Sunday, November 14, 2010

तारकांची तेजोमय परंपरा! उज्ज्वल परंपरा वहावत जाऊ नये

तारकांची तेजोमय परंपरा!
 

गेल्या पन्नास वर्षांतील मराठी तारकांची वाटचाल ही खूपच मोठी, अनेक वळणांची आहे. मी स्वतः चार पिढ्यांत अभिनेत्री म्हणून वाटचाल केलीय. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीवर "मराठी तारकां'नी आपली मोहोर उमटवलीय. हिंदी चित्रपटसृष्टीवर "नायकांचे राज्य' असले तरी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत मात्र अभिनेत्रींना अधिक अधिक सन्मान प्राप्त झाला आहे. शहरापासून खेड्यापाड्यापर्यंत पसरलेल्या चाहत्या वर्गावर मराठी अभिनेत्रींचा तुम्हाला विलक्षण प्रभाव दिसेल.

मराठी नायिकांच्या या वाटचालीत सुलोचनादीदींना सर्वात आधी मानाचं स्थान. जयश्री गडकर, हंसा वाडकर, सीमा देव, सुमती गुप्ते, उषा किरण यांनी आपला ठसा उमटवला. उषा किरणनं तर एकाच वेळी मराठी-हिंदी चित्रपटांतून अदाकारी केली. अदाकारी हा आमच्या पिढीचा खूप आवडता शब्द बरं का. आमच्याच पिढीत अनुपमा होती, नंतर आशा काळे, सरला येवलेकर वगैरे आल्या.

रंजनाचा झंझावात
आमच्या मागची पिढी म्हणजे खास करून रंजनाचा झंझावात सांगता येईल. रंजना ही अष्टपैलू व कमालीची हिकमती-मेहनती बाई. तिच्यात इतकी ऊर्जा कुठून व कशी यायची तेच समजायचे नाही. बघता बघता तिच्या चित्रपटांची संख्या वाढली, तिचे साम्राज्य उभे राहिले. ती मला आपली मोठी बहीणच मानायची. याच काळात स्मिता पाटील ही अगदी वेगळ्या पठडीतील अभिनेत्री आली. ती मराठी अन्‌ हिंदीतही चमकली. स्मितानं "मराठी तारकां'ना प्रतिष्ठा दिली. विशेषतः तिचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून हजेरी लावणे, चित्रपटावर गंभीर भाष्य करणे याविषयी साऱ्यानाच कौतुक व कुतूहल असे. याच काळात रुही, लक्ष्मीछाया, प्रिया तेंडुलकर, कानन कौशल, शलाका, सुषमा, मधु कांबीकर अशा बऱ्याचजणी आल्या. चुकून कोणाचं नाव घ्यायला विसरले तर क्षमस्व, एकदम सगळ्यांची आठवण येणेही तसे कठीणच आहे.

उषाचं कोंडकेपटातही अस्तित्व
उषा चव्हाण व उषा नाईक यांचा दरारा काही वेगळा होता. दोघीही नृत्यबिजली. लावणीनृत्यात एकदमच कडाडत. उषा चव्हाणनं तर दादा कोंडकेंच्या चित्रपटातूनही आपलं अस्तित्व दाखवून दिलं. मराठी अभिनेत्री जास्त सरस असे मी म्हणते, त्यालाही अशी बरीच कारणं आहेत. मराठी चित्रपट म्हटलं की बऱ्याचदा त्याची सर्वकालीन यशस्वी गाणी व ती गाणी पडद्यावर साकारणाऱ्या नायिका ही गोष्ट डोळ्यासमोर येतेच. अन्‌ त्यानंतर अन्य घटक येतात, ही एकच गोष्ट मराठी अभिनेत्रींच्या यशस्वी वाटचालीचा व प्रभावाचा पुरावा देण्यास पुरेशी आहे. यानंतरचा काळ प्रामुख्याने अश्‍विनी भावे, अलका कुबल-आठल्ये, वर्षा उसगावकर, रेखा राव, निशिगंधा वाड, किशोरी शहाणे, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुप्रिया सबनीस अर्थात नंतरची पिळगावकर, प्रेमा किरण आमच्या "प्रेमासाठी वाट्टेल ते'मधून आलेली कांचन घारपुरे म्हणजे आताची अधिकारी. तसेच आमच्याच "आपण यांना पाहिलंत का'मधून आलेली रेशम अशा बऱ्याच जणींची नावे घेता येतील. मृणाल कुलकर्णी, ऐश्‍वर्या नारकर, रेणुका शहाणे, आसावरी जोशी अशी किती जणींची नावे घेतली तरी ती कमीच आहेच.

यानंतरची पिढी म्हणजे आजची झटपट यश, पैसा, लोकप्रियता, गाडी मिळवू इच्छिणारी पिढी. बऱ्याच जणींची नावेदेखील सांगता येणे अवघड आहे. अनेकजणी तर सारख्याच दिसतात आणि त्यातील कितीजणींना आपला आब राखून करिअर करायचा आहे, कोण जाणे.

सोनाली कुलकर्णी - समर्थ अभिनेत्री
या पिढीत सोनाली कुलकर्णी एक खूप चांगली अभिनेत्री आहे. "गाभ्रीचा पाऊस', "रिंगा रिंगा' अशा भिन्न स्वरूपाच्या चित्रपटातून तिनं आपलं अस्तित्व अधोरेखित केलंय. नृत्याबद्दल आर्वजून नावे घ्यायची तर रेशम टिपणीस, दीपाली सय्यद, क्रांती रेडकर, मेघा घाडगे व अमृता खानविलकर यांची नावे घेईन. पण यातल्या दोघी-तिघींनी आपण अंगानं सुटत चाललेय याकडे जरा लक्ष द्यावे. कारण अभिनेत्रीच्या आयुष्याला रूप व बांधा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एकदा का त्यात काही गडबड झाली की मागणी कमी होण्याची शक्‍यता असते आणि एकदा का "नटीचं नाव खराब झालं की' किती कटकटी असतात काही विचारू नका. त्यामुळे अनेक प्रकारच्या मोहांवर नियंत्रण ठेवता यायला हवे. पण मी असे म्हटले की, लगेचच मला जुन्या विचारसरणीची गणले जाते.

चारित्र्य अन्‌ आदराचं स्थान
आमच्या पिढीच्या तारकांनी रूप, तब्येत तर जपलीच, पण केवढा तरी आदरही कमावला. आजही सुलोचनादीदी, सीमाताई कुठेही गेल्या तरी त्यांना आवर्जून वाकून नमस्कार केला जातो. त्यांना आदर मिळतो. "पडद्यावरच्या आयुष्याप्रमाणे सार्वजनिक प्रतिष्ठादेखील जपायची असते' ही आमच्या पिढीची शिकवण आहे, ती कोणी सांगून आमच्यात आली नाही, तर ती आमची आम्हीच शिकलो. आमच्या वेळी चित्रपटही खूप कमी बनत, त्यामुळे आयुष्यातील इतर गोष्टींचा विचार करण्यासाठी आनंद घेण्यासाठी खूप वेळ मिळे. अगदी आपली लग्ने वेळेवर व व्यवस्थित व्हायला हवी, याचीही आम्हाला जाणीव होती, म्हणून तर आम्हाला संसाराचे- संततीसुख लाभलं. आमच्या पिढीचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटसृष्टीतील अत्यंत खरे व कौटुंबिक वातावरण. तेव्हा मराठी चित्रपटाची शूटिंग्ज बऱ्याचदा कोल्हापूरात विशेषतः जयप्रभा स्टुडिओ व शालिनी स्टुडिओ येथे एकेका दिवशी दोन-दोन, तीन-तीन चित्रपटांचे शूटिंग असे. त्यातली तुम्हाला आणखी एक गंमत सांगते, दोन्हीकडच्या शूटिंगच्या "लंच ब्रेक'मध्ये बाहेर झाडाखाली सगळे कलाकार एकत्र जेवायला बसत, एकमेकांची विचारपूस करत, त्या एकोप्याचा परिणाम तेव्हाच्या चित्रपटात उतरलेला दिसेल. म्हणजे प्रत्यक्षातील कौटुंबिक वातावरण मग कॅमेऱ्यासमोरही उतरे व तेव्हाच्या चित्रपटातील कौटुंबिक प्रसंग उत्तम रंगत, भावूक होत. त्या काळात आम्हाला चित्रपटातून काम करण्याचे फारसे पैसे मिळत नसत. पण कामाचा आनंद, बरोबरच्या कलाकार-तंत्रज्ञांबद्दलचे आपलेपण या गोष्टी खूप मोठ्या होत्या. आम्हा तारकांत आपण चांगले दिसायला हवे, काम चांगले करायला हवे याची व्यक्तिगत पातळीवर जाणीव होती. पण त्यात कसलीही असूया नव्हती. अगदी आजही नाही. तेव्हा जुळलेली नाती नंतरही कायम राहिली. मराठी चित्रपटसृष्टीनं मला काय दिले असे कोणी विचारले तर मी या अस


्‌सल नात्यांचा खास उल्लेख करते. माझं सुलोचनादीदींकडे जाणं-येणं असतं. माझ्या लग्नाच्या वेळी जयश्रीजींना खास आवर्जून घरी बोलावले. त्या गेल्या तेव्हा आमच्या काळाच्या किती आठवणी आल्या काही विचारू नका. सीमाताई कुठे कार्यक्रमात भेटल्या की, एकमेकींच्या तब्येतीची विचारपूस होते. हे आपलेपण चित्रपटाच्या जगाच्या बाहेरची गोष्ट आहे, ती मागून मिळत नाही तर एमकेकांच्या विश्‍वासातून मिळते. अर्थात हे तेव्हाच्या एकूणच सामाजिक वातावरणातून घडले.

अडवणूक करण्याची प्रवृत्ती नव्हती
"जयप्रभा' स्टुडिओत देवळाचा सेट लावण्यासंदर्भात खुद्द भालजी पेंढारकरांनी विशेष सहकार्य केले आणि मग रंजनानेही आपल्या बिझी शेड्युलमधून खूप आपलेपणानं महत्त्वाच्या तारखा दिल्या. उगाचच कोणाची अडवणूक करण्याची तेव्हा प्रवृत्ती नव्हती. खरं तर तेव्हाचा काळ खूप भारावलेला होता. आमच्या काळात बऱ्याच तारका बसने प्रवास करीत. मुंबईवरून कोल्हापूरला सेकंड क्‍लासने नेले जाई. आमचे वागणंही सहकार्याचे-सुसंस्कृत होते. "थोरातांची कमळा'मध्ये सूर्यकांत यांच्यासोबत वंदना नायिका साकारणार होती व मला चिमणीची भूमिका दिली. माधवराव शिंदे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत होते. पण मुहूर्ताच्या वेळी बरीच वाट पाहून वंदना न आल्यानं ती भूमिका मला मिळाली. पण त्यावरून वंदनानं मनात राग ठेवला नाही. "नाते जडले दोन जीवांचे'मध्ये अनुपमा दुहेरी भूमिका साकारत असताना एका भूमिकेसाठीचे तिच्या कानातले कोल्हापूरात हरवले. पण तिने त्यावरून कसलाही ओरडा केला नाही, तर तिच्या वडिलांनी लगोलग दुकानात जाऊन ते कानातले आणले. या गोष्टी लांबून खूप छोट्या वाटतात. पण चित्रपट निर्मितीच्या एकूण प्रवासात त्या खूप महत्त्वाच्या असतात.

वर्षा-किशोरी-अश्‍विनीमुळे नवी फॅशन
आमच्या पिढीत रुजलेल्या अनेक चांगल्या गोष्टी पुढच्या पिढीतील तारकांतही कायम राहिल्या. त्यांना इतक्‍या सहजी धक्का बसणे शक्‍यही नव्हते. तिसऱ्या पिढीतील तारकांत वस्त्रांबाबतही जागरुकता दिसते. आमच्या काळातील तारकांचे निर्मात्यांनी खूप लाड केले. गिरगाव-दादरमधील प्रतिष्ठित दुकानातून साड्या खरेदी करायला संधी दिली. पण वर्षा-अश्‍विनी यांनी वेगवेगळ्या फॅशनची वस्त्रे मराठी चित्रपटांत आणली. त्यांच्या रूपाला ती विलक्षण साजेशीही ठरली. वर्षा-किशोरीनं स्वतःचा फिटनेस सातत्यानं राखल्याचं दिसतं. दोघींच्याही कारकिर्दीला वीस वर्षे झालीत, पण अभिनेत्रीनं स्वतःला कसं जपायला हवं याचा जणू त्यांनी आदर्श दिलाय. दोघींनी खूप मेहनत घेतलीय, कारकिर्दीचे चढ-उतार पाहिलेत. हिंदी चित्रपटसृष्टीचाही अनुभव घेतलाय. पण या प्रवासात त्यांनी "मी एक अभिनेत्री आहे' याचं भान सोडलेलं नाही.

आजच्या पिढीत उथळपणा
पण आजची पिढी फार मोकाट व उथळ वाटते. त्यांच्या कल्चरवर बोलण्याचा मला खरंच हक्क आहे का, असा प्रश्‍न कोणी करेल. पण मराठी चित्रपटसृष्टीत तरी झ्याकपक वातावरण येईल, असे वाटले नव्हते. मध्यंतरी एका पार्टीत एकीनं मला व प्रकाशजींना पाहताना पटकन हातातील व्हिस्कीचा ग्लास लपवला. पण सिगारेटचं काय करायचं, हा प्रश्‍न तिला पडला. तिच्या बिनधास्त स्वभावाला ते रुचत असेल. पण इतकं व्यसनाधीन का व्हायचं? कधी समजते, अमकीने नवऱ्याला सोडले, तमकी मित्रासोबत राहते, वगैरे वगैरे. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटाच्या निर्मितीची संख्या वाढलीय, वाहिन्या वाढल्या, कामे मिळू लागली, पुरुष कलाकारांचा सहवास वाढला, पैसाही खूप आला, पण यातून खरंच मानसिक शांतता मिळतेय का? माझ्या खूप चांगल्या परिचयातील एका मराठी तारकेचे या सगळ्या हव्यासापायी आयुष्य उद्‌ध्वस्त झाल्याचे मी पाहिलंय. आम्ही तारका तर फार शिकलेल्या नव्हतो, पण वेगवेगळ्या, बऱ्या-वाईट अनुभवांतून आम्ही घडलो. आजच्या बऱ्याच तारका पदवीधारक आहेत. चांगल्या कुटुंबातील आहेत, विशेष म्हणजे आपली गुणवत्ता दाखवून द्यायला स्वतःला घडवायला त्याना अक्षरशः भरपूर संधी आहे, त्यावर "फोकस' ठेवण्याऐवजी उथळपणाची ही कसली संस्कृती. या पिढीत "कशाला उद्याची बात, जे काही करायचं ते आज व आताच करूया' अशी वृत्ती दिसतेय. या साऱ्यात काहीजणी सन्माननीय अपवाद आहेत. ही पिढी ग्लॅमरव्यतिरिक्त कशाचाच विचार करीत नाही की, काय असं वाटतं.

उज्ज्वल परंपरा वहावत जाऊ नये
भालजी पेंढारकर आम्हा तारकांना मुलीसमान वागवायचे. संस्कार करायचे. त्याची आज गरज आहे. मराठी तारकांची परंपरा अशी वाहवत जावू नये. आज कोणत्या नटीकडे कोणती गाडी आहे, तिचा मित्र कोण यावरून प्रतिष्ठा ठरत असेल तर मग चित्रपटातील त्यांच्या गुणवत्तेचं काय? स्त्रीची सभ्यता, शालिनता, प्रतिष्ठा जपणे तिचे कर्तव्य असते. पण त्याचाच विसर पडला तर कसे होईल? एखाद्या वाहिनीवर "मोलकरीण', "सुवासिनी', "मानिनी' पाहताना आजही भरून येते, ते दिवस पुन्हा येणार नसले तरी आजही कसदार कथानक, उत्तम तांत्रिक मूल्ये, दर्जेदार प्रसिद्धी व खणखणीत वितरण यातून मराठी चित्रपट प्रगती करतोय. "श्‍वास' व "हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी' हे तर "ऑस्कर'च्या स्पर्धेसाठी पाठवले गेले, आजच्या मराठी तारकांनी हा उंचावलेला दर्जा जपावा, हे उत्तम. अन्यथा "मराठी तारकांची ओळख' कदाचित कृष्णधवल काळातील आम्हा काही तारकांपुरती राहील.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive