Thursday, September 23, 2010

सध्याच्या लग्न पद्धतीतील न पटणाऱ्या बाबी

सध्याच्या लग्न पद्धतीतील पटणाऱ्या बाबी





 


बदलत्या काळाबरोबर जीवनाच्या दर्जात, राहणीमानात, बाह्य़ व्यक्तिमत्त्वात कमालीचा बदल झाला आहे. त्या तुलनेत विवाहसंस्थेत, विवाह ठरवण्याच्या बाबतीत किरकोळ बदल झालेत असंच म्हणावं लागेल. सहजीवनाच्या संदर्भात चर्चा, लेख, पुस्तकंही निघाली आहेत. विचारी, व्यवहारी जोडपी चोखंदळपणे जोडीदाराची निवड करतात. पण आजही सर्वसाधारणपणे स्वभाव, जीवनमान, शिक्षण, घरची परिस्थिती, छंद, आवडीनिवडी, मित्र परिवार, आरोग्य या सगळ्या बाबी पाहणारे कमी आहेत. तेव्हा ठरवून केलेले विवाह असोत वा प्रेमविवाह यात वरील बाबींना महत्त्व देणं म्हणजे घटस्फोटाला आमंत्रण हे तरुण पिढीनं लक्षात घेणं आवश्यक आहे. लग्न तुमचं आहे. ते आई-वडिलांना हवं म्हणून तुम्ही करत नाही हे लक्षात घेऊन जोडीदार, सहजीवन, विवाहपूर्व समुपदेशन याचा गांभीर्यानं विचार करावा. आजही मुला-मुलीच्या लग्नासाठी पालकांची धावपळ सुरू असते ती खटकते. आजही ज्या विवाहाचा थेट तुमच्या जीवनावर परिणाम होतो. त्याचा गांभीर्यानं विचार केला जातोय असं वाटत नाही. फ्रेंडशिप डे, बॉयफ्रेंड या वरवरच्या दिखाऊ 'डे' गुंतलेली तरुण पिढी यातूनच अविचारानं प्रपोज करणं, लिव्ह इन रिलेशनशीप, लग्नाआधी लैंगिक अनुभव घेणं अशा गोष्टीत रस घेताना दिसते. विवाह संस्थेला पर्याय द्यायचा असेल तर जरूर द्या. पण त्याबाबतीत तुमची मतं ठाम हवीत. 'कांदा पोहे' विवाह मार्ग नक्कीच बदलायला हवा. पत्रिका पाहून ३६ गुण जमतात का पाहणे आजच्या विज्ञान युगात खटकते.
विवाहासाठी मुहूर्त पाहणे यामुळे एकाच दिवशी राज्यभरांत २१ हजार लग्न होऊन काही कोटींची उधळपट्टी झाल्याची बातमी वाचनात आली होती. ही उधळण सोने, कपडे, जेवणावळी, मानपान तसेच लग्नसोहळ्यासाठी महागडे सभागृह, देखण्या पत्रिका यावर होती. महागाईच्या या दिवसात ही चैन नक्कीच खटकणारी आहे. क्षणिक आनंदासाठी फटाके, व्हिडिओ बँड, शूटिंग, फोटो यासारख्या बाबी टाळून भावी वैवाहिक आयुष्यातील तरतूद महत्त्वाची आहे.
चित्रपट, कौटुंबिक मालिका यातून आपल्या विवाह प्रथेत अनेक खर्चिक प्रथा घुसडल्या जात आहेत. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाला विरोध करणारे पालक मेंदीसाठी एक दिवस राखून ठेवतात. वधूला डोलीतून आणतात. वराचे जोडे लपवून पैसे उकळतात हे विशेष. विवाह विधीचा अर्थ समजून घेता पौरोहित्य करणाऱ्यांचे उखळ पांढरे केले जात आहे. सर्व विधी भडक स्वरूपात, अनेक पदार्थाची नासाडी करत, बाजारी स्वरूपाचे केले जात आहेत. ओटय़ा, अक्षतासाठी आकर्षक बटवे, फुलं, अक्षता ज्यावर खर्च केला जातो ते दुसऱ्या क्षणी पायदळी जाते. स्टेजवर मारल्या जाणाऱ्या झगमगीत स्प्रेनं प्रदूषण वाढतं. वधू-वरांचा मेकअप (खर्चिक) खराब होतो. नृत्य तेही बीभत्स स्वरूपातलं वरातीत हवं कशाला? एकाच वेळी डॉल्बी, धनगरी ढोल, मंडळाचं लेझीम पथक काही ठिकाणी असतं, ज्याच्या आवाजानं डोकं भणभणतं. काही ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम खास ठेवला जातो त्याकडे कुणाचं लक्षच नसतं.
कर्ज काढून जिथं ही उधळपट्टी केली जाते ती तर खरोखरच त्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन कोलमडून टाकते. आहेर जिथं स्वीकारले जाणार नाहीत तिथं फुलांचे बुके नेणं तसेच भेटी स्वीकारण्याचा आग्रह हेही गैर आहे. जसा आहेर घेत नाही तिथं परतही दिला जाऊ नये. २५ हजार सभागृहासाठी मोजणारे जसे आहेत तशी एक पत्रिका १००० रु. दरानं छापणारेही आहेत. १५० रु. जेवणाचं पान परत वर आईस्क्रिम.. अन्नाची नासाडी टाळता येणार नाही काय? बुफे ठेवलं तर अनेक पदार्थाची रेलचेल कशाला? इच्छा भोजन, लक्ष भोजन घालणारे अकलूजफेम मंत्री आजही त्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचं अंधानुकरण करता प्रियंका गांधीसारखा साधा विवाह व्हायला हवा. स्वत:ची वृद्धापकाळासाठी ठेवलेली प्रॉव्हिडंड फंडाची रक्कम अशा विवाहात खर्चून नंतर खचून जाणारे पालक आहेत. फ्लॅट, फर्निचर, फ्रीज, फियाट हे चार '' आता बरेच मोठे होऊन वधुपिता त्यात गटांगळ्या खाताना दिसतो. हौस, मजा अशी लेबलं लावून हा वृथा खर्च खूप जणांना खटकायला हवा. रुखवत मांडून तो बघायला लावून तसा तुम्ही पण मांडा असा संदेश देणं चुकीचं नाही का?
हिऱ्या-मोत्यांनी सजलेली मंगळसूत्र, महागडी पेडंट आपली श्रीमंती दाखवणारी मोठय़ा प्रमाणावर वापरली जात आहेत. 'हटके' करायच्या हव्यासापायी सगळं काही महागडं या विवाहविधीत घुसू पाहतंय. एरवी ड्रेस वापरणाऱ्या तरुणी महागडय़ा साडय़ांसाठी हट्ट का धरतात? मेहंदी तीही साऱ्या घरादाराला, आप्त-स्नेह्य़ांना लावून यासाठी स्पेशल डे, स्पेशल खर्च सुरू झालाय.
रुखवतात बिस्कीट गाडी, खोबऱ्याचा ससा, सॅलड डेकोरेशन करून अनेक खाद्यपदार्थ अक्षरश: शोभेचे बनवतात.
मेकअप फक्त वधूचा नव्हे तर दोघांच्याही महिला परिवाराचा, त्यावरही बेसुमार खर्च होतो आहे. मुहूर्ताच्या वेळेवरही हा मेकअप वेळ काही ठिकाणी कुरघोडी करताना दिसतो. लग्नासाठी दीड-दोन लाखही यामुळे पुरत नाहीत. वधूबरोबर शेजारणी, आप्त, स्नेही महिलांना हिरव्या बांगडय़ा भरायला लावणं हाही मला वायफळ खर्च वाटतो.
वधूला साडीबरोबर हेअर पीन, साडी पीन, चप्पल, पर्स असं सगळं मॅचिंग जितक्या साडय़ा तितक्यावर दिलं जातो. असे अनेक खर्च मारुतीच्या शेपटीसारखे वाढत चाललेत. हा प्रश्न फक्त खर्चाशीच संबंधित आहे असं नव्हे.
विवाह सोहळ्यांत वधू-वरांना उचलणे, पौरोहित्य करणाऱ्याची चेष्टा करणं, नको त्या कोटय़ा (शाब्दिक) करून वातावरण बिघडवणं, असंही अनेक वेळा असह्य़ होतं.
आता या वाढत्या तपमानात विवाह विधी घरापुरते करून मोजक्या लोकांसाठी, मोजक्या खर्चाचा स्वागत समारंभ करावा. नोंदणी विवाहही करता येईल. तरुण पिढीनं यासाठी सर्व सूत्रं वडीलधाऱ्यांना विश्वासात घेऊन आपल्या हातात घ्यावीत.

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive