Sunday, July 1, 2012

Diana and White Cow

दिवाळीचा सण जसजसा जवळ यायचा तसं उत्साहालाही उधाण यायचं . नवीन कपडे - लत्ते , गोडधोड पदार्थ वगैरे गोष्टींचं आकर्षण त्यामागे असायचंच . फुलबाज्या उडवणं , बारूद फोडणं हे तर नित्याचच . पण पाडव्याच्या दिवशी गावातल्या इतर जनावरांसोबत घरच्या गायीला आंघोळ घालून , गेरूच्या मिश्रणात भिजवलेल्या हाताच्या पंजाचे ठसे तिच्या पाठीवर उमटवून , गळ्यात आणि पायात झेंडूच्या फुलांचा हार बांधून तिची कमानीदार शिंग वॉनिर्शनं रंगवून , त्यावर झिलमील चमकणारी विविधरंगी चमकी शिंपडून वाजतगाजत वेशीपल्याडून वाहणाऱ्या ओढ्याकाठच्या जानमाच्या देवळात पाया पडायला न्यायचा ध्यास डोक्यात जबरदस्त ठासलेला असायचा .

दिवाळीच्या अनेक दिवस आधीपासूनच याचं प्लॅनिंग सुरू व्हायचं . त्यामुळं काही दिवस आधीपासूनच तिच्याकडे अॅडव्हान्समध्ये लक्ष देणं सुरू व्हायचं . म्हणजे तिच्या चारा पाण्याची आपणहून एक्स्ट्रा काळजी घ्यायची . तेवढंच प्रेम निर्माण होईल जनावर आणि आपल्यात , हा त्यामागचा उद्देश .

गज्या , सुध्या , पांडू या सर्व मित्रांच्या गायींसोबत आपलीही नटलेली गाय मस्त डौलात घरातनं निघेन . जनावरांच्या कळपासमोर गावातली मोठी पोरं बारूद फोडतील ... आपली गाय दचकेलही .. पण दोरी घट्ट पकडून सांभाळू तिला ... आणि मजा करत करत ... गाणी म्हणत जाऊ ओढ्याकाठच्या त्या देवळापर्यंत ... तिच्या पाया पडून झाल्यावर परत घरी ... मस्त मजा येईल ... सगळेच सोबत असल्यामुळं घाबरायचं कशाला . होईल नीट . तसंही दोन वर्ष घरी जनावरं नव्हतं आपल्या . यावर्षी आहे ना ही गाय .

फटाक्यांच्या आवाजाने डोळे उघडले . तांबडं फुटायच्या आत सगळेच जण आंघोळीसाठी सज्ज . आपणही उरकायचं . साधारण दहानंतर गायीला नदीवर धुवायला नेण्याचा कार्यक्रम ठरला . उत्साह एकदम भरात .

दहा वाजले एकदाचे . गावातली जनावरं नदीकडे जायला निघाली .

' अम्मा , मै अपने गायकू न्हिलाके लाता हूं .'

' नही बेटा , नद्दीमें पानी भोत है , जानेका नही उधर . घरपरीच धो गायकू . पानी है घरपें .'

आजी आणि आईने एकाचवेळी नकारघंटा वाजवली .

दहा बारा वर्षाच्या पोराला ही चलाख गाय काय आवरणार , ही त्यांची चिंता . ती तशी रास्तच होती .

गावातली सगळी जनावरं घरासमोरून नदीकडे जातायत , आणि आपली गाय घरी ? मन खजील होत होतं .

काय करावं कळेना . चला , आई म्हणते तसंच करूया . घरीच अंघोळ घालूया तिची .

पिंपात पाणी भरून घरासमोर आणून ठेवला . गोठ्यात खुंट्याला गुंडाळलेला गायीचा दोर सोडला . तोंडाने प्रेमाने पुचकारत हळूहळू तिला बाहेर ओढत आणलं . तेवढ्यात रस्त्यावर जोरात आवाज झाला ... धडाह्यह्यह्यमधूम ... कुणीतरी मोठा फटाका फोडला . तोच गाय घाबरली आणि जी धूम ठोकली ती सरळ जंगलाच्या दिशेनं ... सुसाट ...

बोंबल्ल सारं ... ज्याची भीती होती तेच झालं . अख्या गावात एकलकोंडी म्हणून कुप्रसिद्ध असलेली आपली ही गाय आज काही देवळात पाया पडायला येणार नाही बुवा . रडकुंड्या चेह - याने आईकडे तक्रार .

' गाय भाग गई , अम्मा .. अब क्या करू '

' जाने दे बेटा , तू पिछे मत लग उसके . एकलकोंडी गाय है अपनी . वो क्या जाएगी सबके साथ '

असं कसं . गज्या , सुध्या , नाम्या .. सगळ्यांची जनावरं जाणार देवळात आणि आपली गाय घरी ?

उद्या मित्रांना काय म्हणून तोंड दाखवणार . चिडवणार ते सगळे . विषय आता प्रतिष्ठेचा बनला होता . काय करायचं . रडारड जोरात सुरू .

ठरवलं ... जंगलात जायचं . गायीला शोधायचं . आणि पकडून आणायचं . तिला अंघोळ घालून न्यायचं म्हणजे न्यायचंच देवळात . अशीकशी येत नाही बघू .

स्वारी पळतच सुटली जंगलाच्या दिशेनं . गायीच्या शोधात . अरेच्चा ... गाय कुठं दिसत नाही . लांब लांब दिसत नाही . फुल्ल टेंशन ... डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरूच होत्या . डोक्यात भुंगा , कुठल्या दिशेनं गेली असेल ती .

तेवढ्यात समोरून एक माणूस येताना दिसला .

' आनेजी , हिकडे गाय दिसली का हो तुमाले . पांढ - या रंगाटी हाय !

' तुयी गाय हाय का रे थी . दोन वावरापलीकडं धु - यावर चरते बा एक गाय . जा पाय तिकडे '

दोन शेत पळत गेल्यावर जीवात जीव आला . होय , आपलीच आहे ती गाय . पकडायचं आता तिला .

कुणीतरी आपल्याला पकडायला येतंय याची तिला चाहूल लागू नये म्हणून चोरपावलांनी तिच्या मागे पोचायचं ठरवलं . ती मात्र चरण्यात मश्गूल .

एक होतं . गाय प्रचंड घाबरट स्वभावाची होती . मारकुंडी मात्र नव्हती . नाहीतर घेतलं असतं शिंगावर .

जवळ पोचलो खरा . पण पकडायची कशी तिला ? समोरून गेलो तर आणखी पळत सुटेल . म्हणून मागून जाऊन दोन्ही हातांनी तिचं शेपूट गच्च पकडलं आणि गाय जोरात उधळली . जोरात पळत सुटली . शेपूट हातात असल्यामुळं मीही फरफटत तिच्यामागे ... अनवानी असल्यामुळं बाभळीचे मोठमोठे काटे खसाखस पायात रूतत होते . रक्तही येऊ लागलं होतं . पण सुद कुठं होती . गायीला पकडण्याचाच ध्यास डोक्यात . जंगलात जोरजोरात रडणं सुरू झालं . गाय काही पकडल्या जात नव्हती . शेवटी हार मानली , नव्हे मानावीच लागली . सोडलं तिचं शेपूट . हासडल्या दोन चार अस्सल गावठी शिव्या आणि रडत रडतच घरी परतलो . घरच्यांना घडलेली कहाणी सांगितली . सर्वांनी मूर्खात काढलं . सांगितलं होतं कुणी तुला जंगलात जायला ?

गायीला देवळात पाया पडायला घेऊन जाता येणार नाही , हे तर स्पष्ट झालं होतं . याच विषयावरून घरात राडा सुरू झाला . घर डोक्यावर घेणं वगैरे झालं ...

घाबरट स्वभावाची गाय . कुणी पकडायला गेलं की शेजा - यांच्या घरात घुसायची . अगदी आतल्या खोलीपर्यंत . जात्याजवळ जाऊन बसायची . मग घरच्यांचा निर्णय झाला . असं वाह्यात जनावर नको पाळायला . वर्षभराच्या आत तिचा निकाल लावला . शेजारच्या गावातल्या शेतक - याला विकून टाकली .

साधारण चार पाच वर्षांचा कालावधी गेला असणार . वडिलांनी म्हैस विकत आणली . टम्म पोट सुटलेलं तिचं . गाभूळ म्हशीचं घरात आगमन झालं .

' म्हशीला हल्या नको व्हायला . वगारच झाली पाहिजे .' येणारे - जाणारे इच्छा व्यक्त करायचे . माणसांच्या अगदी उलट विचार . तिकडे मुलगा हवा असतो . इकडे मात्र तो जेंडर व्यावसायिकदृष्ट्या फायद्याचा नसतो .

एके दिवशी भल्या पहाटे म्हशीनं हंबरडा फोडला . बाहेर धो धो पाऊस सुरू असताना गोठ्यात तिनं छानशा वगारीला जन्म दिला . पहाटेच सगळे झोपेतून उठलो . वडिलधा - यांची सुरू असलेली लगबग टुकूटुकू बघत होतो . नुकतच जन्मलेल्या पिल्लाला म्हशीने चाटू नये म्हणून त्याला घरात आणून ठेवलं . व्वा .. किती सुंदर आहे पिल्लू ... वगैरे कौतुक सुरू झालं .

रांगत रांगत म्हशीचं ते पिल्लू काही दिवसानंतर तुरुतूरु चालायला लागलं . एकदम सगळ्यांचं फेवरेटही झालं . मुलांना एक खेळणं मिळालं होतं .

' अब इसका नाम क्या रखनेका ...' भावंडांमध्ये चर्चा सुरू झाली .

' बदामी , कबरी , चमेली , वगैरे वगैरे '

' ये क्या नाम है ? सब जुने पुराने '

' इसका नाम डायना रखेंगे .'

' डायना ! ए क्या भल्ता नाम ?

थोड्या ऑर्ग्युमेण्टनंतर शेवटी डायना हेच नाव फिक्स झालं .

आलिशान कारमध्ये डोडी अल फहेदच्या कुशीत बसलेली डायना अपघातात नुकतीच मरण पावली होती . तिच्याविषयी जबरदस्त कुतूहल चाळवलं . टीव्ही , रेडियो , वर्तमानपत्रांनी तर तिचा अख्खा कलरफूल जीवनपट समोर मांडला होता . एवढी सुंदर बाई अशी मरायला नको होती .

डायनाचा अपघाती मृत्यू त्यावेळी मनाला चटका लावून गेला होता .

म्हशीच्या त्या भुऱ्या रंगाच्या पिल्लूला नाव ठेवायची वेळ आली तेव्हा डायनाचं नाव चटकन जिभेवर आलं . डायना आता घरात सर्वांची लाडकी झाली होती . शेजारच्यांच्या घरातही तिचा बिंधास्त , मुक्त वावर असे . लाडकी असल्यानं तिच्या खाण्यापिण्याचीही चंगळ असायची . कुटुंबातली एक एक्सटेण्डेड मेंबर जणू . डायना झटपट मोठी झाली . पुढे कळपात चरायला जाऊ लागली . हळूहळू डायनाविषयीचं फॅस्सिनेशन ओसरू लागलं .

कारण इकडे सिरियस बिझनेस सुरू झालं होतं , शिक्षणाचं , अभ्यासाचं .

नंतर जनावरेही कमी झाली . नव्हे एकूण बदललेल्या परिस्थितीत ती पाळणं कठीण होऊन बसलं .

हळूहळू अक्कल येऊ लागली तेव्हा कळायला लागलं की जनावरं पाळणं सोप्प राहिलेलं नाहीये आता . पंचक्रोशित दुष्काळाचं सावट पडू लागलंय . पुरेसा पाऊसही पडत नाही . अशावेळी जनावरांना चारा आणणार कुठून . माणसांना प्यायला पाणी नाही अशावेळी जनावरांना कुठून आणून पाजणार . घरच्यांनी हळूहळू जनावरांची संख्या कमी केली .

सिमेंट कॉंक्रिटच्या जंगलात पाय ठेवल्यानंतर वर्षवर्षभर शेताचं तोंड बघणं बंद झालं . सुरूवाती सुरूवातीला घरी फोन केला की घरात असल्या नसल्या जनावरांबद्दल विचारपूस व्हायची . किती आहेत , दुभती किती , भाकड किती , धडधाकड किती वगैरे वगैरे ... कामाच्या धबडग्यात हळूहळू सारं मागं पडत गेलं ..

हो , मात्र ती पांढरी गाय आणि डायना आहे स्मरणात .. अजूनही !

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive