Sunday, July 1, 2012

विम्बल्डनच्या तृणांगणावरील 'लव्ह-ऑल' Love on Wimbledon tennis court

प्रेमी युगुलांच्या आख्यायिका या जगाला अजिबात नव्या नाहीत. प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे प्रेमवीर या भूतलावर कमी नाहीत. प्रेम कुठेही फुलते , त्याला केवळ हवे असते एकमेकांना समजून घेणारे मन... विंबल्डनच्या तृणांगणावरही अशाच काही प्रेमकथा फुलल्या. ' लव्ह-ऑल ' चा हा खेळ खेळलेल्या या प्रेमकहाण्यांचा गोषवारा...

दुहेरी लव्हस्टोरी...
जिमी कॉनर्स आणि ख्रिस एव्हर्ट

Love Story @ Wimbledon
१९७४ च्या चँपियनशिपच्या बाबतीत दोन गोष्टी प्रामुख्याने खास होत्या. जिमी कॉनर्स आणि ख्रिस एव्हर्ट ह्यांचं गाजत असलेलं प्रेम प्रकरण. त्या वर्षीची एकेरीची टायटल्स जिमी कॉनर्स आणि ख्रिस एव्हर्ट या अमेरिकन्स आणि विशेषकरून दोघेही बॅकहँड मारताना दोन्ही हातांचा वापर करण्याच्या तंत्रामुळे लक्ष्य वेधलेल्या या वाड्:निश्चय झालेल्या जोडप्यानी जिंकली.

टेनिस विश्वात सर्वोच्च स्थानी असलेले जिमी कॉनर्स (जिंबो) आणि ख्रिस एव्हर्ट यांचे १९७३च्या हिवाळ्यात लग्न ठरले. प्रेमात आकंठ बुडालेले तरुण जोडपे , फ्लँबॉयंट जिमी कॉनर्स आणि मनोवेधक ख्रिस एव्हर्ट या दोघांनी १९७४ साली विम्बल्डनची अनुक्रमे पुरुष आणि महिलांची विजेतेपद जिंकल्यानंतर "चँपियन्स बॉल डान्स" मध्ये भाग घेतला. त्यांनी १९७४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या त्यांच्या विवाहाच्या तारखेची घोषणा केल्यावर ' द लव्ह मॅच ' अशा शीर्षकांनी जगभरातील वृत्तपत्रे सजली.

जिमी कॉनर्स आणि ख्रिस एव्हर्ट यांनी तारीख ठरल्यावर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. परीकथेतील वाड्:निश्चय रद्द झाला तरी काही काळ ते दोघे एकत्र रहात होते आणि त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण १९७६ च्या सुरुवातीला त्यांचा विवाह होण्याच्या सर्व आशा मावळळ्या. दोघांना गृहस्थाश्रमापेक्षा आपापली कारकीर्द आणि विश्वात पहिल्या क्रमांकावर राहण्याची मनिषा महत्त्वाची वाटली.

वर्ल्ड चँपियन प्रतियोगी साध्य होण्यासाठी त्याग करावा लागतो आणि त्यांच्याबाबतीत नेमके हेच घडले. सट्टेबाजांनी वाड्:निश्चय झालेल्या ' लव्ह डबल्स ' जोडप्यावर ३३-१ अशी बोली लावली होती. शेवटी जिमी कॉनर्स आणि ख्रिस एव्हर्ट एकमेकांच्या विवाहबंधनात अडकले नाहीतच!

.........................................

दो हंसो को जोडा बिछड गयो रे!
किम क्लायस्टर्स-लेटन ह्युईट

Love Story @ Wimbledon
किम क्लायस्टर्स-लेटन ह्युईट यांच्या प्रेमाची कहाणीही अशीच अधुरी राहिली. दोघेही कारकिर्दीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना एकत्र आले. मैत्री व्हाया डेटिंग प्रेमात कधी रुपांतरीत झाली ते कळलंच नाही. सगळं छान सुरू होतं. २००१ मध्ये अमेरिकन ओपन , तर २००२मध्ये ह्युईटने विम्बल्डन जिंकली होती. किमदेखील स्पर्धांगणिक उत्तम कामगिरी करत होती. २००३च्या डिसेंबरमध्ये ख्रिसमसपूर्वी त्यांनी साखरपुडाही केला. यानंतर या जोडीला न जाणे कोणाची दृष्ट लागली. आधी अफवा आल्या , चर्चा रंगल्या अन् दोघांनी नात्याला ' दी एन्ड ' दिला.

फेब्रुवारी २००५मध्ये ठरलेलं लग्नही रद्द झालं. या प्रकारानंतर ह्युईटने ऑस्ट्रेलियन अभिनेत्री बेक कार्टराईटशी संसार थाटला. पण कदाचित मनातलं दु:ख त्याला सतावत होतं , त्याचा खेळ ढेपाळला. किमने मात्र आपला करिअर ग्राफ उंचावता ठेवला होता. दरम्यान थोड्याफार दुखापतींनी पिच्छा पुरवल्याने तिने निवृत्ती जाहीर केली , अन् अमेरिकन बास्केटबॉलपटू ब्रायन लिचशी विवाह केला. अलीकडेच पुनरागम करत तिने अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. सुदैवाने दोन खेळाडू जोडप्यांमध्ये कुठे न कुठे आड येणारा अहंकार यावेळी किम व ब्रायन यांच्यामध्ये नव्हता.

.........................................

मेड फॉर इच अदर...
आंद्रे आगासी-स्टेफी ग्राफ

Love Story @ Wimbledon
टेनिसच्या इतिहासात स्टेफी व आंद्रे या दोघांनी आपल्या करियर मध्ये चारही ग्रँडस्लॅम्स तर जिंकलेच पण त्यांनी ऑलिंपिक्स मध्ये सुवर्णपदक सुद्धा मिळवले. तसे बघायला गेले तर स्टेफी आणि अगासी ही विरोधी व्यक्तिमत्त्वाची टोकं होतं. स्टेफी मुळातच शांत आणि संयमी तर अगासीचं व्यक्तिमत्त्व फ्लँबॉयंट. अगासीचं फ्लँबॉयंट असणं हा तमाम फिमेल फॅनचा जिव्हाळ्याचा विषय होता.

अगासीने टेनिसपटूंनी स्टाइलिश कसं राहावं , हे शिकवलं होतं. खेळाव्यतिरिक्त स्टेफीचं आयुष्य फारच साधं होतं. त्यामुळेच रेसर मायकल बार्टलशी काही काळ असलेलं तिचं अफेअर लोकांसमोर आलं नाही. स्टेफी ग्राफला आपले आयुष्य आनंदी होईल असे कधीच वाटले नाही , तिचे जीवन नेहमीच चिंतनशील आणि स्पर्धात्मकतेचे दिलखेचक मिश्रण होते.

१९९९च्या फ्रेंच ओपन स्पर्धा सुरु होई पर्यंत स्टेफी आंद्रेशी बोलतसुद्धा नसे. स्टेफी आणि आंद्रे यांचा विवाह व्हावा अशी आंद्रेचा कोच ब्रॅड गिल्बर्टची इच्छा होती. त्यासाठी त्याने प्रयत्नही केले. योगायोगाने १९९२चा विम्बल्डन पुरुष एकेरीचा विजेता आंद्रे अगासी सारखा पुरुष तिच्या जीवनात आला आणि शेवटी त्याचे रुपांतर विवाहात झाले.

२२ ऑक्टोबर २००१ साली लास वेगास येथे एका खाजगी समारंभात स्टेफी व आंद्रे विवाहबद्ध झाले आणि ह्या घटनेला फक्त दोघांच्या मातोश्री उपस्थित होत्या. लग्न सोहळ्यानंतर संयुक्त विधान करताना स्टेफी आणि आंद्रे म्हणाले , " आम्ही जीवनाचा एक नवीन अध्याय सुरु केला आहे. आमच्या सोहळ्याचा एकांतपणा आणि जवळीक खूप सुंदर होती आणि त्यात आमची मुल्ये प्रतिबिंबित होत होती.

आंद्रे म्हणाला , " हा क्षण येण्यापूर्वी फार वर्षापूर्वी त्याच्या पत्नीला(स्टेफनीला) भेटायला आवडले असते". अगासी लांबूनच स्टेफीला न्याहाळायचा व तिला पूज्य मानायचा आणि तिचे त्याला नेहमीच कौतुक वाटे. त्याने तिला १९९२च्या विम्बल्डनमध्ये बघितले त्यावेळी तो २२ वर्षाचा होता. आंद्रेने आपल्या व्यवस्थापकाद्वारा विचारणा केली कि , त्याला स्टेफनीशी त्याला हस्तांदोलन करता येईल का ? यास स्टेफनीने नम्रपणे नकार दिला. आंद्रेला समजून चुकले की जर १९९२च्या विम्बल्डन मध्ये तो पुरुष एकेरी आणि स्टेफी महिला एकेरी विजेती ठरले तरच दोघांची भेट घडू शकेल.

१९९२ साली विम्बल्डनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवल्यानंतर , स्टेफीशी गाठ-भेट होणार या संकल्पनेमुळे आंद्रे हर्षोत्फुल झाला. ज्या क्षणाची तो आतुरतेने वाट पहात होता तो क्षण रात्री येणार असल्यामुळे आंद्रे त्याच धुंदीत होता! आंद्रेने विम्बल्डनच्या सदस्यांना "बॉल डान्स" कधी सुरु होणार याची विचारपूस केली. "बॉल डान्स" रद्द करण्यात आल्याचे सांगितल्यावर आंद्रेचा चांगलाच हिरेमोड झाला. सरतेशेवटी सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर १९९९च्या फ्रेंच ओपन स्पर्धेत दोघांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांची विजेतेपद जिंकल्यानंतर , आंद्रेला स्टेफी बरोबर "बॉल डान्स" करायची संधी मिळाली!

आगासीशी लग्न करण्याचा निर्णय घेताच स्टेफीने व्यावसायिक टेनिसला रामराम ठोकला. स्टेफीने टेनिस मधून आपली निवृत्ती जाहीर केली तेव्हा अमेरिकेचा आंद्रे अगासी हा स्टार टेनिसपटू सूर हरवलेल्या अवस्थेत होता. स्टेफीशी विवाह करण्या अगोदर आंद्रेचा ब्रुक शील्ड्स या नटीशी विवाह झाला होता , पण तो टिकला नाही. आंद्रेचा ब्रूक शिल्डबरोबरचा लक्षवेधक विवाह दोन वर्षापेक्षा कमी टिकला पण तत्पूर्वी त्याचे त्याच्यापेक्षा २३ वर्षांनी मोठ्या असलेल्या बार्बरा स्ट्रीसँड बरोबरचे प्रेम प्रकरण बहुचर्चित झाले होते. ब्रुक शिल्डपासून विभक्त झाल्यानंतर मात्र सारं बदललं. केसांच्या वेगवेगळ्या स्टाइल्स आणि रंगबेरंगी कपड्यातला त्याचा ' अवतार ' संपला होता. तुळतुळीत गोटा आणि मॅच्युअर अगासी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. याचं कारण बहुधा स्टेफी असावं , हे थोड्याच दिवसांत कळलं.

टेनिस मधून निवृत्त झाल्यावर स्टेफी ग्राफला आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले तेव्हां आंद्रे म्हणाला , ज्या व्यक्तीने माझ्या जीवनाचा संपूर्णपणे कायापालट केला तिच्याबद्दल बोलण्यासाठी मी योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आंद्रे त्याचे स्टेफीवरील प्रेम कुतूहलतेने , एकनिष्ठपणे , हृदयापासून आणि मनापासून व्यक्त करतो. आंद्रे पुढे म्हणाला "स्टेफनी मला नवल वाटते ज्या तऱ्हेने तू तुझे टेनिस जीवन जगलीस आणि माझ्या जीवनात जे बदल तू घडवून आणलेस , त्याला न्याय देण्यासाठी माझ्याकडचे शब्द अपुरे पडतात!"

१९९२ सालच्या "विम्बल्डन चँपियन्स डिनर" च्यावेळी आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफचे काढलेले सुप्रसिद्ध छायाचित्र जणू येणाऱ्या काळाची नांदी होते. सात वर्षानंतर , स्टेफी आणि आगासी यांची प्रेमकथा १९९९च्या फ्रेंच ओपन स्पर्धे दरम्यान फुलल्याची चर्चा आजही होतेच. या दोघांनी १९९९ मध्ये आपापल्या विभागात एकेरीत जेतेपदाचा मान मिळवला होता आणि त्यानंतरच ते प्रेमात पडले आणि ही जोडी आजतागायत अतूट आहे.

स्टेफी आणि आगासी या दोघांची संसारवेल बहरली असून त्यावर दोन चिमुकली फुले उमलली आहेत. दोन मुलांचे आई-वडील असलेल्या स्टेफी आणि आंद्रे यांचा संसार सुखात सुरू आहे. सध्या टेनिस जगतात आंद्रे आगासी आणि स्टेफी ग्राफ यांची प्रेमकथा आता परिकथा झाली आहे!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive