Friday, November 19, 2010

आपल्या गडकोटांबद्दल....



आपल्या गडकोटांबद्दल.... 


गिरी-दुर्गांच्या पहाऱ्यातून महाराष्ट्रात गडकोट वैभव विपुल आहे.छत्रपती शिवाजीमहाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर अहिवंतापासून जिंजी तंजावरपर्यंत दुर्गाची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.

दुर्गमता हा गडाचा गाभा होता.शत्रूकडे असलेल्या हत्याराच्या ताकदीवर दुर्गाची रचना अवलंबून असे.प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी झाडे टाकून वस्तीचे रक्षण करण्यात येई.नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले.मग दगडाची रचाई झाली.शेवटी दगड तासून पक्की तटबंदी उभारण्यापर्यंत मजल गेली.अशी तटबंदी असलेल्या ग्रामांना 'पूर' म्हणत असत.
 

तरीही शत्रू बलाढ्य असेल,तर या तटबंदीयुक्त पुराचा पराभव अटळ असे. अशा वेळी गिरी-दुर्गाची रचना करण्यात आली.मात्र,असे गिरी दुर्ग बाधण्याचा खर्च अपरमित असे,परंतु संरक्षण या एकमेव कारणासाठी तो खर्च करणे अपरिहार्य असे.भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन,त्याची दुर्गमता अभ्यासून अशा ठिकाणी दुर्गाची निर्मिती केल्यामुळे किंवा दुर्ग उभारल्यामुळे शत्रूपासून संरक्षण मिळत असे.
मात्र,हेच गडकोट अधिकाधिक बलाढ्य करण्यात मनुष्याचे बुद्धीचातुर्य पणाला लागले.त्यातील बारकाव्यांचा अभ्यास केला गेला व त्यातूनच बेलाग दुर्ग उभारले गेले.परिस्थितीशी सांगड घालून अधिकाधिक दुर्गम ठिकाणी गडकोटांची उभारणी केली गेली.वास्तुरचना,स्थापत्यशास्त्र यांचा कस पणाला लाऊन अशा गडकोटांची निर्मिती झाली.

आपल्याकडील अनेक जुन्या ग्रंथांमधून दुर्गांच्या प्रकाराची माहिती मिळते.मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायात दुर्गांबद्दल केलेली चर्चा आली आहे.त्याचा आशय असा आहे-'राजाने दुर्गांच्या जवळ वसवलेल्या नगरातच आपले वास्तव्य ठेवावे.असे सहा प्रकारचे दुर्ग आहेत - १]धनुदुर्ग २] महीदुर्ग ३] अब्ददुर्ग ४] वाक्ष्रदुर्ग ५] नृदुर्ग ६]गिरिदुर्ग

ज्याच्या आजूबाजूस वीस कोसपर्यंत पाल नाही,त्यास 'धनदुर्ग' म्हणतात.

ज्याला बारा हातांपेक्षा अधिक उंच तटबंदी आहे,युद्धाचा जर प्रसंग आलाच तर ज्यावरून व्यवस्थित पहारेकर्यांना फिरता येईल,ज्याला झरोक्यानीयुक्त अशा खिडक्या ठेवल्या आहेत,अशा दुर्गास 'महादुर्ग' असे म्हणावे.

अपरिमित जलाने चोहोबाजूंनी वेढलेल्या दुर्गास 'अब्ददुर्ग' किंवा 'जलदुर्ग' अशी संज्ञा आहे.

तटाच्या बाहेर चारी बाजूला चार कोसापर्यंत मोठमोठे वृक्ष,काटेरी झाडे,कळकाची बेटे आणि वेलींच्या जाळ्या यांनी वेष्टीलेल्या दुर्गास वृक्षसंबंधी म्हणजेच 'वाक्ष्रदुर्ग' म्हणतात.

गज,अश्व,रथ आणि पत्री या चतुरंग सैन्याने रक्षण केलेल्या दुर्गास 'नृदुर्ग' असे म्हणतात.

तर आसपास वर चढण्यास संकुचित मार्ग असणारा,नदी, झरे इत्यादिकांच्या जलानी व्यापलेला व धान्य निर्माण होण्यासारख्या क्षेत्रांनी युक्त असलेल्या डोंगरी गड हा 'गिरिदुर्ग' या सज्ञेस प्राप्त होतो.
२१ व्या शतकातील युवा पिढीसाठी या गडकोटांचे महत्व समजावून त्याचा अभ्यास करण्यास उदुय्क्त करण्यासाठी,त्याचे महत्व जाणून घेण्यासाठी,गडाची बांधणी करताना तो डोंगर का निवडला,त्या भोवती असलेली साधनसामग्री,तेथे राहणारे लोक,त्या भागात असलेली पाण्याची व्यवस्था,तेथून मिळणारे शेताचे उत्पन्न या गोष्टींचा निश्चितच विचार करून गडांची बांधणी कशी झाली त्यासाठी गडाची एका वेगळ्या माध्यमातून ओळख करून देण्यासाठी हि लेखमाला सुरु करीत आहे.

हि माहिती विविध वर्तमानपत्रातून कात्रणे करून मिळवलेली असून ती माझ्याकडे खूप वर्षापासून आहे ती आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे.


--

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive