आरुणी नावाच्या शिष्याची कथा
धौम्य नावाचे एक ऋषी होते. त्यांचे तिघे शिष्य होते. त्यात आरुणी नावाचा एक शिष्य होता. पूर्वी अशी रीत होती की, गुरू हे शिष्या करवी काम करून घेत असत. गुरू त्यांचे मन पाहात असत. सत्त्वपरीक्षा घेत असत आणि त्या परीक्षेत ते पूर्णपणे उतरले की, गुरू त्यांची मनोकामना पुरवीत असत.
एके दिवशी धौम्य ऋषींनी सत्त्वपरीक्षा पाहाण्यासाठी ते आरुणीला म्हणाले, बाळ तू आज रानात जा व तेथील आमच्या साळीच्या शेताला भरपूर पाणी मिळेल असे कर. तेव्हा गुरूची आज्ञा मिळताच आरुणी धावतच रानात गेला. शेताजवळील कालवा खळखळ वाहत होता, पण शेतात पाणी शिरत नव्हते.
आता काय करावे? जर शेताला पाणी दिले नाही तर गुरू रागावतील म्हणून त्याने मोठमोठे दगड आणून पाण्याला बांध घातला. पण पाणी शेतात आले नाही. दगड वाहून जाऊ लागले. शेतामध्ये पाणी जाण्याकरिता त्याने नाना तरहेचे प्रयत्न केले, पण शेतात पाणी चढेना, शेवटी त्याने मनात विचार केला, दगड तर वाहून गेले तेव्हा आपण स्वत:च या पाण्यात आडवे पडावे. तसा त्याने निर्धार केला. एका हाती घट्ट दगड पकडून दुसरीकडे पाय ठेवला व आपल्या गुरूचे ध्यान करीत पाण्यामध्ये आडवा झाला. त्यामुळे हळूहळू कालव्याचे पाणी शेतात शिरू लागले आणि थोड्याच वेळात शेतात भरपूर पाणी झाले.
सूर्यास्त झाला तरी आरुणी परत आला नाही म्हणून धौम्य ऋषी मनात विचार करू लागले आणि स्वत: शेताकडे गेले. शेतात भरपूर पाणी झालेले पाहून धौम्य ऋषींना फार आनंद झाला. परंतु, आरुणी त्याना दिसेना. त्यांना वाटले की, याला वाघाने तर खाल्ले नाही ना? त्यांनी अरुणीला मोठ्याने हाका मारल्या, ‘आरुणी तू कोठे आहेत.' आणि त्याला ते प्रेमभावाने बोलावू लागले.
धौम्य ऋषींचे शब्द कानावर पडताच आरुणी तेथून उठला, पुढे येऊन त्याने गुरूंना वंदन केले. धौम्य ऋषींनी त्याला जवळ घेतले आणि त्याच वेळी त्याला वर दिला, ‘तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत,' असे ऋषी म्हणताच त्याच क्षणी तो विद्यावंत व ज्ञानी झाला. आरुणीने भक्तीभावाने आपले मस्तक गुरूंच्या चरणावर ठेवले.
No comments:
Post a Comment