क्रिकेट बोर्डाला चाबकानं फोडाः ठाकरे
Punish Indian cricket board - Balasaheb Thakre
' संपूर्ण देश पाकिस्तानच्या विरोधात असताना ज्या क्रिकेट बोर्डानं पाकड्यांना भारतात आमंत्रित केलं ; त्या क्रिकेट बोर्डाला मुंबईच्या ताज हॉटेलसमोर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसवर चाबकाने फोडून काढलं पाहिजे ', असा खणखणीत आवा ss ज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे.
भारतात स्फोट घडवून आणणा-या पाकड्यांशी शांतीवार्ता करणे हे ढोंग आहे व क्रिकेट खेळणे हा राष्ट्रद्रोह आहे. क्रिकेट बोर्ड पैशाला चटावले आहे व पैशांसाठी देशाची सुरक्षा व इज्जतीचा बाजार मांडायलाही तयार झाले आहे. इतके निर्लज्ज व भयंकर लोक ज्या देशात आहेत त्या देशाचे पाकिस्तान व्हायला कितीसा वेळ लागणार ?, असा उद्विग्न सवालही त्यांनी ' सामना ' च्या अग्रलेखातून केलाय.
तब्बल पाच वर्षांनंतर भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट संबंधांचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. ख्रिसमसच्या सुट्टीत तीन वनडे आणि दोन टी-२० सामने खेळण्यासाठी बोर्डानं ' टीम पाकिस्तान ' ला आमंत्रित केलंय. त्यांच्या या भूमिकेला बाळासाहेबांचा ठाम विरोध आहे आणि पाक संघासाठी हिरवे गालिचे अंथरून स्वागताची बांग ठोकणा-या बीसीसीआयवर त्यांनी हल्लाबोल केलाय.
क्रिकेट हा जंटलमन लोकांचा खेळ भारताच्या बाबतीत निर्लज्ज व निर्दयी लोकांचा खेळ झाला आहे. २६/११च्या जखमा अजून भळाभळा वाहत आहेत. या भयंकर हल्ल्यात १६०च्या वर निरपराध लोक मारले गेले. २० पोलिसांनी बलिदान दिले. पण , या जखमा भारतीय क्रिकेट बोर्डाला दिसू नयेत आणि त्यांनी पाकड्या क्रिकेटपटूंसाठी पायघड्या घालाव्यात , ही देशाशी गद्दारी आहे , असा संताप बाळासाहेबांनी व्यक्त केलाय. क्रिकेट सामन्यांमुळे दोन देशांतील संबंध सुधारतील , सुरळीत होतील असे सांगणार्यांच्या अकलेची कीव करावी तेवढी थोडीच आहे , अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे. भारत-पाकिस्तान सामना पाहायला इकडे येणारे पाकडे नंतर अदृश्य होतात. ते हवेत गेले की जमिनीत गडप झाले हे आमचे राज्यकर्ते सांगू शकलेले नाहीत , याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय.
पाकिस्तानसोबतच्या मालिकेला विरोध करणा-या लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचं त्यांनी अभिनंदन केलंय. क्रिकेट बोर्डाचा राष्ट्रद्रोही मुखवटा फाडून गावस्करांनी शंभर कोटी देशवासीयांच्या भावनेला तोंड फोडलं आहे. पाकिस्तानशी क्रिकेट नको तर युद्ध हवे हीच देशवासीयांची भावना आहे. पाकिस्तानशी युद्ध करण्याची धमक काँग्रेस आघाडी सरकारमध्ये नाही. त्यामुळे निदान क्रिकेट तरी खेळू नका आणि देशाच्या जखमेवर मीठ चोळू नका , असे खडे बोल त्यांनी सुनावलेत. शिवसेना काय करायचे ते करीलच , पण ' २६/११ ' ची वेदना शिल्लक असेल , राष्ट्राभिमानाची ज्योत पेटली असेल , तर एकही क्रिकेटवेडा पाकिस्तानचा सामना बघायला स्टेडियमवर जाणार नाही. रिकामे स्टेडियम हाच पाकिस्तानचा धिक्कार आणि ' २६/११ ' च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल , अशी भावनिक सादही बाळासाहेबांनी घातली आहे.
No comments:
Post a Comment