Monday, April 18, 2011

पुणेरी मिसळची 'सेंच्युरी'



पुण्यातील आद्य मिसळ अड्ड्यास १०० वर्षे पुर्ण होत आहेत. रवीवार पेठेतील रेल्वे बुकिंग ऑफीस शेजरी असलेले "वैद्य उपहार गृह" हे ते ठिकाण. हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर ९९ पुर्ण करून शतकी वर्षात प्रवेश करीत आहे.

या निमीत्त सकाळ मधे एक लेख आला आहे. तो पुढील प्रमाणे

पुणेरी मिसळची 'सेंच्युरी'

पुण्याची वैशिष्ट्ये अनेक. पुणेरीपण जपणारी. पुणेरी मिसळ त्याच परंपरेतली. पुणेरी मिसळ म्हटले, की हमखास तोंडावर येते वैद्यांची मिसळ. रविवार पेठेतील खास पुणेरी मिसळीसाठी प्रसिद्ध असलेले वैद्य उपाहारगृह येत्या सोमवारी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी 99 वर्षे पूर्ण करून "सेंच्युरी' मारण्याच्या तयारीत आहे.

शंभर वर्षांपूर्वी रघुनाथ वैद्य हे कोकणातल्या उसगावमध्ये भिक्षुकी करणारे गृहस्थ पुण्यात शिवाजी रस्त्यावर तेव्हा असलेल्या जोगळेकर वाड्यात वास्तव्याला आले. उपाहारगृहांची चलती नव्हती, त्या काळात जोगळेकर एक उपाहारगृह चालवत असत. ते पाहून रघुनाथरावांनीही स्वतःचे हॉटेल थाटायचे ठरवले आणि सरदार फडक्‍यांच्या वाड्यात जागा घेऊन 1912च्या हनुमान जयंतीला उपाहारगृह सुरू केले.

काही वेगळ्या प्रकारचा पदार्थ द्यावा म्हणून रघुनाथरावांनी आपल्या उपाहारगृहात वैशिष्ट्यपूर्ण मिसळ बनवायला सुरवात केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव त्रिंबक वैद्य यांनी उपाहारगृहाची धुरा खांद्यावर घेतली ती थेट 1988 पर्यंत. सुरवातीची काही वर्षे उपाहारगृह पुणेरीपणाला छेद देत पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत सुरू असे. साठच्या दशकात काही घरगुती अडचणींमुळे त्रिंबकरावांच्या पत्नी सुशीलाबाईंना उपाहारगृहाची जबाबदारी हाती घ्यावी लागली. त्या घरचे काम सांभाळून उपाहारगृह चालवत. साहजिकच दुकानाच्या वेळा बदलल्या. आजही त्याच कायम आहेत.

संगणक क्षेत्रात काम करणारे दीपक जोशी हे त्रिंबकरावांचे नातू आज हे उपाहारगृह चालवतात. एक ऐतिहासिक ठेवा जपायचा म्हणून हा खटाटोप असल्याचे ते सांगतात. सुरवातीला दोन आण्यांना मिळणारी इथली मिसळ आज 25 रुपयांपर्यंत जाऊन पोचली आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपायचा म्हणूनच दीपक जोशींनी "विस्तार नाही, शाखा नाही, वेळा त्याच (दुपारी बंद राहणारच) आणि चवही तीच' ही परंपरा आजही सुरू ठेवली आहे.

खास वैद्य उपाहारगृह परंपरा
- मिसळीत लाल तिखट नाही, आल्याचा मुक्त हस्ताने वापर
- सर्व कामगार कोकणचे असल्याने होळी ते रामनवमी उपाहारगृह बंद राहणारच (1912 पासूनची परंपरा)
- सगळा माल रोजच्या रोज बनणार आणि खपणारही
- दुकानात आजही वडील-मुलगा, भाऊ-भाऊ असे एकाच कुटुंबातले सदस्य कामगार
- राजा रविवर्म्यांची चित्रे, देवादिकांची चित्रे यांनी सजलेल्या भिंती (1928 मधील दत्ताची तसबीर अजूनही खांबावर)
- तीच जुनी ओतीव लोखंडाची टेबले आणि जुन्या बसक्‍या खुर्च्या

आपण सगळे जण मराठी माणुस, त्याची व्यवसाय कौशल्ये, स्वभाव इत्यादी बद्दल नेहमीच बोलत तसेच लिहीत असतो. मराठी माणूस चिकाटीने १०० वर्षे हा व्यवसाय करत असेल तर नक्कीच कौतुकास्पद आहे.
--


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive