार्थना करायचो की देवा तीला तशी बुद्धि दे.

नंतर बरीच वर्ष माझा आणि चिटणीसांचा प्रत्यक्ष संपर्क राहिला नाही.पण त्यांच्या विषयी कुणा ना कुणाकडून माहिती कळायची.
सुरेखाने दुसरं लग्न केलं,अविचे आई आणि वडील जगात राहिले नाहीत.त्यांचं फर्निचरचं दुकान त्यांनी विकलं होतं वगैरे वगैरे.
आज मी माटूंग्याला आलो होतो.चिटणीसांच्या घरी जायला वेळ होता म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो.मला सुरेखाने ओळखलं.सुरेखाचा मुलगा आता चांगलाच मोठा झाला होता.तो घरी नव्हता.पण सुरेखा म्हणाली तो अगदी अरविंद सारखाच दिसतो.
मी सुरखेकाकडून सर्व काही ऐकायला उत्सुक्त झालो होतो.मला म्हणाली,
"
तरूण आणि एकट्याच आई बरोबर एक मुल एव्हडी जबाबदारी घेऊन नुसतंच मुलाचं संगोपन करायला मला धडपड करावी लागली नाही तर त्यापुढे जाऊन ज्या कुटूंबावर माझी श्रद्धा होती,ज्या मनोरथावर भविष्य पहात होते तेच कुटूंब डोळ्यासमोर कोसळत आहे हे पाहून माझी जगण्याची धडपड मी करीत राहिले.
ती घटना होऊन बरीच वर्ष संपली.आणि आमच्या धडपडीमुळे नवं जीवन निर्माण करता आलं. त्या गेलेल्या दिवसातून मी एक शिकले उत्तमोत्तम निवडी प्रेमातून केल्या जातात आणि असं करताना आड येत ती गोष्ट म्हणजे भयभिती."

कुतूहल म्हणून मी सुरेखाला विचारलं,
"
तुला कशाची भीती वाटायची?"
मला म्हणाली,
"
मला भिती वाटायची की मी पुरी पडेन का,आमच्या जवळ हवं ते पर्याप्त असेल का,आमच्या नशीबात असलेला आमचा हिस्सा मिळेल का,येऊ घातलेल्या संकटाना आणि व्याधीना मी पूरी पडेन का.जास्त करून मला भिती वाटायची की माझ्या मुलाला वाईट संगत लागेल का.मी माझ्या मुलाला मर्मभेदी दुःखापासून संरक्षण करू शकले नाही.मुळात अशा तर्हेचं संरक्षण असू शकतं हा एक भ्रम आहे म्हणा. श्रीगणेशा पासून पुन्हा कुटूंबाची सुरवात करणं हे मला त्यावेळी जिकीरीचं काम होतं."

मी म्हणालो,
"
नुकसान झाल्यावर पुनर्बांधणी करायला खूप जिकीरीचं जातं."
मला सुरेखा म्हणाली,
"
जरी मनावर जबरदस्त ताण येण्यासारखं काही नसलं,जीवन वाचवण्यासाठी केलेली नाटकी दृश्य नसली,एखादी गोष्ट तात्काल होण्याची घाई नसली तरी ते एक निरस काम होतं,त्यात संगतता होती.ज्यामुळे रोज सकाळी उठल्यावर जिकीरीचं काम करण्याची आठवण करून दिली जायची.आणि हे सर्व करीत असताना जे पूर्वी उपभोगलं ते आता हरवल्याचं स्मरण दिलं जायचं."

हे ऐकून सुरेखाची मला किंव आली.मला माझ्या मनात जे आलं ते सांगावंसं वाटलं.मी म्हणालो,
"
मला वाटतं पुनःप्रस्थापीत झाल्याने जे हरवलं ते साचपत रहाण्याचा प्रयत्न केल्या सारखं होत असतं.जे करायला हवं त्यापासून पलायन करण्याचा प्रयत्न झाल्यास ज्या गोष्टीपासून आपण भय बाळगून रहातो त्याच संकटाच्या जवळ आल्यासारखं होतं.हे माहित असून भयाचा कुणाला समुळ नाश करता येणार नाही,किंवा त्यातून मार्ग काढता येणार नाही ही गोष्ट अलायदा म्हणा.त्याला सामोरं जाणंच उचित असतं.असतील तेव्हडे भयभीतीचे प्रकार समोर आणून त्यांच्याशी दोन हात करायला हवेत.तू केलंस ते अगदी बरोबर केलंस."

सुरेखाला माझं ऐकून खूप बरं वाटल्याचं तीच्या चेहर्यावरून मला दिसलं.मला म्हणाली,
"
तुमच्याकडून असं ऐकून मला खूपच धीर आल्यासारखं वाटतं.कारण माझं काहीच चुकलं नाही ह्याला दुजोरा मिळतो.
कोसळलेल्या परिस्थितितल्या कुटूंबाचा शेवट केवळ आशा बाळगून आणि चांगले सल्ले मिळवून पुर्णत्वाला येत नाही. तरी पण त्यावेळी मला आशा होती आणि माझ्या जवळ योजना पण होती.प्रेमासारख्या गोष्टीवर मी जर भरवंसा ठेवला आणि भीतीविरहीत निर्णय मी घेत गेले तरच नव्या परिस्थितिचा मला स्वीकार करता येईल असं त्यावेळी वाटत होतं.
कारण अंशतः ते काम आमच्या जून्या जीवनशैलीच्या सुक्ष्मपरिक्षणाखाली होणार होतं.त्या जून्या दिवसातल्या मौजमजेच्या आठवणी आता फक्त आठवणीच राहाणार होत्या.प्रत्येक निर्णय परिस्थितीचा विचार करून घ्यावा लागणार होता.माझं कुटूंब आता परस्पर विरोधी निष्टेच्या जाळ्यात अडकलं होतं.जणू आताचं जीवन स्वीकारल्यास पुर्वीचं जीवन भ्रष्ट होणार होतं.जणू नवीन कुटूंब स्वीकारून जो काही आनंद चेहर्यावर दिसेल तोही छिनला गेला जाणार होता.असंच कधी कधी वाटायचं."

बराच वेळ झाला होता.माझी माटूंग्याची खेप काही दुसर्याच कामासाठी होती.पण सुरेखाला भेटून मला खूप बरं वाटलं. जुन्या आठवणीना उजाळा आला.उठता उठता मी तीला म्हणालो,
"
तुझ्या मुलाला पहायला मी पुन्हा कधीतरी येईन.तो अरविंदसारखा दिसतो हे तू सांगीतल्याने मला त्याला पहायची उत्कंटा वाढली आहे.पण जाता जाता मला तुला एक सांगावंसं वाटतं की कुटूंब आणि प्रेम एकमेकाला पूरक असतात पण तसं असलं तरी बंधन मुक्त असतात.तसंच ते भावार्थाने पाहिल्यास क्रियाशील आणि उदार असतात. माझी खात्री आहे की भयभीती नव्हे तर प्रेमच आपल्याला सहनशीलता प्राप्त करून देतं आणि मर्मभेदी दुःखातून सावरतं."

बेल वाजल्याने मला उठायलाच लागलं.पण सुरेखाने दरवाजा उघडल्यावर दर्शन झालं ते अरविंदच्या मुलाचं-किशोरचं.
अरविंदची आठवण येऊन माझ्या डोळ्यात पाणी आलं.किशोर ने मला वाकून नमस्कार केला.मी त्याला अलिंगन दिलं. पुन्हा लवकरच भेटू म्हणून सांगून रुमालाने डोळे पुसत मी खाली उतरलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive