Tuesday, October 1, 2013

Husband Material or Wife Element

तिच्यात/त्याच्यात 'वाइफ/हजबंड मटेरिअल' नाही असं काहीतरी कारण सांगून पालकांना आदर्श वाटणारं स्थळ सरळ नाकारलं जातं. ही 'निवड' म्हणजे नक्की प्रकार तरी काय आहे?

राकेशचं लग्नाचं वय झाल्यानं त्याच्या घरचे मुली पाहाण्याचा सोहळा दर आठवड्याला ठरवायचे. त्याच्या राहाणीमानाला, स्वभावाला आणि आर्थिक संपन्नतेला शोभणारी मुलगी आई-वडील शोधून आणायचे; पण हा पठ्ठ्या पहिल्या भेटीतच सरळ नकार देऊन रिकामा व्हायचा. त्याचं कुठं प्रेमप्रकरण आहे का, हेही घरच्यांनी तपासून पाहिलं. हाती तसं काहीच आलं नाही. नंतर त्याच्याशी बातचित केली असता, पाहिलेल्या मुलींमध्ये 'वाइफ मटेरिअल' जाणवलं नाही, असं काहीसं भलतंच (घरच्यांच्या दृष्टीनं) उत्तर दिलं.

ते दोघं एकदम जिगरी दोस्त. कॉलेजमध्ये जाण्यापासून ते आउटिंगला जाईपर्यंत सगळीकडे एकत्रच असत. त्यांच्याकडे पाहून ते किती 'मेड फॉर इच अदर' आहेत, हे इतरांनाच जाणवायचं. त्यांच्या मात्र हे ध्यानी-मनी नाही. एकदा तिच्याच आईनं टोकलं असता, 'नाही गं, तो काही 'हजबंड मटेरिअल' नाही, फक्त खास दोस्त आहे माझा,' असं उत्तर तिनं देऊन टाकलं!

ही उदाहरणं काही कोणती गृहितकं नाहीत, तर तुमच्या-आमच्यातलीच आहेत. ऑफिस, कुटुंबीय किंवा मित्र-मैत्रीणींमध्ये असं एखादं तरी उदाहरण आपल्याला अवाक् करून जातंच. वाइफ किंवा हजबंड मटेरिअल म्हणजे नेमकं काय? तर, ती/तो चांगली आहे; पण लग्नासाठीचं 'मटेरिअल' तिच्यात/त्याच्यात जाणवत नाही असा साधा अर्थ घेता येईल. कालपर्यंत लग्नाचं नातं हे अपेक्षांवर ठरवलं जायचं. आता त्याला बहुधा 'मटेरिअल' हे नाव रूजू पाहातंय.

पालकांना हे उत्तर अगदी अनपेक्षित असलं, तरी मुलांची मात्र ती खरी प्रतिक्रिया असते. ज्याच्याशी किंवा जिच्याशी लग्न करून आयुष्याची गाठ बांधायची, ती व्यक्ती आपल्याला आतून तशी वाटत नसेल, तर काय करायचं? पुन्हा आजकाल पूर्वीसारखा दबाव नसतो. मुलानं किंवा मुलीनं नकार देणं हे वावगं समजत नाही. मुलीला नकार आला, की आभाळ कोसळत नाही आणि मुलालाही नकार येतो, हे मान्य झालं आहे.

लग्नासाठी अपेक्षांची यादी मांडताना होणारी बायको/नवरा चांगली मैत्रीण किंवा मित्र असावी अशी अपेक्षा ढोबळपणानं केली जाते. मात्र, कॉलेजमधला चांगला मित्र किंवा मैत्रीण जोडीदार म्हणून नको असतो, का तर त्याच्यात/तिच्यात 'मटेरिअल' जाणवत नाही!

अति सहवासामुळेच


काही वर्ष एकमेकांसह मित्र-मैत्रीण म्हणून एकत्र वेळ घालवल्यामुळे आतून-बाहेरून पूर्णपणे मुलं एकमेकांना ओळखत असतात. त्यामुळे एकमेकांतल्या कोणत्या गोष्टी नकोत, हेही कळलेलं असतं. म्हणूनच मैत्रीण किंवा मित्र म्हणून हवे असलेले ते दोघं एकमेकांना बायको किंवा नवरा म्हणून नाकारतात.

इतक्या वर्षांच्या ओळखीत किंवा लहानपणापासून एकत्र वाढले असतील, तर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणं, ट्रेक किंवा ट्रीपला बाइकवर एकत्र जाणं, वाढदिवसाच्या दिवशी केक भरवणं वगैरे या गोष्टी अत्यंत रोजच्या होऊन जातात. त्यातून एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटेनासं होतं, जे नवरा-बायकोच्या नात्यात अपेक्षित आहे.

अलीकडे स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभं राहिल्याशिवाय मुलं लग्नच करत नाहीत. एका विशिष्ट वयापर्यंत त्यांना परिपक्वता येते. तोपर्यंत त्यांच्या नवरा किंवा बायकोविषयीच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झालेल्या असतात. म्हणूनही मुलं अलीकडे वेळीच मैत्रिणीला बायको समजण्याचा वेडेपणा करत नाहीत. हेच मुलींच्याही बाबतीत म्हणता येईल.

क्वचित कधी घरातल्या वातावरणाचाही परिणाम मुलांच्या होकारावर किंवा नकारावर होत असतो. उदाहरणार्थ, घरात आई वर्चस्व गाजवणारी असेल आणि बाहेर मैत्रीणही 'आत्ता कुठून आलास?', 'इतकं साधं कळलं नाही का?', 'माझा वाढदिवस कसा काय विसरलास?' यांसारख्या मुद्द्यावर हक्क गाजवणारी असेल, तर आईसारखीच बायको नको, म्हणूनही मैत्रिणीला नकार दिला जाऊ शकतो.

अतिकाळजी करणाऱ्या मैत्रिणीबाबत किंवा अति 'पझेसिव्ह' असलेल्या मित्राबाबतही हेच होऊ शकतं.



आस्था आणि प्रतिमेत बसणारा/री


मुलींना अजूनही रोमँटिक जोडीदार हवा असतो. पिढ्या बदलल्या, तरी भावना तीच असते. मित्र बऱ्याचदा काळजी घेणारा; तरीही प्रॅक्टिकल वागणारा असतो. त्यामुळे नवरा म्हणून असा मुलगा मुलींना नको वाटतो.

नवरा-बायको हे तसं बरंच पुढचं नातं आहे; पण एखाद्याशी आपली मैत्री जुळेल की नाही, हेही आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून लक्षात येतं. त्यामुळे कुणीही कितीही म्हटलं, तरी तुमचं दिसणं महत्त्वाचं असतंच.

एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच आपण पत्ता का विचारतो? काही व्यक्तींशी आपली तार का जुळते? तसाच काहीसा प्रकार एखादी व्यक्ती नवरा किंवा बायको म्हणून आवडण्याबद्दल होत असावा.

'क्लिक' होणं म्हणजे एखाद्याविषयी आस्था वाटणं आणि अर्थातच मग ही आस्था आपल्याला भावी जोडीदार म्हणून एखाद्या व्यक्तीविषयी वाटते किंवा नाही, हे पाहिलं जातंच.

प्रत्येकाच्या मनात नवरा-बायको या नात्याविषयी काही विशिष्ट कल्पना असतात. समोरच्या व्यक्तीला त्या कल्पनांशी नेहमीच ताडून पाहिलं जातं. आपल्या कुटुंबाच्या व्याख्येत ती व्यक्ती बसते का, वगैरे विचारही केले जातात. त्यामुळे एखादी व्यक्ती 'हजबंड मटेरिअल' किंवा 'वाइफ एलिमेंट' नसण्याविषयी आपण बोलतो.

- गौरी कानिटकर, मॅरेज कौन्सेलर

तुम्हाला काय वाटतं?


तो किंवा ती आवडत असली, तरी तिच्यात/त्याच्यात लग्नासाठी 'मटेरिअल' जाणवत नाही. याला विरोधाभासी व्यक्तिमत्त्व म्हणायचं का? या 'मटेरिअल'ची नेमकी व्याख्या काय? लग्नासाठी स्वभाव, आर्थिक सुबत्ता, रंग आदी गोष्टी मिळत्या-जुळत्या असताना केवळ त्याच्यात/तिच्याच 'मटेरिअल' वाटलं नाही, हे सांगणं म्हणजे मानसिक गोंधळ असल्याचं लक्षण आहे का?

किंवा, त्याच्या बाजूनं विचार करायचाच झाला, तर 'मटेरिअल' नावाची भावना खरंच अस्तित्त्वात असते का आणि लग्न ठरवण्यासाठी ती 'मॅटर' करते का?

... असे अनेक प्रश्न. वाचकहो, तुम्हाला काय वाटतं? काय असतं हे 'वाइफ' किंवा 'हजबंड मटेरिअल'? अपेक्षांहून त्याची व्याख्या वेगळी आहे, की स्थळ नाकारण्यासाठी घेतलेली पळवाट आहे? ही भावना खरंच मनात असते का? तुम्हाला त्याचा अनुभव कधी आलाय का?

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive