Saturday, February 25, 2012

तेरा बाप गरीब है क्‍या? Is your father poor or rich?

तेरा बाप गरीब है क्‍या? (उत्तम कांबळे)

शेवटी ग्राहक हा देव आहे, राजा आहे वगैरे वगैरे खूप काही असतं लिहिलेलं... कपडे चांगले असायला हवेत हे ठीकच आहे; पण चांगले म्हणजे काय? या प्रश्‍नात मात्र अनेकांची होते फसवणूक. मी एकदा गंमत म्हणून टी-शर्ट घातला, तर अनेक जण म्हणाले, ""तुम्ही लेखक आहात, तुम्ही असं वागायचं नाही'' बोंबला... कपडे आपण वापरायचे, आपल्या पैशांतून वापरायचे; पण ते कसे असावेत, हे मात्र कोणती तरी व्यवस्था ठरवत असते. कधी तो स्कूलबॉय असतो, कधी व्यवस्था असते. हे सारे जण मिळून कपड्याला लज्जारक्षणाकडून वर्गरक्षणाकडे जात असतात घेऊन...

पोरं कोणता प्रश्‍न कधी विचारतील आणि आपल्या बापाची फॅ फॅ करून सोडतील, याचा नसतो नेम...

ज्यांना प्रश्‍नाचं उत्तरच द्यायचं नसतं ते पालक नेहमी आपल्या पोराटोराची तोंडं बंद कशी राहतील याचाच करतात विचार... त्यासाठी स्वतःकडची असलेली-नसलेली वापरत राहतात कल्पकता...

जे पालक-शिक्षक सातत्यानं पोरांची तोंडं करतात बंद ते पोरांचंच करतात नुकसान... ज्ञानाचा उगम तोंड उघडल्यानं होतो; बंद करून नव्हे, हे तत्त्वज्ञान अनेक जण गैरसोयीचं म्हणून नाकारतात... पोरांचे प्रश्‍न असू शकतात; पण उत्तरं देण्यासाठी स्वतः तयारी करावी लागते... सातत्यानं स्वतःला ठेवावं लागतं तयार... पोरांच्या जगात कधी कोणता प्रश्‍न येईल जन्माला, याचा नसतो नेम...

माझ्या पोरानं एकदा कसलाही संकोच न बाळगता, आढेवेढे न घेता सरळसोट प्रश्‍न विचारला... "पप्पा, तू गरीब आहेस काय?'

पोराचा साधा-सरळ प्रश्‍न; पण काय द्यावं उत्तर कळंना... गरीब नाही म्हणावं, तर मी खरोखरचा श्रीमंत नव्हतो आणि गरीब आहे म्हणावं, तर तेही नव्हतं फारसं खरं... आपण तसं नसतो श्रीमंतही आणि नसतो गरीबही... मधले कुठले तरी असतो... मध्यमवर्गीय... आता तर नवमध्यम वर्ग, सिक्‍स पे वर्ग असं काहीतरी नवं लफडं येतंय... जेव्हा पोरांच्या प्रश्‍नावर असत नाही उत्तर तेव्हा आपण पोरांना विचारायला लागतो प्रतिप्रश्‍न... मीही केलं तसंच... मूळ प्रश्‍नाचं उत्तर न देता त्यालाच केला प्रतिप्रश्‍न, "जाऊ दे सारं; पण तू मला का विचारतोयस प्रश्‍न?', मी गरीब असंन नाही तर असंन श्रीमंत; तुझी अडचण काय होतेय भाऊ? तुला का हवंय उत्तर... दुसरं विचार काही तरी...

पोरगाही वस्ताद मोठा... वस्तुनिष्ठ प्रश्‍नांच्या आणि वस्तुनिष्ठ उत्तराच्या जमान्यातला. स्पीड एजमधला... तो स्वतःचाच प्रश्‍न रेटत म्हणाला, ""माझ्या प्रश्‍नाचं उत्तर हो किंवा नाही असंच दे... आर यू पूअर ऑर रिच...?''
माझी थोडी होत होती अडचण हे खरंय; पण मीही स्वतःला रेटत विचारलं, ""बेटा, तुझा प्रश्‍न माझ्यासाठी आहे गैरलागू. मी गरीब नाहीय हेही खरं आहे; पण याचा अर्थ असा नव्हे, की मी तुझ्या स्वप्नातला श्रीमंत आहे. पण तू का हे विचारतोयस मला?''
तो, "अरे मी नाही विचारत. माझ्या बेंचवरच्या मित्रानंच विचारलं होतं, की तेरा बाप गरीब है क्‍या?'
मी, "त्यानं का विचारलं असं?'
मुलगा, "तू नेहमी पायजमा आणि झब्बा घालून पेरेन्ट्‌स मीटला येतोस ना म्हणून... बाकीचे पॅरेंट पॅन्ट, शर्ट, कोट, बूट, टाय घालून येतात. विजार वापरणारे गरीब आणि पॅन्ट वापरणारे श्रीमंत, असं माझ्या मित्राला वाटतंय म्हणून तुला विचारतोय मी, तू गरीब की श्रीमंत?'
मी म्हणालो, ""ठीकय... मित्राच्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर तू द्यायलाच हवं असं नाही. आपण गरीबही नाही आणि श्रीमंतही नाही. नवमध्यमवर्गीयही नाही. आपण मधले आहोत. मध्यमवर्गीय आहोत, असं सांग त्याला. मुला काही त्रास तर होत नाहीय ना तुला माझ्या अशा असण्याचा?''
मुलगा, "मला त्रास काही नाही होत; पण प्रश्‍न मित्राचा म्हणून विचारलं.' "जाऊ दे ना यार! एका प्रश्‍नावर किती मोठा प्रोजेक्‍ट तुझा...'

पोरगा मोकळा झाला जाऊ दे म्हणत... पण मी गुंतलो... मनातल्या मनात त्याच्या मित्रापर्यंत, त्याच्या शाळेपर्यंत, त्याच्या बेंचपर्यंत पोचलो... असं आहे तर? पोरांच्या मते अंगावरचे कपडे हे श्रीमंती ठरवण्याचं एक परिमाण असतं... कपडे कसं असतात यावर गरिबी-श्रीमंती ठरतेय... जे पालक टू-व्हीलरवरून आपली लेकरं सोडायला येतात ते अर्थातच गरीब असणार... जे चालत येत असतील त्यांना "बीपीएल'वाले मानलं जात असंल... खासगी, इंटरनॅशनल, कॉन्व्हेंटसमोर उभ्या असलेल्या आलिशान गाड्या पाहून आत श्रीमंत मुलं असतील की गरीब, हे सहज ठरवता येईल... प्रश्‍न होत जातात गंभीर... अनेकदा आहे त्या वर्गात राहून पोराशीही आपल्याला व्हावं लागतं मॅच... स्टेट्‌सचा शो करत पोराला ढकलावं लागतं वरच्या आर्थिक वर्गात... अनेकांना तसं करावं लागतं नाटक... प्रत्येक वेळेला नाटक वटलच असं नाही, तर अनेकदा ते येतं अंगावर... पालकांना बनवतं कर्जबाजारी... त्यांना भाग पडतं त्यांची आवडती वेशभूषा बदलायला... पोराला आपला बाप गरीब वाटू नये म्हणून चढवा कोट-पॅन्ट... लटकवा टाय... वापरा चकचकीत बूट... कसं तरी वाटायला लागलं... त्याच्याऐवजी गरिबी आणि श्रीमंती मोजण्याची पारंपरिक परिमाणं बदलण्याचा प्रयत्न केला तर...? अंगावर चकाकणाऱ्या कपड्यावरूनच मोजायची का श्रीमंती?... तसं कपड्याला अर्थ किती आणि कपड्याचं आयुष्य किती? अलीकडं तर रंगांची गॅरंटीही कोणी नाही देत. बहुतेक दुकानांत एक फलक असतो... कपड्यांऐवजी तोच घेत असतो लक्ष वेधून. त्यावर म्हटलेलं असतं, ""कंपनीवाले हमे कौन सी भी नही देते गॅरंटी... इसलिये हम ग्राहकों को नही देते गॅरंटी... माफ करा...'' शेवटी ग्राहक हा देव आहे, राजा आहे वगैरे वगैरे खूप काही असतं लिहिलेलं... कपडे चांगले असायला हवेत हे ठीकच आहे; पण चांगले म्हणजे काय? या प्रश्‍नात मात्र अनेकांची होते फसवणूक. मी एकदा गंमत म्हणून टी-शर्ट घातला, तर अनेक जण म्हणाले, ""तुम्ही लेखक आहात, तुम्ही असं वागायचं नाही?'' बोंबला... कपडे आपण वापरायचे, आपल्या पैशांतून वापरायचे; पण ते कसे असावेत, हे मात्र कोणती तरी व्यवस्था ठरवत असते. कधी तो स्कूलबॉय असतो, कधी व्यवस्था असते. हे सारे जण मिळून कपड्याला लज्जारक्षणाकडून वर्गरक्षणाकडे जात असतात घेऊन... मी कुठं तरी वाचलंय, ऐकलंय. हर एक कपडे के पीछे एक नंगा शरीर होता है... हे खरंय; पण समजून घ्यायचं कधी?... कपड्याचा रोल काय? श्रीमंत दिसण्याचा, तरुण दिसण्याचा, सुंदर दिसण्याचा, शायनिंग मारण्याचा, वर्ग गमावण्याचा, वर्ग कमावण्याचा, की आणखी काय असतो भाऊ? गांधीबाबानं सांगितलं, की कपडे इतके शुभ्र घाला, इतके शुभ्र घाला, की त्यावरचा सूक्ष्मातला सूक्ष्म डागही आपल्या डोळ्यानं दिसंल. तो लगेचच काढून डागमुक्त होता येईल. आपलं याच्या उलट- आपण कपड्याच्या दुकानात काय म्हणतो, "भाऊ, शर्टासाठी मळखाऊ कापड दे... महिनाभर वापरलं तरी स्वच्छच दिसंल असं दे...'' काय बोलणार?... पायाखाली चिंध्या होणारी किंवा चिंध्यासह वापरली जाणारी पॅन्ट श्रीमंतीचं, आधुनिकतेचं प्रतीक ठरवतो... नीटनेटके कपडे मात्र दारिद्य्राचे दूत ठरतात. वस्तू माणसाला मोठं बनवते, की माणूस वस्तूला मोठं बनवतो... अनेक प्रश्‍न तयार होतात. तूर्त तरी आपण आपला आत्मसन्मान टिकवण्यासाठी वस्तू आपल्यावर मात करेल आणि ती आपल्याला छोटा-मोठा असं शेरा देईल, असं वागू नये... अर्थात, कपड्याचं महत्त्व ठेवून या गोष्टी करायला हव्यात. कपडा किती ताणायचा हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न आहे. मी पोराच्या, नातवाच्याही जगात जगेन; पण आपलं-आपलं मोजमाप घेऊन जगेन, एवढं ठरवायला काय हरकत आहे? कोण कसे आणि कसले कपडे घालतो, हेही फार महत्त्वाचं नाहीय; पण ते करताना काही केमिकल लोचा तर होत नाही ना आपला?

Is your father poor or rich?

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive