Sunday, July 1, 2012

म म मका

तेच ते मिलियन डॉलर स्माइल. ओठांवर उजव्या बाजूला तो वेड लावणारा तीळ. अवखळ निळे डोळे. लांबसडक केसांचं पाठीवर मोकळं रान. सडसडीत बांधा...जणू भरलेलं , रसरशीत मक्याचं सोनसळी कणीस! सिन्थिया त्या मक्याच्या शेतात उभी राहून खिदळत असताना एका प्रेस फोटोग्राफरनं तिला पाहिलं. नकळत त्यानं कॅमेरा सरसावला. क्लिक क्लिक क्लिक...

शेकडो एकरांच्या मक्याच्या शेतात खिदळणारा तो मुलींचा घोळका. पायात अँकल शूज. तोकडी तंग हॉट पँट आणि तेवढाच तोकडा टीशर्ट...भरलेली दाणेदार कणसं हेरायची. खुडायची. टोपलीत टाकायची. फर्लांगभर अंतरावरच्या सेंटरवर नेऊन टाकायची. संध्याकाळी रोकडे डॉलर्स घ्यायचे आणि टाऊनमधला एखादा पब गाठायचा...समर जॉब.

इलिनॉयमधल्या शेकडो पोरी समरमध्ये अजूनही हेच करतात. अगदी भरल्या घरातल्या मुली. तेवढाच मौजमजेला पॉकेटमनी. आईबापापुढे हात पसरायला नको.

इलिनॉय प्रांतातल्या डीकॅब इलाख्यात राहणाऱ्या सिन्थिया अॅन क्रॉफर्ड नावाच्या सोळा वर्षाच्या एका चलाख मुलीचा दिनक्रमही हाच होता. शाळेत पोरगी हुशार होती. विशेषत: गणितात. सटासट सम्स सोडवायची. केमिकल इंजिनीअरिंगला तिनं अॅडमिशनही मिळवली होती. तीही स्कॉलरशिपवर.

अशी ही सिन्थिया त्या मक्याच्या शेतात उभी राहून खिदळत असताना एका प्रेस फोटोग्राफरनं तिला पाहिलं. नकळत त्यानं कॅमेरा सरसावला. क्लिक क्लिक क्लिक...

त्या फोटोनं सिन्थियाच्या नशीबानं अफलातून वळण घेतलं. स्कॉलर सिण्डी इलिनॉयमधल्या घराघरात कौतुकाचा विषय बनली. कित्ती गोड फोटो!

तेच ते मिलियन डॉलर स्माइल. ओठांवर उजव्या बाजूला तो वेड लावणारा तीळ. अवखळ निळे डोळे. लांबसडक केसांचं पाठीवर मोकळं रान. सडसडीत बांधा...जणू भरलेलं , रसरशीत मक्याचं सोनसळी कणीस!

' इथं काय करतेस तू , गधडे. यू शुड बी इन न्यू यॉर्क ', त्या फोटोग्राफरनं तिला प्रेमानं झापलंच. वस्तुत: ती त्याला ' थँक्स ' म्हणायला गेली होती. त्यानं उलट केलेल्या उपदेशानं सिण्डी पार हडबडून गेली. खरंच , आपण इथं काय करतोय ?..

शिकागोतल्या एलिट मॉडेल एजन्सीमार्फत तिनं मॉडेलिंगच्या क्षेत्रात बिचकतच पाऊल टाकलं. मॉडेलिंग करावं. पैसा मिळवावा. पण ते पार्ट टाइम काम. नॉर्थवेस्टर्न युनिव्हसिर्टीतून केमिकल इंजिनीअरिंगची डिग्री मिळवण्याचा तिचा आटापिटा सुरूच होता.

... सो , न्यू यॉर्क. द बिग अॅपल. इथं आल्यानंतर सिण्डीला स्ट्रगलबिगल करावा लागलाच नाही. ती जाई त्या फॅशन हाऊसमध्ये तिचं स्वागतच होई. फॅशनची दुनिया हे असलं प्रकरण पहिल्यांदाच पाहात होतं. पुढच्या दोन वर्षात सिण्डीकडे एण्डॉर्समेण्ट्सचा पाऊस पडला. त्याच त्या स्मितासाठी ती खरोखर मिलियन डॉलर्स बिदागी घेऊ लागली. आणि दोन वर्षांनंतर तिच्या लक्षात आलं , अरे , आपण तर केमिकल इंजिनीअर होणार होतो , त्याचं काय झालं ?

त्याचं लोणचं झालं. सिन्थिया क्रॉफर्डची सिण्डी झाली. या रूपांतरात केमिस्ट्रीचा संबंध आलाच नाही.

आत्ता परवा , म्हणजे गेल्या आठवड्यात 20 फेब्रुवारीला सिण्डी अडतीस वर्षांची झाली. परवाच रशियाच्या दौऱ्यावर ती गेलेली दिसली. अजूनही तशीच! तेच स्मित. तीच मादकता. तोच उत्फुल्ल , उन्नत देह...आणि तोच आत्मविश्वास. 1986 सालापासून ती न्यूयॉर्कची ही चमकदमक अंगावर झेलते आहे. कॅमेऱ्यांचा चकचकाट तिला सरावाचा झालाय एव्हाना. जगभरातल्या किमान सहाशे मासिका-नियतकालिकांच्या मुखपृष्ठावर तिची छबी झळकली आहे. व्हॅनिटी फेअर किंवा प्लेबॉय , व्होगसारख्या मासिकांमध्ये सिण्डीची नग्नसुंदर छायाचित्र येऊ लागली ती याच सुमारास. नओमी कॅम्पबेल , क्लॉडिया शिफर , इव्हांजेलिस्टा... अशा अप्सरा तिच्या समकालीन म्हणून त्याच रॅम्प्सवर डौलात चालत होत्या. पण त्यांच्यातही हे सोनपंखी पाखरू उठून दिसत होतं.

प्लेबॉयमधले तिचे सेण्टरस्प्रेड्स अवघ्या युरोपातल्या तरुण खोल्यांच्या भिंतीवर चिकटले , ते अजूनही कुणी खरवडून काढले नसणार. एकांड्यांच्या खोलीत नेहमी मुक्कामाला असतं , एक गुंतागुंतीचं मन. त्या भयभीषण निबीड अरण्यात सैतानाची कार्यशाळा चालते. त्या सैतानी दुनियेला त्याच काळोखात विरघळवून टाकण्याचं सार्मथ्य भिंतीवरच्या अशा कॅलेण्डरात असतं. सिण्डीच्या अशा कित्येक छब्यांनी अशा कित्येक खोल्या आपल्या अस्तित्वानं उजळून टाकल्या आहेत.

सिण्डीचं गणित चांगलं होतं , हे मघा सांगितलंच. फॅशन शोज , जाहिरात मोहिमा , फोटो सेशन्स , अशा बारा वाटांनी येणारा पैसा गुंतवायचा कशात हे तिला अचूक कळलं. नओमी , क्लॉडिया वगैरेंसारखा तिनं तो पैसा फॅशन बार आणि बिस्ट्रोमध्ये गंुतवला नाही. हमखास दुभती गाय ठरणाऱ्या ' प्लॅनेट हॉलिवूड ' च्या साखळीत गुंतवला. ' रेवलॉन ' शी केलेला करार असाच फायदेशीर ठरला. वर्षातून फक्त वीस दिवस रेवलॉनचं प्रमोशन त्यासाठी चाळीस लाख डॉलर्स दरसाल तिनं बांधून घेतले. पेप्सी , के ज्वेलर्स अशी इतर जाहिरातींमध्येही सिंडीचाच चेहरा वापरला गेला. वन मिनिट मेकपची संकल्पना आणून तिनं जगभरातल्या यच्चयावत वकिर्ंग वीमेनना ऋणात बांधलं. एमटीव्हीवरचा तिचा फिटनेस शोही सहा वर्षं गाजत होता. तिचं मेकपवरचं पुस्तकही बेस्टसेलर आहे.

नव्वदीचं आख्खं दशक जगभर होती सिंडी , सिंडी , सिंडी.

याच दशकात तिला रिचर्ड गेअर भेटला. चार वर्षांच्या फिराफिरीनंतर त्यांनी लग्न केलं. सिंडी प्रेटी वूमन ठरली. आणखी चारेक वर्षांनी त्यांनी एका मोठ्या पेपरात पानभर जाहिरात दिली आणि आमचं कसं एकमेकांवर खर्रखुर्र प्रेम आहे ', हे जगाला ओरडून सांगितलं. त्यानंतरच्या तिसऱ्या महिन्यात सिण्डीनं घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल केला! ' सेक्सिएस्ट कपल ऑफ द इयर ' ची अशी वासलात लागली.

रॉबर्ट डी निरोबरोबर काही वर्षं सिण्डी फिरली. बिव्हलीर् हिल्सच्या तारांकित पाटर््यांमध्ये त्याच्या हातात हात अडकवून स्मितं आणि चुम्मे फेकताना दिसायची. पण तेही मागे पडलं आणि एका पबच्या मालकाशी तिनं लग्न लावून टाकलं फटक्यात.

बुध्दी आणि सौंदर्य. अचूक गणित आणि हळवं मन...सिण्डीकडे एकटीकडे हे सगळं आहे. तिचा लहान भाऊ जेफ चार वर्षांचा असताना ल्युकेमियानं गेला.त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ ती दरवषीर् लाखो डॉलर्सची मदत देते...

आताचा जमाना सिण्डीचा नाहीए. फॅशनच्या दुनियेत वेगळे चेहरे आणि देह आले आहेत. त्यातले काही सिंडीपेक्षा सरस असतीलही.

... पण त्यांना मक्याच्या भाजक्या भुट्ट्यासारखा खमंग वास नाही!

प्रवीण टोकेकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive