सगळ्याच ब्राह्मणांना आणि सगळ्याच मराठ्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करणे समाजस्वास्थ्याचे लक्षण नाही.
खरे म्हणजे झोटिंग आणि मुंज्यांचा नाद सोडून राजकारणाबाहेर असलेल्या संवेदनशील मराठ्या-ब्राह्मणांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. त्यातून मार्ग निघू शकतो. भारत पाकिस्तानशीही बोलतो तर मराठ्यांना ब्राह्मणांशी बोलायला काय हरकत आहे? सगळ्याच ब्राह्मणांना आणि सगळ्याच मराठ्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करणे समाजस्वास्थ्याचे लक्षण नाही. ...... महाराष्ट्र सध्या आजारी पडलाय. आजार बळावत चाललाय. अशाने उद्या कुणी कितीही जालिम मात्रा दिली तरी ती लागू पडायची नाही. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारल्याने तो समाधानी होता. फाटका होता, पण आनंदी होता. पण आज प्रत्येकजण दु:खीकष्टी आहे. मग, बहुजन असो की अभिजन. सगळेच फणफणलेत. तापात वाट्टेल ते चाबडताहेत. अंगात आल्यासारखे घुमताहेत. आणि मांत्रिक त्याला धुरी देऊन भूत उतरविण्याऐवजी आणखी आणखी चढवताहेत. त्यामुळं आख्खा महाराष्ट्र टेंभे-पलिते घेऊन वेताळाच्या जत्रेत बेभान झालाय, अशी स्थिती आहे. परवा शिवप्रेमी जनजागरण समितीच्या नावे एक एसएमएस आख्ख्या महाराष्ट्रात फिरला. मेसेज असा की, 'जो जो बाह्माणावरी विसंबला, त्याचा बट्ट्याबोळ झाला'. हे तर काहीच नाही. पुढे 'साप म्हणू नये धाकला... आणि बामन म्हणू नये आपला'. वा, काय थोर शिकवण आहे! छावे आणि ब्रिगेड सध्या फॉर्मात आहेत. गावोगाव जाऊन मेळावे घेतात. लोकांना सवाल करतात आणि उत्तरेही तेच देतात. उदा. दादोजी कोंडदेव कोण होता? दादोजी कोंडदेव हा कुलकणीर् होता. जेम्स लेन कोण होता? तो अमेरिकन नव्हता. तो भारतातच जन्मला होता. तो कुठे राहतो? पर्वतीच्या पायथ्याला. मग जेम्स लेन कोण? पर्वतीच्या पायथ्याचा 'बाब्या'. तो आणि भांडारकर संस्थेतल्या त्यांच्या चमच्यांनीच आमच्या जिजामातेचे चारित्र्यहनन केले. त्यामुळे दादोजी कोंडदेवाचा पुतळा लाल महालातून हलवा, अशी त्यांची मागणी आहे. परवा पुण्यात त्यासाठी आंदोलन झाले. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविला तरी आंदोलन संपण्याची शक्यता नाही. मग मूळचा लाल महाल कुठे गेला, यासाठी आंदोलन झाले तर आश्चर्य वाटू नये. लेनप्रकरणापासून मराठा-ब्राह्माण असा वाद चालू झाला आहे. समस्त ब्राह्माणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून गरीब मराठा तरुणांची माथी भडकवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. वातावरण तापत चालले आहे. या झोटिंगशाहीमुळे साहजिकच ब्राह्माण समाजातही अस्वस्थता आहे. एकेकाळी ब्राह्माण समाजाने वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून शूदातिशूद आणि स्त्रियांचे शोषण केले. लोकांना तुच्छ लेखले. यात वाद नाही. पण प्रदीर्घ सामाजिक लढ्यातून त्यांची मक्तेदारी संपली. त्यातून ब्राह्माणांमध्येही बदल झाले. अनेकांनी बुरसटलेली विचारसरणी सोडून दिली. सामाजिक कार्याला वाहून घेतले. पण ज्यांच्यात अजिबातच बदल झाले नाहीत ते अखेर ब्राह्मणी कर्मकांडांचे बळी ठरले. काहींना अजूनही त्या वर्णश्रेष्ठत्वाचे अप्रूप आहे. पण म्हणून सगळ्या ब्राह्माणांना एकाच तागडीत तोलणे योग्य नाही. त्यातले कावेबाज घटक अजूनही कपटकारस्थानात मश्गूल आहेत. ते पिंपळावर बसलेल्या मुंज्यांसारखी कुणीतरी वाट चुकलेला जेम्स लेन कधी येतोय याकडे डोळे लावून असतात. एकदा तो आला रे आला की मुंजे टपाटप उड्या टाकून त्याला घेरतात. काखेत मारलेल्या वंशावळ्या, सनावळ्यांची भेंडोळी पुढ्यात सोडून त्याला शेकडो वषेर् मागे नेतात. बखरींचे अर्थ सांगतात... अरे, ते पाहा घोड्यांच्या टापा ऐकायला येताहेत. साक्षात महाराज तर येत नाहीत? नवखा इकडेतिकडे वेड्यासारखा पाहातो. अरे ऐक, तो तलवारींचा खणखणाट. अरे बघ तो अफझलखान कसा गुरासारखा ओरडतोय. महाराजांनी त्याचे डेड्याळच काढलेले दिसते. तो मध्येच 'अहो पण त्या कृष्णाजी भास्करने पहिला घाव महाराजांवर घातला हे कसे', असे विचारतो. तेव्हा एका सुरात सगळे मुंजे म्हणतात, 'अरे तू का वेडा आहेस? कुठला कोण कृष्णाजी ? त्यांस कोण कुत्रा खातो. त्यांस अनुल्लेखानेच मारलेले बरे. प्रश्न हिंदवी स्वराज्याचा आहे. इतिहासातली असली मढी उकरायची नसतात.' मग तो गांगरून म्हणतो, 'मग मी आता इथल्या ब्राह्माणांनी राज्याभिषेकास का नकार दिला आणि गागाभट्ट का आला, असा प्रश्न विचारणार नाही. वेदोक्त की पुराणोक्त या भानगडीतही डोकावणार नाही'. बरोब्बर, आता तू खरा संशोधक झालास. शिवछत्रपती मोगल साम्राज्याचेच नव्हे तर तमाम लांड्यांचे कर्दनकाळ होते. गोब्राह्माण प्रतिपालक होते. राष्ट्राभिमानाचे सळसळते तेज होते. म्हणूनच गुलामगिरीचे प्रतीक असलेली बाबरी उद्ध्वस्त करताना तीनशे वर्षांनंतर प्रथमच ते तेज पुन्हा एकदा हिंदुस्थानात उफाळून आले होते. एव्हाना ठार झालेला तो वेडा वंशावळ पाहायला लागतो. शिवाजी. त्याची आई जिजाबाई. वडील शहाजीराजे. तेव्हा एक मुंजा 'वंशावळीवरून जाऊ नको', असे त्याच्या कानात सांगतो. म्हणजे? अरे आई कळेल, बाप कसा सांगता येईल? मौखिक इतिहासानुसार अनेक प्रवाद आहेत. काय प्रवाद आहेत? वेड्याला आता नवा इतिहास बेक करायचा असतो तो सरसावून लॅपटॉप काढतो. बायालॉजिकल फादर... सगळे मुंजे एकदम सावध होतात. तुझे पुस्तक आख्ख्या विश्वात गाजेल. त्याच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या निघतील. खरा इतिहास लिहिण्याचे धाडस तुम्हा गोऱ्यातच असते. सत्य हे कटू असते. तुला लागेल ती मदत आम्ही करतो. पण, बाबा आमचा दाखला देऊ नको. आम्हाला इथे राहायचे आहे. ते झोटिंग आमच्या घरादाराची राखरांगोळी करतील. 'गांधीवधाच्या'... म्हणजे हत्येच्यावेळीच आमचे हात पोळले आहेत. आमच्यावर कृपा कर. या कावेबाजांनीच शिवाजी महाराजांना कट्टर हिंदुत्ववादी आणि मुस्लिमद्वेष्टा ठरवले. शिवाय, कुजबूज मोहिमेतून त्यांच्या मातापित्यांची प्रच्छन्न निदानालस्ती केली. ही कुजबूज ऐकून यशवंतराव चव्हाणांनी सेतू माधवराव पगडींच्या माध्यमातून इतिहासकारांना बोलावून घेतले होते. हे चुकीचे चालले असून ते ताबडतोब बंद करा. नाहीतर याचे भयंकर परिणाम होतील, अशी समज दिली होती, असे म्हणतात. पण ती कुजबूज तेवढ्यापुरतीच थांबली. हे विसरून मराठा, माळी, धनगर या शूदांनी आणि मातंग, चर्मकार अशा अतिशूदांनी शिवाजीची हिंदुत्ववादी प्रतिमा स्वीकारून मुसलमानांच्या विरोधी दंगली केल्या. संघशाखेवर दक्षआराम केले. कपाळावर भगव्या पट्ट्या लावून गर्व से कहो हम हिंदू है, अशा घोषणा दिल्या. इतकेच नव्हे तर जय भवानी जय शिवाजी, असे म्हणत वाघ मारल्याच्या अविर्भावात दगडमातीची बाबरी मशीद पाडली. आज जे कोणी मराठे जिजामातेच्या चारित्र्यहननाने संतप्त झाले आहेत त्यांनाही शिवाजी हा हिंदुत्ववादीच होता, असे वाटत नव्हते काय? वर्णवर्चस्ववादी ब्राह्माणांप्रमाणेच दलितांच्या राखीव जागांच्या विरोधात रान पेटवणारे कोण होते? शूदांच्या बिरादरीतून बाहेर पडून क्षात्रब्राह्मा युती कोणी केली? अर्थात ती युतीही कोण्या माधुकरीवर शिकणा-या ब्राह्मणांशी नव्हे तर चारित्र्यहनन करणा-या कावेबाजांशीच नव्हती काय? ओबीसींच्या राखीव जागांना विरोध कुणी आणि कोणत्या भूमिकेतून केला? या झोटिंगशाहीमुळे मराठ्यांनी आज बहुतेक मित्र गमावले आहेत. शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे शूदांची क्रांती होती. त्यात मुसलमान होते. महाराजांच्या विश्वासातले होते. शिवाय त्यांच्याबरोबर शूद होते. अगदी आज आपण ज्यांना अतिशूद म्हणतो तेही शिवाजीच्या खांद्याला खांदा लावून मोगल साम्राज्याच्या विरोधात लढत होते. कुणाला आवडो नावडो; पण ब्राह्माणही होते. म्हणजे त्यावेळी अतिशूद हा चार्तुवर्णाच्या बाहेरचा आणखी एक वर्ण अस्तित्वात नसावा आणि कदाचित त्यावेळी अस्पृश्यताही नसावी. असलीच तर पेशवाईइतकी जाचक नसावी. म्हणूनच शिवाजी महाराज महाराष्ट्रात मोगल साम्राज्याला आव्हान देऊ शकले. प्रश्न असा आहे की ज्या कलुष्यांनी जिजामातेच्या चारित्र्यावर शंका घेतल्या त्यांनी दादोजी कोंडदेव या स्वामिनिष्ठ कारभा-यांचेही चारित्र्यहनन केले. दादोजी शिवाजीचे गुरु नव्हते, हे ठीक आहे. पण दादोजी कोंडदेव कुलकणीर् नावाचा कारभारी शिवछत्रपतींच्या सेवेतच नव्हता? का दादोजी हे अगदीच काल्पनिक पात्र आहे? दादोजी कोंडदेव होते आणि निष्ठवान होते. अन्यथा त्यांना कारभारी म्हणून ठेवलेच नसते. आता जिजामातेला बदनाम करण्यासाठी ज्यांनी दादोजीचा वापर केला त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून त्यांचा पुतळा दूर करा, हा कोणता युक्तिवाद झाला. म्हणजे एकप्रकारे तुम्हीही त्या कुजबुजीला पुष्टी देण्याचेच काम करत नाही का? फारतर तिथे शहाजीराजांचा पुतळा उभा करा, अशी मागणी होऊ शकते. पण स्वामिनिष्ठ दादोजीं पुतळा का काढायचा? खरे म्हणजे झोटिंग आणि मुंज्यांचा नाद सोडून राजकारणाबाहेर असलेल्या संवेदनशील मराठ्या-ब्राह्माणांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. त्यातून मार्ग निघू शकतो. भारत पाकिस्तानशीही बोलतो तर मराठ्यांना ब्राह्माणांशी बोलायला काय हरकत आहे? सगळ्याच ब्राह्माणांना आणि सगळ्याच मराठ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे समाजस्वास्थ्याचे लक्षण नाही. पण त्यातून महाराष्ट्रात मराठा-मराठेतर वाद निर्माण होईल. झोटिंग आणि मुंजे यादवीच घडवतील. म्हणूनच सबुरीने घ्यावे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6509244.cms
No comments:
Post a Comment