Sunday, September 12, 2010

सुरेल कम्फर्ट देणारे घर

सुरेल कम्फर्ट देणारे घर

 

आपलं स्वतःचं घर असावं, असं कोणाला नाही वाटणार. आपल्या सगळ्यांच्या घराबद्दलच्या संकल्पना, व्याख्या आणि सजावटीच्या आवडी वेगवेगळ्या असतात आणि त्या वेगळ्या असणं यात काही गैर नाही.

 

या चार भिंतींच्या आतले आणि पलीकडचे जीवन यात फरक असावा, हे सगळ्यांनाच वाटतं. म्हणूनच तर आपण ऑफिस आणि घर यात खूप अंतर ठेवतोच. घराला घरपण देणारी ती शेवटी माणसंच.

 

आपल्या प्रत्येकाच्या घरात असा एक कोपरा असतो जो आपल्याला या त्या कारणाने आनंदी ठेवतो किंवा काही वेळ दुःखही देत असतो. तोच घरातला कोझी (cosy corner) कॉर्नर आपल्याला सुप्त गुणांना वावही देतो.

 

डॉ. सलील कुलकर्णी, प्रसिद्ध गायक आणि म्युझिक कंपोझर यांच्याही घरात असा एक कोझी (cosy corner) कॉर्नर आहे जिथे त्यांना बऱ्याच कवितांच्या चाली सुचतात. ते म्हणतात, ""माझ्या घरात मला माझ्या आईच्या खोलीत बसल्यावर चाली सुचतात. त्यामुळेच मी आजपर्यंत आणि भविष्यातदेखील मी माझा comfort zone  म्हणू शकतो. आजपर्यंत माझी जेवढी गाणी प्रचलित झाली, त्यातल्या बहुतांश चाली मला तिथे बसल्यावर सुचल्या, असं म्हणायला हरकत नाही; पण असंही नाही की, तिथेच बसल्यावर सुचल्या. बऱ्याच वेळेला मी शो साठी बाहेर फिरतीवर असतो. त्यामुळे काही वेळा त्या प्रवासादरम्यानही सुचतात. अजूनही आमच्या घरातल्या हॉलमध्ये मी बऱ्याच वेळा पेटीवर प्रॅक्टिस करतो. तोही एक घरातला असा एक कॉर्नर जिथे मी शांत मनाने, कुणाच्याही डिस्टर्बन्सशिवाय आरामात बसू शकतो. आमच्या तीन बेडरूमच्या घरात आम्ही पाच जणं राहतो. माझी आई, बायको (अंजली) आणि माझी दोन मुलं शुभंकर आणि अनया.

 

दोन्ही मुलं लहान असल्यामुळे घरात मोकळं वातावरण हवं म्हणून घरात जास्त फर्निचरची गर्दी नको म्हणून आम्ही मुद्दामच घर जरा मोकळं ठेवलं आहे, आणि मुख्य आकर्षण म्हणजे मुलांच्या खोलीतला बंक बेड (Bunk Bed).एक तर त्यांनी जागा पण वाचते आणि मुलांनापण आवडतं. माझी दोन्ही मुलं खूप दंगा-मस्ती करतात; पण ते त्यांच्याच खोलीत. त्यांची खोली वेगळी असल्यामुळे त्यांची सर्व खेळणीही त्यांच्याच खोलीत राहतात. या बंक बेडवर त्यांना खेळायला आवडतं.

 

माझा मुलगा शुभंकर हा "हनुमान भक्त' आहे. त्यामुळे घरात वेगवेगळ्या प्रकारचे हनुमान, वेगवेगळ्या कलाकृतींत मिळतील. धावपळीच्या युगात आपण मानसिक शांतता गमावून बसलो आहोत. त्यामुळेच निदान घरात तरी आपल्याला शांतता मिळावी असा आपण सगळेच प्रयत्न करत असतो. म्हणूनच सकाळी उठल्यावर तानपुरा लावून ठेवणे, हा अगदी नित्यक्रम असतो. त्यानी दिवसाची सुरवात खूप छान आणि प्रसन्न होते. त्याचीच सवय माझ्या दोन्ही मुलांनासुद्धा आहे. शेवटी आयुष्यात कितीही धावपळ करून आपल्याला मानसिक शांतता कुठे विकत मिळत नाही. ती आपली आपणच मिळवावी लागते. माझ्या घरात किंवा अंगणात मला नेहमीच एखादा झोपाळा असावा, अशी माझी इच्छा होती आणि फ्लॅटमध्ये इच्छा पूर्ण होईल की नाही अशी शंका आहे. या घरात आम्ही काही वर्षांपूर्वीच आलो. त्यामुळे छान ऐसपैस गच्ची आणि प्रशस्त हॉल हे दोन्ही आम्हाला अगदी मनासारखं मिळालं. आमच्या हॉलमध्ये आम्ही झोपाळा लावला, ज्यावर बऱ्याच वेळा गप्पा मारता येतात आणि कधीतरी मनसोक्तपणे मुलांबरोबर लहान होऊन झोका घेता येतो; पण मुलं लहान आहेत त्यामुळे तोच झोका काढून आम्ही त्याची "भारतीय बैठक' केली. त्याचा असाही छान उपयोग होईल असे आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.

 

हॉलमधल्या एका कोपऱ्यात टीव्ही युनिटमध्ये मला भेट मिळालेल्या बऱ्याच वस्तू मला मांडता येतात. एवढं की आता मला ते छोटं पडायला लागलं आहे. मोजक्या आणि खूप जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या भेटवस्तूच मी आता त्या शेल्फमध्ये ठेवल्या आहेत. एक व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की घराला घरपण आपल्या संस्कारांनी आणि घरातल्या वातावरणामुळे.

 

त्यामुळे सततच घरातलं वातावरण हे निर्मळ आणि आनंदी असावं, असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. घरात लहान मुलं असली की घराला एक वेगळं रूप येतं. मी जरी बऱ्याच वेळा फिरतीवर असलो तरी शेवटी घराची ओढ कायमच राहते.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive