Sunday, July 1, 2012

ऐका कहाणी जिवतीची - Story of Jivatee

एक आटपाट नगर होते. तिथल्या राजाला मूल नव्हते. सर्व सुखे हात जोडून उभी असली तरी त्याचा जीव रमत नव्हता. राणी कष्टी होती. ती सारखी आसवे ढाळी. माझी कूस उजव म्हणून देवाला विनवी. पण तिची व्यथा संपली नाही. मग तिने एका सुइणीला बोलावले. म्हणाली , ' मला कोणाचे तरी नाळ-वारीचे मूल आणून दे. तुला सोने-नाणे देईन. ' सुइण कबूल झाली. राणीने गरोदरपणाचे सोंग केेले. नऊ मास पूर्ण होत आले असता गावातील एक ब्राह्माणी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. सुइणीने तो नाळ-वारेसहीत राणीच्या कुशीत नेऊन ठेवला आणि ब्राह्माणीला म्हणाली की बये , तुला वरवंटा निपजला. इथे राजवाड्यात आनंदोत्सव साजरा झाला. राजाला जगण्यात अर्थ गवसला. राणीच्या कुशीत बाळाचा ट्यॅहा फुटला.
/photo.cms?msid=2315999

ब्राह्माणी मुलाच्या आशेने झुरू लागली. श्ाावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीची पूजा करू लागली. ' जिथे माझा बाळ असेल तिथे तो खुशाल असो ' म्हणत सर्व दिशांना तांदूळ उडवू लागली. ते तांदूळ राजवाड्यात राजपुत्राच्या अंगावर पडू लागले. ब्राह्माणीने हिरवे लुगडे , हिरव्या बांगड्या र्वज्य केेल्या. ती कारलीच्या मांडवाखालून जाईना. तांदुळाचे धुवण ओलांडीना. मुलगा मोठा झाला. राज्याचा राजा झाला. एक दिवस ब्राह्माणी त्याच्या नजरेस पडली. तिचे देखणे रूप पाहून त्याच्या मनात पाप उत्पन्न झाले. तिच्या दारातील वासराच्या शेपटीवर त्याचा पाय पडला. गाय वासराला म्हणाली , ' जो आपल्या आईची अभिलाषा धरायला कचरत नाही , तो तुझ्या शेपटीवर सहज पाय देईल. ' राजाला पश्चाताप झाला.

पुढे तीर्थयात्रा करून त्याने सर्व प्रजेला जेवायला बोलावले. ब्राह्माणीही तेथे आली. राजा पंक्तीत तूप वाढू लागला. तिच्या पानापाशी तो येताच तिला पान्हा फुटला आणि त्याची धार राजाच्या तोंडात उडाली. राजाला राग आला. पण त्याची राणीआई त्याला म्हणाली , ' बाळ , हीच तुझी खरी आई. ' राजा आईच्या पाया पडला. आई-वडिलांना वाडा बांधून दिला. जिवती त्या सर्वांवर प्रसन्न झाली.

अशी ही जिवतीची कहाणी.

आजही श्ाावण आला की पहिल्या शुक्रवारी भिंतीवर केशराने अथवा गंधाने जिवतीचे चित्र काढतात. घराघरात भिंतीवर मुलालेकरांच्या गराड्यात रमलेल्या जिवतीचा कागद लावतात. पूजा करतात. तेरड्याआघाड्याची पानेफुले आणि दुर्वांची माळ करून देवीला घालतात. कणकेचे पाच दिवे करून देवीला ओवाळतात. ' माझे बाळ जिथे आहे त्या दिशेला मी अक्षता टाकतेय , हे जिवतीआई , तू त्याचे रक्षण कर. ' अशी मनोमन प्रार्थना करतात. पुरणावरणाच्या जेवणाने पुजेची सांगता करतात.

काळ बदललाय. अष्टपुत्रा सौभाग्यवती होऊन घराचे गोकुळ करण्याचे दिवस सरलेत. तरीही आपल्या चौकोनी कुटुंबातले वातावरण नांदत्या गोकुळासारखेच असावे यासाठी नव्या युगातली जिवती मनोमन व्याकुळलेली असते. आता क्षितीज रुंदावले आहे. मुलेबाळे मोठी होऊन सातासमुदालीकडे जातात. जगाच्या पाठीवर कोणत्या तरी अनोळखी प्रांतात असलेले आपले बाळ सुखात असावे यासाठी तिचा जीव तीळतीळ तुटतो.

वेष बदलले. जगणे बदलले. रोजचे संदर्भ बदलले. तरी आईची माया तशीच राहिली. ही माया आटत नाही तोवर जिवती प्रसन्नच राहणार. ती तशीच राहो ही तुम्हाआम्हा सर्वांची प्रार्थना. ती सुफळ संपूर्ण होवो. 
- प्रतिमा जोशी  

Diana and White Cow

दिवाळीचा सण जसजसा जवळ यायचा तसं उत्साहालाही उधाण यायचं . नवीन कपडे - लत्ते , गोडधोड पदार्थ वगैरे गोष्टींचं आकर्षण त्यामागे असायचंच . फुलबाज्या उडवणं , बारूद फोडणं हे तर नित्याचच . पण पाडव्याच्या दिवशी गावातल्या इतर जनावरांसोबत घरच्या गायीला आंघोळ घालून , गेरूच्या मिश्रणात भिजवलेल्या हाताच्या पंजाचे ठसे तिच्या पाठीवर उमटवून , गळ्यात आणि पायात झेंडूच्या फुलांचा हार बांधून तिची कमानीदार शिंग वॉनिर्शनं रंगवून , त्यावर झिलमील चमकणारी विविधरंगी चमकी शिंपडून वाजतगाजत वेशीपल्याडून वाहणाऱ्या ओढ्याकाठच्या जानमाच्या देवळात पाया पडायला न्यायचा ध्यास डोक्यात जबरदस्त ठासलेला असायचा .

दिवाळीच्या अनेक दिवस आधीपासूनच याचं प्लॅनिंग सुरू व्हायचं . त्यामुळं काही दिवस आधीपासूनच तिच्याकडे अॅडव्हान्समध्ये लक्ष देणं सुरू व्हायचं . म्हणजे तिच्या चारा पाण्याची आपणहून एक्स्ट्रा काळजी घ्यायची . तेवढंच प्रेम निर्माण होईल जनावर आणि आपल्यात , हा त्यामागचा उद्देश .

गज्या , सुध्या , पांडू या सर्व मित्रांच्या गायींसोबत आपलीही नटलेली गाय मस्त डौलात घरातनं निघेन . जनावरांच्या कळपासमोर गावातली मोठी पोरं बारूद फोडतील ... आपली गाय दचकेलही .. पण दोरी घट्ट पकडून सांभाळू तिला ... आणि मजा करत करत ... गाणी म्हणत जाऊ ओढ्याकाठच्या त्या देवळापर्यंत ... तिच्या पाया पडून झाल्यावर परत घरी ... मस्त मजा येईल ... सगळेच सोबत असल्यामुळं घाबरायचं कशाला . होईल नीट . तसंही दोन वर्ष घरी जनावरं नव्हतं आपल्या . यावर्षी आहे ना ही गाय .

फटाक्यांच्या आवाजाने डोळे उघडले . तांबडं फुटायच्या आत सगळेच जण आंघोळीसाठी सज्ज . आपणही उरकायचं . साधारण दहानंतर गायीला नदीवर धुवायला नेण्याचा कार्यक्रम ठरला . उत्साह एकदम भरात .

दहा वाजले एकदाचे . गावातली जनावरं नदीकडे जायला निघाली .

' अम्मा , मै अपने गायकू न्हिलाके लाता हूं .'

' नही बेटा , नद्दीमें पानी भोत है , जानेका नही उधर . घरपरीच धो गायकू . पानी है घरपें .'

आजी आणि आईने एकाचवेळी नकारघंटा वाजवली .

दहा बारा वर्षाच्या पोराला ही चलाख गाय काय आवरणार , ही त्यांची चिंता . ती तशी रास्तच होती .

गावातली सगळी जनावरं घरासमोरून नदीकडे जातायत , आणि आपली गाय घरी ? मन खजील होत होतं .

काय करावं कळेना . चला , आई म्हणते तसंच करूया . घरीच अंघोळ घालूया तिची .

पिंपात पाणी भरून घरासमोर आणून ठेवला . गोठ्यात खुंट्याला गुंडाळलेला गायीचा दोर सोडला . तोंडाने प्रेमाने पुचकारत हळूहळू तिला बाहेर ओढत आणलं . तेवढ्यात रस्त्यावर जोरात आवाज झाला ... धडाह्यह्यह्यमधूम ... कुणीतरी मोठा फटाका फोडला . तोच गाय घाबरली आणि जी धूम ठोकली ती सरळ जंगलाच्या दिशेनं ... सुसाट ...

बोंबल्ल सारं ... ज्याची भीती होती तेच झालं . अख्या गावात एकलकोंडी म्हणून कुप्रसिद्ध असलेली आपली ही गाय आज काही देवळात पाया पडायला येणार नाही बुवा . रडकुंड्या चेह - याने आईकडे तक्रार .

' गाय भाग गई , अम्मा .. अब क्या करू '

' जाने दे बेटा , तू पिछे मत लग उसके . एकलकोंडी गाय है अपनी . वो क्या जाएगी सबके साथ '

असं कसं . गज्या , सुध्या , नाम्या .. सगळ्यांची जनावरं जाणार देवळात आणि आपली गाय घरी ?

उद्या मित्रांना काय म्हणून तोंड दाखवणार . चिडवणार ते सगळे . विषय आता प्रतिष्ठेचा बनला होता . काय करायचं . रडारड जोरात सुरू .

ठरवलं ... जंगलात जायचं . गायीला शोधायचं . आणि पकडून आणायचं . तिला अंघोळ घालून न्यायचं म्हणजे न्यायचंच देवळात . अशीकशी येत नाही बघू .

स्वारी पळतच सुटली जंगलाच्या दिशेनं . गायीच्या शोधात . अरेच्चा ... गाय कुठं दिसत नाही . लांब लांब दिसत नाही . फुल्ल टेंशन ... डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरूच होत्या . डोक्यात भुंगा , कुठल्या दिशेनं गेली असेल ती .

तेवढ्यात समोरून एक माणूस येताना दिसला .

' आनेजी , हिकडे गाय दिसली का हो तुमाले . पांढ - या रंगाटी हाय !

' तुयी गाय हाय का रे थी . दोन वावरापलीकडं धु - यावर चरते बा एक गाय . जा पाय तिकडे '

दोन शेत पळत गेल्यावर जीवात जीव आला . होय , आपलीच आहे ती गाय . पकडायचं आता तिला .

कुणीतरी आपल्याला पकडायला येतंय याची तिला चाहूल लागू नये म्हणून चोरपावलांनी तिच्या मागे पोचायचं ठरवलं . ती मात्र चरण्यात मश्गूल .

एक होतं . गाय प्रचंड घाबरट स्वभावाची होती . मारकुंडी मात्र नव्हती . नाहीतर घेतलं असतं शिंगावर .

जवळ पोचलो खरा . पण पकडायची कशी तिला ? समोरून गेलो तर आणखी पळत सुटेल . म्हणून मागून जाऊन दोन्ही हातांनी तिचं शेपूट गच्च पकडलं आणि गाय जोरात उधळली . जोरात पळत सुटली . शेपूट हातात असल्यामुळं मीही फरफटत तिच्यामागे ... अनवानी असल्यामुळं बाभळीचे मोठमोठे काटे खसाखस पायात रूतत होते . रक्तही येऊ लागलं होतं . पण सुद कुठं होती . गायीला पकडण्याचाच ध्यास डोक्यात . जंगलात जोरजोरात रडणं सुरू झालं . गाय काही पकडल्या जात नव्हती . शेवटी हार मानली , नव्हे मानावीच लागली . सोडलं तिचं शेपूट . हासडल्या दोन चार अस्सल गावठी शिव्या आणि रडत रडतच घरी परतलो . घरच्यांना घडलेली कहाणी सांगितली . सर्वांनी मूर्खात काढलं . सांगितलं होतं कुणी तुला जंगलात जायला ?

गायीला देवळात पाया पडायला घेऊन जाता येणार नाही , हे तर स्पष्ट झालं होतं . याच विषयावरून घरात राडा सुरू झाला . घर डोक्यावर घेणं वगैरे झालं ...

घाबरट स्वभावाची गाय . कुणी पकडायला गेलं की शेजा - यांच्या घरात घुसायची . अगदी आतल्या खोलीपर्यंत . जात्याजवळ जाऊन बसायची . मग घरच्यांचा निर्णय झाला . असं वाह्यात जनावर नको पाळायला . वर्षभराच्या आत तिचा निकाल लावला . शेजारच्या गावातल्या शेतक - याला विकून टाकली .

साधारण चार पाच वर्षांचा कालावधी गेला असणार . वडिलांनी म्हैस विकत आणली . टम्म पोट सुटलेलं तिचं . गाभूळ म्हशीचं घरात आगमन झालं .

' म्हशीला हल्या नको व्हायला . वगारच झाली पाहिजे .' येणारे - जाणारे इच्छा व्यक्त करायचे . माणसांच्या अगदी उलट विचार . तिकडे मुलगा हवा असतो . इकडे मात्र तो जेंडर व्यावसायिकदृष्ट्या फायद्याचा नसतो .

एके दिवशी भल्या पहाटे म्हशीनं हंबरडा फोडला . बाहेर धो धो पाऊस सुरू असताना गोठ्यात तिनं छानशा वगारीला जन्म दिला . पहाटेच सगळे झोपेतून उठलो . वडिलधा - यांची सुरू असलेली लगबग टुकूटुकू बघत होतो . नुकतच जन्मलेल्या पिल्लाला म्हशीने चाटू नये म्हणून त्याला घरात आणून ठेवलं . व्वा .. किती सुंदर आहे पिल्लू ... वगैरे कौतुक सुरू झालं .

रांगत रांगत म्हशीचं ते पिल्लू काही दिवसानंतर तुरुतूरु चालायला लागलं . एकदम सगळ्यांचं फेवरेटही झालं . मुलांना एक खेळणं मिळालं होतं .

' अब इसका नाम क्या रखनेका ...' भावंडांमध्ये चर्चा सुरू झाली .

' बदामी , कबरी , चमेली , वगैरे वगैरे '

' ये क्या नाम है ? सब जुने पुराने '

' इसका नाम डायना रखेंगे .'

' डायना ! ए क्या भल्ता नाम ?

थोड्या ऑर्ग्युमेण्टनंतर शेवटी डायना हेच नाव फिक्स झालं .

आलिशान कारमध्ये डोडी अल फहेदच्या कुशीत बसलेली डायना अपघातात नुकतीच मरण पावली होती . तिच्याविषयी जबरदस्त कुतूहल चाळवलं . टीव्ही , रेडियो , वर्तमानपत्रांनी तर तिचा अख्खा कलरफूल जीवनपट समोर मांडला होता . एवढी सुंदर बाई अशी मरायला नको होती .

डायनाचा अपघाती मृत्यू त्यावेळी मनाला चटका लावून गेला होता .

म्हशीच्या त्या भुऱ्या रंगाच्या पिल्लूला नाव ठेवायची वेळ आली तेव्हा डायनाचं नाव चटकन जिभेवर आलं . डायना आता घरात सर्वांची लाडकी झाली होती . शेजारच्यांच्या घरातही तिचा बिंधास्त , मुक्त वावर असे . लाडकी असल्यानं तिच्या खाण्यापिण्याचीही चंगळ असायची . कुटुंबातली एक एक्सटेण्डेड मेंबर जणू . डायना झटपट मोठी झाली . पुढे कळपात चरायला जाऊ लागली . हळूहळू डायनाविषयीचं फॅस्सिनेशन ओसरू लागलं .

कारण इकडे सिरियस बिझनेस सुरू झालं होतं , शिक्षणाचं , अभ्यासाचं .

नंतर जनावरेही कमी झाली . नव्हे एकूण बदललेल्या परिस्थितीत ती पाळणं कठीण होऊन बसलं .

हळूहळू अक्कल येऊ लागली तेव्हा कळायला लागलं की जनावरं पाळणं सोप्प राहिलेलं नाहीये आता . पंचक्रोशित दुष्काळाचं सावट पडू लागलंय . पुरेसा पाऊसही पडत नाही . अशावेळी जनावरांना चारा आणणार कुठून . माणसांना प्यायला पाणी नाही अशावेळी जनावरांना कुठून आणून पाजणार . घरच्यांनी हळूहळू जनावरांची संख्या कमी केली .

सिमेंट कॉंक्रिटच्या जंगलात पाय ठेवल्यानंतर वर्षवर्षभर शेताचं तोंड बघणं बंद झालं . सुरूवाती सुरूवातीला घरी फोन केला की घरात असल्या नसल्या जनावरांबद्दल विचारपूस व्हायची . किती आहेत , दुभती किती , भाकड किती , धडधाकड किती वगैरे वगैरे ... कामाच्या धबडग्यात हळूहळू सारं मागं पडत गेलं ..

हो , मात्र ती पांढरी गाय आणि डायना आहे स्मरणात .. अजूनही !

ओढ पैठणीची

कपाटं महागड्या साड्यांनी भरली तरी ' पैठणी ' ची कमी राहते. पैठणीशिवाय कलेक्शनला पूर्तता येत नाही असं मानणाऱ्यांपैकी आहे नयना झवेरी... तिचं पैठणीचं वेड वेगळचं आहे. स्वत:साठी पैठणी घेतल्यावर तिचं हे वेड वाढलं आणि त्यातूनच आकाराला आला नयनाचा पैठणीचा व्यवसाय. स्वत:हून पैठणी डिझाईन करून नयनाने आणली पैठणीत कल्पकता...

/photo.cms?msid=2217888


नयना झवेरी हे नाव अमराठी असलं तरी व्यक्ती मात्र पूर्णत: मराठी मातीत वाढलेली आणि महाराष्ट्राबदद्ल प्रेम-आपुलकी असणारी. खरंतर मराठी तिची मातृभाषा नाही तरीही महाराष्ट्रात वाढलेली नयना ' मी महाराष्ट्रीय आहे ' असं अभिमानाने सांगते. तिच्या या महाराष्ट्र प्रेमातूनच तीने येथील पैठणीचा प्रचार आणि प्रसार करायचा ठरवलं. नयना केवळ नावापुरती अमराठी राहिली आहे बाकी आपले सगळे मराठी सण-वार , व्रत-वैकल्य ती इथल्या परंपरेप्रमाणे साजरे करते. महाराष्ट्राची पैठणी सर्वत्र पोहोचावी या उद्देशाने तीने अनेक अमराठी ग्राहक जोडले आहेत. पैठणी प्रामुख्याने गडद रंगात मिळते. गडद जांभळा , गडद लाल , गडद हिरवा , काळा किंवा गडद निळा वगैरे रंग पैठणीत हमखास पाहायला मिळतात. पण नयनाने या रंगांबरोबरच काही फिकट रंग पैठणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला ग्राहकांकडून विशेषत: तरूण महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नयना सांगते , ' पैठणी साडी केवळ प्रौढ महिलांमध्येच नव्हे तर आजच्या वेस्टर्न कपड्यांमध्ये वावरणाऱ्या तरुण मुलींनीही नेसली पाहिजे म्हणून मी त्यांना आवडतील असे रंग पैठणीत आणले आहेत. यात बेबी पिंक , पिस्ता , लव्हेंडर , फिका चटणी रंग , फिका ग्रे , पांढरा असे अनेक रंग पाहायला मिळतात. पैठणीचे दुपट्टे हा पर्यायही नयनाने तरुण मुलींसाठी उपलब्ध केला आहे. पैठणी साडीवरचे मोर , कुयरी , पोपट , पक्षांची जोडी , कमळ या डिझाईन्स तर आहेतच पण त्यापलिकडेही आणखी कुठल्या नवीन डिझाईन्स पैठणीत आणता येतील याचा विचार करणारी नयना झवेरी कमळाची कळी , वेलबुट्टी , सूर्यफूल , शंकरपाळे , चक्र , कणीस , डबल-सिंगल बॉर्डर अशा नवनवीन डिझाईन्स आणण्याचा प्रयत्न करीत असते. अमराठी ग्राहकांना पैठणीचं महत्त्व सांगावं लागतं पण एकदा त्यांनी पैठणी पाहिली की त्यांना घेण्याचा मोह आवरत नाही असा नयनाचा अनुभव आहे. तिच्या कलेक्शनचं प्रदर्शन पाहायला येणाऱ्या ग्राहकांमध्ये अनेक अमराठी ग्राहक असतात , त्यांना नयना महाराष्ट्राचं आणि पैठणीचं महत्त्व समजावून सांगत असते. पाच हजारापासून ते पन्नास हजारा पर्यंतच्या रेंज मध्ये नयना झवेरीच्या या पैठणी कलेक्शनची रेंज पाच हजारापासून सुरू होते ती पुढे पन्नास हजारापर्यंत जाते. यात असतात काही म्युझियम पीस अर्थात राजेशाही थाटातली पैठणी. काही असतात गडद रंगात तर काही पेस्टल कलर्समध्ये. नयना सांगते , '' रंग कुठलाही असो पैठणीचा बाज वेगळा , तिचा थाट वेगळा आणि तिची शान वेगळीच आहे त्यामुळेच माझ्या महाराष्ट्राची शान असलेली पैठणी डिझाईन करण्याचा मोह सुटत नाही की ही ओढ कमी होत नाही. प्रत्येक वेळी ती वाढत राहते. ''

- मनीषा नित्सुरे

म म मका

तेच ते मिलियन डॉलर स्माइल. ओठांवर उजव्या बाजूला तो वेड लावणारा तीळ. अवखळ निळे डोळे. लांबसडक केसांचं पाठीवर मोकळं रान. सडसडीत बांधा...जणू भरलेलं , रसरशीत मक्याचं सोनसळी कणीस! सिन्थिया त्या मक्याच्या शेतात उभी राहून खिदळत असताना एका प्रेस फोटोग्राफरनं तिला पाहिलं. नकळत त्यानं कॅमेरा सरसावला. क्लिक क्लिक क्लिक...

शेकडो एकरांच्या मक्याच्या शेतात खिदळणारा तो मुलींचा घोळका. पायात अँकल शूज. तोकडी तंग हॉट पँट आणि तेवढाच तोकडा टीशर्ट...भरलेली दाणेदार कणसं हेरायची. खुडायची. टोपलीत टाकायची. फर्लांगभर अंतरावरच्या सेंटरवर नेऊन टाकायची. संध्याकाळी रोकडे डॉलर्स घ्यायचे आणि टाऊनमधला एखादा पब गाठायचा...समर जॉब.

इलिनॉयमधल्या शेकडो पोरी समरमध्ये अजूनही हेच करतात. अगदी भरल्या घरातल्या मुली. तेवढाच मौजमजेला पॉकेटमनी. आईबापापुढे हात पसरायला नको.

इलिनॉय प्रांतातल्या डीकॅब इलाख्यात राहणाऱ्या सिन्थिया अॅन क्रॉफर्ड नावाच्या सोळा वर्षाच्या एका चलाख मुलीचा दिनक्रमही हाच होता. शाळेत पोरगी हुशार होती. विशेषत: गणितात. सटासट सम्स सोडवायची. केमिकल इंजिनीअरिंगला तिनं अॅडमिशनही मिळवली होती. तीही स्कॉलरशिपवर.

अशी ही सिन्थिया त्या मक्याच्या शेतात उभी राहून खिदळत असताना एका प्रेस फोटोग्राफरनं तिला पाहिलं. नकळत त्यानं कॅमेरा सरसावला. क्लिक क्लिक क्लिक...

त्या फोटोनं सिन्थियाच्या नशीबानं अफलातून वळण घेतलं. स्कॉलर सिण्डी इलिनॉयमधल्या घराघरात कौतुकाचा विषय बनली. कित्ती गोड फोटो!

तेच ते मिलियन डॉलर स्माइल. ओठांवर उजव्या बाजूला तो वेड लावणारा तीळ. अवखळ निळे डोळे. लांबसडक केसांचं पाठीवर मोकळं रान. सडसडीत बांधा...जणू भरलेलं , रसरशीत मक्याचं सोनसळी कणीस!

' इथं काय करतेस तू , गधडे. यू शुड बी इन न्यू यॉर्क ', त्या फोटोग्राफरनं तिला प्रेमानं झापलंच. वस्तुत: ती त्याला ' थँक्स ' म्हणायला गेली होती. त्यानं उलट केलेल्या उपदेशानं सिण्डी पार हडबडून गेली. खरंच , आपण इथं काय करतोय ?..

शिकागोतल्या एलिट मॉडेल एजन्सीमार्फत तिनं मॉडेलिंगच्या क्षेत्रात बिचकतच पाऊल टाकलं. मॉडेलिंग करावं. पैसा मिळवावा. पण ते पार्ट टाइम काम. नॉर्थवेस्टर्न युनिव्हसिर्टीतून केमिकल इंजिनीअरिंगची डिग्री मिळवण्याचा तिचा आटापिटा सुरूच होता.

... सो , न्यू यॉर्क. द बिग अॅपल. इथं आल्यानंतर सिण्डीला स्ट्रगलबिगल करावा लागलाच नाही. ती जाई त्या फॅशन हाऊसमध्ये तिचं स्वागतच होई. फॅशनची दुनिया हे असलं प्रकरण पहिल्यांदाच पाहात होतं. पुढच्या दोन वर्षात सिण्डीकडे एण्डॉर्समेण्ट्सचा पाऊस पडला. त्याच त्या स्मितासाठी ती खरोखर मिलियन डॉलर्स बिदागी घेऊ लागली. आणि दोन वर्षांनंतर तिच्या लक्षात आलं , अरे , आपण तर केमिकल इंजिनीअर होणार होतो , त्याचं काय झालं ?

त्याचं लोणचं झालं. सिन्थिया क्रॉफर्डची सिण्डी झाली. या रूपांतरात केमिस्ट्रीचा संबंध आलाच नाही.

आत्ता परवा , म्हणजे गेल्या आठवड्यात 20 फेब्रुवारीला सिण्डी अडतीस वर्षांची झाली. परवाच रशियाच्या दौऱ्यावर ती गेलेली दिसली. अजूनही तशीच! तेच स्मित. तीच मादकता. तोच उत्फुल्ल , उन्नत देह...आणि तोच आत्मविश्वास. 1986 सालापासून ती न्यूयॉर्कची ही चमकदमक अंगावर झेलते आहे. कॅमेऱ्यांचा चकचकाट तिला सरावाचा झालाय एव्हाना. जगभरातल्या किमान सहाशे मासिका-नियतकालिकांच्या मुखपृष्ठावर तिची छबी झळकली आहे. व्हॅनिटी फेअर किंवा प्लेबॉय , व्होगसारख्या मासिकांमध्ये सिण्डीची नग्नसुंदर छायाचित्र येऊ लागली ती याच सुमारास. नओमी कॅम्पबेल , क्लॉडिया शिफर , इव्हांजेलिस्टा... अशा अप्सरा तिच्या समकालीन म्हणून त्याच रॅम्प्सवर डौलात चालत होत्या. पण त्यांच्यातही हे सोनपंखी पाखरू उठून दिसत होतं.

प्लेबॉयमधले तिचे सेण्टरस्प्रेड्स अवघ्या युरोपातल्या तरुण खोल्यांच्या भिंतीवर चिकटले , ते अजूनही कुणी खरवडून काढले नसणार. एकांड्यांच्या खोलीत नेहमी मुक्कामाला असतं , एक गुंतागुंतीचं मन. त्या भयभीषण निबीड अरण्यात सैतानाची कार्यशाळा चालते. त्या सैतानी दुनियेला त्याच काळोखात विरघळवून टाकण्याचं सार्मथ्य भिंतीवरच्या अशा कॅलेण्डरात असतं. सिण्डीच्या अशा कित्येक छब्यांनी अशा कित्येक खोल्या आपल्या अस्तित्वानं उजळून टाकल्या आहेत.

सिण्डीचं गणित चांगलं होतं , हे मघा सांगितलंच. फॅशन शोज , जाहिरात मोहिमा , फोटो सेशन्स , अशा बारा वाटांनी येणारा पैसा गुंतवायचा कशात हे तिला अचूक कळलं. नओमी , क्लॉडिया वगैरेंसारखा तिनं तो पैसा फॅशन बार आणि बिस्ट्रोमध्ये गंुतवला नाही. हमखास दुभती गाय ठरणाऱ्या ' प्लॅनेट हॉलिवूड ' च्या साखळीत गुंतवला. ' रेवलॉन ' शी केलेला करार असाच फायदेशीर ठरला. वर्षातून फक्त वीस दिवस रेवलॉनचं प्रमोशन त्यासाठी चाळीस लाख डॉलर्स दरसाल तिनं बांधून घेतले. पेप्सी , के ज्वेलर्स अशी इतर जाहिरातींमध्येही सिंडीचाच चेहरा वापरला गेला. वन मिनिट मेकपची संकल्पना आणून तिनं जगभरातल्या यच्चयावत वकिर्ंग वीमेनना ऋणात बांधलं. एमटीव्हीवरचा तिचा फिटनेस शोही सहा वर्षं गाजत होता. तिचं मेकपवरचं पुस्तकही बेस्टसेलर आहे.

नव्वदीचं आख्खं दशक जगभर होती सिंडी , सिंडी , सिंडी.

याच दशकात तिला रिचर्ड गेअर भेटला. चार वर्षांच्या फिराफिरीनंतर त्यांनी लग्न केलं. सिंडी प्रेटी वूमन ठरली. आणखी चारेक वर्षांनी त्यांनी एका मोठ्या पेपरात पानभर जाहिरात दिली आणि आमचं कसं एकमेकांवर खर्रखुर्र प्रेम आहे ', हे जगाला ओरडून सांगितलं. त्यानंतरच्या तिसऱ्या महिन्यात सिण्डीनं घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल केला! ' सेक्सिएस्ट कपल ऑफ द इयर ' ची अशी वासलात लागली.

रॉबर्ट डी निरोबरोबर काही वर्षं सिण्डी फिरली. बिव्हलीर् हिल्सच्या तारांकित पाटर््यांमध्ये त्याच्या हातात हात अडकवून स्मितं आणि चुम्मे फेकताना दिसायची. पण तेही मागे पडलं आणि एका पबच्या मालकाशी तिनं लग्न लावून टाकलं फटक्यात.

बुध्दी आणि सौंदर्य. अचूक गणित आणि हळवं मन...सिण्डीकडे एकटीकडे हे सगळं आहे. तिचा लहान भाऊ जेफ चार वर्षांचा असताना ल्युकेमियानं गेला.त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ ती दरवषीर् लाखो डॉलर्सची मदत देते...

आताचा जमाना सिण्डीचा नाहीए. फॅशनच्या दुनियेत वेगळे चेहरे आणि देह आले आहेत. त्यातले काही सिंडीपेक्षा सरस असतीलही.

... पण त्यांना मक्याच्या भाजक्या भुट्ट्यासारखा खमंग वास नाही!

प्रवीण टोकेकर

निगेटिव आमीर - Negative role of Aamir Khan

आमीर खान... सध्याचा सगळ्यात लाडका नट.

त्याच्या करिअर ग्राफमधले चढउतार लोकांनी पाहिले. पण लोकप्रियतेची कमान सतत उंचावत राहिली. इतर नटांच्या तुलनेत वाद कमी वाट्याला आले. त्यामुळेच आमीर नशीबवान म्हणायला हवा. राजा हिंदुस्तानीतल्या ' टॅक्सी ड्रायव्हर'ने सुरू झालेल्या दुसऱ्या इनिंग्जमध्ये तो यशस्वी धाव घेतोय. 'फनाह'मध्ये तो गाइड कम दहशतवाद्याच्या रूपात दिसणार आहे.

आमीरला स्वत:च्या उंचीबाबत न्यूनगंड होता. आपल्याला लोक अभिनेता म्हणून स्वीकारतील का, असं त्याला नेहमी वाटत होतं. मन्सूर खानने 'कयामत से कयामत'ची जुळवाजुळव करताना तो हिरो बनण्याच्या कल्पनेने तो सुखावला. पण उंचीची कमी त्याला डाचत होती. कयामत से... च्या आधी त्याने 'होली' मध्ये रोल केला होता. अभिनय आपल्याला जमतोय याची खात्री होती पण अभिनेता म्हणून लोक स्वीकारतील की नाही याबाबत धाकधूक होती. त्यामुळेच मग भल्यामोठ्या पोस्टर्सवर दोन चेहरे पाहून लोक थिएटरमध्ये जरा शासंक होऊन गेले. पण 'एक दुजे के लिए' थाटाची ही नवी प्रेमकथा तरुणांनी डोक्यावर घेतली. आमीरचा चेहरा फ्रेश होता. त्यामुळे प्रेमकथेत शोभून दिसला. चित्रपटसृष्टीत खान पर्व सुरू होण्याचा तो मुहुर्त होता.

आमीर खानला मिळालेली ही लोकप्रियता त्याला भांबवणारी होती. त्यामुळे त्या काळात त्याने केलेल्या भूमिकांची निवड चुकली. वेगळे प्रयोग करण्याची हौस त्याला होती. प्रेमकथा आणि जुही चावला अशा त्याच त्याच साच्यात तो गरगरला. लागोपाठ चुकीच्या भूमिका केल्याने प्रेक्षकांनीही त्याच्याकडे लगेचच पाठ फिरवली. अनेक कलाकारांना यशाचा ग्राफ कायम ठेवणं कठीण जातं तेच आमीरच्या बाबतही घडलं.

आमीरला लव्हरबॉय किंवा चॉकलेट बॉय या इमेजमध्ये अडकणं आवडत नव्हतं. त्यामुळेच 'राख' सारखा वेगळा सिनेमा त्याने कारकिदीर्च्या सुरुवातीलाच स्वीकारला. त्याच वेळी त्याला कळलं होतं. ग्रे शेड असलेल्या भूमिकांच्या वाटेला जाणं धोक्याचचं. आता मात्र परफेक्शनिस्ट आणि हिट सिनेमा देऊ शकणारा हुकमी स्टार असा तोरा मिरवणारा तो एकमेव नट झाला आहे. त्यामुळे अशी रिस्क तो सहज घेऊ शकतो आहे. खरं तर 'राजा हिंदुस्तानी'पर्यंत यश-अपयश अशा हिंदोळ्यावर सतत होता. आमीर खान आता आपल्या बळावर गदीर् खेचू शकतो.

' दिल है के मानता नही' किंवा 'जो जिता वही सिंकदर' या सिनेमाने त्याच्यातलं ग्लॅमर आणि अभिनय काय आहे हे दाखवून दिलं होतं. 'दिल', 'हम है राही प्यार के' अशा सुपरहिट सिनेमातही आमीर खान होता. 'रंगीला'मुळे तर तो घोस्ट दिग्दर्शकाच्या भूमिकेतही शिरला. राम गोपाल वर्मासारख्या दिग्दर्शकाला आपणच शॉट कसा घ्यायचा असं सांगत होतो, नाही तर त्याला हिंदीतले डायलॉग तरी समजतात काय, असा सांगून आमीर दिग्दर्शकापेक्षाही मोठा होत गेला. मग आमीरच्या सिनेमात आमीरशिवाय कोणाला फारसं महत्त्वच उरलं नाही. 'राजा हिंदुस्तानी'ने त्याचा सिनेमा म्हणजे तोच असं गणित झालं. हा सिनेमा म्हणजे त्याची दुसरी इनिंग्जच होती. पण त्यानंतरचा त्याचा प्रवास फक्त त्याच्या एकट्याचा होता. इंडस्ट्रीतल्या इतरांना मागे टाकून तो कधीच पुढे निघून गेला होता. हे सगळं एका रात्रीत घडलं नव्हतं. त्याची परफेक्टनिस्ट होण्याची ती वाटचाल होती. सगळ्या दिग्दर्शकांपेक्षाही तो मोठा होत जाणं सर्वस्वी त्याच्यामुळेच घडलं होतं. स्वत:च्या स्क्रीन प्रेझेन्सबाबत तो कमालीचा जागरूक झाला. सिनेमाची कथा साधी असली तरी त्यात जान ओतण्याचं काम त्याने केलं. नाही तर गुलाम सिनेमात असं काय वेगळं जेणेकरून तो हिट व्हावा. मोठ्या दिग्दर्शकांनी नेहमीच त्याच्याकडे पाठ फिरवली. विक्रम भट, फरहान अख्तर, जॉन म्यॅथ्यू मथाई अशा नव्या दिग्दर्शकांनाही तो स्टारपद देऊन गेला आहे. 'सरफरोश' तर त्याने स्वत:च्याच खांद्यावर वाहून घेतला. 'गुलाम'मध्येहीत्यानेच पडदा व्यापून राहिला होता. मग त्याचं उंचीने कमी असणंही लोकांनी फारसं मनावर घेतलं नाही.

आमीर खानच्या प्रत्येक सिनेमाबरोबर त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. त्याची ढवळाढवळ आता दिग्दर्शकांना मोलाची वाटायला लागली. 'दिल चाहता है' सिनेमाने तर एकूण सिनेमाचं रूपडंच बदललं. आमीर प्रमुख भूमिकेत असल्याने आपल्यामुळेच सारं काही घडलं हे तो सांगू शकत होता. मग 'लगान'सारखा महत्त्वाकांक्षी सिनेमाही आला. आशुतोष गोवारीकरच्याऐवजी आमीरनेच दिग्दर्शनाचा भार उचलल्याची चर्चा झालीच. 'लगान'चं यश दिग्दर्शकाऐवजी आमीरच्या नावावर जमा झालं. 'मंगल पांडे -द रायझिंग' सिनेमा चालला नाही. पण त्यासाठी आमीर जबाबदार नव्हताच मुळी.

आमीर खानच्या करिअरमध्ये 'रंग दे बसंती'च्या निमित्ताने पुन्हा एकदा एक यश जमा झालं. ग्रे शेडच्या भूमिका करायला घाबरत नाही, हे 'राख' आणि '1947-अर्थ'च्या निमित्ताने त्याने स्पष्ट केलंच होतं. पण यश मिळालं नाही. 'फनाह'मध्ये काजोलच्या प्रेमात पडलेला गाइड कम दहशतवादी रंगवला आहे. आता या निमित्ताने यश मिळतय का ते पाहायचंय एवढंच.

- अपर्णा पाटील

विम्बल्डनच्या तृणांगणावरील 'लव्ह-ऑल' Love on Wimbledon tennis court

प्रेमी युगुलांच्या आख्यायिका या जगाला अजिबात नव्या नाहीत. प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे प्रेमवीर या भूतलावर कमी नाहीत. प्रेम कुठेही फुलते , त्याला केवळ हवे असते एकमेकांना समजून घेणारे मन... विंबल्डनच्या तृणांगणावरही अशाच काही प्रेमकथा फुलल्या. ' लव्ह-ऑल ' चा हा खेळ खेळलेल्या या प्रेमकहाण्यांचा गोषवारा...

दुहेरी लव्हस्टोरी...
जिमी कॉनर्स आणि ख्रिस एव्हर्ट

Love Story @ Wimbledon
१९७४ च्या चँपियनशिपच्या बाबतीत दोन गोष्टी प्रामुख्याने खास होत्या. जिमी कॉनर्स आणि ख्रिस एव्हर्ट ह्यांचं गाजत असलेलं प्रेम प्रकरण. त्या वर्षीची एकेरीची टायटल्स जिमी कॉनर्स आणि ख्रिस एव्हर्ट या अमेरिकन्स आणि विशेषकरून दोघेही बॅकहँड मारताना दोन्ही हातांचा वापर करण्याच्या तंत्रामुळे लक्ष्य वेधलेल्या या वाड्:निश्चय झालेल्या जोडप्यानी जिंकली.

टेनिस विश्वात सर्वोच्च स्थानी असलेले जिमी कॉनर्स (जिंबो) आणि ख्रिस एव्हर्ट यांचे १९७३च्या हिवाळ्यात लग्न ठरले. प्रेमात आकंठ बुडालेले तरुण जोडपे , फ्लँबॉयंट जिमी कॉनर्स आणि मनोवेधक ख्रिस एव्हर्ट या दोघांनी १९७४ साली विम्बल्डनची अनुक्रमे पुरुष आणि महिलांची विजेतेपद जिंकल्यानंतर "चँपियन्स बॉल डान्स" मध्ये भाग घेतला. त्यांनी १९७४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या त्यांच्या विवाहाच्या तारखेची घोषणा केल्यावर ' द लव्ह मॅच ' अशा शीर्षकांनी जगभरातील वृत्तपत्रे सजली.

जिमी कॉनर्स आणि ख्रिस एव्हर्ट यांनी तारीख ठरल्यावर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. परीकथेतील वाड्:निश्चय रद्द झाला तरी काही काळ ते दोघे एकत्र रहात होते आणि त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण १९७६ च्या सुरुवातीला त्यांचा विवाह होण्याच्या सर्व आशा मावळळ्या. दोघांना गृहस्थाश्रमापेक्षा आपापली कारकीर्द आणि विश्वात पहिल्या क्रमांकावर राहण्याची मनिषा महत्त्वाची वाटली.

वर्ल्ड चँपियन प्रतियोगी साध्य होण्यासाठी त्याग करावा लागतो आणि त्यांच्याबाबतीत नेमके हेच घडले. सट्टेबाजांनी वाड्:निश्चय झालेल्या ' लव्ह डबल्स ' जोडप्यावर ३३-१ अशी बोली लावली होती. शेवटी जिमी कॉनर्स आणि ख्रिस एव्हर्ट एकमेकांच्या विवाहबंधनात अडकले नाहीतच!

.........................................

दो हंसो को जोडा बिछड गयो रे!
किम क्लायस्टर्स-लेटन ह्युईट

Love Story @ Wimbledon
किम क्लायस्टर्स-लेटन ह्युईट यांच्या प्रेमाची कहाणीही अशीच अधुरी राहिली. दोघेही कारकिर्दीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना एकत्र आले. मैत्री व्हाया डेटिंग प्रेमात कधी रुपांतरीत झाली ते कळलंच नाही. सगळं छान सुरू होतं. २००१ मध्ये अमेरिकन ओपन , तर २००२मध्ये ह्युईटने विम्बल्डन जिंकली होती. किमदेखील स्पर्धांगणिक उत्तम कामगिरी करत होती. २००३च्या डिसेंबरमध्ये ख्रिसमसपूर्वी त्यांनी साखरपुडाही केला. यानंतर या जोडीला न जाणे कोणाची दृष्ट लागली. आधी अफवा आल्या , चर्चा रंगल्या अन् दोघांनी नात्याला ' दी एन्ड ' दिला.

फेब्रुवारी २००५मध्ये ठरलेलं लग्नही रद्द झालं. या प्रकारानंतर ह्युईटने ऑस्ट्रेलियन अभिनेत्री बेक कार्टराईटशी संसार थाटला. पण कदाचित मनातलं दु:ख त्याला सतावत होतं , त्याचा खेळ ढेपाळला. किमने मात्र आपला करिअर ग्राफ उंचावता ठेवला होता. दरम्यान थोड्याफार दुखापतींनी पिच्छा पुरवल्याने तिने निवृत्ती जाहीर केली , अन् अमेरिकन बास्केटबॉलपटू ब्रायन लिचशी विवाह केला. अलीकडेच पुनरागम करत तिने अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. सुदैवाने दोन खेळाडू जोडप्यांमध्ये कुठे न कुठे आड येणारा अहंकार यावेळी किम व ब्रायन यांच्यामध्ये नव्हता.

.........................................

मेड फॉर इच अदर...
आंद्रे आगासी-स्टेफी ग्राफ

Love Story @ Wimbledon
टेनिसच्या इतिहासात स्टेफी व आंद्रे या दोघांनी आपल्या करियर मध्ये चारही ग्रँडस्लॅम्स तर जिंकलेच पण त्यांनी ऑलिंपिक्स मध्ये सुवर्णपदक सुद्धा मिळवले. तसे बघायला गेले तर स्टेफी आणि अगासी ही विरोधी व्यक्तिमत्त्वाची टोकं होतं. स्टेफी मुळातच शांत आणि संयमी तर अगासीचं व्यक्तिमत्त्व फ्लँबॉयंट. अगासीचं फ्लँबॉयंट असणं हा तमाम फिमेल फॅनचा जिव्हाळ्याचा विषय होता.

अगासीने टेनिसपटूंनी स्टाइलिश कसं राहावं , हे शिकवलं होतं. खेळाव्यतिरिक्त स्टेफीचं आयुष्य फारच साधं होतं. त्यामुळेच रेसर मायकल बार्टलशी काही काळ असलेलं तिचं अफेअर लोकांसमोर आलं नाही. स्टेफी ग्राफला आपले आयुष्य आनंदी होईल असे कधीच वाटले नाही , तिचे जीवन नेहमीच चिंतनशील आणि स्पर्धात्मकतेचे दिलखेचक मिश्रण होते.

१९९९च्या फ्रेंच ओपन स्पर्धा सुरु होई पर्यंत स्टेफी आंद्रेशी बोलतसुद्धा नसे. स्टेफी आणि आंद्रे यांचा विवाह व्हावा अशी आंद्रेचा कोच ब्रॅड गिल्बर्टची इच्छा होती. त्यासाठी त्याने प्रयत्नही केले. योगायोगाने १९९२चा विम्बल्डन पुरुष एकेरीचा विजेता आंद्रे अगासी सारखा पुरुष तिच्या जीवनात आला आणि शेवटी त्याचे रुपांतर विवाहात झाले.

२२ ऑक्टोबर २००१ साली लास वेगास येथे एका खाजगी समारंभात स्टेफी व आंद्रे विवाहबद्ध झाले आणि ह्या घटनेला फक्त दोघांच्या मातोश्री उपस्थित होत्या. लग्न सोहळ्यानंतर संयुक्त विधान करताना स्टेफी आणि आंद्रे म्हणाले , " आम्ही जीवनाचा एक नवीन अध्याय सुरु केला आहे. आमच्या सोहळ्याचा एकांतपणा आणि जवळीक खूप सुंदर होती आणि त्यात आमची मुल्ये प्रतिबिंबित होत होती.

आंद्रे म्हणाला , " हा क्षण येण्यापूर्वी फार वर्षापूर्वी त्याच्या पत्नीला(स्टेफनीला) भेटायला आवडले असते". अगासी लांबूनच स्टेफीला न्याहाळायचा व तिला पूज्य मानायचा आणि तिचे त्याला नेहमीच कौतुक वाटे. त्याने तिला १९९२च्या विम्बल्डनमध्ये बघितले त्यावेळी तो २२ वर्षाचा होता. आंद्रेने आपल्या व्यवस्थापकाद्वारा विचारणा केली कि , त्याला स्टेफनीशी त्याला हस्तांदोलन करता येईल का ? यास स्टेफनीने नम्रपणे नकार दिला. आंद्रेला समजून चुकले की जर १९९२च्या विम्बल्डन मध्ये तो पुरुष एकेरी आणि स्टेफी महिला एकेरी विजेती ठरले तरच दोघांची भेट घडू शकेल.

१९९२ साली विम्बल्डनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवल्यानंतर , स्टेफीशी गाठ-भेट होणार या संकल्पनेमुळे आंद्रे हर्षोत्फुल झाला. ज्या क्षणाची तो आतुरतेने वाट पहात होता तो क्षण रात्री येणार असल्यामुळे आंद्रे त्याच धुंदीत होता! आंद्रेने विम्बल्डनच्या सदस्यांना "बॉल डान्स" कधी सुरु होणार याची विचारपूस केली. "बॉल डान्स" रद्द करण्यात आल्याचे सांगितल्यावर आंद्रेचा चांगलाच हिरेमोड झाला. सरतेशेवटी सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर १९९९च्या फ्रेंच ओपन स्पर्धेत दोघांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांची विजेतेपद जिंकल्यानंतर , आंद्रेला स्टेफी बरोबर "बॉल डान्स" करायची संधी मिळाली!

आगासीशी लग्न करण्याचा निर्णय घेताच स्टेफीने व्यावसायिक टेनिसला रामराम ठोकला. स्टेफीने टेनिस मधून आपली निवृत्ती जाहीर केली तेव्हा अमेरिकेचा आंद्रे अगासी हा स्टार टेनिसपटू सूर हरवलेल्या अवस्थेत होता. स्टेफीशी विवाह करण्या अगोदर आंद्रेचा ब्रुक शील्ड्स या नटीशी विवाह झाला होता , पण तो टिकला नाही. आंद्रेचा ब्रूक शिल्डबरोबरचा लक्षवेधक विवाह दोन वर्षापेक्षा कमी टिकला पण तत्पूर्वी त्याचे त्याच्यापेक्षा २३ वर्षांनी मोठ्या असलेल्या बार्बरा स्ट्रीसँड बरोबरचे प्रेम प्रकरण बहुचर्चित झाले होते. ब्रुक शिल्डपासून विभक्त झाल्यानंतर मात्र सारं बदललं. केसांच्या वेगवेगळ्या स्टाइल्स आणि रंगबेरंगी कपड्यातला त्याचा ' अवतार ' संपला होता. तुळतुळीत गोटा आणि मॅच्युअर अगासी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. याचं कारण बहुधा स्टेफी असावं , हे थोड्याच दिवसांत कळलं.

टेनिस मधून निवृत्त झाल्यावर स्टेफी ग्राफला आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले तेव्हां आंद्रे म्हणाला , ज्या व्यक्तीने माझ्या जीवनाचा संपूर्णपणे कायापालट केला तिच्याबद्दल बोलण्यासाठी मी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आंद्रे त्याचे स्टेफीवरील प्रेम कुतूहलतेने , एकनिष्ठपणे , हृदयापासून आणि मनापासून व्यक्त करतो. आंद्रे पुढे म्हणाला "स्टेफनी मला नवल वाटते ज्या तऱ्हेने तू तुझे टेनिस जीवन जगलीस आणि माझ्या जीवनात जे बदल तू घडवून आणलेस , त्याला न्याय देण्यासाठी माझ्याकडचे शब्द अपुरे पडतात!"

१९९२ सालच्या "विम्बल्डन चँपियन्स डिनर" च्यावेळी आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफचे काढलेले सुप्रसिद्ध छायाचित्र जणू येणाऱ्या काळाची नांदी होते. सात वर्षानंतर , स्टेफी आणि आगासी यांची प्रेमकथा १९९९च्या फ्रेंच ओपन स्पर्धे दरम्यान फुलल्याची चर्चा आजही होतेच. या दोघांनी १९९९ मध्ये आपापल्या विभागात एकेरीत जेतेपदाचा मान मिळवला होता आणि त्यानंतरच ते प्रेमात पडले आणि ही जोडी आजतागायत अतूट आहे.

स्टेफी आणि आगासी या दोघांची संसारवेल बहरली असून त्यावर दोन चिमुकली फुले उमलली आहेत. दोन मुलांचे आई-वडील असलेल्या स्टेफी आणि आंद्रे यांचा संसार सुखात सुरू आहे. सध्या टेनिस जगतात आंद्रे आगासी आणि स्टेफी ग्राफ यांची प्रेमकथा आता परिकथा झाली आहे!

कामप्रेरणा आणि साहित्य

आत्मसंरक्षणाच्या प्रेरणे-नंतर मानवी जीवनातील अत्यंत प्रभावी प्रेरणा म्हणजे कामप्रेरणा. हिचा परिचय अगदी बालवयातच मला झाला; कारण रामायण, महाभारत आणि श्रीकृष्ण चरित्र यातल्या कथा मी वाचल्या होत्या किंवा मला सांगितल्या गेल्या होत्या आणि त्यात ही अत्यंत प्रभावी प्रेरणा मला नाना संदर्भात व स्वरूपात भेटली होती. मत्स्यगंधाच्या सौंदर्याने मोहित होऊन तिच्याशी कामक्रीडा करणारा पराशर ऋषी, यमुनेत स्नान करायला गेलेल्या गोपींची किनाऱ्यावरची वस्त्रे लपविणारा श्ाीकृष्ण, त्यानं गोपींशी केलेल्या क्रीडा आणि पुढे त्याची व रुक्मिणीची प्रेमकथा, अहिल्येला फसवून तिचा संभोग घेणारे देव, विश्वमित्राचा अप्सरेनं केलेला तपश्चर्याभंग... जाऊ दे. अशी यादी करत राहिलो तर दहा पानं तरी सहज भरतील. पुराणातच नव्हे, तर इतिहासातदेखील अशा असंख्य प्रेमकथा आहेत. त्यामुळे कामप्रेरणा किती प्रभावी आहे, माणसाला मोहित करणारी आहे ते मला कळलं आणि तिचा परिचय व्हावा, तिचा अनुभव घ्यावा असं मला वाटू लागलं.

माझ्या जीवनात ती विचित्र प्रकारे आली. आमच्या गावाजवळच्या आवास गावात एक नागोबाचं देऊळ होतं. तेथे दरवषीर् जत्रा भरत असे. त्यावेळी आम्ही गावात असलो तर जत्रेला जात असू. गावच्या माझा मित्र बापू मला सांगायचा की, त्या देवळात नागोबा प्रत्यक्ष असतो आणि कधी कधी भाविकांच्या दृष्टीस पडतो. तो म्हणे मनगटाएवढा जाड आहे आणि त्याच्या अंगावर केस आहेत.

नंतर काय झालं, तो नागोबा माझ्या स्वप्नात आला आणि माझ्यावर प्रसन्न होऊन मला त्याच्या अंगाला हात लावायला देऊ लागला. इतकंच नव्हे तर माझ्याबरोबर माझ्या बिछान्यात झोपू लागला. त्याच्या आणि माझ्या मैत्रीच्या अनेक कथा माझ्या मनानं निर्माण केल्या आणि त्या कथा सारख्या माझ्या मनात घोळत राहू लागल्या.

त्या वयात माझ्या मनात एक स्वप्नसृष्टी निर्माण होत होती. त्या सृष्टीत नंतर एका लावण्यवती स्त्रीनं प्रवेश केला. तिचंही त्या नागोबावर प्रेम होतं आणि ती, मी आणि तो नागोबा यांच्या अनेक कथा माझ्या मनात निर्माण होत होत्या किंवा माझं मन त्या निर्माण करीत होतं.

कामप्रेरणेची जागृती अशाप्रकारे माझ्या मनात सुंदर स्वप्नसृष्टीच्या रूपानं होत असता माझ्या वर्गातल्या मुलांच्याही मनात ती जागृती होत होती; पण ती अगदी वेगळ्या प्रकारे होत होती. निदान मला तसं तेव्हा वाटलं. ते लैंगिक अनुभवाविषयी अतिशय टवाळपणे बोलायचे आणि ख्व्या ख्व्या करून हसायचे. प्रत्यक्ष लैंगिक समागम कसा असेल ते हातवारे करून दाखवायचेे. रस्त्यातून सुंदर स्त्री जाताना दिसली की, तिच्याविषयी अश्लील बोलायचे. आपलं अमक्या पोरीवर इंप्रेशन पडलं असं सांगायचे. तिच्यावर आपण लाइन मारतो आहे असं म्हणायचे आणि अमकी पोरगी आपल्यावर खुश झाली, तमकी आपल्याकडे पाहून हसली असं सांगायचे. काही तर आपण त्याच्याही पुढे गेलो असं हलक्या आवाजात सांगायचे. लैंगिक जागृतीविषयी असं बोलणं मला आवडत नसे आणि असेही. त्यांचं बोलणं ऐकलं म्हणजे अंग शिरशिरायचं.

रोमिओ अँड ज्युलियट या नाटकात शेक्सपिअरनं प्रीतीच्या या दुहेरी आविष्काराचं अतिशय वास्तव आणि प्रत्ययकारी दर्शन घडवलं आहे. पण मध्येच तिच्याविषयी टवाळखोर शेरे कोणीतरी मारतं आहे, असं दाखवलं आहे. पहिल्यांदा ते नाटक वाचताना मला हे चमत्कारिक, रसभंगकारक वाटलं. पण नंतर ते किती वास्तवदशीर् आहे ते पटलं. शेक्सपिअर हा फार थोर लेखक आहे, याचा पुन्हा प्रत्यय आला.

त्या काळात मी दोन पातळ्यांवर जगत असे. एक व्यावहारिक पातळी किंवा वास्तवाधिष्ठित पातळी आणि दुसरी स्वप्नांच्या विश्वातली पातळी.

पुढे मी मोठा झालो. माझा प्रेमविवाह झाला तेव्हा स्वप्नांच्या विश्वातून मी बाहेर पडलो; पण तरी मी सतत मनाच्या एका पातळीवर कल्पित विश्वात असतो. माझं मन सतत काहीतरी कल्पित असं निर्माण करीत असतं. याचं उदाहरण एका व्याख्यानात विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आणि ऐकून ते खळखळून हसले होते.

त्याचं काय झालं, मी गोव्यात एका हॉटेलात उतरलो असताना मला कोकिळेचं कुहू-कुहू कंुंजन ऐकू आलं. मग त्याच्या मागोमाग कावळ्याचा कर्कश आवाज ऐकू आला. मग दबक्या आवाजात दुसऱ्या कावळ्याचं ओरडणं ऐकू आलं. याचा माझ्या मनानं असा अर्थ लावला की, कोकिळेचं कुहू कुहू असं कुंजन ऐकून कावळी कर्कश आवाजात आपल्या नवऱ्याला सांगू लागली. 'पहा, किती दुर्बळ कुंजन आहे या कोकिळेचं आणि मी पहा कशी जोरदार आवाजात ओरडते आहे. मग श्रेष्ठ कोण, कोकिळा की मी? मीच श्ाेष्ठ आहे हे कोणीही कबूल करील.' तेव्हा तिचा नवरा असलेला कावळा दबक्या आवाजात म्हणाला, 'हो. हो.'

असं माझं मन अखंडपणे कथांची निमिर्ती करीत असतं. आता कथा लिहायची आहे, काय बरं लिहावी, असा सुदैवानं मला प्रश्नच पडत नाही. या स्वप्नसृष्टीचं मूळ कामप्रेरणेत आहे.

- गंगाधर गाडगीळ

कला-सौंदर्याचे लेणे Art of caves

भारतातीलच नव्हे, तर जगातील शिल्पसौंदर्याचा परमोच्च आविष्कार असलेल्या अजिंठा लेण्यांच्या परिसरात एकोणिसाव्या शतकात एक अद्वितीय प्रेमकथा आकाराला आली. अजिंठ्याचा शोध लागल्यानंतर तिथल्या शिल्पांची चित्रं काढण्यास आलेला रॉबर्ट गिल नावाचा इंग्रज अधिकारी आणि पारो नावाची अजिंठ्याची लेक यांच्यातील ही अभूतपूर्व प्रेमकथा त्या परिसरात कैक वर्षं एक दंतकथा बनून राहिली होती. विख्यात निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी 'अजिंठा' नावाचं खंडकाव्य लिहून ही कहाणी साहित्यसृष्टीत अजरामर केली. या काव्यावर सिनेमा करण्याचा मोह अनेकांना झाला. एक प्रख्यात मराठी दिग्दर्शक या कथेवर सिनेमा काढणार, अशी अनेक वर्षं चर्चा होती. मात्र, ती चर्चाच राहिली. शेवटी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी ही कलाकृती एखादं स्वप्न साकारावं, तद्वत रूपेरी पडद्यावर आणली आहे. नितीन देसाईंचा चित्रपट म्हटला म्हणजे देखण्या चित्रचौकटी आल्याच. प्रत्येक फ्रेममध्ये होणारी विविध रंगांची मनमोहक उधळण, उच्च निर्मितीमूल्यं, अभिजात संगीत आणि विषयावर प्रेम करून केलेली सुंदर निर्मिती यामुळं 'अजिंठा' हे रूपेरी पडद्यावरचे देखणे लेणे झाले आहे.

हा मराठी/इंग्लिश चित्रपट पाहताना आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती पाहत आहोत, असे सतत जाणवत राहते. भव्य सेट्स, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सजवलेल्या फ्रेम्स, खिळवून ठेवणारे छायाचित्रण यांच्या साह्याने मराठी चित्रपटाने घेतलेली ही भरारी पाहणे खूप सुखद वाटते. एखादी कलाकृती पाहताना आपण समृद्ध होत असल्याची जाणीव म्हणजे त्या कलाकृतीच्या श्रेष्ठत्वाची पावती असते. नितीन देसाईंचा 'अजिंठा' या निकषावर पूर्णपणे उतरतो. पहिल्या शिकारीच्या दृश्यापासून ते शेवटच्या पं. सत्यशील देशपांडेंच्या भैरवीपर्यंत (संपूर्ण नामावली संपेपर्यंत) प्रेक्षक जागचे हलत नाहीत, ही दादच पुष्कळ काही सांगून जाते.

' अजिंठा'चं निम्मं यश त्यातल्या 'युनिक' कथेतच आहे. दिग्दर्शकानं ही कथा पडद्यावर आणताना, जगातील सवोर्त्तम शिल्पकृतीच्या सान्निध्यात ती घडते आहे, याचं भान कुठंही सोडलेलं नाही. त्यामुळं अजिंठ्यातली ती भव्य, नि:स्तब्ध करणारी बुद्धलेणी कायम नेपथ्यासारखी कथेची सोबत करीत राहतात. कथेचा नायक इंग्रज अधिकारी असल्यानं तो पूर्णपणे इंग्लिशमध्येच बोलताना दाखविला आहे. कथेची सोय म्हणून त्याला मराठीत बोलता केलेला नाही. त्यामुळं त्याचं आणि पारोचं अक्षरश: शब्दांपलीकडं जाणारं प्रेम खूपच ठळकपणे व्यक्त होतं. रॉबर्ट आणि अन्य गावकरी यांच्यातील संवाद थोडा तरी सुसह्य व्हावा, यासाठी इथं जलालुद्दीन नावाच्या दुभाष्याची योजना आहे. शिवाय रॉबर्टला अजिंठ्याच्या चित्रांमागचा इतिहास सांगण्यासाठी विश्वंभरशास्त्री नावाचे पात्र कथेत येते. या दोन्ही पात्रांमुळं कथा प्रवाही होण्यास मदत झाली आहे. क्वचित या दोघांचा वावर गरजेपेक्षा अधिक वाटतोही; पण फारच थोडा वेळ.

या चित्रपटाला संगीत कौशल इनामदार यांनी दिलं आहे. सुमारे १० गाणी सिनेमात आहेत. त्यातील प्रत्येकाविषयी लिहायचं, तर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. तरीही होळीची गाणी आणि पं. सत्यशील देशपांडे यांनी गायिलेली 'सरण जळताना' ही भैरवी यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढं जाता येणार नाही. एकोणिसाव्या शतकाचा आणि तत्कालीन ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा बाज नेमका पकडणारं हे संगीत कथेत छान मिसळून गेलं आहे. ना. धों. महानोर यांच्या गीतरचना अनुभवाव्या अशाच. एकूणच या सिनेमाची ऑडिओ सीडीही संग्राह्य होणार, यात शंका नाही.

याचा अर्थ हा सिनेमा १०० टक्के परिपूर्ण आहे, असे मात्र नाही. काही 'पॉलिटिकली करेक्ट' गोष्टी दिग्दर्शकाने दाखविल्या आहेत, हे अगदीच जाणवतं. मध्यंतरापूर्वी कथेचा वेगही काहीसा मंदावल्यासारखा वाटतो. तसंच गाण्यांचा भडिमार होतोय की काय असंही वाटतं.

अभिनयात फिलिप स्कॉट वॉलेस यानं रॉबर्ट गिलची भूमिका खूपच समरसून केली आहे. रॉबर्टचं कलासक्त मन आणि अजिंठ्याच्या चित्रांमागचं तत्त्वज्ञान समजून घेता घेता भारताच्या प्रेमात पडणारा अधिकारी त्यानं समजून साकारला आहे. विश्वंभरशास्त्री एकदा त्याला बुद्धाचं तत्त्वज्ञान समजावून सांगत असताना, तो भारताचं वर्णन करतो- 'हा देश रसरशीत जगण्यानं भरलेला आहे, शांतताप्रिय आहे, धबधब्यातून कोसळून पुन्हा आकाशाकडं उसळणाऱ्या थेंबासारखा विजिगीषू आहे, आध्यात्मिक आहे, अगदी विशुद्ध आहे... पारोसारखा!' त्याच्या या उद््गारांतून त्याचं व्यक्तिमत्त्वही प्रतीत होतं आणि त्यांच्या प्रेमकहाणीचंही.

सोनाली कुलकर्णी (ज्यु.) हिच्या आयुष्यातली 'मैलाचा दगड' ठरावी, अशी भूमिका तिला पारोच्या रूपाने मिळाली आहे. तिनंही या संधीचं सोनं केलं आहे. मूळच्या गोऱ्यापान सोनालीला या भूमिकेसाठी सावळ्या रंगात रंगावं लागलं आहे. पण त्या रंगाचा सगळा देखणेपणा तिनं अवघ्या देहात आणला आहे. 'बुद्धदेवांचं काम' म्हणून सुरुवातीला रॉबर्टला मदत करणारी, लहानपणीच आई-वडील गमावलेली, नंतर हळुवारपणे रॉबर्टला तन व मन अर्पण करणारी आणि त्याच्या वियोगानं व्याकुळ होणारी पारो तिनं अप्रतिम साकारली आहे.

मकरंद देशपांडे, अविनाश नारकर, मनोज कोल्हटकर आदींची कामेही पूरक. हिंदीत नेहमी दिसणाऱ्या मुरली शर्माने यातला गावाचा मुखिया, अर्थात खलनायक झोकात साकारला आहे.

कलासक्त आणि प्रेमावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी चुकवू नये, असेच हे कला-सौंदर्याचे लेणे आहे.

.........

निर्मात्या : नेहा व मीना देसाई

दिग्दर्शक : नितीन चंदकांत देसाई

पटकथा : नितीन देसाई व मंदार जोशी

संवाद : अभिराम भडकमकर

छायाचित्रण : राजीव जैन

संगीत : कौशल इनामदार

प्रमुख भूमिका : फिलिप स्कॉट वॉलेस, सोनाली कुलकणीर्, मकरंद देशपांडे, मनोज कोल्हटकर, रीना आगरवाल, मुरली शर्मा आदी.

प्रेमाची बोल्ड वळणं! Bold Turns of love

तो साठ वर्षांचा आणि ती केवळ अठरा वर्षांची... त्यांचं प्रेम जमतं. अमिताभ आणि जिया खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'नि:शब्द'ची कथा अशी थोडक्यात सांगता येईल. रामगोपाल वर्मा यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांनी अजिबातच स्वीकारली नाही. पण सरळमागीर् प्रेमकथांपेक्षा आडवळणाच्या प्रेमकथांचीच अधिक चर्चा होते. कारण अशा प्रेमकथांमध्येच अधिक थ्रिल आणि रंजकता असते. 'नि:शब्द' ही अशी पहिलीच प्रेमकथा नाही. यापूवीर्ही अशा बऱ्याच बोल्ड प्रेमकथा येऊन गेल्या आहेत.

प्रेमशास्त्र : दिग्दर्शक बी. आर. इशारा असं नाव वाचलं की सिनेमा सेन्सेशनल असणार, यात शंकाच नसते. खरंतर या नावाने काहीजण दचकायचे तर काहींच्या अपेक्षा पल्लवित व्हायच्या. या सिनेमात इफ्तेखारची तरुण पत्नी बिंदू देवआनंदकडे आकषिर्त होते. तो इफ्तेखारचा तरुण सेक्रेटरी असतो. त्याच्या तारुण्यावर बिंदू भाळते. खरंतर हा सिनेमा आला तेव्हा देवआनंद खरोखरच तरुण दिसायचा. त्यामुळे तो या भूमिकेसाठी फिट्ट होता. देवआनंदचं मात्र झीनत अमानवर प्रेम असतं. त्या काळाच्या तुलनेत ही थीम खूपच बोल्ड होती, परंतु ती जेव्हा पडद्यावर आली तेव्हा अगदीच पिचपिचीत ठरली.

एक बार फिर : दिग्दर्शक विनोद पांडे म्हटलं म्हणजे एकदम 'कडक' प्रेमकथा! अनैतिकतेला नैतिकतेचा मुलामा द्यावा तो अशा धाडसी दिग्दर्शकानेच. या चित्रपटातली प्रेमकथाही वेगळी आणि हटके होती. सुपरस्टार (सुरेश ओबेरॉय) सतत बिझी राहत असल्याने त्याची पत्नी (दीप्ती नवल) पुरती कंटाळलेली असते. अशावेळी ती एका चित्रकाराकडे (प्रदीप) आकषिर्त होेते. हे नातं नकळतच मर्यादा ओलांडतं. त्या संबंधाने ती विलक्षण सुखावते आणि नवऱ्याला सोडण्याचा निर्णय घेते. पंचवीस वर्षांपूवीर्चं हे कथानक तसं डेंजरसच होतं. नवीन विचारांचा चित्रपट म्हणून 'एक बार फिर'चं खूप कौतुक झालं होतं. रॉक्सीमधल्या मॅटिनीमध्ये त्याची चक्क ज्युबिली झाली होती.

परोमा : अपर्णा सेनचा अत्यंत बोल्ड सिनेमा. एका बंगाली एकत्र कुटुंबातली एक समजूतदार, सुस्वरूप स्त्री परोमा (राखी) आपल्या मुलाच्या मित्राच्या आग्रहास्तव फोटोसेशनसाठी तयार होते. त्यांच्या भेटीगाठी वाढतात. यातूनच त्यांच्यात मैत्री होऊन शरीरसंबंधांपर्यंत त्यांची मजल जाते. हे एकदा तिच्या कुटुंबियांना कळतं आणि ती कोसळते. वीस वर्षांपूवीर्चा प्रेक्षक ही थीम पचवण्याइतका मॅच्युअर्ड झाला नव्हता. (पण याचा अर्थ खऱ्या आयुष्यात असं घडत नाही, असं नाही) या चित्रपटाचं भारतात कौतुक झालं नसलं तरी आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्याला चांगली लोकप्रियता मिळाली.

दुसरा आदमी : रमेश तलवार प्रेक्षकांना बोल्ड सिनेमाचा धक्का देण्याइतपत कधीच हिम्मतवान नव्हता. तरी त्याने हा प्रयत्न केला. एक विवाहिता (राखी) आपल्या ऑफिसातल्या तरुण सहकाऱ्याची सोबत टिकवून ठेऊ इच्छिते. त्याचा उत्स्फूर्त स्वभाव तिला खूप आवडतो. त्याच्या जवळ जाण्यासाठी ती सतत धडपडत राहते. थीम चांगली असूनही सिनेमात फारशी खुलली नाही. कल्पना कितीही चांगली असली तरी प्रत्यक्षात व्यावसायिक चित्रपट मूळ पदावर येतात. त्याबरहुकूम सिनेमात ऋषी कपूर नीतू सिंगच्या वाट्याला जातो.

लम्हे : यश चोप्रा दिग्दशिर्त या चित्रपटाची थीम खरंच बोल्ड होती. नुकताच वयात आलेला नायक वयाने त्याच्याहून मोठ्या असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो. तिला या प्रेमाची कल्पना नसते. ती मात्र तिच्या प्रियकराशीच लग्न करते. पण एका मुलीला जन्म दिल्यानंतर एका अपघातात या जोडप्याचा मृत्यु होतो. या मुलीला नायक वाढवतो. ती मोठी झाल्यानंतर थेट आपल्या आईसारखीच दिसते. ही मुलगी वडलांच्या वयाएवढ्या नायकाच्या प्रेमात पडते. चोप्रांनी किती हळूवारपणे हा गुंता सोडवला होता! कथा खरंच काळाच्या पुढची होती. पण प्रेक्षकांनी दगा दिला. याच चित्रपटाच्या स्पधेर्ला 'फूल और कांटे' मात्र यशस्वी ठरला.

गाइड : विजय आनंदचा हा अस्सल धाडसी चित्रपट. विवाहित रोझीला राजस्थान दाखवताना राजू नावाचा गाइड तिच्या प्रेमात पडतो. त्यांचं प्रेम जुळतं. पण या प्रेमाचा एक वेगळाच रंग प्रेक्षकांना दिसतो. चाळीस वर्षांपूवीर् आलेल्या या चित्रपटातून अगदी वेगळा प्रेमाविष्कार दाखवण्याचा प्रयत्न गोल्डीने केला होता. त्याचं हे धाडस हिंदी चित्रपटांतला मैलाचा दगड ठरलं. वहिदा रेहमानचं नृत्यकौशल्य, सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय आणि श्रवणीय गाणी यामुळे या प्रेमकथेने थेट काळजालाच हात घातला. अशाच आणखी काही संवेदनशील प्रेमकथा त्या काळात आल्या असत्या तर?

जॉगर्स पार्क : निवृत्तीनंतर एक न्यायाधीश (व्हिक्टर बॅनजीर्) फिट राहण्यासाठी मॉनिर्ंग वॉकला जाऊ लागतात. तिथे एका तरुणीशी त्यांची ओळख होते. ही ओळख पुढे वाढत जाऊन त्याचं रूपांतर प्रेमात होतं. तिने सहज केलेल्या सूचना त्यांच्यात बराच फरक करू लागतात. त्यातून या दोघांमध्ये आकर्षणाचा सूक्ष्म धागा निर्माण होतो. पण त्यांच्या कुटुंबियांना हे नातं मंजूर नसतं. क्लायमॅक्स वगळता दिग्दर्शक अनंत बालानीने हा चित्रपट चांगला हाताळला आहे.

सत्या : ही अंडरर्वल्डची कहाणी असून प्रेमकथा नाहीए, असं म्हणताय? तसं असेल तर एका प्रेमकथेच्या नजरेने या चित्रपटाकडे पाहा. गँगस्टर सत्या (चक्रवतीर्) आणि चाळीत राहणारी साधीसुधी मुलगी गीता (उमिर्ला मातोंडकर) यांची ही अंडरर्वल्डवरच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथाच तर आहे. या दृष्टीने चित्रपटाकडे पाहा. कदाचित तो रंगही दिसेल.

जिस्म : महेश भटला कधी काय आणि का सुचेल हे कोणी सांगेल का? इथं लेखन त्याचं आणि दिग्दर्शन मोहित सुरीचं होतं. मध्यमवयीन नवऱ्याच्या अपरोक्ष त्याची बायको त्याच्याच एका मित्राशी संबंध ठेवते. पण तिची हाव वाढतच जाते व त्यात तिच्या नवऱ्याचा अंत होतो. परंतु यात कथेपेक्षा सादरीकरणातच रंग अधिक भरले गेल्याने प्रेक्षकांचा बेरंग झाला.

सरळमागीर् प्रेमकथांपेक्षा अशा वेड्यावाकड्या वळणांनी जाणाऱ्या प्रेमकथांमध्येच अधिक दम असतो, हे आता तरी मान्य कराल ना? अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा एखाद दोन वर्षांपूवीर् आलेल्या बोल्ड सिनेमांनी कायम ठेवली आहे. पण 'नि:शब्द' त्यात वेगळा ठरलाय, एवढं मात्र निश्चित!

यशस्वी शाही प्रेमकथा! - Successful Royal Lovestory Prince William and Kate Middleton

Successful Royal Love-Story
 
Prince William and Kate Middleton

प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांचा शाही विवाहसोहळा ही ब्रिटनच्या नागरिकांसाठी मोठी पर्वणी होती. हा सोहळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी हजारो सामान्यजनांनी लंडनकडे धाव घेतली. काही लोकांनी तर विवाहस्थानाच्या जितके जवळ जाता येणे शक्य आहे, तितक्या नजीकचे तंबू स्वत:साठी राखून ठेवले. त्यासाठी पैसे मोजले. ज्यांना शाही विवाह आरामदायी तंबूंतून अनुभवायचा होता, त्यांनी तर त्यासाठी दोन लाख रुपयांहून अधिक पैसे खर्च केले. या विवाहसोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहताना लोकांचा उत्साह लक्षात येत होेताच; परंतु इंग्लंडच्या राजघराण्याविषयी लोकांमध्ये एकविसाव्या शतकातही, किती कुतूहल आणि प्रेम आहे, हेच ध्यानात येत होते. या सोहळ्यामध्ये जगातील ४० राजघराण्यांतील सभासद होतेच; परंतु सर एल्टन जॉन आणि डेव्हिड व व्हिक्टोरिया बेखहॅम यांच्यासारखे नामांकितही होते. एकेकाळी ब्रिटनचे साम्राज्य ज्या ज्या भूप्रदेशावर पसरलेले होते, तेथील लोकांतही या विवाहाबाबत कुतूहल निर्माण झाले होते. त्यामुळेच या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोट्यवधी लोकांनी पाहिले. या सोहळ्यात ब्रिटनमधले ५६ टक्के लोक सहभागी झाले होते आणि त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. ज्या विल्यमचा काल विवाह झाला, त्याच्या आईवडिलांचे, म्हणजेच प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांचे लग्न तीन दशकांपूवीर् झाले. त्यांच्या विवाहाच्यावेळेस तर ब्रिटनमधले अवघे वातावरण भारून गेले होते. त्याला एक महत्त्वाचे कारण डायनाचे व्यक्तिमत्त्व हे होते. तिच्या वागण्या-बोलण्यात एक रुबाब होता; परंतु त्याला कोणताही दर्प नव्हता. चार्ल्स आणि डायना यांच्या प्रेमाच्या गोष्टींबाबतही जनमानसात कुतूहल होते. साहजिकच त्यांचा विवाहसोहळा थाटात झाला. त्या विवाहात शाही रुबाब तर होताच; परंतु अरब जगतातील धनवंत मंडळींची हजेरी हासुद्धा चचेर्चा विषय झाला होता. यातील दुदैर्वाची गोष्ट अशी की एखाद्या परीकथेसारखीच फुलत गेलेली प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांची प्रेमकहाणी पुढे एका अटळ शोकांतिकेच्या वाटेने गेली. ३१ ऑगस्ट १९९७ या दिवशी डायनाचे अपघाती निधन झाले. डायनाचा तो मृत्यू अकाली होताच; परंतु काळजाला चटका लावणाराही होता. त्यावेळी प्रिन्स चार्ल्सपेेक्षाही विल्यम आणि हॅरी यांच्यासाठी लोकांचा जीव कळवळला होता. काल विल्यमचा शाही विवाहसोहळा पाहताना अनेकांच्या मनात डायनाची आठवण जागी झाली. अशी स्मृती यावी, असेच तिचे व्यक्तिमत्त्व होते. विल्यमची अर्धांगी झालेल्या केट मिडलटनकडे डायनासारखे नजर बांधून ठेवणारे सौंदर्य नाही. तिचे व्यक्तिमत्त्व सौम्य भासते. मात्र तिच्याकडे विचारांतला ठामपणा असावा, असे दिसते. कारण विवाहप्रसंगी घ्यावयाची शपथ निवडताना तिने 'मी त्याची आज्ञा पाळीन' असे स्पष्ट करणारी शपथ घेतली नाही. केट ही अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेली आहे. तिचे पणजोबा, म्हणजे तिच्या आईचे वडील, हे इंग्लंडच्या ईशान्य भागातील एका खाणीत काम करणारे कामगार होते. परंतु प्रत्येक पिढीमध्ये हे कुटुंब आपला सामाजिक स्तर उंचावत गेले आणि त्यामध्ये त्या कुटुंबातील महिलांचा वाटा मोठा होता. केटचा प्रिन्स विल्यमशी झालेला विवाहसुद्धा तीच गोष्ट अधिक स्पष्ट करून जाते. सामान्य घराण्यातील एक तरुणी राजघराण्यामध्ये शाही सन्मानाने स्वीकारली जाते ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. जगभरातल्या राजघराण्यांतील व्यक्ती आणि अनेक नामवंत मंडळी यांच्या साक्षीने केलेला हा स्वीकार इंग्लंडमधील समाजाच्या मनोवृत्तीवर, संस्कृतीवर आणि मानसिक प्रगल्भतेवर प्रकाश टाकणारा आहे. या अंगाने पाहिले तर या विवाहसोहळ्याला एक आगळेच महत्त्व प्राप्त होते. चारचौघींसारखी पदवीचे शिक्षण घेणारी आकर्षक रूपाची एक मुलगी, एकेकाळी निम्म्या जगावर राज्य करणाऱ्या घराण्यातील तरुणाच्या प्रेमपाशात अडकते आणि राजघराण्याची सून होते, ही गोष्ट आजही आपल्याला आश्चर्यवतच वाटते. असे आश्चर्य ब्रिटनमध्ये घडले आणि ते बहुतांशी जगाने पाहिले. या सोहळ्याच्या निमित्ताने किमान चार कोटी पौंड रकमेची उलाढाल झाली असावी, असा अंदाज आहे. आजची त्या देशाची आथिर्क स्थिती पाहता, इतकी मोठी उलाढाल शाहीविवाहाच्या निमित्ताने व्हावी काय, हा वादाचा मुद्दा आहे. त्यामुळेच काहीजणांनी हा शाहीसोहळा की शाही उधळपट्टी अशी टीका केली आहे. मध्ययुगातील वेश परिधान करून त्याच काळाला शोभेल अशारीतीने लग्न लावणे अशोभनीय असल्याची तिखट टिपणीही करण्यात आली आहे. ब्रिटनमधील वाढती बेकारी आणि त्यामुळे तरुणवर्गात असलेली अस्वस्थता लक्षात घेता अशी टीका होणे स्वाभाविकही आहे. दुसरे असे की या सोहळ्यास इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि गॉर्डन ब्राऊन यांना निमंत्रण नव्हते. ते मजूर पक्षाचे असल्याने त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते काय, अशी शंका घेतली जाऊ शकते. याचे कारण हुजूर पक्षाचे असलेले माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर आणि जॉन मेजर यांना बोलाविण्यात आले होते. हा सापत्नभाव अशोभनीय आहे. मात्र हे अपवाद सोडले, तर विल्यम-केटचा विवाह म्हणजे एकविसाव्या शतकातील एक यशस्वी शाही प्रेमकथा आहे. 

Successful Royal Love-Story
 
Prince William and Kate Middleton Marriage

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories