Saturday, March 20, 2010

गारेगार खाऊगल्ली

गारेगार खाऊगल्ली

मुंबईत पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. त्याबरोबरच मुंबईतले काही खास टेस्टी पॉईंटही प्रसिद्ध आहेत.

चर्चगेटनजिकची खाऊगल्लीही त्यापैकीच एक. कोणत्याही अस्सल मुंबईकराला खाऊगल्ली माहीत नाही असं होणार नाही. कामानिमित्त दक्षिण मुंबईत आलं की 'थोडी सी पेटपूजा' करायला पावलं आपसूकच खाऊगल्लीच्या दिशेने वळतात. खिशाला फारशी चाट बसता पोटभर आणि चमचमीत खाता येऊ शकेल असं हे ठिकाण. पण दक्षिण मुंबईबरोबरच उपनगरातही आता सुरू झालीय एक खाऊगल्ली.

अंधेरीच्या या खाऊगल्लीचं वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे एसी आहे. मुंबईतल्या रस्त्यांवर वडापावपासून ते चायनीजपर्यंत जे-जे म्हणून खाणं मिळतं ते या खाऊगल्लीत उपलब्ध आहे. याबाबत सांगताना 'खाऊगल्ली'चे ऑपरेशन्स हेड सॅव्हिओ फर्नांडिस सांगतात की, मुंबईतल्या रस्त्यांवर लागलेल्या ठेल्यांवर २४ तास खाणाऱ्यांची गदीर् असते. रस्त्यावर मिळणारे पदार्थ चमचमीत असले तरी ते 'हायजेनिक' नसतात. ठेल्यांवर विकले जाणारे पदार्थ विकताना स्वच्छतेची काळजी नीटशी घेतली जात नाही. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही रस्त्यावर उभं राहून खाणं शक्य होत नाही. ज्यांना मुंबईतल्या रस्त्यांवर मिळणारे, तोंडाला पाणी सुटणारे ते पदार्थ खायचे आहेत पण तिथं उभं राहून खाणंही नकोसं वाटतं, शिवाय त्यांना स्वच्छ, ताज्या खाण्याचा पर्याय हवायं अशांसाठी सावंत यांनी ही खाऊगल्ली सुरू केली. विशेष म्हणजे इथं आल्यावर तुम्हाला अगदी रस्त्यावर उभं राहूनच तिथल्या झणझणीत, लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्याचा फिल मिळेल.

तब्बल १० हजार चौरसफुटांवर उभ्या राहिलेल्या या खाऊगल्लीत भेळपुरीपासून ते पावभाजीपर्यंत आणि भुजीर्पावपासून ते पास्त्यापर्यंत सबकुछ खायला मिळू शकतं. त्याच्या जोडीला आईसक्रिम, फालुदा, बर्फाचा गोळा आहेच. मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे इथली लोकल ट्रेन. हे लक्षात घेऊन खाऊगल्लीचा थोडासा भाग एखाद्या लोकलट्रेनच्या कंपार्टमेण्टसारखा बनवण्यात आला आहे. तिथं ट्रेनसारखी आसनव्यवस्था आहे, त्या भागात रेल्वेस्टेशनवर होतात त्याप्रमाणे अनाऊन्समेण्ट होत असतात. जे लोक ट्रेनने कधीही प्रवास करत नाहीत त्यांना ट्रेनमध्ये असल्याचा 'फिल' इथं मिळू शकेल.

अंधेरीतल्या वसोर्वा टेलिफोन एक्सचेंजजवळच्या म्हाडा लेनमध्ये ही खाऊगल्ली वसलीय. विशेष म्हणजे खाऊगल्लीत वीकेण्डला मुलांसाठी काही खास आकर्षण आहेत. संपूर्ण भारतात हे अशा प्रकारचं पहिलंच फूड आऊटलेट म्हणता येईल. यंदाच्या सुटीत मुलांना घेऊन या खास खाऊगल्लीला भेट द्यायला हरकत नाही.
........

मराठी पाऊल...

भेळपुरी, डोसासारख्या खाद्यपदार्थांचे ठेले म्हटले की नजरेसमोर एखादा उत्तरभारतीय किंवा दक्षिण भारतीय येतो. पण एसी खाऊगल्लीची अनोखी कल्पना आहे विश्राम सावंत या मराठी माणसाची. सावंत हे अॅडव्हर्टायझिंग आणि फिल्म क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव. या क्षेत्रात कार्यरत असतानाच पण अशी खाऊगल्ली उभारण्याची आगळीवेगळी कल्पना त्यांनी मुंबईत प्रत्यक्षातही उतरवून 'मराठी पाऊल पडते पुढे' हे सिद्ध केलं.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive