Tuesday, August 17, 2010

येरवडा तुरुंगातून कैद्याचे पलायन


येरवडा तुरुंगातून कैद्याचे पलायन


* खुनासाठी शिक्षा भोगणारा पवार गज कापून फरार

* चार तुरुंग कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश

 

 

 

. टा. प्रतिनिधी पुणे

 

खुनाच्या आरोपावरून येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला कैदी सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढत जेलमधून पळाल्याची खळबळजनक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली असून या प्रकरणी जेलमधील चार कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

 

बाळासाहेब बजाबा पवार (वय ४०, रा. मंगळापूर, ता. संगमनेर) असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे. तो जेलमध्ये लोहारकाम करत होता. त्याने लोखंडी सळ्या आणि गजाचा वापर करून शिडी तयार करून ठेवली होती. तसेच हॅक्सॉ ब्लेड चोरून बरॅकमध्ये नेऊन ठेवले होते. जेलमध्ये तो वर्षभर मोठ्या आवाजात प्रार्थना म्हणत असायचा. प्रार्थना करत असताना त्याने गज कापून ठेवले होते.

 

रात्री बारा ते सकाळी चार वाजण्याच्या सुमारास बराकीचे गज काढून पवार बाहेर आला. बराकीजवळ असलेल्या दवाखाना यार्डला शिडी लावून तो चढला. त्यानंतर शिडी काढून घेतली आणि पुन्हा जेलच्या मोठ्या भिंतीला लावली. त्यावरून अँगल टाकून तो जेलमधून पसार झाला असावा, असे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. सकाळी सहा वाजता कैद्यांची हजेरी घेत असताना तो पसार झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी तुरुंग अधिकारी दत्तात्रय खांडेकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 

पवार याच्याविरुद्ध संगमनेर येथील राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. अहमदनगर कोर्टाने त्याला खूनप्रकरणी दोषी ठरविले होते. जुलै २००९ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑगस्ट २००९ पासून तो येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. जेलमधील बराक क्रमांक सात मध्ये त्याला ठेवण्यात आले होते.

 

पलायनाची चौथी घटना

 

यापूवीर् १९९६ मध्ये जेलच्या आवारातून कच्चा कैदी पळून गेल्याची घटना घडली होती. त्यापूवीर् १९८५ आणि १९७३ मध्येही जेलमधून कैदी पळून गेल्याची घटना घडल्या होत्या. कारागृह अप्पर पोलीस महानिरीक्षक राजेंद सोनावणे यांनी ही माहिती दिली.

 

बागवेंची भेट; चौकशीचे आदेश

 

कैद्याच्या पलायनानंतर गृहमंत्री रमेश बागवे यांनी सोमवारी सायंकाळी जेलला भेट देऊन सुमारे दोन तास पाहणी केली. रात्रपाळीवर असलेले पोलीस कर्मचारी कमलाकर महाले, उद्धव फारसे, ज्ञानेश्वर खाडे, महादेव भोसले या चौघांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिलेे. फरार झालेल्या कैद्याला एखाद्या पोलिसानेच मदत केली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. जेलमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive