Sunday, July 1, 2012

ओढ पैठणीची

कपाटं महागड्या साड्यांनी भरली तरी ' पैठणी ' ची कमी राहते. पैठणीशिवाय कलेक्शनला पूर्तता येत नाही असं मानणाऱ्यांपैकी आहे नयना झवेरी... तिचं पैठणीचं वेड वेगळचं आहे. स्वत:साठी पैठणी घेतल्यावर तिचं हे वेड वाढलं आणि त्यातूनच आकाराला आला नयनाचा पैठणीचा व्यवसाय. स्वत:हून पैठणी डिझाईन करून नयनाने आणली पैठणीत कल्पकता...

/photo.cms?msid=2217888


नयना झवेरी हे नाव अमराठी असलं तरी व्यक्ती मात्र पूर्णत: मराठी मातीत वाढलेली आणि महाराष्ट्राबदद्ल प्रेम-आपुलकी असणारी. खरंतर मराठी तिची मातृभाषा नाही तरीही महाराष्ट्रात वाढलेली नयना ' मी महाराष्ट्रीय आहे ' असं अभिमानाने सांगते. तिच्या या महाराष्ट्र प्रेमातूनच तीने येथील पैठणीचा प्रचार आणि प्रसार करायचा ठरवलं. नयना केवळ नावापुरती अमराठी राहिली आहे बाकी आपले सगळे मराठी सण-वार , व्रत-वैकल्य ती इथल्या परंपरेप्रमाणे साजरे करते. महाराष्ट्राची पैठणी सर्वत्र पोहोचावी या उद्देशाने तीने अनेक अमराठी ग्राहक जोडले आहेत. पैठणी प्रामुख्याने गडद रंगात मिळते. गडद जांभळा , गडद लाल , गडद हिरवा , काळा किंवा गडद निळा वगैरे रंग पैठणीत हमखास पाहायला मिळतात. पण नयनाने या रंगांबरोबरच काही फिकट रंग पैठणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला ग्राहकांकडून विशेषत: तरूण महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नयना सांगते , ' पैठणी साडी केवळ प्रौढ महिलांमध्येच नव्हे तर आजच्या वेस्टर्न कपड्यांमध्ये वावरणाऱ्या तरुण मुलींनीही नेसली पाहिजे म्हणून मी त्यांना आवडतील असे रंग पैठणीत आणले आहेत. यात बेबी पिंक , पिस्ता , लव्हेंडर , फिका चटणी रंग , फिका ग्रे , पांढरा असे अनेक रंग पाहायला मिळतात. पैठणीचे दुपट्टे हा पर्यायही नयनाने तरुण मुलींसाठी उपलब्ध केला आहे. पैठणी साडीवरचे मोर , कुयरी , पोपट , पक्षांची जोडी , कमळ या डिझाईन्स तर आहेतच पण त्यापलिकडेही आणखी कुठल्या नवीन डिझाईन्स पैठणीत आणता येतील याचा विचार करणारी नयना झवेरी कमळाची कळी , वेलबुट्टी , सूर्यफूल , शंकरपाळे , चक्र , कणीस , डबल-सिंगल बॉर्डर अशा नवनवीन डिझाईन्स आणण्याचा प्रयत्न करीत असते. अमराठी ग्राहकांना पैठणीचं महत्त्व सांगावं लागतं पण एकदा त्यांनी पैठणी पाहिली की त्यांना घेण्याचा मोह आवरत नाही असा नयनाचा अनुभव आहे. तिच्या कलेक्शनचं प्रदर्शन पाहायला येणाऱ्या ग्राहकांमध्ये अनेक अमराठी ग्राहक असतात , त्यांना नयना महाराष्ट्राचं आणि पैठणीचं महत्त्व समजावून सांगत असते. पाच हजारापासून ते पन्नास हजारा पर्यंतच्या रेंज मध्ये नयना झवेरीच्या या पैठणी कलेक्शनची रेंज पाच हजारापासून सुरू होते ती पुढे पन्नास हजारापर्यंत जाते. यात असतात काही म्युझियम पीस अर्थात राजेशाही थाटातली पैठणी. काही असतात गडद रंगात तर काही पेस्टल कलर्समध्ये. नयना सांगते , '' रंग कुठलाही असो पैठणीचा बाज वेगळा , तिचा थाट वेगळा आणि तिची शान वेगळीच आहे त्यामुळेच माझ्या महाराष्ट्राची शान असलेली पैठणी डिझाईन करण्याचा मोह सुटत नाही की ही ओढ कमी होत नाही. प्रत्येक वेळी ती वाढत राहते. ''

- मनीषा नित्सुरे

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive