Friday, November 19, 2010

इतिहासात मिळालेली तुच्छतेची वागणूक



Pratapgarh%20Fort.JPG
जगाच्या इतिहासात महाराष्ट्राचे स्थान आणि महाराष्ट्राच्या लोकांनी केलेली कामगिरी या विषयाची चर्चा करण्याइतपत या देशाला आणि तेथील रहिवाशांना मुळात महत्त्व द्यायचेच का हा खरा प्रश्‍न आहे. हाच प्रश्‍न भारताच्या संदर्भातही उपस्थित होऊ शकतो. आधुनिक काळातील इतिहासलेखन मुख्यतः यूरोपकेंद्रित झाल्यामुळे आशियातील देशांना अडगळीच्या कोपऱ्यातील स्थान मिळणे साहजिकच होते. विशेषतः इतिहासाचा जेव्हा तत्त्वज्ञानाच्या अंगाने विचार होतो तेव्हा तर ही गोष्ट प्रकर्षाने पुढे येऊ लागते. मानवी इतिहास हा एकप्रकारे विश्‍वचैतन्याचे आत्मप्रगटीकरण आहे असा सिद्धांत मांडणाऱ्या हेगेल या जर्मन तत्त्ववेत्त्याने हे प्रगटीकरण मुख्यत्वे मानवी संस्कृतीमधून व विशेषतः राज्य संस्थेतून होत असल्याचा दावा केला. त्याच्या लिखाणात भारतालाही योग्य ते स्थान नाही तर मग महाराष्ट्राची गोष्टच सोडा. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना हेगेलच्या सिद्धांतामधील अपुरेपणा जाणवला. मराठ्यांच्या इतिहासाची न्या. महादेव गोविंद रानडे यांनी केलेली मांडणी हेगेलच्या वाचनात आली असती तर त्याला आपल्या सिद्धांताचा पुनर्विचार करावा लागला असता असे ते म्हणाले.

अर्थात यात हेगेलला दोष देण्यात अर्थ नाही. मराठ्यांच्या इतिहासाविषयी जी सामग्री त्याला उपलब्ध होती ती अगदीच तुटपुंजी आणि पूर्वग्रहग्रस्त होती. भारतात मोगलांचे साम्राज्य नुसतेच दृढमूल झालेले नव्हते तर जगभर पुरेसे प्रतिष्ठाही पावले होते. त्याचा ताबा मिळवणाऱ्या इंग्लंडचे खरे तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कौतुक होणेही क्रमप्राप्तच होते. या कौतुकात ब्रिटिशांनी हिंदुस्थानचा ताबा प्रत्यक्षात मोगलांकडून न घेता मराठ्यांकडून घेतला होता, खरे तर मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या मोगल बादशहाला आपल्या ताब्यात घेऊन त्यांनी एक तांत्रिक औपचारिताच पार पाडली होती हे कोणी ध्यानात घ्यायलाच तयार नव्हते. जर्मनीमधील हॅले विद्यापीठात इतिहासाचे अध्यापन करणाऱ्या एम. सी. स्प्रेंगेल या प्राध्यापकाने इ. स. 1791 मध्ये इंग्रज व मराठ्यांमधील सालबाईच्या तहापर्यंतचा (1782) मराठ्यांचा इतिहास सांगणारा 288 पृष्ठांचा शीलहळलहींश वशी चरीरीींशप ग्रंथ प्रसिद्ध केला होता. हेगेलने तो पाहिला नसावाच आणि पाहिला असता तरी दरम्यानच्या काळात मराठ्यांच्या राज्याचाच ग्रंथ आटोपल्यामुळे त्याला मराठ्यांचे महत्त्व समजून घेण्याचे काही कारणही उरले नव्हते.

ते काहीही असो. एकूणच इंग्रज लोकांची मानसिक ठेवण घटनात्मक असल्यामुळे त्यांनी वास्तविकतेपेक्षा वैधानिकतेवर भर दिला. (इंग्रजांनी आपण हिंदुस्थान मोगलांकडून घेण्याचा प्रचार केला. पण मोगल बादशहाला अशा प्रकारे मूळ क्‍लृप्ती मराठ्यांचीच व तिचा शाहू छत्रपती - बाळाजी विश्‍वनाथांपासून महादजी शिंद्यांपर्यंत विकास होत गेला हे ते कशाला सांगणार?) शिवाय दुसरे असे, इतिहासप्रसिद्ध मोगल साम्राज्य जिंकल्यामुळे त्यांना जी प्रतिष्ठा मिळणार होती, त्यांचा दरारा व दबदबा जितका वाढणार होता तसे काही त्यांनी मराठ्यांना पराभूत करून त्यांच्याकडून हिंदुस्थान घेतला असे म्हटल्याने झाले नसते. त्यामुळे मराठ्यांचा "फॅक्‍टर' हा इतिहासातील एक आगंतुक आणि उपटसुंभ घटक होता अशी भूमिका घेणे त्यांना परवडणार होते. इतिहासातील हा अपघाती अडथळा दूर करून आपण इतिहासाचा भरकटलेला प्रवाह जणू सुरळीत केला असेच म्हणणे त्यांना उपयुक्त होते.
या संदर्भात मराठ्यांचा नाणावलेला इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रॅंट डफ याच्याच पुस्तकाचा दाखला घेणे उचित ठरेल. डफचे मराठ्यांच्या इतिहासावरील पुस्तक छापायला काकू करणारा मरे नावाचा प्रकाशक पुस्तकाचे नाव बदलले, तर ते प्रकाशित करायला तयार होत होता. नावात त्याला "मराठा' शब्द नको होता. "ऊुेपषरश्रश्र ेष ींहश चेसरश्री रपव ींहश ठळीश ेष ींहश एपसश्रळीह' किंवा तत्सम शीर्षक त्याला चालणार होते. मराठे कोण? आणि त्यांना ओळखतो तरी कोण? अर्थात मुद्दा केवळ व्यावहारिक नसून तात्त्विकही होता. नुसत्या सत्तेचा नसून सत्तेच्या नैतिक अधिष्ठानाचाही होता.

गोंधळलेला ग्रॅंट डफ
ग्रॅंड डफ तडजोडीस तयार झाला नाही व सुदैवाने जेम्स मॅकिनटॉशच्या मध्यस्थीने त्याने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास लॉंगमन कंपनीने प्रकाशित केला. या व्यवहारात डफला जे काही मानसिक समाधान लाभले असेल ते असो; पण त्यात त्याने गुंतवलेल्या 2000 पौंडांपैकी त्याला (रॉयल्टीच्या रूपाने) 300 पौंडच परत मिळाले. 1700 पौंड बुडाले असे डॉ. अ. रा. कुलकर्णींनी डफवरील आजच्या ग्रंथात नमूद केले आहे.
मराठ्यांच्या राजकारणाप्रमाणेच त्यांचा इतिहासावरील हा ग्रंथ तसा आतबट्ट्याचाच व्यवहार ठरला तरी तो त्यानंतरच्या सर्व ब्रिटिश इतिहासकारांना आणि महाराष्ट्रातील प्रारंभीच्या लेखकांना आधारभूत प्रमाणग्रंथ ठरला. नीलकंठ जनार्दन कीर्तने यांनी आपल्या डेक्कन कॉलेजमधील दिवसांत 1867 मध्ये डफच्या इतिहासातील चुका दाखवून दिल्यानंतर विशेषतः चिपळूणकर संप्रदायातील इतिहासकारांनी डफची कठोर चिकित्सा केली. अलीकडे
डॉ. कुलकर्णी यांनी मात्र त्याला न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केला.

कीर्तन्यांपासून राजवाड्यांपर्यंतच्या अभ्यासकांनी ग्रॅंट डफच्या इतिहासातील दाखवलेल्या त्रुटी व दोष जमेस धरूनही युरोपला व विशेषतः इंग्लंडला मराठ्यांचा जो काही इतिहास कळला तो त्याच्यामुळेच असे म्हणावे लागते. मराठ्यांचा इतिहास लिहिण्याची डफची पात्रता नव्हती हे राजवाड्यांचे मत एका अर्थाने खरेच आहे. एक तर त्याची पूर्वतयारी नव्हती आणि दुसरे असे, की हे काम त्याने स्वयंस्फूर्तीने स्वतःहोऊन केले नाही. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या "बॉस'च्या सूचनेवरून तो ते करण्यासाठी प्रवृत्त झाला. त्यामुळे अनेकदा त्याच्या वाट्याला "बोअर' होण्याचे क्षणही आले.

डफच्या इतिहासातील तपशिलांच्या चुका कीर्तनेप्रभृतींनी उजेडात आणल्या होत्याच परंतु मुख्य मुद्दा डफच्या दृष्टिकोनाचाही आहे. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या पहिल्या खंडाला लिहिलेल्या प्रस्तावनेत राजवाड्यांनी दाखवून दिल्याप्रमाणे मराठ्यांच्या हालचालींना, कृतींना व गतीला काही एक अधिष्ठान आहे हेच त्याच्या लक्षात आले नव्हते. अशा सूत्राशिवाय पुष्कळदा एखाद्याच्या कृती निरर्थक, अनावश्‍यक, स्वैर व प्रसंगी अनैतिकही वाटू शकतात.
स्वतः ग्रॅंट डफ सातारचे राजे प्रतापसिंह भोसले यांच्या दरबारात ब्रिटिशांचा पोलिटिकल एजंट व रेसिडन्ट होता. मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचे काम खरे तर स्वतः एल्फिन्स्टनला करायचे होते पण त्याला ते जमेनासे झाल्याने त्याने ते डफवर सोपवले. डफने सातारच्या दप्तरात उपलब्ध होणारी अनेक सनदापत्रे पाहिली, बखरी चाळल्या. विशेष म्हणजे दरबारातील पारंपरिक मानकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली.

शिवाजी महाराजांच्या व एकूणच मराठ्यांच्या कृतींचे घटनात्मक आणि नैतिक अधिष्ठान कोणते हा खरा मुख्य प्रश्‍न होता. डफ त्याबाबत चांगलाच गोंधळलेला दिसतो. प्रतापसिंह महाराजांच्या रोजनिशीत डफबरोबरचे काही संवाद आलेले आहेत. त्यावरून त्याच्या दृष्टिकोनावर प्रकाश पडतो. 17 जुलै 1819 या दिवशीची चर्चा महाराजांनी नोंदवली आहे. ""नंतर तृतीय प्रहरी कचेरी तावदानात झाली. मंडळी सर्व आली. नंतर आबा पारसनीस ग्रांट याजकडून आले. त्यांनी वर्तमान सांगितले, की जुनी बुके नाना प्रकारची काढून वाचून दाखविली आणि बोलिले जे आम्हापासी लिहिले आहे यास व चिटणीस माजी बखर लिहून दिल्ही यास मिळत नाही. महाराजाची (म्हणजे शिवाजी महाराज, बढाई करून लिहिले आहे. लटके आहे व सर्व राज्य दिलीपासून मोजावयाचे आहे व सिवाजी महाराजास जरीपटका निशाण कधी पातशहांनी दिले वगैरे पुसिले. पहिले सिवाजी बंडच होते. पातशहाचे देणे नव्हे.''

25 जुलैचा संवाद. ""चंद्रराव मोरे मारले. त्यास का मारले? बंड होते? रडतोंडीच्या घाटात मदत केली सिवाजीस, आसे आमचे बुकात आहे. तुम्ही बखरीत का लिहिले नाही हे समजले. काये कसे म्हणून माहाराजानी पुसले. त्याजवर ग्रांटानी उत्तर केले की, सिवाजी माहाराजास मदत केली. उपयोगी पडले. त्यास मारिले राज्य लोभे, तेव्हा हरामखोरी माहाराजाकडे येईल याकरिता लिहिले नाही. त्यावर बळवंतराव चिटणीस याणी उतर केले की मदत केलीच नाही. केली असती तर लिहितो. परंतु केलीच नाही म्हणोन लिहिले नाही. वडिलांनी लिहिले ते खरे म्हणोन आम्ही मानतो.''

थोडक्‍यात सांगायचे म्हणजे शिवरायांच्या व एकूणच मराठ्यांच्या हालचालींचा अन्वयार्थ लावण्यासाठी आवश्‍यक असलेली प्रतिभा व सहानुभूती डफच्या ठायी नव्हती. त्याच्या इतिहासामुळे मराठ्यांचे नाव शाबूत राहिले हे खरे असले तरी मराठ्यांबद्दल ते लुटारू वगैरे असल्याचे अपसमजही पसरले. अफजलखानाला दगा केल्याची दंतकथा सर्वतोमुखी झाली. प्रा. ना. के. बेहरे यांनी "मराठे, रजपूत व शीख' नामक लेखातून या परिस्थितीचे विदारक दर्शन घडवले आहे. ते लिहितात, ""इंग्रजांनी मराठ्यांपासून हिंदुस्थानचे राज्य जिंकून घेतल्यामुळे मराठ्यांना तुच्छ लेखण्याची त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती बनली. मराठे म्हणजे चोर, भुरटे, लुटारू ! इतिहासात त्यांना मग कसे स्थान मिळणार? निःपक्षपाती म्हणविणाऱ्या इंग्रज इतिहासकारांनाही ही धुंदी चढली. टॉडने रजपुतांच्या वीर्यकथा गौरवाने रंगवून सांगितल्या. सेवेलने वैभवशाली हिंदू राज्याचा इतिहास भडक कुंचलीने उघड उघड अतिशोक्तीपूर्ण वाटण्याइतपत रेखाटन केला. मोगलांच्या स्तुतीपर तर अनेक इंग्रजी ग्रंथ निर्माण झाले. रणजितसिंहावर सुमनांजली वाहण्यात आली. फार काय, पण हैदरअली व त्याचा क्रूर पुत्र टिपू यांनाही इंग्रजांकडून प्रसंगोपात्त प्रशंसापत्रे मिळाली परंतु मराठ्यांच्या शिवाजीच्या कपाळी लागलेला लुटारूपणाचा टिळा मात्र वज्रलेप झाल्यासारखा वाटू लागला. हिंदुस्थानच्या गेल्या सहाशे - सातशे वर्षांच्या इतिहासात मराठ्यांना स्थान देण्यासारखा कालखंडच इंग्रज व हिंदी इतिहासकारांच्या दृष्टीने उपलब्ध नव्हता. मोगल रियासतीचा सविस्तर इतिहास लिहिताना केवळ नाईलाज म्हणून चोर व लुटारू ठरवलेल्या मराठ्यांचा प्रसंगोपात्त अनुषंगिक उल्लेख अधूनमधून इतिहासकार करीत असत.''

प्रा. बेहरे यांनी उल्लेख केलेला राजस्थानचा इतिहासकार जेम्स टॉड आणि ग्रॅंड डफ यांची तुलना केल्यास ही परिस्थिती आणखी स्पष्ट होईल. आपापल्या इतिहासलेखनाची सामग्री व खर्डे घेऊन दोघांनीही हिंदुस्थानचा किनारा सोडून मायदेश म्हणजे इंग्लंड गाठले. ग्रॅंट डफच्या मराठ्यांच्या इतिहासाची पहिली आवृत्ती 1826 मध्ये प्रकाशित झाली. टॉडचा ग्रंथ त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1829 मध्ये प्रकाशित झाला.

ग्रॅंट डफप्रमाणे टॉडही ब्रिटिशांच्या लष्करी आणि प्रशासकीय सेवेशी संबंधित होता. निवृत्तीच्या वेळी डफ कॅप्टन तर टॉड कर्नल पदांवर आरूढ होते हा मुद्दा त्यांच्या पात्रतेच्या संदर्भात तितका महत्त्वाचा नाही. परंतु इतिहासकार म्हणून टॉडची पात्रता डफपेक्षा नक्कीच वरच्या दर्जाची होती. त्याला इतिहासाच्या अनेक शाखांमध्ये गती होती. बलराम आणि हर्क्‍युलिस यांच्यातील साम्यस्थळापासून वेरूळ लेण्यातील मूर्तींपर्यंत त्याची बुद्धी सहज संचार करी आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे राजपूतांचा इतिहास त्याने स्वयंस्फूर्तीने लिहिला. राजपूतांबद्दल म्हणजेच आपल्या इतिहासलेखनाच्या विषयीभूत लोकांबद्दल त्याला परम सहानुभूती होती. राजपूतांचे हितसंबंध रक्षिण्यासाठी त्याने केलेली धडपड पाहून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच्या राष्ट्रनिष्ठेविषयी संशयसुद्धा आला होता. 1927 मध्ये प्रसिद्ध झालेल्या गौरीशंकर ओझाकृत टॉडच्या इतिहासाच्या हिंदी अनुवादाच्या अर्पणपत्रिकेतील शब्दयोजना पाहिली म्हणजे माझा मुद्दा लक्षात येईल. अनुवाद खुद्द टॉडलाच अर्पण आहे.

""इतिहास के परमानुरागी पुरातत्त्वानुसंधान के अपूर्व प्रेमी राजपूत जाति के सच्चे मित्र राजपूतों के इतिहास के पिता और उनकी कीर्तिके रक्षक महानुभव कर्नल जेम्स टॉड की पवित्र स्मृती को सादर समर्पित.''
अशा प्रकारची अर्पणपत्रिका ग्रॅंट डफच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या मराठी भाषांतरासाठी लिहिण्याची कोणी कल्पना तरी करू शकेल का?


--

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive