Sunday, July 22, 2012

गुरबानी आपल्याला काय सांगते? Gurbani

जीवन म्हणजे एक संघर्ष. हा संघर्ष चांगलं आणि वाईट यांच्यातील असतो.... सांसारिक जीवन आणि सवोर्च्च बनण्याचा आनंद, यांच्यातील असतो... परंतु, संघर्षाचं कारण काय? संघर्षाचं मुख्य कारण माणसाचा अहंकार. सर्व संकटांचं हेच कारण आहे. अहं थोडा बाजूला सारून अंगी नम्रता बाणवा. गुरबानी हेच तर आपल्याला शिकविते...

...

एक दिवस गुरू नानक आणि त्यांचा सहकारी भाई मर्दाना फिरत फिरत एका गावात गेले. त्या गावी एक ठग, साधूच्या वेषात राहत होता. त्याचं नाव सज्जन होतं. त्यानं त्या गावात मुस्लिमांसाठी मशीद आणि हिंदूसाठी मंदिर उभारलं होतं. दिवसा येणाऱ्या वाटसरूंचं तो स्वागत करून त्यांना आश्रय देत असे, चांगलं खायला घालत असे. परंतु, रात्र पडताच त्यांना ठार करून त्यांच्याकडील किमती वस्तू, पैसे घेत असे.

सज्जनने गुरू नानक आणि भाई मर्दाना यांचं स्वागत करून त्यांची सर्व काळजी घेतली. त्याला पाहुण्यांना ठार करायचं असल्यानं रात्र पडून कधी एकदा पाहुणे गाढ झोपतात, याची तो वाट पाहत राहिला.

परंतु, गुरू नानक आणि भाई मर्दाना काही झोपले नाहीत. मर्दाना रबाब वाजवत राहिला आणि गुरू नानक अभंग गात राहिले. दोघंही देवभक्तीत तल्लीन झालेले. या पवित्र वातावरणाचा हळुहळू परिणाम त्या ठगावर होऊ लागला. त्याचं हृदय पालटून गेलं आणि अचानक त्याला आपल्या कृष्णकृत्यांची लाज वाटू लागली. देवाच्या गुणगानात रंगलेल्या या दोन भक्तांना आपण मारून टाकणार होतो, या जाणिवेनं त्याच्या अंत:करणात कल्लोळ उमटले. मन पश्चात्तापानं भरून गेलं. त्यानं मग गुरूंच्या पायावर लोटांगण घातलं. त्यांचे पाय पकडले आणि तो साश्रू नयनांनी त्यांची क्षमायाचना करू लागला.

त्या दिवसापासून सज्जन केवळ दिवसभर देवभक्तीत रमू लागला इतकंच नव्हे तर त्यानं आपल्या घराचं रूपांतर धर्मशाळेतच केलं. त्याने आपले घर म्हणजे जणू देशभरातून येणाऱ्या यात्रेकरूंसाठीचा स्वर्गच बनविला. अशा प्रकारे बानी म्हणजे दैवी वाणीचा त्याच्यावर परिणाम होऊन तो केवळ नावाचाच नव्हे तर सर्वार्थानं सज्जन बनला. शीखपंथात वाणी म्हणजे बानी. आणि गुरूंचा उपदेश म्हणजेच गुरबानी. श्री गुरू ग्रंथसाहिबमध्ये या अभंग रुपातल्या गुरबानीचा समावेश आहे. बानी म्हणजे दैवी सत्य, देवाचा शब्द, निर्गुण, निराकार देवाचं प्रकटीकरण.

गुरू अमरदास यांनी म्हटले आहे, 'जय हो, जय हो, गुरू वचन का जय हो। जो वचन ही, निराकार प्रभू है। वहां कोई अन्य नही, कुछ और भी नही। उनके बराबर कोई भी नही।।'

गुरबानी भक्तीनं गात राहिल्यास किंवा केवळ ऐकत राहिल्यानंही अंगात चैतन्य संचारते. गुरबानी शब्दरूपात आहे आणि ती ३१ रागांमध्ये आहे. ती प्रेमकविता आहे तशीच भक्तीगीतही आहे. गुरबानी म्हणजे आनंदाचा अक्षय स्त्रोत.

गुरबानी आध्यात्मिक आणि नीतीचं मार्गदर्शन करते. गुरू रामदास यांच्या 'सारंग की वार' या बानीत एक प्रश्ान् विचारण्यात आला आहे, 'जीवनाचा हेतू काय आहे?'

जीवन म्हणजे संघर्ष असतो. हा संघर्ष चांगलं आणि वाईट यांच्यातील असतो.... सांसारिक जीवन आणि सवोर्च्च बनण्याचा आनंद यांच्यातील असतो... परंतु, संघर्षाचं कारण काय?

संघर्षाचं मुख्य कारण म्हणजे माणसाचा अहंपणा. सर्व संकटाचं हेच तर कारण आहे. माणूस प्रत्येक यशाचं श्रेय घ्यायला जातो. परंतु, वास्तवात संपूर्ण जगाची निमिर्ती करणारा सर्व काही नियंत्रित करणारा देवच प्रत्येक कृती घडवून आणतो. देवाचा आदेश समजण्यासाठी नामस्मरण करून अहंकार बाजूला सारून अंगी नम्रता बाणवा. तुम्ही जेव्हा देवाला शरण जाता, त्यावेळी तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतात, मानवाच्या आकलन व नियंत्रणाच्या पलीकडे असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास सापडतात. दैवी आदेशाचा अर्थ गुरू ग्रंथसाहिबाच्या पहिल्या बानीत स्पष्ट केला आहे.

जापूजीसाहिब यांनी म्हटले आहे की, सर्वजण देवाच्या हुकमाचे ताबेदार आहेत. त्याच्या आदेशाबाहेर कोणी नाही. ज्यास या आदेशाचं आकलन होतं, तो आपला अहंकार सोडून देतो. देवाला शरण जाणं म्हणजेच सत्य उमगणं होय.

बानीमागील मुख्य संकल्पना निर्गुण, निराकार देवाच्या नामस्मरणाची आहे. देव म्हणजेच शब्द, शब्द म्हणजेच दैवी सत्य आहे. शब्द म्हणजे शास्त्रीय संगीत आहे, शबद-कीर्तनामुळे शांत आणि स्वगीर्य वातावरण तयार होते. भक्तांना ते स्वगीर्य राज्यात घेऊन जाते. हळुहळू त्यास सत्याशी एकरूप करतं. बानी किंवा शब्द यांचं कीर्तनाच्या स्वरूपात गायन करणं हा प्रत्येक शिखाच्या जीवनाचा भागच असतो. गुरबानी हाच आध्यात्मिक आणि नैतिक गुरू आहेे. त्यामुळे प्रत्येक शिखानं त्याचं वाचन आणि गायन करणं स्वाभाविकच आहे. पण जो जो भारतीय त्याला त्याला या गुरबानीत नक्कीच रस वाटेल. कारण ती आपल्याला अधिक उन्नत जीवनाची वाट दाखवते. इतकेच नाही तर त्या वाटेवर आपल्याला अविरत सोबत करते...

अनुवाद : जॉन कोलासो

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive