Sunday, July 1, 2012

कला-सौंदर्याचे लेणे Art of caves

भारतातीलच नव्हे, तर जगातील शिल्पसौंदर्याचा परमोच्च आविष्कार असलेल्या अजिंठा लेण्यांच्या परिसरात एकोणिसाव्या शतकात एक अद्वितीय प्रेमकथा आकाराला आली. अजिंठ्याचा शोध लागल्यानंतर तिथल्या शिल्पांची चित्रं काढण्यास आलेला रॉबर्ट गिल नावाचा इंग्रज अधिकारी आणि पारो नावाची अजिंठ्याची लेक यांच्यातील ही अभूतपूर्व प्रेमकथा त्या परिसरात कैक वर्षं एक दंतकथा बनून राहिली होती. विख्यात निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी 'अजिंठा' नावाचं खंडकाव्य लिहून ही कहाणी साहित्यसृष्टीत अजरामर केली. या काव्यावर सिनेमा करण्याचा मोह अनेकांना झाला. एक प्रख्यात मराठी दिग्दर्शक या कथेवर सिनेमा काढणार, अशी अनेक वर्षं चर्चा होती. मात्र, ती चर्चाच राहिली. शेवटी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी ही कलाकृती एखादं स्वप्न साकारावं, तद्वत रूपेरी पडद्यावर आणली आहे. नितीन देसाईंचा चित्रपट म्हटला म्हणजे देखण्या चित्रचौकटी आल्याच. प्रत्येक फ्रेममध्ये होणारी विविध रंगांची मनमोहक उधळण, उच्च निर्मितीमूल्यं, अभिजात संगीत आणि विषयावर प्रेम करून केलेली सुंदर निर्मिती यामुळं 'अजिंठा' हे रूपेरी पडद्यावरचे देखणे लेणे झाले आहे.

हा मराठी/इंग्लिश चित्रपट पाहताना आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती पाहत आहोत, असे सतत जाणवत राहते. भव्य सेट्स, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सजवलेल्या फ्रेम्स, खिळवून ठेवणारे छायाचित्रण यांच्या साह्याने मराठी चित्रपटाने घेतलेली ही भरारी पाहणे खूप सुखद वाटते. एखादी कलाकृती पाहताना आपण समृद्ध होत असल्याची जाणीव म्हणजे त्या कलाकृतीच्या श्रेष्ठत्वाची पावती असते. नितीन देसाईंचा 'अजिंठा' या निकषावर पूर्णपणे उतरतो. पहिल्या शिकारीच्या दृश्यापासून ते शेवटच्या पं. सत्यशील देशपांडेंच्या भैरवीपर्यंत (संपूर्ण नामावली संपेपर्यंत) प्रेक्षक जागचे हलत नाहीत, ही दादच पुष्कळ काही सांगून जाते.

' अजिंठा'चं निम्मं यश त्यातल्या 'युनिक' कथेतच आहे. दिग्दर्शकानं ही कथा पडद्यावर आणताना, जगातील सवोर्त्तम शिल्पकृतीच्या सान्निध्यात ती घडते आहे, याचं भान कुठंही सोडलेलं नाही. त्यामुळं अजिंठ्यातली ती भव्य, नि:स्तब्ध करणारी बुद्धलेणी कायम नेपथ्यासारखी कथेची सोबत करीत राहतात. कथेचा नायक इंग्रज अधिकारी असल्यानं तो पूर्णपणे इंग्लिशमध्येच बोलताना दाखविला आहे. कथेची सोय म्हणून त्याला मराठीत बोलता केलेला नाही. त्यामुळं त्याचं आणि पारोचं अक्षरश: शब्दांपलीकडं जाणारं प्रेम खूपच ठळकपणे व्यक्त होतं. रॉबर्ट आणि अन्य गावकरी यांच्यातील संवाद थोडा तरी सुसह्य व्हावा, यासाठी इथं जलालुद्दीन नावाच्या दुभाष्याची योजना आहे. शिवाय रॉबर्टला अजिंठ्याच्या चित्रांमागचा इतिहास सांगण्यासाठी विश्वंभरशास्त्री नावाचे पात्र कथेत येते. या दोन्ही पात्रांमुळं कथा प्रवाही होण्यास मदत झाली आहे. क्वचित या दोघांचा वावर गरजेपेक्षा अधिक वाटतोही; पण फारच थोडा वेळ.

या चित्रपटाला संगीत कौशल इनामदार यांनी दिलं आहे. सुमारे १० गाणी सिनेमात आहेत. त्यातील प्रत्येकाविषयी लिहायचं, तर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. तरीही होळीची गाणी आणि पं. सत्यशील देशपांडे यांनी गायिलेली 'सरण जळताना' ही भैरवी यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढं जाता येणार नाही. एकोणिसाव्या शतकाचा आणि तत्कालीन ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा बाज नेमका पकडणारं हे संगीत कथेत छान मिसळून गेलं आहे. ना. धों. महानोर यांच्या गीतरचना अनुभवाव्या अशाच. एकूणच या सिनेमाची ऑडिओ सीडीही संग्राह्य होणार, यात शंका नाही.

याचा अर्थ हा सिनेमा १०० टक्के परिपूर्ण आहे, असे मात्र नाही. काही 'पॉलिटिकली करेक्ट' गोष्टी दिग्दर्शकाने दाखविल्या आहेत, हे अगदीच जाणवतं. मध्यंतरापूर्वी कथेचा वेगही काहीसा मंदावल्यासारखा वाटतो. तसंच गाण्यांचा भडिमार होतोय की काय असंही वाटतं.

अभिनयात फिलिप स्कॉट वॉलेस यानं रॉबर्ट गिलची भूमिका खूपच समरसून केली आहे. रॉबर्टचं कलासक्त मन आणि अजिंठ्याच्या चित्रांमागचं तत्त्वज्ञान समजून घेता घेता भारताच्या प्रेमात पडणारा अधिकारी त्यानं समजून साकारला आहे. विश्वंभरशास्त्री एकदा त्याला बुद्धाचं तत्त्वज्ञान समजावून सांगत असताना, तो भारताचं वर्णन करतो- 'हा देश रसरशीत जगण्यानं भरलेला आहे, शांतताप्रिय आहे, धबधब्यातून कोसळून पुन्हा आकाशाकडं उसळणाऱ्या थेंबासारखा विजिगीषू आहे, आध्यात्मिक आहे, अगदी विशुद्ध आहे... पारोसारखा!' त्याच्या या उद््गारांतून त्याचं व्यक्तिमत्त्वही प्रतीत होतं आणि त्यांच्या प्रेमकहाणीचंही.

सोनाली कुलकर्णी (ज्यु.) हिच्या आयुष्यातली 'मैलाचा दगड' ठरावी, अशी भूमिका तिला पारोच्या रूपाने मिळाली आहे. तिनंही या संधीचं सोनं केलं आहे. मूळच्या गोऱ्यापान सोनालीला या भूमिकेसाठी सावळ्या रंगात रंगावं लागलं आहे. पण त्या रंगाचा सगळा देखणेपणा तिनं अवघ्या देहात आणला आहे. 'बुद्धदेवांचं काम' म्हणून सुरुवातीला रॉबर्टला मदत करणारी, लहानपणीच आई-वडील गमावलेली, नंतर हळुवारपणे रॉबर्टला तन व मन अर्पण करणारी आणि त्याच्या वियोगानं व्याकुळ होणारी पारो तिनं अप्रतिम साकारली आहे.

मकरंद देशपांडे, अविनाश नारकर, मनोज कोल्हटकर आदींची कामेही पूरक. हिंदीत नेहमी दिसणाऱ्या मुरली शर्माने यातला गावाचा मुखिया, अर्थात खलनायक झोकात साकारला आहे.

कलासक्त आणि प्रेमावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी चुकवू नये, असेच हे कला-सौंदर्याचे लेणे आहे.

.........

निर्मात्या : नेहा व मीना देसाई

दिग्दर्शक : नितीन चंदकांत देसाई

पटकथा : नितीन देसाई व मंदार जोशी

संवाद : अभिराम भडकमकर

छायाचित्रण : राजीव जैन

संगीत : कौशल इनामदार

प्रमुख भूमिका : फिलिप स्कॉट वॉलेस, सोनाली कुलकणीर्, मकरंद देशपांडे, मनोज कोल्हटकर, रीना आगरवाल, मुरली शर्मा आदी.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive