Sunday, July 1, 2012

निगेटिव आमीर - Negative role of Aamir Khan

आमीर खान... सध्याचा सगळ्यात लाडका नट.

त्याच्या करिअर ग्राफमधले चढउतार लोकांनी पाहिले. पण लोकप्रियतेची कमान सतत उंचावत राहिली. इतर नटांच्या तुलनेत वाद कमी वाट्याला आले. त्यामुळेच आमीर नशीबवान म्हणायला हवा. राजा हिंदुस्तानीतल्या ' टॅक्सी ड्रायव्हर'ने सुरू झालेल्या दुसऱ्या इनिंग्जमध्ये तो यशस्वी धाव घेतोय. 'फनाह'मध्ये तो गाइड कम दहशतवाद्याच्या रूपात दिसणार आहे.

आमीरला स्वत:च्या उंचीबाबत न्यूनगंड होता. आपल्याला लोक अभिनेता म्हणून स्वीकारतील का, असं त्याला नेहमी वाटत होतं. मन्सूर खानने 'कयामत से कयामत'ची जुळवाजुळव करताना तो हिरो बनण्याच्या कल्पनेने तो सुखावला. पण उंचीची कमी त्याला डाचत होती. कयामत से... च्या आधी त्याने 'होली' मध्ये रोल केला होता. अभिनय आपल्याला जमतोय याची खात्री होती पण अभिनेता म्हणून लोक स्वीकारतील की नाही याबाबत धाकधूक होती. त्यामुळेच मग भल्यामोठ्या पोस्टर्सवर दोन चेहरे पाहून लोक थिएटरमध्ये जरा शासंक होऊन गेले. पण 'एक दुजे के लिए' थाटाची ही नवी प्रेमकथा तरुणांनी डोक्यावर घेतली. आमीरचा चेहरा फ्रेश होता. त्यामुळे प्रेमकथेत शोभून दिसला. चित्रपटसृष्टीत खान पर्व सुरू होण्याचा तो मुहुर्त होता.

आमीर खानला मिळालेली ही लोकप्रियता त्याला भांबवणारी होती. त्यामुळे त्या काळात त्याने केलेल्या भूमिकांची निवड चुकली. वेगळे प्रयोग करण्याची हौस त्याला होती. प्रेमकथा आणि जुही चावला अशा त्याच त्याच साच्यात तो गरगरला. लागोपाठ चुकीच्या भूमिका केल्याने प्रेक्षकांनीही त्याच्याकडे लगेचच पाठ फिरवली. अनेक कलाकारांना यशाचा ग्राफ कायम ठेवणं कठीण जातं तेच आमीरच्या बाबतही घडलं.

आमीरला लव्हरबॉय किंवा चॉकलेट बॉय या इमेजमध्ये अडकणं आवडत नव्हतं. त्यामुळेच 'राख' सारखा वेगळा सिनेमा त्याने कारकिदीर्च्या सुरुवातीलाच स्वीकारला. त्याच वेळी त्याला कळलं होतं. ग्रे शेड असलेल्या भूमिकांच्या वाटेला जाणं धोक्याचचं. आता मात्र परफेक्शनिस्ट आणि हिट सिनेमा देऊ शकणारा हुकमी स्टार असा तोरा मिरवणारा तो एकमेव नट झाला आहे. त्यामुळे अशी रिस्क तो सहज घेऊ शकतो आहे. खरं तर 'राजा हिंदुस्तानी'पर्यंत यश-अपयश अशा हिंदोळ्यावर सतत होता. आमीर खान आता आपल्या बळावर गदीर् खेचू शकतो.

' दिल है के मानता नही' किंवा 'जो जिता वही सिंकदर' या सिनेमाने त्याच्यातलं ग्लॅमर आणि अभिनय काय आहे हे दाखवून दिलं होतं. 'दिल', 'हम है राही प्यार के' अशा सुपरहिट सिनेमातही आमीर खान होता. 'रंगीला'मुळे तर तो घोस्ट दिग्दर्शकाच्या भूमिकेतही शिरला. राम गोपाल वर्मासारख्या दिग्दर्शकाला आपणच शॉट कसा घ्यायचा असं सांगत होतो, नाही तर त्याला हिंदीतले डायलॉग तरी समजतात काय, असा सांगून आमीर दिग्दर्शकापेक्षाही मोठा होत गेला. मग आमीरच्या सिनेमात आमीरशिवाय कोणाला फारसं महत्त्वच उरलं नाही. 'राजा हिंदुस्तानी'ने त्याचा सिनेमा म्हणजे तोच असं गणित झालं. हा सिनेमा म्हणजे त्याची दुसरी इनिंग्जच होती. पण त्यानंतरचा त्याचा प्रवास फक्त त्याच्या एकट्याचा होता. इंडस्ट्रीतल्या इतरांना मागे टाकून तो कधीच पुढे निघून गेला होता. हे सगळं एका रात्रीत घडलं नव्हतं. त्याची परफेक्टनिस्ट होण्याची ती वाटचाल होती. सगळ्या दिग्दर्शकांपेक्षाही तो मोठा होत जाणं सर्वस्वी त्याच्यामुळेच घडलं होतं. स्वत:च्या स्क्रीन प्रेझेन्सबाबत तो कमालीचा जागरूक झाला. सिनेमाची कथा साधी असली तरी त्यात जान ओतण्याचं काम त्याने केलं. नाही तर गुलाम सिनेमात असं काय वेगळं जेणेकरून तो हिट व्हावा. मोठ्या दिग्दर्शकांनी नेहमीच त्याच्याकडे पाठ फिरवली. विक्रम भट, फरहान अख्तर, जॉन म्यॅथ्यू मथाई अशा नव्या दिग्दर्शकांनाही तो स्टारपद देऊन गेला आहे. 'सरफरोश' तर त्याने स्वत:च्याच खांद्यावर वाहून घेतला. 'गुलाम'मध्येहीत्यानेच पडदा व्यापून राहिला होता. मग त्याचं उंचीने कमी असणंही लोकांनी फारसं मनावर घेतलं नाही.

आमीर खानच्या प्रत्येक सिनेमाबरोबर त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. त्याची ढवळाढवळ आता दिग्दर्शकांना मोलाची वाटायला लागली. 'दिल चाहता है' सिनेमाने तर एकूण सिनेमाचं रूपडंच बदललं. आमीर प्रमुख भूमिकेत असल्याने आपल्यामुळेच सारं काही घडलं हे तो सांगू शकत होता. मग 'लगान'सारखा महत्त्वाकांक्षी सिनेमाही आला. आशुतोष गोवारीकरच्याऐवजी आमीरनेच दिग्दर्शनाचा भार उचलल्याची चर्चा झालीच. 'लगान'चं यश दिग्दर्शकाऐवजी आमीरच्या नावावर जमा झालं. 'मंगल पांडे -द रायझिंग' सिनेमा चालला नाही. पण त्यासाठी आमीर जबाबदार नव्हताच मुळी.

आमीर खानच्या करिअरमध्ये 'रंग दे बसंती'च्या निमित्ताने पुन्हा एकदा एक यश जमा झालं. ग्रे शेडच्या भूमिका करायला घाबरत नाही, हे 'राख' आणि '1947-अर्थ'च्या निमित्ताने त्याने स्पष्ट केलंच होतं. पण यश मिळालं नाही. 'फनाह'मध्ये काजोलच्या प्रेमात पडलेला गाइड कम दहशतवादी रंगवला आहे. आता या निमित्ताने यश मिळतय का ते पाहायचंय एवढंच.

- अपर्णा पाटील

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive