Friday, November 19, 2010

बराक हुसेन ओबामा हे एक विलक्षण रसायन आहे.

बराक हुसेन ओबामांच्या भाषणाचं कौतुक करतानाच आपलं देशहित कशात आहे आणि त्यांची भारत भेट नेमकी का घडवून आणली गेली, यावर क्ष-किरण टाकणं आवश्यक आहे...

बराक हुसेन ओबामा यांची भारत भेट फार उत्साहात पार पडली. ज्यांना ज्यांना ते भेटले त्यांना त्यांना ते अप्रूप वाटलं. खरं तर बराक हुसेन ओबामा ज्या देशात जन्माला आले ते त्या देशाचे भाग्य. भारतात जर त्यांचा जन्म झाला असता तर नेत्यांच्या घराण्यांच्या पिलावळी पुढे ते कधीच पंतप्रधान होऊ शकले नसते. माझ्या या म्हणण्यावर नरसिंहराव किंवा मनमोहन सिंग यांचे उदाहरण देऊन मला गप्प करण्याचा प्रयत्न बरेच जण करतील. जरी ही उदाहरणं खोटी नसली तरी अपवाद आणि अपघात म्हणून आहेत. बराक हुसेन ओबामा हे एक विलक्षण रसायन आहे. मुत्सद्दीपणा आणि कल्पक बुद्धी यांचं मिश्रण बराक हुसेन ओबामा यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांच्या प्रचाराच्या काळात हेच आपल्याला प्रकर्षांने जाणवलं होतं. चार ऑगस्ट १९६१ रोजी जन्मलेल्या ओबामांनी एका सामान्य कुटुंबातून येऊन अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. ते कोलंबिया विद्यापीठाचे पदवीधर आहेत. Horward Law School येथून त्यांनी डिग्री घेतली. Horward Law Preview चे ते प्रेसिडेंट होते. कायद्याची डिग्री घेण्याच्या अगोदर शिकागो येथे सिविल राइट्ससाठी त्यांनी Attorney म्हणून काम केले. हा झाला त्यांचा व्यक्तिगत त्रोटक इतिहास. परंतु त्यांच्या भारतात येण्याने भारतात काय बदल होईल किंवा त्यांच्या पॉलिसीमध्ये भारतात येण्याचे बीज कशात आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. अन्यथा आपण फसव्या मृगजळाच्या मागे जाऊ शकतो.
बिल क्लिंटन अध्यक्ष असताना आपल्याकडे मागे आले होते तेव्हा मारवाडमध्ये जाऊन नाचले होते. जॉर्ज बुश जुनिअर आपल्याकडे आले आणि त्यांनी अणुकरार केला. भारत हे सर्वशक्तिमान राष्ट्र आहे असे सगळेजण म्हणाले. ते महासत्तेच्या वाटेवर आहे असंही म्हणाले. परंतु यामध्ये अमेरिकेचं सातत्याने एक धोरण राहिलेलं आहे हे आपण आता समजून घेतलं पाहिजे आणि ते म्हणजे इस्लामी दहशतवादामुळे भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही एकाच वेळी कुरवाळण्याची वेळ आता अमेरिकेवर आलेली आहे. अन्यथा जेव्हा जग द्विधृवीय अथवा Bi-polar होतंतेव्हा फक्त पाकिस्तानला कुरवाळण्याची अमेरिकेची पद्धत होती. आता जग Uni-Polar झालं आहे. कारण फक्त अमेरिकेकडे super power म्हणून आज पाहिलं जातं. आता रशिया अस्तित्त्वात आहे, पण तिच्याकडे ते सामथ्र्य उरलेलं नाही जे सोवियतकडे होतं.
आता या पाश्र्वभूमीवर बराक हुसेन ओबामा यांच्या व्यक्तिगत जीवनाकडे आपण पहिलं तर ते एक आदर्शवत उदाहरण आहे. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या माणसाने इतक्या अप्रतिम बुद्धीने एवढय़ा मोठय़ा पदावर झेप घ्यावी हे कौतुकास्पद आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे. पण बराक हुसेन ओबामा भारतात येण्यामागे भारतातली जी २० टक्के लोकांची अतिप्रचंड बाजारपेठ आहे ती आहे. भारताची लोकसंख्याच मुळी १२० कोटी आहे त्यामुळे २० टक्के लोक जरी have's मध्ये आले, 'आहे रे' वर्गात आले तरी त्यांची विकत घेण्याची क्षमता प्रचंड आहे आणि हे अमेरिकेला पक्कं माहीत आहे.
रतन टाटा यांच्यासारख्या कुशल उद्योगपतीच्या नेतृत्वाखाली जे पथक त्यांना भेटलं, त्यांच्याकडून प्रचंड मोठय़ा प्रमाणावर बिझनेस अमेरिकेत आणणं आणि अमेरिकेतली बेकारी आणि दारिद्रय़ दूर करणं हे बराक हुसेन ओबामा यांचं पाहिलं उद्दिष्टय़ होतं. त्याचं दुसरं उद्दिष्टय़ होतं ते म्हणजे आशिया खंडामध्ये एका अर्थाने चीनला आकारामध्ये आणि लोकसंख्येमध्ये जर दबाव गट म्हणून जर कुणाला वापरता येईल तर ते भारताला वापरता येईल ही त्यांची धारणा आहे आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत.

भारताला आपल्या बरोबरीचं स्थान देण्याची अमेरिकेची कोणतीही इच्छा नाही. सुरक्षा परिषदेतील कायमचं स्थान भारताला मिळावं यासाठी ओबामा यांनी पाठिंबा दर्शवला खरा, पण येत्या १० वर्षांमध्ये भारताला सुरक्षा परिषदेमध्ये स्थान मिळणार नाहीए. गेली कित्येक वर्ष हे तुणतुणं वाजत आहे.

यामध्ये भारताला आपल्या बरोबरीचं स्थान देण्याची अमेरिकेची कोणतीही इच्छा नाही. सुरक्षा परिषदेतील कायमचं स्थान भारताला मिळावं यासाठी ओबामा यांनी पाठिंबा दर्शवला, पण येत्या १० वर्षांमध्ये भारताला सुरक्षा परिषदेमध्ये स्थान मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. गेले कित्येक वर्ष हे तुणतुणं वाजत आहे, पण ते कधीही सफल होणार नाही. याचं एक मुख्य कारण असं की भारत आणि चीन यांची बरोबरी केलीच जाऊ शकत नाही, एवढी प्रगती चीनने केलेली आहे आणि ती पण शिस्तबद्ध आखणीने केलेली आहे. आज अमेरिका चीनला बरोबरीचा दर्जा देते, पण भारताला हाच दर्जा ती देत नाही. भारत हा जगातला सगळ्यात मोठा लोकशाही असलेला, पण लोकशाहीच्या मार्गाने नव-सरंजामशाहीकडे जाणारा देश आहे, याची ओबामा यांना कल्पना नसणं शक्यच नाही. कारण त्यांचं गुप्तहेर खातं, सीआयए हे भारताची नेमकी परिस्थिती जाणून घेण्याकरिता पूर्णपणे सक्षम आहे.
संपूर्ण भारताने अमेरिकेला एकदिलाने पाठिंबा दिलेला आहे असे नाही, कारण आजही ओबामा नेमके भारतात कशाला आले याची आपल्यापैकी कित्येकांना कल्पनाच नाहीय. आजही इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान आहेत असे सांगणाऱ्या काही वस्त्या भारतात शिल्लक आहेतच की.अमेरिकेतलाच एक विचारवंत Noem Chomski याने एका मुलाखतीत असं सांगितलं की, Nuremberg च्या खटल्याचे नियम जर अमेरिकन अध्यक्षाला लावायचे झाले तर (ओबामा यांचा मी अपवाद करतो कारण ओबामा यांनी नुकतीच सुरु वात केली आहे) रुझवेल्टनंतरच्या सर्व अध्यक्षांना फासावर जावं लागेल. याचं कारण असं की Nuremberg च्या खटल्यामध्ये कोणत्याही प्रकारची अमानुषता करण्याची आज्ञा आपल्या वरिष्ठांनी दिली आणि आपण त्याप्रमाणे वागलो तर अविवेकी कृत्य केल्यामुळे आपण त्या गुन्ह्यातून सुटत नाही. Weapons of mass destructions ही एक कविकल्पना होती आणि त्या जोरावर इराकमध्ये प्रवेश मिळवून इराकच्या तेल विहिरी अमेरिकेने कब्जात घेतल्या आणि इराकला आता वाऱ्यावर सोडण्याकडे अमेरिकेची वाटचाल सुरू आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या संपूर्ण इतिहासामध्ये अमेरिकेने हुकुमशहांना पाठिंबा दिला आणि लोकशाही देशांकडे दुर्लक्ष केले आहे, पाकिस्तानला गोंजारलं पण भारताकडे दुर्लक्ष केले. हे वारंवार झालेलं आहे. आणि जिथे जिथे हुकुमशाही आहे तिथे अमेरिकेने सहजपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि जिथे जिथे लोकशाही आहे तिथे तिथे त्यांनी दुर्लक्ष केलं. आता अमेरिकेवर मात करायला चीन सुसज्ज झाला हे अमेरिकेचं दुर्दैव आहे. त्यामुळेच आता अमेरिकेला भारताची गरज पडते आहे हे आपण कधीच विसरता कामा नये.
इथे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, भारताला नेमकं काय हवं आहे? आपल्या देशातली न्यायव्यवस्था ही सर्वोत्तम आहे हे ओबामा यांच्या तोंडून संसदेतल्या भाषणामध्ये आपल्याला ऐकावं लागतं, पण इथे सर्वात मोठी दुर्दैवाची बाब मला अशी वाटते की भारताच्या सरन्यायाधीशांनीच सांगितलं की भारताची न्यायव्यवस्था किती कोसळलेली आहे. साधी गोष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयात एखाद्या सामान्य माणसाला रिट पिटीशन दाखल करायचं झालं तर त्याचा कागद फक्त वाचण्याकरता जेष्ठ विधिज्ञ १० लाख रुपये घेतो, केसच्या कोटय़वधी रु पयांमध्ये फीज घेतल्या जातात. अशा देशाची न्यायव्यवस्था ही आदर्श व्यवस्था कशी मानली जाऊ शकते? किंवा ८५ टक्के लोक 'नाही रे' वर्गाचे आहेत त्या देशाला महासत्ता बनण्याची स्वप्ने कशी पडू शकतात. कारण संपत्ती निर्माण करणं ही एक कला आहे, पण संपत्ती ओरबाडणं ही एक अमानुष विकृती आहे आणि अनेक भारतीय नेत्यांमध्ये आणि भारतीय प्रशासनामध्ये ही विकृती मुळातून रुजलेली आहे. ब्रिटिश गेल्यानंतर ज्या लोकांनी भारत चालवायला घेतला त्यांनी अखेर भारताला एका नवसरंजामशाही टप्प्यावर आणून सोडलेलं आहे ज्या टप्प्यावर आपण जगतो आहोत.

भारताची न्यायव्यवस्था कोसळलेली आहे, हे आपल्या सरन्याधीशांनीच सांगितलेलं आहे. न्यायालयात एखाद्या सामान्य माणसाला रिट पिटीशन दाखल करायचं झालं तर त्याचा कागद फक्त वाचण्याकरता जेष्ठ विधिज्ञ १० लाख रुपये घेतो, केसच्या कोटय़वधी रु पयांमध्ये फीज घेतल्या जातात. अशा देशाची न्यायव्यवस्था ही आदर्श व्यवस्था कशी मानली जाऊ शकते?

८० टक्के 'नाही रे' लोकांचा ज्वालामुखी धगधगतो आहे त्यावर हे २० टक्के लोक उभे आहेत. जे २० टक्के लोक ओबामा यांच्याशी संपर्क करू शकतात, ओबामांच्या भाषणाने आनंदित होऊ शकतात, ओबामांमुळे आपल्याला बरे दिवस येऊ शकतात असे वाटून घेऊ शकतात, परंतु आपल्या खाली चारी बाजूला झोपडपट्टी आहे आणि मध्ये एक महाल उभा आहे असे होऊ शकत नाही. त्यामुळे ओबामा याचं जे म्हणणं आहे ते एका मर्यादेपर्यंतच आपण मानलं पाहिजे. याचं कारण असं की ओबामा यांच्या एक गोष्ट लक्षात आली की या भारतातल्या २० टक्के लोकांमध्ये खूप क्रयशक्ती आहे. कारण भारत हा नेहरूंच्या स्वप्नांमुळे औद्योगिक विकास झालेला देश बनला. आणि या प्रकारचा देश बनल्यामुळे भारतामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी निर्माण होतात. भारताहून श्रीमंत असलेल्या देशांमध्ये या गोष्टी निर्माण होत आहेत. भारत हा एक Manufacturer देश आहे आणि त्यामुळे भारताची बाजारपेठ ही २० टक्के लोकांची का होईना प्रचंड मोठी आहे. म्हणजेच १२० कोटींच्या २० टक्के म्हणजे अनेक देशांच्या पूर्ण लोकसंख्येच्या बरोबरीने ही लोकसंख्या आहे. एवढी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून घेणं आणि भारताला नेहमी मधाचं बोट लावून आपल्या बरोबर ठेवणं हे आता अमेरिकेला अपरिहार्य आहे. म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष भारतात आले. यामुळे हुरळून मेंढी लांडग्याच्या मागे गेली असे करण्याची काहीही आवश्यकता नाही ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओबामा यांना मिळालेलं नोबेल पारितोषिक हे त्यांनी स्वत:च्या कष्टांनी मिळवलेलं आहे. अनेकांनी त्याच्यावर टीका केली, पण माझं स्पष्ट मत आहे की ओबामा त्याचे पात्र होते. कारण ओबामा यांनी जे कर्तृत्व त्यांच्या लहान वयातच दाखवलं तसे फार थोडे लोक दाखवू शकतात. परंतु त्यांच्या इथे येण्यामुळे भारतात काही बदल होईल असं अजिबात नाही. कारण अमेरिकन अध्यक्ष हा अमेरिकन प्रशासनाने पूर्णपणे बांधलेला असतो. जरी आपल्याला तो मोकळा-ढाकळा आणि अत्यंत सर्वशक्तिमान वाटत असला तरी त्याची जी कारकीर्द असते ती संपल्यानंतर तो एक सामान्य नागरिक बनतो. अशा प्रकारची कोणतीही राज्यव्यवस्था भारतात राबवली जात नाही. भारतात राजकीय माणूस हा रिटायर होत नाही. अशी एक गावठी पद्धतीची, भोंगळ स्वरूपाची नवसरंजामशाही भारतात आहे. फक्त त्यावर आपण एक लोकशाहीचं लेबल चिकटवतो एवढंच. दुसरीकडे शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने सातत्याने पाकिस्तानची पाठराखण केली होती आणि भारताकडे अत्यंत दुर्लक्ष केलं होतं, इंदिरा गांधींनी त्याचे भीषण चटके भोगलेले आहेत. हे असं अमेरिकेने का केलं आणि अचानक त्यांचं धोरण का बदललं हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. हे होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय बनावटीच्या वस्तू आणि गोष्टी या जागतिक बाजारपेठेमध्ये सतत वावरत असतात, ज्यावर चीननेही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण चीनचे हे आक्रमण यशस्वी होऊ शकले नाही. भारतीय बनावटीच्या वस्तू किंवा भारतीय उद्योग जर अमेरिकेत आले तर अमेरिकेतली प्रचंड मोठय़ा प्रमाणावरची बेकारी कमी होईल याची त्यांना पुरती जाणीव आहे. मधल्या मंदीच्या काळात सुद्धा भारत टिकला ही गोष्ट अमेरिकेला धक्कादायक होती आणि या गोष्टीमुळे अमेरिका भारताकडे अधिक भक्कमपणे आकर्षित झाली. पण हे आकर्षित होतानाही पाकिस्तान हे एक महान राष्ट्र आहे आणि भारताने त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे अशी शालजोडीतली बराक हुसेन ओबामा यांनी आपल्याला लगावलेलीच आहे. आपण ज्या दहशतवादामुळे त्रस्त झालेलो आहोत त्याच्यावर नेमका काय उपाय करायचा? किंवा दोघांनी मिळून आपण लढू म्हणजे नेमकं काय? या दोन्ही प्रश्नाचं उत्तर बराक हुसेन ओबामा यांनी आपल्या भाषणामध्ये दिलेलं नाही हेही आपल्याला नमूद करावेच लागेल. आज भारत एका ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. चारी बाजूला झोपडय़ा असताना जे २० टक्के लोक मध्ये महाल बांधून राहू इच्छितात त्या लोकांना लवकरच एका प्रचंड मोठय़ा उद्वेगाची  धग लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याबद्दल बराक हुसेन ओबामा काहीही करू शकत नाहीत. कारण जेव्हा सोवियत युनियनकडे सर्व प्रकारची शस्त्रं, अण्वस्त्रं, केजीबीसारखं अत्यंत हुशार गुप्तचर दल असतानासुद्धा त्यांचे तुकडे होतात, फाळणी होतेच.

पाकिस्तान हे एक महान राष्ट्र आहे आणि भारताने त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे अशी शालजोडीतली बराक हुसेन ओबामा यांनी आपल्याला लगावलेलीच आहे. आपण ज्या दहशतवादामुळे त्रस्त झालेलो आहोत त्याच्यावर नेमका काय उपाय करायचा? किंवा दोघांनी मिळून आपण लढू म्हणजे नेमकं काय? या दोन्ही प्रश्नाचं उत्तर बराक हुसेन ओबामा यांनी आपल्या भाषणामध्ये दिलेलं नाही.

भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारत हा आतून पूर्णपणे पोखरला गेलेला आणि भुसभुशीत असा देश आहे. या देशाकडून अमेरिकेची जी अपेक्षा आहे ती माफक आहे आणि अमेरिकेला काही कळत नाहीं असं कृपा करून समजू नका. त्यांना संपूर्ण भारताची खडानखडा बित्तंबातमी आहे. ते आपली पूर्ण माहिती काढून येथे आलेले आहेत. या टूथपेस्टच्या टय़ूबमधून जेवढं पिळून घेता येईल तेवढं पिळून घ्यायचं आणि त्याची गरज संपली की टाकून द्यायची ही अमेरिकेची रीत आहे. जोपर्यंत तालिबान ब्रेझनेव्हच्या रशियन फौजांना प्रतिकार करत होते आणि अमेरिकेला आवश्यक होते तोपर्यंत तालिबान आणि ओसामा बिन लादेन अमेरिकेचे लाडके होते आणि ते जेव्हा उलटे अमेरिकेवर प्रहार करू लागले तेव्हा अमेरिकेचे ते शत्रू झाले. हेच पाकिस्तानच्या बाबतीत झालेलं आहे, पण पाकिस्तान महान राष्ट्र आहे असं बोलण्याखेरीज त्यांना सध्या पर्याय नाही. चीनबरोबर आर्थिक युद्ध करण्यासाठी त्यांना भारत आणि भारताचे २० टक्के हवे आहेत. हे २० टक्के कदाचित त्यांच्याबरोबर जातीलसुद्धा पण त्यामुळे भारताची एकही समस्या सुटणार नाही. भारतातल्या ८० टक्के 'नाही रे' वर्गाला कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळणार नाही आणि चांगली भाषणे ऐकून अथवा महात्मा गांधी अथवा विवेकानंदांचे प्रेरणादायक उद्गार ऐकून कुणाचे पोट भरत नाही अथवा त्यामुळे कुणाला अन्न, वस्त्र, निवारा मिळत नाही, हे ओबामा यांच्या भाषणांनी आनंदून गेलेल्या लोकांनी समजून घ्यायची गरज आहे. यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी की बराक हुसेन ओबामा यांचे जे स्व-कर्तृत्व आहे त्याला कमी लेखण्याचा हा अजिबात प्रयत्न नाही. पण हा तो प्रयत्न आहे ज्यामुळे ओबामा यांच्या भेटीपल्याडचं जे वास्तव आहे ते क्ष-किरणामध्ये आपण पहिलं पाहिजे आणि आपण सावध झालं पाहिजे. अमेरिकेचा अध्यक्ष इथे आला, ३ दिवस राहिला याचा अर्थ भारत आता महाशक्ती झालेला आहे अशा प्रकारच्या भ्रमात कुणीही राहण्यात अर्थ नाही. सुरक्षा परिषदेतले कायमस्वरूपी पाच देश आहेत, म्हणजेच अमेरिका, फ्रांस, चीन, इंग्लंड आणि रशिया. सुरक्षा परिषदेसाठी जी सहावी जागा आपल्याला मिळायची आहे त्यासाठी हे पाचही देश भारताला आपल्या शेजारी बेंचवर बसू देतील याची सुतरामही शक्यता नाही. हे केवळ एक मधाचं बोट लावलेलं आहे. पुढचे अमेरिकेचे अध्यक्ष येईपर्यंत आपण त्या मधाच्या बोटावर आनंदात राहू. अणुकरार केला म्हणजे अमेरिकेने भारतावर उपकार केले असं नाही. Noam Chomsky यांचं "what we say-goes" नावाचं पुस्तक सर्वानी वाचावं असे मी सुचवतो. म्हणजे बराक हुसेन ओबामा भारतात आले, राहिले, नाचले, उत्तम भाषण केले, या सगळ्याचाच जो ज्वर आलेला असेल तो ज्वर तात्काळ उतरेल. Nuremberg च्या खटल्यामध्ये जी गोष्ट घडली होती की कोणताही मनुष्य जर आपल्या वरिष्ठांच्या आदेशाने जर अमानुषता करेल तरी तो विवेक विसरला म्हणून त्याला शिक्षा झाली पाहिजे. नोआम चॉम्स्की यांनी म्हटल्याप्रमाणे काही अपवाद वगळता अमेरिकेचे सगळे अध्यक्ष या शिक्षेचे हकदार ठरतात. भारतासारख्या लोकशाही देशासोबत आपण कुठल्या प्रकारचा मुत्सद्देगिरीचा खेळ करतो त्यावर पुढचा सगळा डोलारा उभा आहे. ओबामांच्या भाषणांनी आणि नृत्यांनी भारत सुधारेल, भारताची भरभराट होईल अशी आशा बाळगणं हे व्यर्थ आहे. अमेरिकेने केलेला अणुकरार काय किंवा अनेक आर्थिक र्निबध उठवणं काय, ही गोष्ट चीनबरोबर भारताने स्पर्धा करावी यासाठी आहे. कोंबडय़ांमध्ये झुंझी लावण्यात अमेरिका हुशार आहे. पाकिस्तान -भारत हीं झुंज आता हळूहळू विझत चालली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर चीन-भारत अशी नवी आर्थिक स्पर्धा त्यांनी सुरू केलेली आहे. परंतु याला पाठिंबा देणारी जी अमेरिकन शक्ती आहे त्या शक्तीने आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना पाठिंबा दिला ते पराभूत झाले असा इतिहासाचा अनुभव आहे. फिडेल कॅस्ट्रो हे याचं उदाहरण आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यावर कुठलाही हुकुमशहा टिकू शकत नाही. अमेरिकेच्या पाठिंब्याने फक्त काही प्रमाणात समृद्धी येऊ शकते आणि ते पण सिंगापूरसारखी छोटय़ा बेटांच्या देशांच्या संदर्भात हे खरं आहे. अन्यथा अमेरिकेचा उपयोग हा भारताच्या प्रगतीसाठी मोठय़ा प्रमाणावर होईल ही एक व्यर्थ कल्पना आहे. आणि म्हणूनच बराक हुसेन ओबामा यांच्या भेटीकडे आपण वास्तवाच्या भूमीवर उभं राहून पाहिलं पाहिजे. अन्यथा येणाऱ्या मोठय़ा संकटांना तोंड देण्याची जी अंगभूत क्षमता भारताकडे आहे ती क्षमताच आपण गमावून बसू जे आपल्याला कधीच परवडणारं नाही.
rajuparulekar@hotmail.com

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive